यंदाच्या विधानसभा निवडणुकीचं वेगळेपण काय?

१८ ऑक्टोबर २०१९

वाचन वेळ : ३ मिनिटं


यंदाची निवडणूक अगदीच शांत आहे. आधीच्या निवडणुकांच्या तुलनेत अनेक बाबतीत वेगळी आहे. त्याची नेमकी वैशिष्ट्यं आहेत तरी काय, याचा हा धांडोळा. निष्प्रभ विरोधक, चतुर सत्ताधारी, निष्ठाहीन नेतृत्व, स्वतःत मश्गुल मतदार आणि बनचुके कार्यकर्ते यांनी मिळून घडवलेली ही निवडणूक आहे.

काँग्रेसचा महाराष्ट्रातला एकछत्री अंमल संपल्यानंतरची यंदाची विधानसभा निवडणूक ही राज्यातली पहिलीच खूप सोप्पी निवडणूक आहे, असं मानायला हरकत नसावी. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूक प्रचाराच्या काळातही काँग्रेस काही करिष्मा करुन दाखवेल, अशी किमान धाकधूक तरी वाटत होती.

मात्र महाराष्टाच्या विधानसभा निवडणुकीचं मतदान काही दिवसांवर येवून ठेपलेलं असतानाही सर्वसाधारणपणे निरुत्साह जाणवतो आहे. या निवडणुकांचं वेगळेपण असं आहे,

निष्प्रभ विरोधक

इतके निष्प्रभ विरोधक निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्र अनेक वर्षांनी अनुभवत असावा. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपूर्वी भाजप शिवसेनेने ज्या पद्धतीने विरोधकांना फोडलं, त्यात निष्ठा वगैरे तर वाहून गेल्याच, पण त्याचबरोबर मूल्याधिष्ठीत राजकारणाचा पायाच राज्यातून उखडला गेल्याचं जाणवलं.

नेतेच पळापळ करू लागल्याने कार्यकर्ते सैरभैर झाले नसतील तर नवलच. पैसा, कंत्राटं, गुन्हेगारी ते सत्ता आणि सत्तेसाठी पुन्हा पैसा, या चक्रात महाराष्ट अडकला असल्याची भीती वाटतोय. त्यात ईडी नावाचं ब्रह्मास्त्र कुठे आणि कुणाकुणावर वापरायचं, याचं चांगलंच भान सत्तेला असल्यामुळे विरोधक गप्पगार बसलेले दिसतायेत.

हेही वाचाः आश्चर्यच, मुंबईत काँग्रेसच्या आमदारांची संख्या वाढू शकेल

मोठे नेते धुळीला

या निवडणुकीचं आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे या निवडणुकीने काही नेत्यांचा महाराष्टावरचा ठसा पुसट केलाय. तर काहींना पूर्ण राजकारण सोडण्याची वेळ आणलीय. राज ठाकरे, एकनाथ खडसे, प्रकाश मेहता, नारायण राणे यांचं राजकारण या निवडणुकीनं बर्‍यापैकी संपवलंय.

अगदी लोकसभा निवडणूक प्रचारातही राज यांच्या सभांची जोरदार चर्चा झाली. तीही आत्ताच्या घडीला जाणवत नाहीय.

प्रचाराच्या मुद्द्यांचा अभाव

प्रचाराचे मुद्देच नसणं हे या निवडणुकीचं सर्वाधिक दुर्दैव म्हणायला हवं. याआधीच्या निवडणुकांना प्रचाराचे थेट भिडणारे मुद्दे होते. मग ते जेम्स लेन असो, आरक्षण असो, सिंचन घोटाळा, भ्रष्टाचार असो. तसा कोणताही ठोस मुद्दा प्रचारात दिसत नाहीय.

विरोधक फारच कमजोर पडल्याने मंदी, बेरोजगारीसारखे मुद्देही तीव्रतेने येताना दिसत नाहीयेत. भाजपने निवडणूक ३७० वर नेण्यात बऱ्यापैकी यश मिळवलंय, हेही एक प्रमुख कारण आहे. दुष्काळ आणि शेतकरी हे या निवडणुकीचं प्रचार केंद्र होवू शकलेलं नाही. यावर्षी राज्यभर पडलेला पाऊस, आरक्षणाबाबतचे निर्णय याहीमुळे हे शक्य झालं असावं.

हेही वाचाः मोदी-राहुल यांची महाराष्ट्रातल्या प्रचाराची बोहनी काय सांगते?

बलदंड सत्ताधारी आणि संघटना

महायुती घडवून आणत देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी ही निवडणूक स्वतःसाठी ८० टक्के सोप्पी करून घेतलीय. नरेंद्र मोदी, अमित शहा, जेपी नड्डा, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांच्या प्रचाराच्या झंझावाताला एकटे शरद पवार किती पुरे पडणार, हा प्रश्नच आहे.

काँग्रेसच्या फक्त जाहिराती दिसताहेत. बाकी सगळी शांतताच आहे. भाजपाची पक्षबांधणी, संघटन, नियोजन, नेतृत्व हे सगळंच त्यांच्या पथ्यावर पडताना दिसतंय. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मराठा समाज फोडण्यात भाजपाला न भूतो ना भविष्यती यश मिळालंय. त्यामुळे मराठा नेतृत्व आणि मतदार संभ्रमावस्थेत आलाय. तो भाजपकडे झुकलेला लोकसभेत दिसलंच आहे,

कार्यकर्त्यांचा बनचुकेपणा मीडियाही

निवडणुकीवा मोठ्ठा प्रचार हा सोशल मीडियातून होतोय. वॉट्सअप, फेसबुक ही त्याची माध्यम आहेत. निष्ठा संपल्याने कार्यकर्ते बोलबच्चन झाले आहेत. प्रत्येकाला त्याचा त्याचा गोल सेट करायचाय. मुलाखती देण्यात, बाईट देण्यात सगळे पटाईत झालेत. त्यामुळे मीडियातून वास्तवापेक्षा सभा, टीका, बनचुक्या कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया एवढंच पाहायला मिळतंय. शेवटी त्यांच्याही मर्यादाच आहेत.

लोकशाहीचा उत्सव असणाऱ्या निवडणूक या खेळातली ईर्ष्याच संपलीय, असं वाटण्यासारखी परिस्थिती आहे. एक पोलादी, अजस्र, अदृष्य शक्ती ही पूर्ण निवडणूक एकतर्फी करतेय. रोज साधा पेपरही न पाहणाऱ्या, वास्तवाचे भान हरवलेल्या आणि स्वतःत मश्गूल मतदारांना प्रत्यक्षात काय घडतंय, याची माहितीच नाहीय. ते कुणाच्या तरी एका वॉट्सअप मेसेजने प्रभावित होऊन मतदान करतील किंवा न करतीलही.

हेही वाचाः 

भीम परतून आल्यासारखं वाटतंय!

या तीन लेखिका जग गाजवत आहेत

विदर्भातील दहा हाय व्होल्टेज लढतीकडे राज्याचं लक्ष

डॉ. मनमोहन सिंग यांच्या प्रश्नांची नरेंद्र मोदींकडे उत्तरं आहेत का?

दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंच्या भाषणातल्या चार महत्त्वाच्या गोष्टी

(लेखक मुक्त पत्रकार आहेत.)