यंदाची वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धा कोण जिंकेल यावर केव्हापासून अंदाज वर्तवले जाताहेत. सेमीफायनलच्या लढाईत आतापर्यंत ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड आणि इंग्लंड यांनी आपली प्रबळ दावेदारी पेश केलीय. पण वर्ल्डकप जिंकल्यावर त्या टीमचं, त्या खेळाडूंचं पुढे काय होतं?
जो संघ विश्वविजेता होतो, त्याचा पराक्रम इतिहासात नक्कीच स्थान मिळवतो. नाही म्हटलं तरी गेली ४५ वर्षे ही स्पर्धा सुरु आहे. यंदाची ही बारावी स्पर्धा आहे. ज्या खेळाडूंनी स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती त्यांच्या आठवणी जरूर आजही निघतात. पण बरेच जण विस्मृतीत गेलेत. असंही होतं की भले एक मॅचही न खेळलेला खेळाडूसुद्धा ह्याच कारणाने लक्षातसुद्धा राहिलेला असतो.
उदाहरण द्यायचं तर सुनील वॉल्सन यांचं देता येईल? १९९३ मधे कपिल देवच्या भारतीय संघाने विश्वचषक पटकावला. या संघातला सुनील हा एकमेव असा खेळाडू होता ज्याच्या वाट्याला एकही सामना आला नव्हता. ती स्पर्धा जिंकल्याने त्या भारतीय संघातली सर्व नवे मात्र आजही सर्वांना पाठ आहेत. म्हणून सुनील विस्मृतीत गेलेला नाही.
खरंच विश्वचषक जिंकल्यावर त्या संघाचं त्या देशात खूपच कौतुक होतं. अनेक समारंभ आयोजित केले जातात. खेळाडूंचा सत्कार होतो. बक्षिसांचा वर्षाव त्यांच्यावर होतो. विश्वविजय ही शेवटी महत्वाची बाब खरीच. अशा विजयाने कोणकोणते फायदे कोणाकोणाला झालेत हे बघणं मनोरंजक ठरेल.
हेही वाचाः ख्रिश्चनांच्या पंढरीत अवतरलीय धर्मगुरूंची क्रिकेट टीम
तर सांगायचं म्हणजे ही स्पर्धा सुरु झाली तेव्हा वेस्ट इंडिजचा संघ बलाढ्य होता. त्यांचा कर्णधार क्लाईव लॉईड याचा दबदबा होता. त्याने वेगवान गोलंदाजच वापरायचं तंत्र ठेवलं. ते यशस्वी ठरले. लॉइडच्या त्या संघाचं सगळ्याच क्रिकेट पंडितांनी कौतुक केलं. पण या संघाला घरी परतल्यावर फक्त हारतुरे मिळाले होते. विंडीज क्रिकेट मंडळ गरीब असल्याने ते खेळाडूंना फारसं काही देऊ शकले नाही.
पुन्हा १९७९ मधे ही स्पर्धा लॉईडच्या संघाने जिंकली. तेव्हा मात्र मंडळाने प्रत्येक खेळाडूला सोन्याची साखळी द्यायचं सौजन्य दाखवलं होतं. ह्या संघातील काही खेळाडू निवृत्तीनंतर छोटेमोठे धंदे करून गुजराण करू लागले. अँडी रॉबर्टस खतरनाक गोलंदाज. त्याला किरणामालाचं दुकान टाकावं लागलं. मात्र त्याने नंतर मग विंडीज संघाचं प्रशिक्षकपदही भुषवलं.
गॉर्डन ग्रिनिज बांगलादेशचा प्रशिक्षक झाला आणि त्याने या संघाची उन्नतीही केली. व्हीव रिचर्डस हा अँटिग्वामधला सर्वात श्रीमंत माणूस बनला. पण त्यानेच वर्णभेदी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जायची एक खासगी ऑफर नाकारण्याचा बाणेदारपणाही दाखवला. मायकेल होल्डिंग चांगला क्रिकेट समालोचक झाला.
लॉईड आजही विंडीज क्रिकेटला मदत करायला तत्पर असतो. त्यानेच अलीकडे विंडीज संघ गाळात रुतल्यावर तो सावरण्यासाठी जेसन होल्डरचं नाव सुचवलं ते कर्णधारपदासाठी. एरवी आंद्रे रसेल कर्णधार व्हायचा होता. पण लॉईडला रसेलपेक्षा होल्डर नेक आणि निष्ठावान क्रिकेटपटू वाटला. लॉईडचा अंदाज खरा ठरला. होल्डरने ह्या संघाला सावरलं. आजही तो फोनवरून लॉईडचा सल्ला घेत असतो.
भारताचा संघ १९८३ मधे विजयी झाल्यावर त्याचे कौतुक तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी त्यांना खाण्यास बोलावून केलं होतं. या संघाचं कौतुक खरं सांगायचं तर आताही सुरु आहे. पुढील वर्षी या संघाच्या कामगिरीवर ८३ नावाचा हिंदी सिनेमा येऊ घातलाय. याच संघातील रवी शास्त्री सध्या टीम इंडियाचा प्रशिक्षक आहे.
