कोरोनाविरुद्धची लढाई भारताला सहा महिने लढावी लागेलः डॉ. जयप्रकाश

२७ मार्च २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


कोरोनाला रोखण्यासाठी पंतप्रधानांनी २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केलीय. तिसऱ्या स्टेजमधे जाऊ नये यासाठी हे तीन आठवडे निर्णायक आहेत. याकाळात सोशल डिस्टसिंगच्या मदतीनं कोरोनाचं संक्रमण थांबवता येईल. लॉकडाऊन २१ दिवसांचा असला तरी ही लढाई आपल्या सहा ते नऊ महिने लढावी लागेल, असं प्रसिद्ध साथरोगतज्ञ डॉ. जयप्रकाश मुलियीर यांचं मत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्चला देशभरात २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली. अशी घोषणा करणारा भारत हा काही पहिलाच देश नाही. या आधीही चीन, इटली, अमेरिका, ब्रिटन यासारख्या देशांनी लॉकडाऊनची घोषणा केलीय. त्यामानाने आपण लॉकडाऊन जाहीर करायला जरा उशीरच केला, असं म्हटलं जातंय.

कोरोना वायरसचं स्वरूप आणि भारताची आर्थिक आणि आरोग्य क्षेत्राची पार्श्वभूमी लक्षात घेता लॉकडाऊन हा भारतासमोरचा एकमेव पर्याय होता. तसंच आपल्या पंतप्रधानांनीही सांगितलंय. कोरोनाला रोखण्यासाठी भारताकडे लॉकडाऊनशिवाय दुसरा कुठलाच नसल्याचं मत प्रसिद्ध साथरोगतज्ञ जयप्रकाश मुलियील यांनी व्यक्त केलंय. संसर्गजन्य आजार पसरवणाऱ्या वायरसशी दोन हात करणारे साथरोगतज्ञ म्हणून ते सध्या चर्चेत आहेत.

हेही वाचा : कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

कोरोना रोखण्यासाठी फक्त २१ दिवस

जयप्रकाश मुलियील यांनी तामिळनाडूच्या वेल्लोरमधल्या ख्रिश्चन मेडिकल कॉलेजमधून मेडिकलची पदवी घेतली. बाल्टिमोर मधल्या जॉन हाफकिन युनिवर्सिटीत पुढचं शिक्षण घेतलं. नंतरच्या काळात त्यांनी ख्रिश्चन मेडिकल कॉलेजचे प्राचार्य म्हणून जबाबदारीही सांभाळली. आयसीएमआर अर्थात इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्चच्या अनेक समित्यांवर त्यांनी सल्लागार म्हणून काम केलंय. सध्या ते लेप्रसी मिशन इंटरनॅशनल या संस्थेत मेडिकल कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहेत. गेल्या अनेक दशकांपासून ते संसर्गजन्य रोगांवर अभ्यास करताहेत.

जयप्रकाश हे भारतातले आघाडीचे साथरोग तज्ञ म्हणून ओळखले जातात. कोरोना वायरस देशभर पसरतोय, तसं जाणकार व्यक्ती म्हणून ते सध्या मीडियात दिसतात. ब्लूमबर्ग क्विंट चॅनलला दिलेल्या एका इंटरव्यूमधे ते सांगतात, कोरोनाविरोधात २१ दिवसांचं लॉकडाऊन हे भारतात कितपत प्रभावी ठरेल हे आत्ताच निश्चित सांगता येत नाही. हा रोग आता दुसऱ्या स्टेजवर आहे. आणि भारताला समुदाय संक्रमणचा मोठा धोका आहे आणि तो टाळण्यासाठी २१ दिवसांचा हा किमान वेळ आपल्याकडे आहे.

२१ दिवस म्हणजे तीन आठवडे. या तीन आठवड्यात कशा पद्धतीनं काम केलं जाईल आणि आपल्याला काय काय सुविधा लागतील याची माहिती त्यांनी या मुलाखतीत दिलीय.

कोरोनाशी अजून सहा महिने लढायचंय! 

भारतात कोरोनाचा संसर्ग झालेले अनेक रूग्ण असण्याची शक्यता आहे. पण त्यांची वैद्यकीय चाचणी न झाल्यामुळे नेमकी आकडेवारी अजून समोर आलेली नाही. डॉक्टर मुलियील यांच्या मते, 'लॉकडाऊनच्या पहिल्या आठवड्यात अशा संक्रमण झालेल्या पण अद्याप समोर न आलेल्या एकूण रुग्णांचा डेटा आपल्याला उपलब्ध होईल. त्यावरून या संसर्गजन्य कोविड-१९ या आजाराचे परिणाम लक्षात येतील.'

