घटता जीडीपी, वाढत्या महागाईने अर्थव्यवस्थेची स्टॅगफ्लेशनकडे वाटचाल

१७ जानेवारी २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


देशाच्या आर्थिक विकासाचा दर ५ टक्क्यांवर आलाय. तर महागाईचा दर ७.३ टक्क्यांवर गेलाय. देशाच्या तिजोरीत सध्या खडखडाट आहे. दुसरीकडे मोदी सरकारनं रिजर्व बॅंकेकडे ३५ ते ४५ हजार कोटी मागितल्याच्या बातम्याही आल्यात. अर्थव्यवस्था आचके देतीय. सध्याच्या आर्थिक परिस्थितीचं वर्णन अर्थतज्ञ स्टॅगफ्लेशनचा काळ अशा शब्दांत करताहेत.

‘भारताचे आर्थिक प्रश्न गंभीर आहेत. राजकीय आणि वैचारिक गोंधळामधेच भरकटलेलं लक्ष सध्या केवळ देशाच्या अर्थव्यवस्थेवर द्यायला हवं. राजकीय आणि वैचारिक चर्चांमुळे काहीकाळ प्रसिद्धी मिळेल पण अर्थव्यवस्थेकडे केलेलं दुर्लक्ष देशाचं आणि मतांचंही नुकसान करेल.’ न्यूयॉर्क युनिवर्सिटीतले प्राध्यापक आणि ज्यांच्या शब्दाला जगभरात मोठी किंमत आहे, असे प्रसिद्ध अर्थतज्ञ नूरिएल रॉबिनी यांनी हा इशारा दिलाय.

देशासमोरचे अर्थिक प्रश्न दिवसेंदिवस तीव्र होतायत. त्याकडे पाहता अर्थतज्ञांना आपली अर्थव्यवस्था स्टॅगफ्लेशनकडे जाणार असल्याची शक्यता वाटतेय. स्टॅगफ्लेशन एक खूप मोठं आर्थिक संकट मानलं जातं. त्याचे परिणाम खूप दूरगामी राहतील. आता ही भीती खरी ठरू नये यासाठी प्रयत्न करणं हे देशासमोरचं एक मोठं संकट आहे. स्टॅगफ्लेशन अर्थव्यवस्थेतली अशी अवस्था आहे ज्यात विकासाची मंद गती आणि महागाईचा दर यामुळे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढते. देशातल्या आर्थिक प्रश्नाचं गांभीर्य पुन्हा एकदा लक्षात आणून देण्यासाठी स्टॅगफ्लेशचा इशारा आपल्यासाठी पुरेसा आहे.

स्टॅगफ्लेशन म्हणजे काय?

सोप्या भाषेत सांगायचं झालं तर स्टॅगनंट आणि इनफ्लेशन अशा दोन शब्दांपासून स्टॅगफ्लेशन हा शब्द बनलाय. स्टॅगनंट म्हणजे थांबलेली वाढ आणि इनफ्लेशन म्हणजे चलन फुगवटा. यालाच आपण आपल्या रोजच्या भाषेत महागाई असं म्हणतो. अर्थव्यवस्थेला घातक असणाऱ्या या दोन परिस्थिती एकाचवेळी येणं म्हणजे स्टॅगफ्लेशन! परिपक्व होणाऱ्या अर्थव्यवस्थेला चलनवाढ किंवा मंदीमधे होणारी वाढ या दोन विरोधाभासी धोक्यांची कल्पना असू शकते. यातून बाहेर कसं पाडावं याची उत्तरंही सोपी आहेत.

चलनवाढ ही आर्थिक विकासासाठी पूरक मानली जाते. लोकांच्या हातात जास्त पैसा असताना वस्तूंची किंमत वाढते. मग उत्पादनही वाढतं. महागाई जीडीपी दर वाढवते. पण एकीकडे वस्तूंच्या किंमती वाढत असताना उत्पादन वाढत होत नाहीय. उलट उत्पादनात घट होतेय. लोकांच्या हातात पैसाच नाही. त्यामुळे सध्याची महागाई नुकसानकारक आहे. म्हणूनच ही महागाई स्टॅगफ्लेशनचं लक्षण असल्याची शंका व्यक्त केली जातेय.

