दोन वर्षात दुसऱ्या जागतिक आरोग्य आणीबाणीचं कारण ठरलेला मंकीपॉक्स

२९ जुलै २०२२

वाचन वेळ : ४ मिनिटं


मंकीपॉक्स हा वायरस ७८पेक्षा अधिक देशांमधे पसरलाय. जगभरात २० हजारापेक्षा अधिक पेशंट आढळून आल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेनं मंकीपॉक्सला 'जागतिक आरोग्य आणीबाणी' म्हणून घोषित केलंय. भारतातही मंकीपॉक्सचे पेशंट आढळलेत. त्यामुळे खबरदारी म्हणून केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्यात.

दोन वर्षांपूर्वी आलेल्या कोरोनानं जगभरात हाहाकार उडवला. लॉकडाऊनमुळे जग स्तब्ध झालं होतं. लोकांनी कोरोनाचा धसका घेतलाच पण वेगवेगळ्या पातळ्यांवर त्याचा फटकाही बसला. त्याचा संसर्ग जगभरात इतक्या वेगाने झाला की, त्यामुळे जागतिक आरोग्य संघटना अर्थात डब्ल्यूएचओनं कोरोनाला 'जागतिक आरोग्य आणीबाणी' म्हणून घोषित केलं. दोन वर्षातच नव्यानं आलेल्या मंकीपॉक्स वायरसलाही जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित करायची वेळ आलीय.

हेही वाचा: तुम्हाला कोरोना फेक न्यूज रोगाची लागण झालेली नाही ना?

मंकीपॉक्स जगभर पसरलाय

मंकीपॉक्स हा एक दुर्मिळ आजार आहे. १९५८मधे पहिल्यांदा हा वायरस माकडांच्या कळपामधे आढळून आला होता. त्यामुळेच त्याला मंकीपॉक्स हे नाव पडलं. १९७०ला मंकीपॉक्सच्या मानवी संसर्गाची पहिली केस समोर आली होती. मंकीपॉक्स वायरस हा मध्य आफ्रिकन आणि पश्चिम आफ्रिकन अशा दोन भिन्न वायरसच्या गटांचं एक वर्जन आहे.

मे २०२२ला मंकीपॉक्सच्या पहिल्या काही केसेस या पश्चिम आणि मध्य आफ्रिकेत आढळून आल्या होत्या. त्यानंतर हळूहळू हा वायरस अमेरिका, युरोप आणि आशियामधे पसरू लागला. त्यामुळेच २३ जुलैला डब्ल्यूएचओचे महासंचालक डॉ. टेड्रोस यांनी मंकीपॉक्स वायरस 'जागतिक आरोग्य आणीबाणी' म्हणून घोषित केली. आतापर्यंत ७८पेक्षा अधिक देशांमधे हा वायरस पसरला असून जगभरात या वायरसच्या २० हजारपेक्षा अधिक केसेस आढळून आल्यात.

मंकीपॉक्स हा प्राण्यापासून माणसात आणि माणसापासून माणसांमधे पसरतो. त्याची सर्वसाधारण लक्षणं ही ताप, डोकेदुखी, स्नायू आणि पाठदुखीचा त्रास अशी असून ही लक्षणं साधारण २ आठवडे ते १ महिना अशी असू शकतात. त्याशिवाय तळहात, चेहरा आणि पायाच्या तळव्यावर ओरखडे येणं आणि त्याचं मुरूम किंवा डागांमधे रूपांतर होऊ शकतं. संसर्ग झालेल्या व्यक्तीने वापरलेले कपडे, चादरी, उशीमधूनही हा वायरस पसरू शकतो.

सॉफ्ट टार्गेट कोण ठरतंय?

डब्ल्यूएचओच्या मते, मंकीपॉक्सच्या ९८ टक्के केसेस या बायसेक्शुअल आणि ज्या पुरुषांचे एकापेक्षा अधिक पुरुषांशी शारीरिक संबंध आहेत अशांमधे आढळून आल्यात. त्यामुळे अशा व्यक्तींनी आपले सेक्स पार्टनर कमी करायचा त्याशिवाय योग्य ती खबरदारी घेण्याचा सल्लाही डब्ल्यूएचओकडून दिला गेलाय.