'सुरवातीच्या काळात भारतात अशा रोगांची चाचणी घेण्याची योग्य आणि गुणवत्तापूर्ण पुरेशी सुविधा उपलब्ध नव्हती. त्यामुळे संसर्गित रुग्णांची नेमकी संख्या किती हे लक्षात येत नव्हतं. आता हा आकडा जवळपास पाचशेच्या वर असल्याचं आपण सांगत असलो तरी ही संख्या काही हजारोंच्या घरात असण्याची शक्यता आहे,' असाही अंदाज डॉ. जयप्रकाश व्यक्त करतात. ‘आत्ता आपल्याकडे उत्कृष्ट दर्जा असलेले टेस्टिंग किट उपलब्ध झालेत. त्यामुळे एका आठवड्यानंतर संक्रमितांची नेमकी संख्या समोर येईल,’ असं डॉ. जयप्रकाश यांचं म्हणणं आहे.

पण यासाठी सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट आहे ती लोकांनी फिजिकल डिस्टन्सिंग पाळणं. सोशल किंवा फिजिकल डिस्टन्सिंग पाळून कोरोनाचे आणखी रूग्ण तयार झाले नाहीत तरच २१ दिवसांनंतर या संसर्गाची वाढ ही नेमकी किती होते, हे लक्षात येईल. त्यामुळेच आत्ता लॉकडाऊन केला नसता तर मोठ्या आपत्तीला सामोरं जावं लागलं असतं, असं मुलियील सांगतात.

लॉकडाऊन दरम्यान लोकांनी स्वतःला शिस्त लावून आपल्या वागण्यात बदल करणं अपेक्षित आहे.. एकमेकांशी शारीरिक संपर्क न ठेवल्यानं किंवा एकमेकांमधे अंतर ठेवल्यानं या रोगाचं संक्रमण निश्चितपणे कमी होईल. लोकांना अशा संसर्गजन्य रोगांशी कशा पद्धतीने सामना करायचा याबद्दल माहिती मिळेल. दरम्यानच्या काळात यावर लसींची उपलब्धता होण्याची शक्यता आहे.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या २१ दिवसांच्या लॉकडाऊनच्या काळात कोविड-१९ आजारात्या आलेखाचा कर्व बदलून तो सपाट आणि स्थिर होईल, अशी आशा आहे. हा लढा सहा ते नऊ महिने चालवावा लागेल, असं असं मुलियील यांना वाटतं.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

सोशल मीडियात ज्ञानदा कोरोनापेक्षा जास्त वायरल का होतेय?

कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

कोरोनाः बिल गेट्सनी २०१५ मधेच दिलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष आपल्याला भोवतंय

कोरोनाला हरवण्यासाठी जग वेगवेगळे मार्ग अवलंबतंय, मग मोदी घरीच राहायला का सांगतात?

आरोग्य व्यवस्था सुधारायला हव्यात

'कोविड-१९ विरोधात लढण्यासाठी कोणत्याही देशाकडे आताच्या घडीला पुरेशी क्षमता नाही. आपल्याला देशातल्या या परिस्थितीचं काहीच वाटत नाही. पण आजही देशाच्या अनेक भागात आरोग्याच्या कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीत. संसर्गजन्य रोगांचा सामना करायचा असेल तर पुरेसे वेंटिलेटर उपलब्ध असणं गरजेचं आहे. आपल्याकडे सध्या ते उपलब्ध नाहीत.'

'सरकारकडून आरोग्य व्यवस्थेवर तुलनेने अत्यंत कमी खर्च केला जातो. आज कोविड-१९ आलाय, उद्या आणखी कोणता रोग येऊ शकतो. अशा रोगांविरोधात लढण्यास आपण नेहमीच सज्ज असले पाहिजे,' असं मुलियील म्हणतात.

‘कोविड-१९ वरच्या उपचारांसाठी केंद्र सरकारने १५ हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केलीय. भविष्यातल्या अशा प्रकारच्या समस्यांना तोंड देण्यासाठी आणि आरोग्य व्यवस्थेची क्षमता वाढवण्यासाठी ही पावलं उचलणं आवश्यक आहे. जिल्हास्तरीय आरोग्य केंद्रावर सर्व सुविधा उपलब्ध असायला हव्यात.’