खरंतर या दोन गोष्टी एकाचवेळी असू शकत नाहीत. समोर असलेल्या संकटांपैकी एकाचा सामना करताना दुसऱ्या परिस्थितीकडे उपाय म्हणून बघितल जातं. सोपं उदहरण घेऊया, आमटी खूप आंबट झाली तर साखर घालून तिची चव टिकवता येते किंवा गोड झाली तर आंबट पदार्थ मूळ चव राखतो. दोन्ही चवी जास्त प्रमाणात झाल्या तर ‘जुगाड’ करणं शक्य नसतं. अर्थव्यवस्थेत वाढ खुंटणं आणि महागाई वाढणं अशा दोन्ही चवी एकदमच येतायत.

हेही वाचा: सत्तेचं विकेंद्रीकरण केलं तरच आर्थिक स्थिती सुधारेल :  रघुराम राजन

अमेरिकेतही आलं होतं स्टॅगफ्लेशन

चलनवाढ किंवा मंदीमधे होणारी वाढ ही दोन्ही आर्थिक संकटं एकाचवेळी वाटचाल करत असतील तर ही फार गंभीर परिस्थिती उद्भवू शकते. इंग्रजीत ज्याला ‘डेडली कोम्बिनेश’ म्हणतात. अशी ही स्थिती आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी एरवी वापरली जाणारी साधनं पुरेशी नाहीत. अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी अर्थतज्ञ, रिझर्व बँक आणि सरकार यांना फार कष्ट घ्यावे लागतात. दरम्यानच्या काळात जे काही नुकसान होतं ते वेगळंच!

अर्थव्यवस्था एकाच वेळी महागाई आणि मंद झालेलं उत्पादन आणि बेरोजगारी अशा दोन स्थिती मधे असूच शकत नाही असा १९७० पर्यंत अर्थतज्ञांचा विश्वास होता. पण अमेरिकन अर्थव्यवस्थेला प्रदीर्घ काळ आलेली सुस्ती आणि महागाई, बेरोजगारी यामुळे एक विचित्र स्थिती अर्थतज्ञांनी बघितली जिला ते स्टॅगफ्लेशन म्हणू लागले. त्याचा फटका जगभरात बसला. अशी परिस्थिती उद्भावण्यासाठी केवळ अंतर्गत नाही तर अनेक आंतरराष्ट्रीय घटक जबाबदार असतात. ओपेक म्हणजेच ओईल ऍन्ड पोट्रोलियम प्रोड्युसिंग केंट्रीजचे तेलाची निर्यात घटवण्याचे निर्णय देखील याला जबाबदार होते.

दुष्काळात तेरावा महिना तशी महागाई

गेल्या दोन आठवड्यात भारतात आलेल्या आर्थिक मंदीची चर्चा आयएमएफ अर्थात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीपर्यंत गेली. लोकांची खालावलेली क्रयशक्ती, बेरोजगारी, उत्पादनातली घट या सगळ्याबद्दल अर्थमंत्री आणि नेत्यांनी मौन पाळणं पसंत केलं. इतर राजकीय घडामोडीत या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणं ही सोपं होतं. आर्थिक प्रश्नांबद्दल नेहमीच आपण फारच तटस्थ भुमिका घेतो. त्यामुळेच आता या प्रश्नाचं स्वरूप अधिक गंभीर होऊ लागलंय. दुष्काळात तेरावा महिना यावा तशी महागाईही सतत वाढत चाललीय. नुकतेच वाढत्या महागाईचे आकडेही समोर आलेत.

