स्टारलिंक ही जगप्रसिद्ध उद्योगपती इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीची ‘सॅटेलाईट इंटरनेट सर्विस’ आहे. सॅटेलाईटचा वापर करून स्टारलिंक आपली इंटरनेट सेवा जगभर पोचवतेय. मागच्या महिन्यात अवकाशात आलेल्या मॅग्नेटिक वादळामुळे मस्क यांचे ४० सॅटेलाईट एकाचवेळी नष्ट झाले. त्याचा मोठा फटका मस्क यांच्या स्टारलिंकला बसला होता.
नैसर्गिक वादळांच्या बातम्या आपण ऐकत आलो आहोत. किनारपट्टीच्या भागाला त्यामुळे बसलेला फटका, झालेलं नुकसानही आपण अनुभवलं असेल. मागच्या महिन्यात तर थेट अवकाशात एक वादळ आलं. हे मॅग्नेटिक वादळ इतकं जबरदस्त होतं की, त्याने जगप्रसिद्ध उद्योगपती इलॉन मस्क यांच्या खाजगी अंतराळ कंपनीचे अवकाशातले ४० सॅटेलाईट पाडले. त्याचा आर्थिक फटका मस्क यांना बसला होता.
स्टारलिंक ही इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीची ‘सॅटेलाईट इंटरनेट सर्विस’ आहे. कोणत्याही परिस्थितीत, अगदी युद्ध काळातही इंटरनेट सेवा सगळीकडे पोचावी या उद्देशानं मस्क यांनी स्टारलिंक उभं केलंय. सॅटेलाईटचा वापर करून स्टारलिंकची इंटरनेट सेवा जगभर पोचवली जातेय.
मस्क यांच्या ‘स्पेसएक्स’ कंपनीनं २०१८पासून जवळपास २००० सॅटेलाईट अंतराळात पाठवलेत. मागच्याच महिन्यात ३ फेब्रुवारीला फाल्कन ९ या रॉकेटमधून ४९ स्टारलिंक सॅटेलाईट पृथ्वीच्या खालच्या कक्षेत पाठवण्यात आले होते. या प्रत्येक सॅटेलाईटचं वजन २६० किलोग्राम इतकं होतं.
४ फेब्रुवारीला अंतराळात अचानक एक मॅग्नेटिक वादळ आलं आणि या वादळानं मस्क यांचे ४० सॅटेलाईट पाडले. थेट सॅटेलाईट पडल्यामुळे कंपनीला याचा आर्थिक फटका बसला. नुकसानही झालं. त्यासाठी मोठा खर्च आल्यामुळे मॅग्नेटिक वादळानं एकप्रकारे मस्क यांना झटका दिलाय.
हेही वाचा: पहिल्या अग्निबाणाच्या यशस्वी उड्डाणाची आज पन्नाशी
सूर्य हा वायूंचा गोळा आहे. त्यात ९२.१ टक्के हायड्रोजन, ७.८ टक्के हेलियम वायू असतो. इथं चुंबकीय क्रिया अधूनमधून चालूच असतात. ११ वर्षांमधे एकदाच या चुंबकीय क्रिया सर्वोच्च टोक गाठतात. त्याला सौर चक्र म्हणतात.
सौर चक्रावेळी अब्जावधी टन गरम वायूचे फवारे पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतात. सूर्याकडून येणारे हे कण पृथ्वीच्या वातावरणात चुंबकीय वादळं तयार करतात. यालाच मॅग्नेटिक अर्थात सौर वादळ म्हटलं जातं.
१८५९ला पहिल्यांदा अशाप्रकारचं मोठं मॅग्नेटिक वादळ आल्याचं ‘स्पेसवेदर डॉट कॉम’ या विज्ञानविषयक वेबसाईटनं म्हटलंय. त्याचा फटका युरोप आणि अमेरिकेतल्या टेलिग्राफ यंत्रणेला बसला होता. त्यातून बरंच नुकसानही झालं.
या वादळादरम्यान गडगडणाऱ्या विजेचा झटका इतका जबरदस्त होता की, तिच्या चमकण्यानंही अमेरिकेतल्या लोकांना पेपर वाचता येत होते. १९८९मधेही असं वादळ आलं होतं. त्यामुळे कॅनडातलं क्यूबेक शहर १२ तास अंधारात होतं.
२९ जानेवारी २०२२ला अशाप्रकारचं वादळ येणार असल्याचं भाकीत करण्यात आलं होतं. असा अंदाज वर्तवण्यासाठी शास्त्रज्ञ कम्प्युटर मॉडेलचा वापर करतात. पृथ्वीभोवती असलेल्या चुंबकीय वर्तुळाला मॅग्नेटोस्फियर म्हणतात. याच मॅग्नेटोस्फियरचा अभ्यास करून मॅग्नेटिक वादळांचा अंदाज बांधता येतो.
अशाप्रकारच्या मॅग्नेटिक वादळांच्या वेग आणि वेळेचाच केवळ अंदाज बांधता येतो. वादळाची दिशा आणि त्यात होणारे बदल याविषयी काहीच सांगता येत नसल्याचं कोलकाताच्या इंडियन इंस्टिट्युट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्चचे शास्त्रज्ञ दिवेंदू नंदी यांनी 'द क्विंट' या वेबसाईटशी बोलताना सांगितलंय.
अर्थात सगळीच मॅग्नेटिक वादळं ही पृथ्वीपर्यंत पोचत नाहीत. पण त्यामुळे जीपीएससारखी यंत्रणा, रेडियो, दूरसंचार क्षेत्र कोलमडून पडू शकतात अशी भीती दिवेंदू नंदी यांनी व्यक्त केलीय. तसंच सॅटेलाईट तुटल्यामुळे अवकाशात कचरा तयार होतो. त्याचाही फटका अवकाश कार्यक्रमांच्यावेळी बसू शकतो.
हेही वाचा:
ती १५ मिनिटं ठरवणार आपल्या चांद्रयानाचं भवितव्य
विज्ञानदिनी ना सीवी रमण यांचा जन्मदिन, ना स्मृतिदिन
चंद्रावर पहिलं पाऊल कोण ठेवणार यावरुन वाद झाला होता