दडपशाही करुन चालणार नाही

कोरोनाशी दोन हात करणं हे सरकारचं काम आहे. तसंच त्यासोबत नागरिकांचंही आहे. भारतीय संस्कृतीत शारीरिक संपर्क मर्यादित ठेवला जातो. कामाच्या ठिकाणीही एकमेकांमधे अंतर ठेवलं जातं. सध्या सोशल डिस्टन्सिंग राखण्याचं आवाहन केलं जातंय. या अशा प्रकारच्या गोष्टींची किती काळ गरज आहे हे सांगू शकत नाही. पण भारतीयांनी आताच याची सवय लावून घेतली पाहिजे. तळागाळातल्या भारतीयांच्या वागण्यात आणि आरोग्य सवयीत बदल होणं अपेक्षित आहे. हा लढा वैयक्तिक आणि कौटुंबिक पातळीवर लढला गेला तर निश्चितच मोठा फरक पडेल, असं मुलियील म्हणतात.

‘कामाच्या ठिकाणी बसमधून प्रवास करताना किंवा समाजात वावरताना एकमेकांमधे शारीरिक अंतर राखण्याशिवाय दुसरा पर्याय सध्या नाही. हे लॉकडाऊन संपल्यानंतरही पुढच्या सहा ते नऊ महिन्यांदरम्यान मोठे सोहळे, लग्न, समारंभ किंवा गर्दीचे कार्यक्रम टाळावेत. शारीरिक अंतर ठेवून लोकांनी काम करण्यास काही हरकत नाही. त्यामुळे अर्थव्यवस्था चालू राहील. हे फिजिकल डिस्टन्सिंग केवळ समाजात वावरताना असेल कौटुंबिक स्तरावर हे पाळलं नाही तरी चालेल.’

कोविड-१९ सारख्या रोगांविरोधात लढताना दडपशाही अपेक्षित नसल्याचं मत मुलियील मांडतात. कोरोनाविरोधातला लढा दीर्घकालीन आहे. त्यामुळे सक्तीच्या मार्गापेक्षा वैयक्तिक खबरदारी आणि सावध राहणं आवश्यक असल्याचं ते म्हणतात. सगळ्यांनी काळजी घेतल्यास प्रत्येकाचा जीव सुरक्षित राहील आणि इतरांचाही जीव वाचेल.

हेही वाचा : जय शेंडुरे: कोरोना आणि ट्रम्प प्रशासनाला पुरुन उरणारा रांगडा कोल्हापूरकर

भारतातल्या निम्म्या लोकसंख्येला कोरोनाचा धोका

पूर्वीच्या रोगापेक्षा आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. यापूर्वीच्या एच१एन१ अर्थात स्वाईन फ्लूचा विचार करता त्यावेळी संसर्गित व्यक्तीकडून पुढे संक्रमण होण्याचा कालावधी हा एक दिवसापेक्षा कमी होता. तसंच त्याचा सब-क्लिनिकल इन्फेक्शन रेट म्हणजे संसर्गाची लागण झालीय पण तो लक्षात न येण्याचा दर हा दहा वीस टक्के होता.

कोविड-१९ च्या केसमधे संक्रमण प्रसार होण्याचा कालावधी हा तीन दिवसांचा आहे. तसंच ५० टक्के संसर्गित लोकांना आपल्याला हा रोग झालाय, याची माहितीच नसते आणि ते पुढे संसर्ग प्रसार प्रक्रियेमधे भाग घेतात. भारतातल्या ५५ टक्के लोकांना कोविड-१९ पासून संसर्ग होण्याचा अंदाजही मुलियील यांनी स्क्रोल डॉट इनशी बोलताना व्यक्त केलाय.

हेही वाचा : 

कोरोनानंतर आपण वेगळ्याच जगात असणार आहोत

एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?

कोरोना वायरसः मोदींनी कुणाकडून घेतली जनता कर्फ्यूची आयडिया

विलगीकरण कक्षात डॉक्टर काय करतात, मुंबईची पत्रकार सांगतेय स्वानुभव

लॉकडाऊन न करता कोरोनाशी लढणाऱ्या दक्षिण कोरियाचं होतंय जगभर कौतूक