किरकोळ खरेदी-विक्रीची किंमत देशतली चलनवाढ किंवा आपण ज्याला महागाई म्हणतो ती निर्देशित करते. आपण सीपीआयमधे ही महागाई मोजतो. हा ग्राहक किंमत निर्देशांक गेल्या साडे पाच वर्षात सर्वात जास्त दराने वाढतोय. हा महागाईचा दर नोव्हेंबर मधे ५.५४% इतका होता. डिसेंबरमधे तो चक्क ७.३५% इतका वाढलाय. अन्नधान्यांच्या किंमतीत १४% आणि भाज्यांच्या किमतीत ६०.५% इतका उच्च दर हा निर्देशांक दाखवतो. याचं कारण अर्थात कांद्याच्या भाववाढीमधे आहे.

हेही वाचा: अर्थव्यवस्थेचं चाक मंदीच्या चिखलातून कधी बाहेर निघणार?

वाढती महागाई संकटासारखीच

खरं तर चलनवाढ ही आर्थिक विकासासाठी पूरक मानली जाते. लोकांच्या हातात जास्त पैसा असताना वस्तूंची किंमत वाढते. मग उत्पादनही वाढतं. महागाई जीडीपी दर वाढवते. एकीकडे वस्तूंच्या किंमती वाढत असताना उत्पादन वाढत नाहीय. उलट उत्पादनात घट होत आहे. लोकांच्या हातात पैसाच नाही तेव्हा अशी महागाई नुकसानकारक आहे. त्यामुळे ही महागाई स्टॅगफ्लेशनचं लक्षण असल्याची शंका व्यक्त केली जातेय.

रिजर्व बॅंकेला साधारण ४% महागाई दराची अपेक्षा होती. असं असताना दराचं  केलं असताना महागाईचा हा वाढता उच्चांक एका नव्या संकटाचं चिन्ह आहे. गेल्या सहा तिमाही काळात घासलेली वाढ, आणि ही महागाई यामुळे भारत स्टॅगफ्लेशनच्या दिशेनं जात असण्याची भीती पश्चिम बंगालचे अर्थमंत्री अमित मित्रा यांनीही व्यक्त केलीय. हीच भीती अर्थतज्ञ आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही काही महिन्यांपूर्वी व्यक्त केली होती. परंतु भारत आत्ता तरी स्टॅगफ्लेशन मधे आहे असे म्हणता येणार नाही. पण परिस्थिती गंभीर होऊ शकते ही शंका नाकारता येत नाही.

आर्थिक मुद्यांवर चर्चा व्हायला हवी

सध्या आपल्या देशात आर्थिक आघाड्यांवर जे काही घडतंय ते चिंता करायला लावणारंय. स्टॅगफ्लेशनकडे वाटचाल करण्याची ही लक्षणं असली तरी आजच्या घडीला याला स्टॅगफ्लेशन म्हणता येणार नाही. असं असलं तरीही या प्रश्नाच्या तीव्रतेकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. गेल्या काही दिवसात अर्थव्यवस्था बऱ्याच गटांगळ्या खाताना दिसतेय. ती पूर्णपणे कोसळताना बघावी लागू नये इतकंच.

त्यासाठी प्रत्येक आर्थिक मुद्यावर चर्चा करायला, व्हायला हवी. मंत्र्यांनी आणि तज्ञांनी राजकीय प्रश्नांबरोबर आर्थिक प्रश्नांवर आपापली मतं नोंदवायला हवीत. त्यावर उपायही शोधायला हवेत. सर्वात महत्वाचं म्हणजे आर्थिक प्रश्न आता तरी महत्वाचे झालेत हे मान्य करून त्यांच्याकडे दुर्लक्ष करण बंद केलं पाहिजे. हे सगळं चित्र डोळे उघडे ठेवून पाहतायंत त्यांचं अभिनंदन. झोपेचं सोंग घेतलेल्यांनी आता उठायला हवं हे नक्की

हेही वाचा: 

रोहित, आज आंबेडकरांचाही खूप राग येतोय रे! एका कार्यकर्त्याचं पत्र

सरकारी कंपन्या विकून सरकार देशाला आर्थिक मंदीतून बाहेर काढणार?

भारत माता की जय म्हणणं हा माझा अधिकार, जावेद अख्तर यांचं वायरल भाषण

संसद मोठी की संविधान या लढाईत आज नानी पालखीवाला कुणाच्या बाजूने असते?