उन्हाळ्यातला पावसाळी बॉम्ब, हवामान बदलाचा नवा पॅटर्न

२४ मार्च २०२२

वाचन वेळ : ३ मिनिटं


मागच्या महिन्यात ऑस्ट्रेलियात अचानक पावसाळी बॉम्ब फुटला. भर उन्हाळ्यात जोरदार पाऊस आल्यामुळे ऑस्ट्रेलियातली अनेक शहरं पाण्याखाली गेली. या पावसाळी बॉम्बनं ऑस्ट्रेलियातल्या लाखो लोकांवर विस्थापित व्हायची वेळ आलीय. हवामान बदलाचा हा नवा पॅटर्न जगासाठी डोकेदुखी ठरणार आहे.

सध्या रशिया-युक्रेन युद्ध सुरू आहे. रशिया युक्रेनच्या वेगवेगळ्या शहरांवर करत असलेल्या बॉम्ब हल्ल्याच्या बातम्या आपण टीवी, सोशल मीडियातून ऐकतोय. ऑस्ट्रेलियावर थेट निसर्गानंच केलेल्या बॉम्ब हल्ल्याची बातमी सगळीकडे वायरल होतेय. 'पावसाळी बॉम्ब' असं त्याला म्हटलं जातंय. या बॉम्ब हल्ल्यानं ऑस्ट्रेलियातली अनेक शहरं उध्वस्त केलीयत.

ऑस्ट्रेलियातली शहरं पाण्याखाली

फेब्रुवारी महिन्यात ऑस्ट्रेलियातल्या ईशान्य किनारपट्टीकडे असलेल्या कोरल समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला होता. ऑस्ट्रेलियातल्या किनारी भागातला समुद्र उष्ण आहे. त्यामुळे हवेच्या वाढलेल्या जोरानं आपल्यासोबत समुद्रातलं पाणीही खेचून घेतलं. त्यामुळे हवेत पावसाळी बॉम्ब तयार झाला. न्यूझीलँडमधेही उच्च दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे त्याला इतरत्र जायचा मार्ग उरला नाही.

ऑस्ट्रेलियातली अनेक शहरं या पावसाळी बॉम्ब आणि चक्रीवादळांनी हादरली होती. ऑस्ट्रेलियाची राजधानी असलेलं ब्रिसबेन शहर पूर्णपणे पाण्याखाली गेलं होतं. याचा सगळ्यात जास्त फटका बसला तो ऑस्ट्रेलियातल्या न्यू साऊथ वेल्स या राज्याला. पावसानं इतकं नुकसान केलंय की, इथल्या ५ लाख लोकांवर विस्थापित व्हायची वेळ आल्याचं रॉयटर न्यूज एजन्सीच्या एका बातमीत म्हटलंय.

न्यू साऊथ वेल्स आणि क्वीसलँडमधे महिन्याभराचा पाऊस दोन दिवसांमधे पडला. त्यामुळे नद्यांचा जोर वाढला. हे पाणी थेट शहरांमधे शिरलं. अनेक शहरांमधे तर १४ मीटरपर्यंत पाणी होतं. बिल्डिंग पाण्याखाली गेल्या. त्यामुळे अनेकांचे संसार, घरं उध्वस्त झाली.

हेही वाचा: पाऊस तर जगभर पडतो, पण भारतातला मान्सून जगावेगळा आहे!

पावसाळी बॉम्ब का म्हणतात?

ऑस्ट्रेलियातले सगळेच रेकॉर्ड मागच्या महिन्यात आलेल्या दोन दिवसाच्या पावसानं ब्रेक केलेत. याचा उल्लेख ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी 'पावसाळी बॉम्ब' असा केला होता. त्यामुळे जगभरात या घटनेची चर्चा होतेय. या शब्दाचा उल्लेख स्कॉट मॉरिसन यांनी केला असला तरी तो जगासाठी नवा नाहीय असं हवामान तज्ञांचं म्हणणं आहे.

पावसाळ्याच्या दिवसांमधे वादळ, पूर अशा बऱ्याच घटना घडत असतात. 'पावसाळी बॉम्ब' हे त्यातलंच औपचारिक नाव म्हणता येईल असं इंग्लंडच्या हवामान विभागानं त्यांच्या वेबसाईटवर म्हटलंय. अशा परिस्थितीत वातावरणात कमी दाबाचा पट्टा तयार होतो. हा पट्टा २४ तासांमधे २४ मिलिबारपेक्षाही कमी असतो. त्यामुळे मोठी चक्रीवादळं तयार होतात.

हा दाबाचा पट्टा इतका कमी असतो की त्यामुळे हवा वेगाने खेचली जाते. अशावेळी वाऱ्याचा वेगही फार असतो. मध्यभागी हवा कमी असली तरीही किनारपट्टी भागात हा हवेचा जोर वाढलेला असतो. त्यामुळे स्फोटक परिस्थिती तयार होऊ शकते. ज्याचा अनुभव मागच्या महिन्यात ऑस्ट्रेलियानं घेतलाय.

हवामान बदलाचा नवा पॅटर्न

महाराष्ट्रातल्या सातारा-सांगलीत पावसाने उडवलेला हाहाकार आपण सगळ्यांनी पाहिलाय. गेल्यावर्षी रत्नागिरीतलं चिपळूण शहर पावसानं पूर्णपणे उध्वस्त केलं होतं. नैसर्गिक आपत्तींपेक्षाही मानवी हस्तक्षेप याला अधिक कारणीभूत ठरतोय. माणसं निसर्गाशी छेडछाड करतायत. त्याचा परिणाम जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलातून आपण अनुभवतो आहोत.

ऑस्ट्रेलियातल्या आताच्या पावसाळी बॉम्बला त्या दृष्टीनं पाहता येणार नाही असं अनेक पर्यावरण अभ्यासक म्हणतायत. पण जागतिक तापमानवाढीकडे दुर्लक्ष करता येणं शक्य नाही असंही त्यांचं म्हणणं आहे. कारण हवा जितकी उष्ण तितक्या पटीने पाणी शोषून घेण्याची क्षमता वाढते. तिथपर्यंत पोचणाऱ्या मानवनिर्मित कारणांचाही विचार आताच व्हायला हवा.

'द कन्वर्सेशन' हे ऑस्ट्रेलियातल्या मेलबर्नमधून प्रकाशित होणारं एक प्रतिष्ठित मॅगझीन आहे. या मॅगझीनमधे हवामानशास्त्रज्ञ अँड्यू किंग यांचा एक लेख आलाय. 'एल निनो, ला निनो सारख्या घटना हवामान बदलाचा नवा पॅटर्न आहे. त्यामुळे पूर, पावसाच्या शक्यता वाढतायत. त्याचीच परिणीती म्हणजे भर उन्हाळ्यात ऑस्ट्रेलियात आलेला पावसाळी बॉम्ब.' असं अँड्यू किंग या लेखात म्हणतात.

हेही वाचा: 

एका झाडाची किंमत शोधली कशी?

शुद्ध हवेसाठी, हॅशटॅग ‘शुद्ध हवा हक हमारा’ कॅम्पेन

‘संवर्धन राखीव वनक्षेत्र’ सगळ्यांसाठी फायद्याची का ठरतात?

नव्या वर्षात यूएनने ‘झाडं जगवा, जीव वाचवा’ असा नारा का दिलाय?

आरेतल्या वृक्षतोडीचा झाडं लावून निषेध करणाऱ्या चिंचणीची भन्नाट गोष्ट!