दुसरीकडे लहान मुलं आणि गर्भवती महिलांनाही काळजी घ्यायला हवी. अशा व्यक्तीही मंकीपॉक्स वायरसचं सॉफ्ट टार्गेट ठरू शकतात. हा आजार दुर्मिळ असला तरी तो जीवावर बेतू शकतो. त्याचा सगळ्यात जास्त धोका हा तरुणांना असल्याचं डब्ल्यूएचओनं म्हटलंय.

हेही वाचा: कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना

भारतात मंकीपॉक्सची पहिली केस १२ जुलैला समोर आली होती. यूएईमधून केरळमधे आलेल्या एका व्यक्तीमधे मंकीपॉक्सचा हा संसर्ग आढळून आला होता. त्यानंतर केरळमधे पुन्हा २ तर २४ जुलैला दिल्लीतही १ केस समोर आली होती. त्यानंतर केंद्र सरकारने तात्काळ एक उच्च स्तरीय टीम केरळमधे पाठवली.

केरळमधे पहिला पेशंट आढळून आल्यावर १५ जुलैला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने खबरदारी म्हणून काही मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या. ज्या व्यक्ती मंकीपॉक्सचं निदान झालेल्यांच्या संपर्कात होत्या शिवाय ज्यांच्या अंगावर चट्टे आलेत आणि सोबत तापही आहे त्यांनी तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधण्याची महत्वाची सूचना सरकारकडून करण्यात आलीय.

प्रवास करणाऱ्यांसाठीही सरकारनं मार्गदर्शक सूचना जाहीर केल्यात. अशांनी आजारी लोकांशी विशेषतः ज्यांच्या त्वचेवर फोड आलेत त्यांच्यापासून संपर्क टाळावा. तसंच वन्य प्राण्यांशी विशेष करून उंदरासारख्या प्राण्याचा संपर्क टाळण्याचं आवाहनही सरकारने केलंय. तसंच वन्य प्राण्यांचं मांस खातानाही काळजी घ्यावी लागेल असंही मार्गदर्शक सूचनांमधे नमूद करण्यात आलंय.

भारतासाठी टर्निंग पॉईंट

कोरोना वायरस आल्यावर सुरवातीला जगभरात गोंधळलेलं वातावरण होतं. जस-जसं या आजाराचं निदान होऊ लागलं तसा संशोधनाला वेग आला. लसी आल्या. त्याच्या ट्रायल झाल्या. त्यानंतर वेगवेगळ्या कंपन्यांच्या लसी बाजारात आल्या. मंकीपॉक्सच्या बाबतीत तो गोंधळ पहायला मिळत नाहीय. वायरसचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन अमेरिका, कॅनडा, तसंच युरोपियन युनियननं आधीच डेन्मार्कच्या बवेरियन नॉर्डिक कंपनीची 'इमवॅनेक्स' ही लस वापरण्याची सूचना केलीय.

'इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च' अर्थात आयसीएमआर ही भारतातली सर्वोच्च वैद्यकीय संशोधन संस्था आहे. पुण्याची 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी' ही आयसीएमआरच्या अंतर्गत येते. याच संस्थेच्या शास्त्रज्ञांना मंकीपॉक्सचे विषाणू वेगळे करण्यात यश आलंय. मंकीपॉक्सवरची लस बनवण्यासाठी आणि ती लवकर बाजारात आणण्याच्या दृष्टीने हा मोठा टर्निंग पॉईंट ठरणार आहे.

मंकीपॉक्सचे भारतात आतापर्यंत ४ पेशंट आढळून आलेत. त्यादृष्टीने जलदगतीने होणारं संशोधन आणि अभ्यास महत्वाचा आहे. याआधी कोरोनाच्या लसीत महत्वाची भूमिका बजावलेली सिरम इन्स्टिट्यूटही आता मैदानात उतरलीय. लस विकसित करण्यासाठी सध्या सिरमकडून भागीदारांचा शोध घेतला जात असल्याचं कंपनीचे सीईओ अदार पुनावाला यांनी जाहीर केलंय. त्यामुळे लसीच्याबाबतीत एक नवी आशा निर्माण झालीय.

हेही वाचा: 

कोरोनानंतर आपण वेगळ्याच जगात असणार आहोत

एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

कोरोना वायरसः मोदींनी कुणाकडून घेतली जनता कर्फ्यूची आयडिया

विलगीकरण कक्षात डॉक्टर काय करतात, मुंबईची पत्रकार सांगतेय स्वानुभव