सत्य शोधणारी पॉलिग्राफ टेस्ट स्वतः खरं बोलते?

०२ सप्टेंबर २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


सुशांत सिंग प्रकरणात रोज नव्या गोष्टी बाहेर येतायत. रिया चक्रवर्तीच्या भोवती संशयाचं धुकं आहे. त्यातच तिच्या पॉलिग्राफ टेस्टची मागणीनं जोर धरला. ही पॉलिग्राफ टेस्ट माणूस खरं बोलतोय का नाही ते ओळखते. जगभरातल्या जवळपास दीडशे देशांमधे अशाप्रकारच्या टेस्टला मान्यता आहे.  त्याचसोबत ही टेस्ट विवादास्पद असल्याचं अनेक जण म्हणतात. तंत्रज्ञानाच्या आधाराने सत्य आणि असत्य वेगळं करणं सोपं नाही असंही अनेक अभ्यासकांचं म्हणणं आहे.

दीपिका पादुकोन आणि अक्षय कुमार यांच्या मुख्य भूमिका असलेल्या हाऊसफुल्ल या सिनेमात एक मस्त सीन आहे. दीपिका म्हणजे सँडी आणि अक्षय कुमार म्हणजे आयुष ही दोन पात्रं एकमेकांच्या अखंड प्रेमात बुडालेली असतात. मात्र आयुषला सँडीच्या भावाकडून लग्नाची परवानगी मिळवण्यासाठी सातत्याने खोटं बोलावं लागतं. सँडीचा भाऊ असतो पोलिस. त्यामुळे त्याची संशयाची सुई लगेचच वर सरकते. शेवटी तो खोटं बोलतोय हे त्याच्याच तोंडून वधवून घेण्यासाठी हाताला नळ्या लावून त्याची एक टेस्ट घेतली जाते. या टेस्टला पॉलिग्राफी टेस्ट असं म्हटलं जातं.

सध्या सुशांत सिंगच्या आत्महत्या प्रकरणातही या पॉलिग्राफी टेस्टचा संदर्भ आलाय. सुशांत सिंगचा मृत्यू की आत्महत्या हा एकच मुद्दा माध्यमांसाठी सगळ्यात जास्त चर्चेचा विषय ठरतोय. जिच्या भोवती हे सगळं प्रकरण फिरत आहे त्या रिया चक्रवर्तीच्या पॉलिग्राफ टेस्टचीही मागणी होतेय. पण ही पॉलिग्राफ टेस्ट अत्यंत धोकादायक असल्याचं अनेक अभ्यासकांचं मत आहे.

हेही वाचा : तंत्रज्ञानाच्या युगात अश्मयुगातल्या मानवी मेंदूचं काय होणार?

पॉलिग्राफीची पुढच्या वर्षी शंभरी

कोणताही गुन्हा झाल्यावर एखादी व्यक्ती खोटं बोलत असेल तर ते हेरण्यासाठी म्हणून पॉलिग्राफ टेस्ट केली जाते. या टेस्टला लाय डिटेक्टर टेस्ट या नावानेही ओळखलं जातं. आरुषी हत्याकांडासारख्या हाय प्रोफाइल केसमधेही या टेस्टची मागणी झाली होती आणि तशा टेस्ट करण्यातही आल्या. अतिशय रंजक अशा या टेस्टचा इतिहासही फार जुना आहे.

१९२१ मधे जॉन ऑगस्ट्स लार्सन यांनी या मशीनचा शोध लावला. जॉन यांनी 'युनिवर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया' मधून मेडिकलचं शिक्षण पूर्ण केलं होतं. काही काळ कॅलिफोर्नियाच्या बर्कले पोलीस स्टेशनमधे त्यांनी कामही केलं. त्याआधी ब्रिटिश कादंबरीकार डॅनियल डिफो यांनी  १७३० मधे लिहिलेल्या एका निबंधातही या मशीनचा उल्लेख केलेला दिसतो.

डिफो यांच्यानंतर १८७८ मधे इटलीचे फीजियोलॉजिस्ट एंजेलो मोसो यांनीही अशाच प्रकारच्या मशीनचा वापर केल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे पॉलिग्राफ मशीनचा शोध नेमका कुणी लावला याबाबत अनेक मतमतांतरं आहेत. तरी १९२१ मधेच खऱ्या अर्थाने पॉलिग्राफ मशीन प्रत्यक्षात आली. त्यामुळे त्याचं श्रेय जॉन ऑगस्ट्स लार्सन यांना जातं. पुढच्या वर्षी या शोधाला शंभर वर्ष पूर्ण होतील. 

टेस्ट नेमकी करतात कशी?

आपलं आयुष्य धकाधकीचं बनलंय. साधं काही दुखत असेल, ताप असेल तरी शंका नको म्हणून डॉक्टर वेगवेगळ्या टेस्ट करायला सांगतात. भीतीपोटी आपण त्या करतोही. सध्या आपण मॉर्डन जगात वावरतो आहोत. पटकन रिझल्ट मिळण्याचा हा काळ आहे. आरोग्याच्या बाबतीतल्या साध्या साध्या टेस्ट करून त्याचाही रिझल्ट झटक्यात कळेल अशी व्यवस्थाही होतेय. अर्थात त्यासाठी पैसाही मोजावा लागतो. पण प्रत्येक टेस्टची पद्धत वेगळी आहे. सध्याच्या बऱ्याच टेस्ट या संगणकीकृत झालेल्या आहेत. अशा टेस्ट करणाऱ्या व्यक्ती रेकॉर्डिंग सिस्टमचा वापर करतात.

