मुंबईच्या काळजावर कोरला गेलेला ब्लॅक फ्रायडे

१२ मार्च २०२०

वाचन वेळ : ५ मिनिटं


१२ मार्च १९९३ ला देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत १२ साखळी बॉम्बस्फोट घडवून आणले. त्यामुळेच या दिवशी कुठलाही वार असो, १२ मार्च हा दिवस ब्लॅक फ्रायडे या नावानंच ओळखला जातो. आज २७ वर्षांनंतरही या ब्लॅक फ्रायडेच्या आठवणी पुसल्या जात नाहीत.

१२ मार्च १९९३. दुपारचे साधारण एक-दीडची वेळ झाली होती. दुपारचं ऊन डोक्यावर चढू लागलं होतं. त्यात मुंबईच्या दमट हवेनं ऊत आणला होता. मुंबईच्या फोर्ट परिसरात नोकरदारांची रेलचेल चालू होती. काला घोडा भागातल्या दलाल स्ट्रीटवरही तोच प्रकार होता. तिथंली बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची बिल्डिंग जवळपास ४ हजार लोकांनी खच्चून भरली होती.

बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमधे चाललेला शेअर मार्केटमधली उलाढाल दुपारी दीडला बंद व्हायची. त्यासाठी एक मोठी बेल वाजायची. त्याआधी आता ट्रेडिंग करण्यासाठी अर्धाच तास उरलाय हे सांगणारा एक अलार्म १ वाजता वाजायचा. १२ मार्च १९९३ ला ही एकची बेल वाजली. ट्रेडिंगशी डायरेक्ट संबंध नसलेले अनेक जण जेवणासाठी मोकळे झाले आणि निघून गेले. दुसरी बेल झाल्यावर जवळपास सगळी बिल्डिंगच मोकळी होणार होती.

पण त्यादिवशी १:३० वाजताची बेल वाजायच्या आधीच लोकांनी जोराचा धमाका ऐकू आला. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या बिल्डिंगमधे पहिल्या मजल्यावर पार्क केलेल्या गाडीत बॉम्बस्फोट झाला होता.

त्यानंतर संपूर्ण मुंबईत एकामागून एक असे सलग १२ बॉम्बस्फोट झाले. त्यात शेकडो लोकांचा जीव गेला, अनेक लोक जखमी झाले. त्या दिवशी शुक्रवार होता. म्हणूनच मुंबईच्या इतिहासात ही घटना ब्लॅक फ्रायडे म्हणून ओळखली जाते. आज या घटनेला २७ वर्ष पूर्ण झाली. तरी आजही या घटनेच्या आठवणी मुंबईकरांच्या मनातून पुसल्या गेलेल्या नाहीत.

हेही वाचा : तुम्हाला कोरोना फेक न्यूज रोगाची लागण झालेली नाही ना?

चारचाकी गाड्यांमधे लपवले होते बॉम्ब

१:३० वाजता बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या बिल्डिंगमधे बॉम्ब फुटला. त्यानंतर साधारण अर्ध्या तासाने मशीद बंदरला असणाऱ्या कॉर्पोरेशन बॅंकेसमोरच्या गाडीतून बॉम्बब्लास्ट झाला. अशा प्रकारे एकामागून एक १२ बॉम्ब फुटत गेले. दुपारी दीडला चालू झालेलं हे बॉम्बस्फोटांचं सत्र दुपारी ३ वाजून ४० मिनिटांनी थांबलं. २ तास १० मिनिटं मृत्यूचं तांडवं चाललं होतं. यातले अनेक बॉम्ब चारचाकी गाड्यांमधे ठेवण्यात आले होते. एखाद दोन स्कुटरमधे होते.

सी रॉक, जुहू सेंटर आणि एअरपोर्ट सेंटर ही तीन हॉटेलही टार्गेट केली गेली होती. त्यातल्या रूम्समधे राहून हल्लेखोरांनी सुटकेसमधे बॉम्ब लपवून ठेवले होते. अनेक बॅंका, स्थानिक पासपोर्ट ऑफिस, एअर इंडिया बिल्डिंग आणि मोठे मोठे मॉल्स अशी गर्दीची ठिकाणी निवडली होती. झवेरी बाजार आणि सेंचुरी बजार इथंही बॉम्बस्फोट झाले.

छोटे, हातात मावतात असे ग्रेनेड्स बॉम्बही या हल्ल्यात वापरण्यात आले. माहीममधल्या कोळी पाड्यात आणि सहारा इंटरनॅशनल एअरपोर्टवर याचा वापर केला गेला. एक डबल डेकर बसही उडवली गेली.

संजय दत्तचाही संबंध

स्फोटानंतर पोलिसांना माहीमला पोलिसांना एक मारुती वॅन आणि स्कूटर सापडली. या दोन्ही वाहनांमधे स्फोटकं भरली होती. पण त्यांचा स्फोट झाला नव्हता. तपास केल्यावर ही मारुती वॅन माहीमच्याच रुबिना मेमन हिच्या नावावर असल्याचं समोर आलं. या रुबिनाचा शोध घेत पोलिस तिच्या घरापर्यंत पोचले तेव्हा ती २ दिवसांपूर्वीच भारत सोडून निघून गेली असल्याचं पोलिसांना समजलं. तिच्या घराची झडती घेतल्यानंतर तिच्या घरात त्या स्कूटरची चावी सापडली.

पुढे हा शोध पोलिसांना टायगर मेमन पर्यंत जाऊन पोचला. हा टायगर संपूर्ण कुटुंबासोबत भारत सोडून पळाला आहे, हे पोलिसांना कळलं. 

