हिंदू-मुस्लिम नसलेली पत्रकार सांगतेय, दिल्ली दंगलीत काय झालं?

२८ फेब्रुवारी २०२०

वाचन वेळ : ५ मिनिटं


चार दिवसांपासून धुमसणारी दिल्ली आता शांत झालीय. पण वातावरणात प्रचंड तणाव आहे. हिंदू-मुस्लिम दंगलीत सर्वसामान्य लोकांची घरंदारं, दुकानं जाळली गेलीत. लोक प्रचंड दहशतीखाली आहेत. हिंदू आणि मुस्लिमबहुल भागातल्या परिस्थितीची लाईव माहिती देणारा महिला पत्रकार ऐशालिन मॅथ्यू यांचा अंगावर काटे आणणारा हा रिपोर्ताज.

‘असलं कसलं नाव? मुसलमान आहेस की काय?’ हिंदू सेनेचा कार्यकर्ता राजनने मौजपूर मेट्रो स्टेशनजवळ हा प्रश्न विचारला. दिल्लीच्या उत्तरेला असलेल्या या मौजपूर भागात रविवारपासूनच तणावाचं वातावरण आहे.

मौजपूरच्या नूर-ए-इलाही परिसराच्या दिशेनं मी जात होते. तेव्हा डोक्यावर भगवा टीळा ओढलेला, हातात काठी घेतलेला एक तरूण मला हे प्रश्न विचारत होता. सुरवातीला या प्रश्नांनी मी गडबडलेच. मी काही उत्तर देण्याच्या आधीच तिथून जाणाऱ्या एका माणसानं सांगितलं, ‘ती हिंदुस्तानी आहे’ या उत्तरानं राजनही गडबडला आणि त्याच्या बोलण्यात थोडी नम्रता आली. तरीही तो माझा धर्म विचारत होता. शेवटी मी एक ख्रिश्चन आहे, हे मला त्याला सांगावं लागलंच. त्यानंतर तो मोकळेपणाने बोलू लागला. माझ्या ख्रिश्चन असण्याने मला जीवदान देण्याची ही माझ्या आयुष्यात घडलेला पहिलीच घटना होती.

‘आम्ही हिंदू आता जागे झालो आहोत,’ राजन बोलू लागला. ‘तुम्ही आमच्या बाजुच्या बातम्या कधीच छापत नाही. आपण पाकिस्तानी लोकांनी वेढलो असताना सुरक्षित कसं राहणार? मुस्लिम लोक दोन महिने धरणं धरू शकतात तर मग आम्हीही सीएएच्या समर्थनासाठी रस्त्यावर का उतरू शकत नाही? तुम्ही मला तुमचा नंबर द्या. आमच्या आंदोलनाची माहिती मी तुम्हाला देईन.’ असं म्हणून राजन पुढे निघून गेला.

जाफराबादवरून चांदबागकडे जाणाऱ्या ५ किलोमीटरच्या या सरळ रस्त्यावर हिंसाचाराच्या प्रचंड खाणाखुणा दिसतात. अनेक दुकानांची तोडफोड करून आग लावण्यात आली. त्यातली बहुतांश दुकानं मुस्लिमांची होती. या भागाला आता पोलिसांनी वेढा घातलाय. इथं हिंदू आणि मुस्लिमांचे थेट वेगवेगळे इलाखे दिसतात.

हेही वाचा : दंगलीतून वाचण्यासाठी मला गळ्यातली रूद्राक्षाची माळ दाखवावी लागली!

हिंदूंबद्दल आमची तक्रार नाही

सीलमपूरच्या थोडं पुढे जाफराबादनंतरच्या भागात मुस्लिम बायका गेल्या ४५ दिवसांपासून धरणं आंदोलन करताहेत. रविवारी २३ फेब्रुवारीला भीम आर्मीनं भारत बंद पुकारला होता. या भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी सीएएचा विरोध करणाऱ्या आंदोलकांनी एका बाजुचा रस्ता बंद करून टाकला. त्यानंतर भाजपचे नेते आणि दिल्ली निवडणुकीतले उमेदवार कपिल मिश्रा आपल्या समर्थकांसोबत मौजपूर इथं पोचले. आणि दिल्ली पोलिसांच्या अधिकाऱ्यांसमोरच रस्ता मोकळा करण्याची धमकी दिली. त्यानंतरच दिल्लीतलं वातावरण खराब व्हायला सुरवात झाली.