पॉलिग्राफ टेस्टही अशीच वेगळी आहे. 'अमेरिकन सायकॉलॉजीकल असोसिएशन' या साईटवर ही टेस्ट नेमकी कशी केली जाते याबद्दलची माहिती वाचायला मिळते. 'फिजिओलॉजिकल रेकॉर्डर' ही यातली महत्वाची गोष्ट. हृदयाच्या डॉक्टरांना आपल्या हृदयाच्या हालचाली टीपायच्या असतील म्हणजेच कॅरडीओग्राफ करायचा असेल तर आपल्या शरीरभर मशीनच्या नळ्या जोडल्या जातात. पॉलिग्राफमधेही अशाच नळ्या जोडलेल्या असतात.

एखाद्या व्यक्तीची पॉलिग्राफी टेस्ट केली जाते तेव्हाही शरीरातल्या वेगवेगळ्या भागांमधे जोडलेले सेन्सर्स अर्थात संवेदक महत्त्वाची भूमिका बजावतात. सेंसर्समधून सिग्नल मिळतो त्याची एका कागदावर नोंद केली जाते. त्यातून ग्राफ तयार केला जातो.  ज्या व्यक्तीची टेस्ट करायची तिला ६ प्रकारचे सेन्सर्स जोडतात. यातून ४ प्रकारच्या गोष्टी रेकॉर्ड केल्या जातात. व्यक्तीला प्रश्नोत्तरं विचारत असताना श्वास आणि हृदयाचे ठोके, ब्लडप्रेशर आणि शरीरातून निघणाऱ्या घाम या चार गोष्टी तपासल्या जातात. 

काहीवेळा संबंधित व्यक्तीचा पाय आणि हातांच्या हालचालीही रेकॉर्ड केल्या जातात. टेस्ट देणाऱ्या व्यक्तीला साधारणतः ११ प्रश्न विचारले जातात. त्यातले ४ ते ५ प्रश्न घटनेशी संबंधीत असतात. तर उरलेले प्रश्न इतर गोष्टींबद्दल असतात. एखाद्या व्यक्तीला प्रश्न विचारल्यावर ती व्यक्ती खोटं बोलत असेल तर डोक्यातून तसा सिग्नल कॅच केला जातो. इतर प्रश्नांबाबत व्यक्ती खोटं बोलत नसते त्यामुळे हा सिग्नल येत नाही. तर घटनेशी संबंधित प्रश्नांत खोटं बोललं की लगेच हा सिग्नल येतो. तो ती मशीन पडकते आणि माणूस खोटं बोलतोय की नाही ते सांगते.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

कोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं?

बाळासाठी सुरक्षित असेल का कोरोनाग्रस्त आईचं दुध?

कोरोना पॉझिटिव आलो तरी आम्ही घरीच राहिलो, कारण

सुपर स्प्रेडर म्हणजे काय? ते मुद्दाम कोरोना पसरवतात का?

एडवर्ड जेन्नरः देवी संपवणाऱ्या या देवमाणसाने लसीकरण शोधलंय

कोरोनाच्या R0 नंबरवर आपलं, लॉकडाऊनचं भवितव्य अवलंबून आहे?

पॉलिग्राफीवर अनेक मतमतांतरंही आहेत

जगभरातल्या जवळपास दिडशे देशात या टेस्टला मान्यता आहे. मात्र, अशा मशीनवर विश्वास ठेवून एखाद्या व्यक्तीचं बोलणं खोटं की खरं हे ठरवणं अत्यंत चूक असल्याचं अनेक अभ्यासक म्हणतात. सामाजिक मानसशास्त्राचे प्रोफेसर एलवर्ड व्रिज यांनी या विषयावर एक पुस्तक लिहिलंय. 'डिटेकटिंग लाइज अँड डिसीट' असं या पुस्तकाचं नाव आहे. व्रिज आपल्या पुस्तकात असं म्हणतात की, 'प्रत्येकजण सत्य सांगत राहिला तर आयुष्य खूप विचित्र होऊन जाईल. सामाजिकदृष्ट्या, आपल्यासाठी आयुष्य कठीण होईल. लोकांनी कायमच सत्य सांगितलं तर ते आपल्या स्वाभिमानासाठीही खूप वाईट असेल. थोडं खोटं बोलणं हे चालायचंच.'

मानसशास्त्रज्ञ लिओनार्ड सक्से यांच्या मते, 'शारीरिक बदलांवर लक्ष ठेवून आपण एखाद्याची सत्यता ओळखू शकतो ही कल्पनाच मुळात वास्तविकतेला धरून नाही. ते एक मिथक आहे.' बाहेरच्या देशातल्या वेगवेगळ्या कंपन्या ब्रेन स्कॅनिंगकडे व्यवसाय म्हणून बघतात. व्यावसायिक दृष्टीकोन ठेवून त्या यात उतरल्यात. पैसेही कमवतायत. सत्य आणि असत्य वेगळं करणं इतकं सोपं नाही. असं अवघड काम करू शकणारं तंत्रज्ञान नाही. असंही अनेक अभ्यासक म्हणतात. एकुणात पॉलिग्राफ मशीनचा वापर करून शोधलं जाणारं 'सत्य' हे खरं असेलच असं नाही. ट्रुथ लॅब ही भारतात काम करणारी संस्था आहे. या संस्थेचे चेअरमन असलेले केपीसी गांधी यांनी अनुभवी तज्ञांच्या माध्यमातून अशी टेस्ट झाली तर मिळालेली माहिती ही कोर्टात मान्य होऊ शकते.

हेही वाचा : 

फेसबुक झालंय 'बुक्ड'!

भिऊ नका, मीच तुमच्या पाठीशी आहे!

नागराज मंजुळेंनी आरएसएसच्या शाखेत जाणं का थांबवलं?

या बाळंतपणाने सरकारी आरोग्य व्यवस्थेवरचा विश्वास जन्माला घातलाय