'ऑपरेशन गंगा'मागचं मिशन पॉलिटिक्स आहे काय?

०८ मार्च २०२२

वाचन वेळ : ४ मिनिटं


युक्रेनमधे अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने 'ऑपरेशन गंगा' सुरू केलं. युद्धजन्य काळात परदेशातल्या भारतीयांना बाहेर काढून एअरलिफ्टिंग करणं पहिल्यांदाच घडलं नाही. याआधीही अशा मोहिमा भारताने यशस्वी केल्यात. पण ५ राज्यांच्या निवडणुकांमुळे 'ऑपरेशन गंगा' चर्चेत ठेवलं गेलं.

रशिया-युक्रेनच्या युद्धात दोन्ही देशांमधे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना माघारी आणणं सगळ्यात मोठा टास्क आहे. रशियाकडून सातत्याने युक्रेनची महत्वाची शहरं बॉम्ब, मिसाईल हल्ल्यांनी लक्ष्य केली जातायत. या युद्धात युक्रेनमधल्या दोन भारतीय विद्यार्थ्यांना आपला जीवही गमवावा लागलाय. त्यामुळे त्यांना भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारने 'ऑपरेशन गंगा'ची घोषणा केलीय.

युक्रेनमधे अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी नरेंद्र मोदींमुळे पुतीन यांनी ६ तास युद्ध थांबवल्याच्या बातम्या मीडियातून पेरल्या गेल्या. ५ राज्यांमधल्या निवडणुका विशेषतः उत्तरप्रदेशला डोळ्यासमोर ठेवून हे सगळं चर्चेत राहील याची काळजी घेतली गेलीय. युद्धजन्य काळात परदेशातल्या भारतीयांना बाहेर काढून एअरलिफ्टिंग करणं काही पहिल्यांदा घडत नाहीय. अशा अनेक मोहिमा याआधी भारताने यशस्वी केल्यात.

लेबनॉनचं ऑपरेशन सुकून

इस्त्राईल आणि लेबनॉन या देशांमधे २००६ला युद्ध झालं. लेबनॉनच्या हिज्बुल्लाह या संघटनेनं युद्धादरम्यान आक्रमक पवित्रा घेत इस्त्राईलला टक्कर दिली. १९८२ला इस्त्राईलनं दक्षिण लेबनॉनमधे आक्रमण केलं होतं. त्याचवेळी हिज्बुल्लाहची स्थापना झाली. या संघटनेला इराण आणि सिरियाचं समर्थन आहे. इस्त्राईलच्या तुलनेत कमी सैन्यबळ आणि शस्त्रात्र असूनही लेबनॉननं हे युद्ध जिंकलं होतं.१२ जुलै २००६ला सुरू झालेलं हे युद्ध पुढचे ३४ दिवस चाललं.

या युद्धादरम्यान लेबनॉनमधे अडकलेल्या भारत, श्रीलंका, नेपाळ आणि लेबनॉनच्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारतीय नौदलाने 'ऑपरेशन सुकून' सुरू केलं. याला 'बेरुत सीलिफ्ट' असंही म्हटलं गेलं. या युद्धात एका भारतीयाचा मृत्यूही झाला होता. त्यावेळी केंद्रात मनमोहनसिंग यांचं सरकार सत्तेत होतं. 'ऑपरेशन सुकून'मधून भारतीय नौदलानं १८०० भारतीयांना सुरक्षितपणे मायदेशी आणलं. तर श्रीलंका, नेपाळ आणि लेबनॉनच्या नागरिकांचीही सुटका केली.

हेही वाचा: लोकशाही वाचवण्याचा वीस कलमी कृतीक्रार्यक्रम

नेपाळमधे ऑपरेशन मैत्री

२५ एप्रिल २०१५ला नेपाळमधे भूकंप आला होता. या भूकंपाची तीव्रता ७.८ रिश्टर स्केल इतकी होती. त्यात ८ हजार लोकांचा मृत्यू झाला. द क्विंटच्या रिपोर्टनुसार, १९९४नंतर नेपाळमधे आलेली ही सगळ्यात मोठी नैसर्गिक आपत्ती होती. त्यामुळे माउंट एवरेस्ट आणि नेपाळच्या लांगटांग वॅलीत हिमस्खन झालं. ज्यात २००च्या आसपास लोक बेपत्ता झाले.