या प्रकरणानंतर आंदोलनं सुरू असणाऱ्या अनेक ठिकाणांची तोडफोड झाली. काही ठिकाणी पेट्रोल बॉम्ब फेकले गेले. जाफरबादमधे धरणे आंदोलनात सहभागी बायका सोमवारी खूप काळजीत होत्या. सोमवारच्या हिंसेचारात पाचेक लोकांचा जीव गेला. त्यात दिल्ली पोलिसांच्या एका कॉन्स्टेबलचाही समावेश होता. त्यानंतर काही बायका जाफराबाद मेट्रो स्टेशनखाली धरणे आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. इथं हळूहळू लोकांची संख्या वाढू लागली. त्यावेळी या आंदोलनावर हल्ला होऊ नये म्हणून मुस्लिम पुरूष नजर ठेवून होते.

काही वेळातच तिथं कपाळावर  टीळा ओढलेला एक तरूण दिसला. लोकांनी त्याला वेढा घातला आणि तिथून निघून जायला सांगितलं. त्याला कुणीही हातही लावला नाही. ‘दंगल करणारे भारतीय असूच शकत नाहीत हेच आम्ही लोकांना सांगतोय. ते गुंड आहेत. हिंदू बांधवांबद्दल आमची काहीएक तक्रार नाही. त्यातल्या कुणालाही जखम झाली तरी त्याचा त्रास आम्हालाही होतो. ही टोळी हल्ला करते तेव्हा रस्त्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीची नासधूस करत सुटते.,’ तिथंला इमरान सांगत होता.

जमावबंदी असलेल्या भागात जमली गर्दी

मौजपूर भागातली परिस्थिती खूप वेगळी आहे. हा मुळातच हिंदूबहुल भाग आहे. रात्री उशीरापर्यंत या भागातले लोक हातात काठी, दांडुके, लोखंडाचे रॉड घेऊन फिरताना दिसले. जय श्रीरामचा नारा लावत अनेक दुकानांची तोडफोड सुरू होती. त्यासोबतच हे लोक देश के गद्दारों ‘देश के गद्दारों को, XX XX सालों को’ अशी नारेबाजीही करत होते. 

ही टोळी काय करणार आहे याची चांगलीच कल्पना या भागात राहणाऱ्या लोकांना होती. त्यांनी या भागाला चारही बाजुंनी वेढलं होतं. पोलिस तिथं होते. पण डोळ्यासमोर होणारी हिंसा बघत राहण्याशिवाय त्यांनी दुसरं काहीही केलं नाही. या भागात राहणाऱ्या ज्येष्ठांनी मला सल्ला दिला, पुढे जाऊ नकोस. तिथे दगडफेक आणि जाळपोळ सुरू आहे, असं ते म्हणाले. फोन बाहेर काढू नकोस. कुणीतरी हातातून हिसकावून पळून जाईल, असंही त्यांनी मला सांगितलं.

या संपूर्ण भागात कलम १४४ म्हणजे जमावबंदी लागू करण्यात आलीय. पण मौजपूर मेट्रो स्टेशनजवळच्या शनि मंदिराशेजारी जवळपास ४०० लोकांची गर्दी जमली होती. त्या गर्दीतून वंदे मातरमचे नारे दिले जाताहेत. शनि मंदिराजवळ बसलेली ज्योती सांगते,‘दोन्ही बाजुंनी दगडफेक सुरू आहे. आमच्यातले अनेकजण जखमी झालेत. आमच्या हक्काची गोष्ट घेण्यासाठी आम्ही बाहेर का आलो नाही. आम्ही चारही बाजुंनी मुसलमानांकडून वेढलेलो होतो. असं रस्ते बंद करण्याचा त्यांना काय हक्क आहे. ते आम्हाला आदेश देऊ शकत नाहीत.’

हेही वाचा : होस्नी मुबारक: इजिप्तवर ३० वर्ष हुकूम राबवणारा शांतताप्रिय सत्ताधीश!

दंगलखोरांनी सीसीटीवी कॅमेरेही तोडले

तिथून थोडं पुढे गेल्यावर विजय पार्कमधे पूर्णपणे शांतता होती. इथं दोन्ही धर्माची माणसं राहतात. तर पुढे मुस्लिमबहुल नूर ए इलाही हा भाग लागतो. दोन्ही भागात लोक सावध होती. हिंदूबहुल भागात लोक काठ्या, दांडुकं आणि रॉड घेऊन गल्ल्यांमधे जय श्री रामचे नारे देत फिरत होती. तशीच इथं मुस्लिम भागात काही लोक लाठ्या घेऊन घरांसमोर जमाव करून उभं होती.