त्यानंतर हा टायगर मेमन आणि दाऊद इब्राहीम हे दोघे या बॉम्बस्फोटामागचे मास्टरमाइंड आहेत हे स्पष्ट झालं. या दोघांव्यतिरिक्त दाऊदचा भाऊ अनिस इब्राहीम आणि टायगरचा भाऊ याकूब मेमन यांनाही दोषी मानलं गेलं. याशिवाय, अबू सालेम, मुस्तफा डोसा, फिरोज खान, ताहेर मर्चंट, रियाज सिद्दिकी, करीमुल्ला खान, अब्दुल कय्युम अशी गुन्हेगारांची मोठी फळी होती. यांना ईसीस या दहशतवादी संघटेनेचाही मोठा हात असल्याचं आता उघड झालंय.

हे सगळेच मोठे गुंड किंवा प्रख्यात दहशतवादी होते. मात्र दोषींच्या यादीतलं एक नाव आपल्या खूप ओळखीचं आहे आणि ते म्हणजे अभिनेता संजय दत्त याचं. दाऊद इब्राहीम याच्या दुबईतल्या या घरी संजय दत्तने अनेक फोन केले होते. त्यातलं रेकॉर्डिंग पोलिसांचा हाती लागलं होतं. दाऊदचा भाऊ अनिस इब्राहीम आणि संजय दत्त यांमधे अनेक खुरापती झाल्या होत्या. या शिवाय अबू सालेम या आरोपीचंही संजय दत्तच्या घरी येणं-जाणं असायचं. तपासादरम्यान संजय दत्त याच्याकडे एके ४७ ही बंदुकही सापडली होती.

हेही वाचा : मुंबई महापालिकेबद्दल या गोष्टी माहीत आहेत का?

बॉम्बस्फोटांबद्दल पोलिसांना माहीत होतं?

हे सगळं कशामुळे? ही घटना घडायच्या आधी २ महिन्यांपासून देशात तणावाचं वातावरण होतं. ६ डिसेंबर १९९२ ला बाबरी मशीद पाडली. त्यानंतर डिसेंबर १९९२ आणि जानेवारी १९९३ या काळात देशात अनेक ठिकाणी धार्मिक दंगली घडल्या. ‘ब्लुमबर्ग’च्या एका बातमीनुसार, या धार्मिक दंगलीतल्या १९ जणांना निवडून त्यांना बॉम्बस्फोटाच्या कटात सामील करून घेतलं. बाबरी मशीद पाडल्याचा बदला म्हणून हे बॉम्बस्फोट घडवून आणले होते.

या प्रकरणाच्या तपासाला गुल मोहम्मद या तरूणामुळे दिशा मिळाली. गुल मोहम्मद हा मुंबईच्या झोपडपट्टीत रहायचा. बाबरी मशीद पाडल्यानंतर तोही धार्मिक दंगलीत सामील झाला होता. टायगर मेमनने बॉम्बस्फोटाच्या कटात त्यालाही सामील करून घेतलं होतं.तो पाकिस्तानात ट्रेनिंगही घ्यायला गेला होता. भारतात आल्यानंतर त्याच्या भावाने पोलिसांना शरण जाण्यासाठी त्याचं मन वळवलं. 

भावाचं ९ मार्चला त्यांनं पोलिसांना भेट दिली आणि बॉम्बस्फोटाच्या कटाची सगळी माहिती पुरवी. पण पोलिसांनी तो थापा मारतोय असं म्हणून त्याच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केलं. तीन दिवसांनी बॉम्बस्फोटाने अनेक लोकांचे जीव गेल्यानंतर गुल मोहम्मद थाप मारत नव्हता हे स्पष्ट झालं.

हा गुल मोहम्मद पकडला गेल्यामुळे दाऊदला आपला प्लॅन लवकरात लवकर उरकून घ्यावा लागला. ही बॉम्बस्फोट साखळी तिथीनुसार येणाऱ्या शिवजयंतीला घडवून आणायची असा त्याचा प्लॅन होता.

ब्लॅक फ्रायडेवर सिनेमाही बनवलाय

या गुन्ह्यासाठी शेकडो लोकांना अटक केलं गेलं. अनेकांवर चार्जशीट दाखल केली गेली. २००७ मधे या प्रकरणाचा निकाल लागल्यावर न्यायालयानं १०० आरोपींना शिक्षा ठोठावली होती. टायगर मेमन आणि त्याचा भाऊ याकूब मेमन यांच्यासोबत १२ लोकांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. २० लोकांना जन्मठेव आणि उरलेल्या ६७ जणांना ३ ते १४ वर्षांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

यातल्या याकूब मेमनला ३० जुलै २०१५ ला फाशी देण्यात आली. पण दाऊद इब्राहीम आणि टायगर मेमन आजपर्यंत कधीही पकडले गेले नाहीत. त्यांनी पाकिस्तानात आश्रय घेतला आहे, असं म्हटलं जातं.

या संपूर्ण घटनेवर बॉलिवूडमधे ब्लॅक फ्रायडे या नावाचा सिनेमाही निघाला आहे. अनुराग कश्यप यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. या संपुर्ण घटनेत नेमकं काय झालं हे सांगणारी अनेक पुस्तकंही लिहिली गेलीयत. हिंसेला हिंसेनं उत्तर दिल्यानं काय होऊ शकतं याचंच उदाहरण ही पुस्तकं देत राहतात.

हेही वाचा : 

एके ४७: जगातली सगळ्यात यशस्वी रायफल

'मुंबई आय'मधून ठाकरे सरकार कुठली जत्रा दाखवणार?

गोताबाया श्रीलंकेचे अध्यक्ष बनलेत, याची चिंता भारताने करावी?

देशद्रोहाच्या कलमाला किंग ऑफ आयपीसी असं का म्हणतात?