सुप्रीम कोर्टानं निर्भया बलात्कार प्रकरणातल्या चारही दोषींविरोधात डेथ वॉरंट काढलंय. सोप्या भाषेत सांगायचं तर मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावलीय. ही शिक्षा देण्यापूर्वी आरोपींची विशेष काळजी घेतली जाते. फाशीसाठी वापरली जाणारी दोरीसुद्धा वेगळी असते. तिहार जेल प्रशासनाने सध्या अशा १२ दोऱ्या मागवल्यात.
हैदराबादमधे प्रियांका रेड्डी प्रकरणातल्या आरोपींना एन्काउंटर करून ठार मारण्यात आलं. त्यानंतर आता दिल्लीमधल्या निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातल्या आरोपींनाही तत्काळ अशीच झटपट शिक्षा द्या, अशी मागणी केली जात होती. दिल्लीच्या तिहार जेलमधे फाशीची तयारी चालू आहे, असंही बोललं जात होतं.
दिल्लीमधल्या पटियाला हाऊस कोर्ट इथं १८ डिसेंबर २०१९ ला निर्भया प्रकरणावर सुनावणी होणार होती. पण या प्रकरणातला एक आरोपी अक्षय ठाकूर याने सुप्रीम कोर्टात फेरविचार याचिका दाखल केली. या याचिकेवर १७ डिसेंबर २०१९ ला सुनावणी होती. त्यामुळे फाशीसाठीची १८ डिसेंबर ही तारीख पुढं ढकलण्यात आली.
‘तारीख पे तारीख’ असं करत शेवटी ९ वर्षांनी कोर्टानं या प्रकरणात कायदेशीर पुरावे बघून निकाल दिलाय. ७ जानेवारी २०२० ला निर्भया केसमधल्या चारही आरोपींविरुद्ध डेथ वॉरंट काढण्यात आलंय. त्यानुसार चारही आरोपींना २२ जानेवारीला फासावर चढवण्यात येईल.
हेही वाचा : 'तुम्हीच आहात बलात्कारी' असं सांगणारं गाणं जगाचं बलात्कार विरोधी गीत झालंय!
सोप्या भाषेत सांगायचं तर डेथ वॉरंट म्हणजे मरेपर्यंत फाशीची शिक्षा. दंड प्रक्रिया संहिता म्हणजेच कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर अर्थात सीआरपीसी या १९७३ च्या कायद्यानुसार ही शिक्षा देण्यात येते. या कायद्यात ५६ फॉर्म असतात. यात एक फॉर्म नंबर ४२ असतो. त्यावर ‘वॉरंट ऑफ एक्झिक्युशन ऑफ अ सेंटेंस ऑफ डेथ’ असं इंग्लिशमधे लिहिलेलं असतं. या फॉर्म नंबर ४२ लाच डेथ वॉरंट असं म्हटलं जातं. यालाच ब्लॅक वॉरंट असंही म्हणतात.
साधारण एका पानाचा हा फॉर्म असतो. त्यावर जेलचा नंबर, फासावर चढवल्या जाणाऱ्या सगळ्या कैद्यांची नावं, त्यांची संख्या अशी माहिती लिहावी लागते. या सोबतच केस नंबर, डेथ वॉरंट लागू झाल्याची तारीख, फाशीची तारीख, वेळ आणि जागा अशीही माहिती पुरवावी लागते. आरोपीचा जीव जात नाही तोपर्यंत फाशी देत राहावी, अशीही तरतूद या फॉर्ममधे केलेली असते.
कोर्टाकडून काढण्यात आलेलं असं हे वॉरंट पहिल्यांदा जेल प्रशासनाकडे पोचवलं जातं. त्यानंतर याची माहिती आरोपींच्या नातेवाईकांना दिली जाते. एका बंद लाल पाकिटात कोर्टाची माहिती नातेवाईकांना दिली जाते. ते पाकीट नातेवाईकांच्या हातात कोणत्या तारखेला आणि किती वाजता दिलं याचंही सगळं रेकॉर्ड ठेवलं जातं. त्यानंतर नातेवाईकांना आरोपींना भेटण्याची परवानगी असते. यावेळी आरोपी आपली मालमत्ता किंवा तत्सम गोष्टी नातेवाईंकांच्या नावे करू शकतात.
डेथ वॉरंट काढल्यानंतर आरोपीवर कडक पाळत ठेवली जाते. जेल प्रशासनाकडे डेथ वॉरंट पोचलं की मृत्यूसाठी आरोपींना मानसिक दृष्टीनं तयार करणं हे जेल प्रशासनाचं काम असतं. आरोपींना एका वेगळ्या तुरुंगात नेलं जातं. एकाच प्रकरणातले आरोपी आपापसात भेटूही शकतात. पण या भेटीवरही कडक नजर ठेवली जाते.
डेथ वॉरंट निघाल्यापासून ते फाशी होईपर्यंत आरोपींचं सतत समुपदेशन केलं जातं. ते शारीरिक किंवा मानसिकरित्या आजारी पडू नयेत याची विशेष काळजी घेतली जाते. त्यांना नेहमीसारखं अन्न आणि एक जोड नवे कपडे दिले जातात. आरोपींची इच्छा असेल तर त्यांना धार्मिक ग्रंथही वाचायला दिले जातात.
हेही वाचा : १०० बलात्काऱ्यांच्या मुलाखती घेणाऱ्या तरुणीचं म्हणणं ऐकायलाच हवं!
फाशी देण्यासाठी वापरलेली दोरीसुद्धा वेगळी असते. बिहारमधल्या बक्सर जेलमधे ही दोरी बनवली जाते. त्याला मनिला रोप असं म्हटलं जातं. फिलिपिन्सची राजधानी मनिला इथं ती पूर्वी बनवली जात असे. त्यावरून तिला मनिला रोप असं नाव पडलं असावं.
एक दोरी ७२०० कच्च्या धाग्यांपासून बनवली जाते. जेलमधल्या पाच ते सहा कैद्यांना एक दोरी बनवायला दोन तीन दिवस लागतात. पुन्हा त्यावर मेणाचा लेप लावला जातो. फाशी दिली जाणाऱ्या कैद्यांच्या मानेला दोरी काचू नये म्हणून हे मेण लावलं जातं.
निर्भया केसमधले आरोपी ज्या तिहार जेलमधे आहेत तिथल्या प्रशासनानं सध्या १२ फाशीच्या दोऱ्या मागवल्यात, असं सांगितलं जातंय. आरोपीचं लक्ष विचलित होऊ नये म्हणून फाशी देईपर्यंत आरोपीच्या आसपासची सगळी कामं इशाऱ्यानं केली जातात. फाशी दिल्यानंतर डॉक्टर मृतदेह तपासतात आणि मृत्यूची घोषणा करतात. त्यानंतर आरोपीचं डेथ सर्टिफिकेट डॉक्टर देतात. हे डेथ सर्टिफिकेट आणि जेल प्रशासनाकडे असलेलं डेथ वॉरंट पुन्हा कोर्टासमोर सादर केलं जातं. त्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण होते.
हेही वाचा :
आपण बाल दिन साजरा करतोय की बाल दीन?
लोक आपापल्या सोयीपुरता स्त्रीवाद का मांडतात?
सुरक्षेची जबाबदारी महिलांवर ढकलून बलात्कार थांबणार का?
२०१९ चा निरोप : गेल्या वर्षभरात स्त्रियांच्या जगात काय काय झालं?