नेपाळमधल्या लोकांना मदत आणि दिलासा देण्यासाठी भारताच्या गोरखा रेजिमेंटनं २६ एप्रिल २०१५ला 'ऑपरेशन मैत्री' सुरू केलं. यात नेपाळच्या माजी सैनिकांनाही सामावून घेतलं गेलं होतं. नेपाळमधे भारतीय नागरिकही अडकलेले होते. त्यामुळे भारताच्या तीनही दलांनी तिथं आपलं बचाव कार्य सुरू केलं.

ऑपरेशन मैत्रीअंतर्गत ५ हजार भारतीयांना विमानाने माघारी आणण्यात आलं. भारतीय वायू सेनेच्या आयएल७६, सी१३०जे हरक्यूलस, सी१७ ग्लोबमास्टर ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट, एमआय१७ या हेलिकॉप्टरनी मोलाची कामगिरी बजावली. या हेलिकॉप्टरमधून नेपाळची राजधानी काठमांडूमधे अत्यावश्यक साहित्य पोचवलं गेलं.

ऑपरेशन सेफ होम कमिंग

लिबिया हा उत्तर आफ्रिकेतला एक देश. कर्नल गद्दाफी हा हुकूमशहा इथला सत्ताधीश होता. २०११मधे त्याचं सैन्य आणि लिबियातल्या बंडखोर गटांमधे युद्ध सुरू झालं. या बंडखोर गटांना गद्दाफीला सत्तेवरून खाली खेचायचं होतं. १५ फेब्रुवारी २०११ला गद्दाफीच्या विरोधात बंडखोर गटांनी आंदोलन पुकारलं. पूर्ण देशभर ते पसरलं.

या युद्धादरम्यान १५ हजार भारतीय नागरिक लिबियात अडकले होते. त्यांना तिथून सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी २६ फेब्रुवारी २०११ला तत्कालीन मनमोहनसिंग सरकारनं ऑपरेशन होम कमिंग सुरू केलं. त्यासाठी एअर इंडियाची ९ विमानं पाठवली होती. या ऑपरेशनमुळे नौदलाला सुरक्षितपणे लिबियातून भारतीयांना बाहेर काढण्यात यश आलं.

हेही वाचा: लोकशाहीमुळे आर्थिक विकास खुंटतो?

दिलासा देणारं 'ऑपरेशन राहत'

अरब राष्ट्र असलेल्या येमेनमधे एप्रिल २०१५ला यादवी युद्ध झालं होतं. यावेळी यूएई, इजिप्त, जॉर्डन, बहरिन, कुवैत, मोरॅक्को या अरब राष्ट्रांनी एकत्रित येत येमेनमधल्या बंडखोरांवर लष्करी कारवाई केली. त्यावेळी येमेनमधे अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकारकडून 'ऑपरेशन राहत'ची घोषणा करण्यात आली.

तिथं अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यात एक अडचण होती. कारण या यादवी दरम्यान येमेनला 'नो फ्लाय झोन' घोषित करण्यात आलं होतं. त्यामुळे समुद्राच्या मार्गे 'ऑपरेशन राहत' सुरू झालं. तब्बल ३ हजार भारतीयांना येमेनच्या राजधानीत विशेष विमानाने आणलं गेलं. पुढे येमेनच्या बंदरांवरून भारतीय नौदलाच्या जहाजांमधून त्यांना भारतात आणण्यात आलं.

संरक्षण खात्याच्या २०१५च्या प्रेस रिलीजनुसार, भारतातल्या १६७० तर इतर २६ देशातल्या ९८० नागरिकांना हवाई-समुद्री मार्गाने सुरक्षितपणे बाहेर काढलं गेलं. भारताचं 'ऑपरेशन राहत' इतर देशातल्या नागरिकांसाठी दिलासा देणारं ठरलं.

वंदे भारत मिशन

२०२०ला कोरोनामुळे जगभरातल्या विमान उड्डाणांवर बंदी होती. सगळीकडे कोरोनाचा कहर होता. त्यामुळे भीतीचं वातावरण होतं. परदेशातल्या भारतीयांची मायदेशी येण्याची धावपळ सुरु होती. त्यांना माघारी आणण्यासाठी केंद्र सरकारने ७ मे २०२०ला भारतीय विमानांची व्यवस्था केली. २०२०मधे वर्षभरात परदेशात अडकलेल्या ७१ लाख भारतीयांना भारतात आणण्यात आलं.

केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार, ७ ते १७ मे २०२०मधे भारतातून विमानाची ८४ उड्डाणं झाली. पुढे वर्षभरात या १८ लाख नागरिकांना आणण्यासाठी ११,५२३ उड्डाणांची व्यवस्था करण्यात आली. सरकारच्या 'वंदे भारत मिशन'मधे मात्र परदेशातल्या भारतीयांना स्वतःच्या तिकिटांची व्यवस्था स्वतःलाच करावी लागली होती.

१९८० ते १९८८मधे इराण आणि इराकमधे युद्ध झालं. हे युद्ध तब्बल आठ वर्ष चाललं. कर्जाच्या बोझ्यामुळे इराकचा हुकूमशहा सद्दाम हुसेननं शेजारी राष्ट्र कुवैतवर आक्रमण केलं. त्यामुळे अमेरिकेसोबत ३४ राष्ट्रांनी एकत्र येत इराकवर हल्ला केला. इराकचं सैन्य कुवैतमधून हाकलवून देण्यात आलं. या आखाती युद्धामधे १ लाख भारतीय नागरिकांना एअरलिफ्ट करण्यात आलं.

हेही वाचा: चीनने धोका दिल्यानंतर नेहरूंनी आपली युद्धनीति कशी बदलली?

अफगाणिस्तानमधलं देवी शक्ती

मागच्या वर्षी एक एक शहर ताब्यात घेत तालिबाननं १५ ऑगस्ट २०२१ला अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर ताबा मिळवला. राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी स्वतः देश सोडून पळून गेले होते. या दरम्यान अफगाणिस्तानसोबत इतर देशातल्या नागरिकांचीही काबुल विमानतळावर झुंबड पहायला मिळाली होती.

अफगाणिस्तानातल्या हिंसक परिस्थितीमुळे तिथल्या भारतीयांच्या सुटकेसाठी भारताने विशेष मोहीम राबवली. 'ऑपरेशन देवी शक्ती' असं या मोहिमेचं नाव होतं. ८०० नागरिकांना एअर इंडियाच्या विमानाने भारतात आणण्यात आलं. यात भारतीय नागरिकांसोबत २०० अफगाणी शीख, हिंदूंचा समावेश होता.

ऑपरेशन गंगामागे मिशन पॉलिटिक्स?

केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार, युक्रेनमधे १६ हजार भारतीय विद्यार्थी आणि नागरिक अडकलेत. युक्रेनची विमानतळं सध्या बंद आहेत. त्यामुळे जवळच्या हंगेरी, पोलंड, रोमानिया या देशांतून नागरिकांना भारतात आणलं जातंय. २८ फेब्रुवारी ते ८ मार्चपर्यंत ४६ भारतीय विमानं या देशांमधे पाठवली जातील. यात एअर इंडियाची १३, एअर इंडिया एक्सप्रेसची ८, इंडिगोची ५, स्पाईसजेटची २ आणि एक इंडियन एअरफोर्सचं विमान असेल.

भारतानं 'ऑपरेशन गंगा'ची घोषणा केली. केंद्रीय हवाई उड्डाण खात्याचे मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया युक्रेनचा शेजारी असलेल्या रोमानियामधे दाखल झाले. केंद्रीय मंत्रीही विमानतळांवर या भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांना रिसीव करतायत. हे फोटो सोशल मीडियातून वायरल केले जातायत. याच जाहिरातबाजीवर अनेक जण आक्षेप घेतायत.

'ऑपरेशन गंगा'वरून सरकार गाजावाजा करत असल्यामुळे काही प्रश्नही उपस्थित केले जातायत. त्यावर टीकाही होतेय. स्वतः युक्रेनमधे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचे मदतीसाठी विनवणी करतानाचे वीडियो वायरल होतायत. या युद्धादरम्यान २ भारतीय विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागलाय.

हेही वाचा: 

भिऊ नका, मीच तुमच्या पाठीशी आहे!

आपले राजकारणी पुस्तकं का लिहित नाहीत?

नागराज मंजुळेंनी आरएसएसच्या शाखेत जाणं का थांबवलं?

बहुसंख्यांक राजकारणाच्या खुशमस्करीत क्षीण झाला पुरोगामी आवाज

या बाळंतपणाने सरकारी आरोग्य व्यवस्थेवरचा विश्वास जन्माला घातलाय