‘दगडफेक करण्यासाठी पोलिसच गुंडांना मदत करतायत. दोन्ही भागातला फरक तुम्ही स्वतः बघा. कलम १४४ लागू आहे म्हणून आम्हाला घरात रहायला सांगणारे पोलिस तिथं त्या टोळक्यांसोबत फिरतायत,’ असं या भागात राहणाऱ्या दानिशनं सांगितलं. तर याच भागातल्या हुसैनने दिलेली माहिती खूप धक्कादायक आहे. ‘पॅन्ट काढायला लावून सर्वसामान्य माणसं हिंदू आहेत की मुसलमान हे दंगलखोर लोकांकडून तपासलं जातंय. एक-दोन लोकांसोबत असं झालं असल्याचं मी ऐकलंय. पण नक्की माहीत नाही. आणि हे सगळं पोलिसांसमोर होतंय.’

‘एक गुंड प्रिया वस्त्र भांडारच्या छतावर चढला आणि त्याने आम्ही उभं होतो त्याबाजुला बंदुकीतून गोळ्या झाडायला सुरवात केली. त्यात ५ लोक जखमी झाले. दिल्ली पोलिस आमची मदत करतील का? आम्ही पोलिसांचे आदेश पाळतो. पण ते लोक पोलिसांचं काहीही ऐकत नाहीत. हिंदू सेनेच्या गुंडांची ही दहशत आम्ही कधीपर्यंत सहन करायची? ते आमच्या गल्ल्यांमधे फिरतायत, हल्ले करतायत. आम्ही फक्त आमच्या मुलाबाळांच्या सुरक्षेसाठी उभं आहोत. त्यांच्या कृतीचं रेकॉर्डींग होऊ नये यासाठी त्यांनी सीसीटीवी कॅमेरेही तोडलेत,’ असं या भागातल्या फहादने सांगितलं.

फहादने जमिनीवर पडलेले रक्ताचे डाग दाखवले. एका माणसाला जांघेत गोळी लागली. त्याचे हे डाग आहेत. काही लोकांना हातावर, काहींना तर पोटावर गोळी मारली. त्यांना हॉस्पिटलमधे भरती केलंय. 

मीडिया निष्पक्ष नाही

सगळ्यात जास्त हिंसा भजनपुर भागात झाली. इथं ठिकठिकाणी मोटरसायकल, बस, ट्रक जळून खाक झालेत. रात्री उशिरापर्यंत आगीच्या धुराचे लोट आकाशात धुमसत होते. फायर ब्रिगेडच्या काही गाड्या आग विझवण्याचा प्रयत्न करत होत्या.

चांदबाग आणि खजूरी भागातलं कुणीही मीडियाशी बोलण्यास तयार नव्हतं. पण पुढे जाऊ नका असा सल्ला त्यांनी दिला. हे दोन्ही भाग मुस्लिमबहुल आहेत. ‘त्या बाजुला कशाला चाललीस? भजनपुर पोलिस स्टेशनमधे जा आणि रात्रभर तिथेच रहा. दिल्लीच्या दिशेला जाऊ नकोस. या भागातून बाहेर पडल्यावर तू सुरक्षित राहणार नाहीस’ असं एका हिंदू व्यक्तीनं मला सांगितलं.

चांदबागच्या बाजुला गेलं तर दंगलीच्या खाणाखूणा स्पष्ट दिसत होत्या. अनेक ठिकाणी जाळपोळ झालेली. लोकांच्या चेहऱ्यावर भीती दिसत होती. वातावरणात प्रचंड तणाव होता. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक माणसाकडे शंकेखोर नजरेनं पाहिलं जात होतं. लोकांना मीडियाबद्दलही विश्वास वाटत नव्हता. पत्रकार निष्पक्ष नाहीत, असं त्यांचं म्हणणंय

हेही वाचा : 

आपण इतके हिंसक का होतोय?

बाबरी मशीद निकालानंतर मुस्लिमांनी काय करावं?

नागरिकत्त्व दुरूस्ती कायद्याला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली नाही, कारण

ओबीसी असल्याचं सांगणाऱ्या मोदींनीच मागासवर्गीयांचा निधी कमी केला!

(पत्रकार ऐशालिन मॅथ्यू यांचा हा रिपोर्ताज नवजीवन इंडिया या हिंदी वेबसाईटवर प्रसिद्ध झालाय. रेणुका कल्पना यांनी त्याचा हा मराठी अनुवाद केलाय.)