कपिल देव, सुनिल गावस्कर, श्रीकांत, मोहिंदर अमरनाथ हे सगळे समालोचकाच्या भूमिकेत बहुदा असतात. संदिप पाटील, रॉजर बिन्नी, बलविंदर संधू यांनी प्रशिक्षक म्हणून कुठल्या ना कुठल्या संघासाठी काम केलंय.
हेही वाचाः क्रिकेट म्हणजे पुरुषांचा खेळ, हा समज खोटं ठरवणाऱ्या बायका
विश्वविजयाचा खरा फायदा कुणी उठवला असेल तर तो पाकिस्तानच्या इम्रान खानने. त्याने जावेद मियान्दादकडून नेतृत्वाची धुरा घेतल्यापासून संघ निवडताना निवड समितीवर दबाव ठेवला. तो चिवट आणि धडाकेबाज खेळाडूच्या सतत शोधात राहिला. त्याने रस्त्यावरचे गुणी खेळाडूही हेरले. त्यातून वसिम अक्रम, वकार युनुस यासारख्यांना संधी मिळाली. त्याने संघात शिस्त आणली आणि मुख्य म्हणजे जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावण्यासाठी आग्रह धरला.
टीममधे धर्म, राष्ट्र याबद्दल जबरदस्त अभिमान पेरण्याचं काम इम्रानने केलं. परिणामी १९९२चा विश्वचषक त्याच्या संघाने जिंकला. तो जिंकल्यावर भाषण करतानाच त्याने बक्षिसादाखल मिळणारे पैसे हा संघ आपण बांधत असलेल्या कॅन्सरग्रस्तांसाठीच्या इस्पितळाला देईल असं जाहीर केलं. मग त्याने जगभरातून अर्थसहाय्य घेऊन आपल्या मातोश्रीच्या नावाने भलं मोठं हॉस्पिटल उभारलं.
हा सगळा प्रकार त्याच्या राजकारणाच्या प्रवेशाची नांदी ठरला. पुढे त्याने तहरिक-ए-इन्साफ नावाचा पक्ष काढला. आणि आपल्या लोकप्रियतेच्या जोरावर तो आज देशाचा पंतप्रधान झालाय. विश्वविजयाने सर्वाधिक फायदा कोणाला झाला असेल तर तो इम्रान खानला असं म्हणायला हरकत नाही.
२०११च्या स्पर्धेच्या वेळी सचिन तेंडूलकर आपल्या कारकिर्दीतली शेवटची आणि सहावी विश्वचषक स्पर्धा खेळत होता. म्हणून सगळ्या खेळाडूंनी विश्वचषक जिंकण्यासाठी प्रयत्न केला. हा चषक जिंकणं हे सचिनचं स्वप्न होतं. धोनीच्या संघाने हे स्वप्न पूर्ण केलं.
सचिनच्या झळाळत्या कारकिर्दीला या विजयाने सोन्याची झालर लावली आणि तेव्हाच सचिनला भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार देण्याची मागणी जोर धरू लागली. आणि सचिनला हा किताब लगेचच मिळालाही. विश्वविजयामुळे घडलेला हा फरक होता.
श्रीलंकेनेही एकदा विश्वचषक जिंकला तो १९९६ मधे. त्यांच्या कॅप्टनने नवोदित खेळाडू घेऊन चांगला संघ बांधला होता. सनथ जयसूर्या आणि अनुभवी अरविंद डिसिल्वा हे त्यांचे स्टार ठरले. पुढे अर्जून रणतुंगाला त्याच्या या अनोख्या कामगिरीने मंत्रिपदापर्यंत नेलं. सर्वच खेळाडूंना चांगले पैसे मिळाले. जयसूर्या एक कोळी. तो वैभवात लोळू लागला. विश्वसुंदरी स्पर्धेच्या निरीक्षाकात समावेश होण्याएवढी त्याने प्रसिद्धी मिळवली. अरविंद डिसिल्वा तर श्रीलंकेतला सर्वाधिक श्रीमंत खेळाडू बनला. हा परिणाम होता विश्वविजयाचा.
काय असेल ते असो पण सर्वाधिक वेळा ही स्पर्धा जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या संघावर मोठा बक्षीस वर्षाव कधीच झाला नाही. एलन बॉर्डरने १९८६च्या विश्वविजयानंतर तिथल्या क्रिकेटला नवसंजीवनी दिली. स्टीव्ह वॉ आणि रिकी पॉन्टिंग यांनी ऑस्ट्रेलियाचा विजयाचा सिलसिला बराच काळ चालवला. हे सर्व खेळाडू सधन झाले. पण ते राजकारणात आले असं काही झालं नाही.
उलट स्टीव वॉ मदर तेरेसांचं भारतातलं कार्य पाहून भारावला आणि दानधर्म करू लागला. ऑस्ट्रेलियाचे खेळाडू, चाहते, पत्रकार भावनांच्या भरात वाहून जाणारे नाहीत. म्हणून तिथल्या खेळाडूंची लोकप्रियता मर्यादित राहते. म्हणूनच ते सर्वाधिक वेळचे विजेते झाले असावेत.
हेही वाचाः
धर्म कसला बघताय क्रिकेटपटूंची जिगर बघा
सुप्रिया सुळेः लढणाऱ्या लेकीची बुलंद कहाणी
वेगन म्हणजे वेजिटेरीअन नाही, त्यापेक्षा बरंच काही