कोरोनाः जागतिक आरोग्य आणीबाणी लागू केल्याने काय होणार?

०२ फेब्रुवारी २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


कोरोना वायरसचा धुमाकूळ बघून जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर करण्यात आलीय. डब्लुएचओने आणीबाणी लागू केल्यामुळे चीनसह अनेक देशांवर काही निर्बंध आलेत. यामुळे अनेक देशांना मोठं नुकसानही सहन करावं लागणार आहे. पण कोरोनाशी दोन हात करायचे असतील तर फायद्यातोट्याचा विचार बाजूला सोडून आता सगळ्या देशांनी एकत्र यायला हवं.

अखेर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन अर्थात डब्लुएचओने जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केलीय. कोरोना वायरसने आत्तापर्यंत चीनमधल्या २१३ लोकांचा बळी घेतलाय. शिवाय २१ देशांमधे त्याची लागण झालेले रूग्ण सापडलेत. या सगळ्याचा विचार करता अखेर शुक्रवारी ३१ जानेवारीला डब्लुएचओने जागतिक आरोग्य आणीबाणीची घोषणा केली.

डब्लुएचओचे महासंचालक टेड्रॉस अधानोम यांनी काल ट्विटरवरून ही घोषणा केली. आरोग्य यंत्रणा कमकुवत असलेल्या देशात कोरोना वायरस मोठ्या प्रमाणावर पसरण्याची शक्यता आणि जागतिक आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन आपण ही आरोग्य आणीबाणी जाहीर करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

कोरोनाचा प्रसार थांबेना

चीनमधे जन्मलेला कोरोना वायरस आता लाखो मैल दूरवरच्या अमेरिकेत जाऊन पोचलाय. परवाच भारतातही कोरोनाचा एक रूग्ण सापडलाय. केरळमधल्या थ्रिसूर जिल्ह्यातला एक तरूण चीनमधल्या वुहान विद्यापीठात शिक्षण घेत होता. भारतात आलेल्या या तरुणाची तपासणी केली असता तो कोरोनाबाधित असल्याचं स्पष्ट झालं.

कोरोनाच्या गांभीर्याची दखल डब्लूएचओने आधीही घेतली होती. या वायरसशी दोन हात कसं करायचं यावर चर्चा करण्यासाठी डब्लूएचओही एक तातडीची बैठक बोलावली होती. डब्लूएचओचे प्रवक्ते तारिक याशरेविच यांनी ट्विटरवरून याची माहितीही दिली. ‘काही दिवसात चीनमधे आणि दुसऱ्या देशात या वायरसचे आणखी रूग्ण सापडू शकतात. वुहानच्या आरोग्य अधिकाऱ्यांसोबत डब्लूएचओची एक टीम वायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी काम करतेय,’ असं त्यांनी जाहीर केलं होतं.

यासोबतच चीनमधेही भरपूर खबरदारी बाळगली जातेय. सार्वजनिक रहदारीच्या अनेक जागा बंद करून तिथून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं होतं. प्रत्येक देशाच्या एअरपोर्टवर चीनमधल्या किंवा चीनमार्गे येणाऱ्या सगळ्या प्रवाशांची तपासणी केली जात होती. यानंतर हा वायरस आटोक्यात येईल असं वाटलं होतं. पण तरीही दर दोन दिवसांनी नव्या देशांत या वायरसचा रूग्ण सापडतच राहिला. यामुळेच डब्लुएचओने शुक्रवारी कोरोनामुळे जागतिक आरोग्य आणीबाणीची परिस्थिती उद्भवल्याचं जाहीर केलं.

हेही वाचा : माणसं मारणारा कोरोना वायरस आता अर्थव्यवस्थेलाही मारणार?

कोरोनावर औषध उपलब्ध नाही

बीबीसीच्या एका बातमीनुसार, याआधीही अशाप्रकारे रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्यामुळे डब्लुएचओने जागतिक आणीबाणी जाहीर केली होती. स्वाईन फ्लु, पोलिओ, झिका, इबोला अशा रोगांनी गेल्या दशकात धुमाकूळ घातला होता. तेव्हाही डब्लुएचओनं आणीबाणी जाहीर करत वेगानं पावलं उचलली होती.

कोरोना वायरस म्हणजे एक प्रकारे वायरसचं कुटुंबच आहे. त्यातल्या नवीन मेंबरला सध्या आपण नोवेल कोरोना वायरस किंवा नुसतं कोरोना वायरस असं म्हणतो. या कोरोनाचा मोठा भाऊ म्हणजे सार्स. २००३ सार्स नावाच्या या वायरसचा चीनमधूनच प्रादुर्भाव झाला होता. तेव्हाही त्याची लागण अनेकांना झाली होती.

‘कोरोना वायरस सार्सपेक्षा कमी धोकादायक आहे,’ असं लंडन स्कूल ऑफ हायजिन अँड ट्रॉपिकल मेडिसीनचे संचालक प्रा. पीटर पायोट यांनी बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं होतं. असं असलं तरी, सध्या कोरोनापासून लोकांना वाचवण्यासाठी कोणतंही रोगप्रतिबंधात्मक औषध आपल्याकडे नसल्यामुळे परिस्थिती गंभीर आहे हे लक्षात घ्यायला हवं.

देशांनी एकमेकांना मदत करणं गरजेचं

आता रोगप्रतिबंधक औषधं नसताना कोरोनापासून जगाला वाचवण्यासाठी एकच उपाय आहे. तो म्हणजे, कोरोना संकटातून आपली नैय्या पार करण्यासाठी जगभरातल्या सगळ्या देशांना एकत्र यायला हवं. एकमेकांना मदत करत कोरोनाशी दोन हात करायला हवेत.

दोन महायुद्धांनंतर जगभरातल्या जवळपास सगळ्याच देशांना मोठं नुकसान सोसावं लागलं. तेव्हापासून अशा मोठ्या संकटात एकमेकांना मदत करण्याची अक्कल जवळपास सगळ्यांच देशांना आलीय. १९५१ मधे डब्लुएचओने पहिल्यांदा अशा भयंकर रोगांचा एकत्रितपणे सामना करता यावा यासाठी एक जागतिक नियमावली तयार केली होती. रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर वेगवेगळ्या देशातल्या सरकारांनी काय करायचं हे त्यात लिहिलं होतं.

२००३ मधे चीनमधूनच सार्स या विषाणूचा फैलाव झाला. त्यानिमित्ताने २००५ मधे या नियमावलीमधे बदल करून त्यात काही महत्त्वाच्या गोष्टी जोडण्यात आल्या. या नव्या नियमावलीला इंटरनॅशनल हेल्थ रेग्युलेशन असं म्हटलं जातं. या इंटरनॅशनल हेल्थ रेग्युलेशनमधे जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणजे काय, ती कधी लावावी याची माहिती देण्यात आलीय.

हेही वाचा : जीवघेण्या चिनी कोरोना वायरसपासून आपण कसं सुरक्षित राहायचं?

आणीबाणी लागू करण्याची प्रक्रिया

या नियमावलीमधे जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर करण्याची दोन कारणं दिलीत. एकतर, रोगाचा प्रसार आंतरराष्ट्रीय स्तरावर होत असेल आणि दुसरं, रोगाला आळा घालण्यासाठी आंतरराष्ट्रीय समन्वयाची गरज असेल तेव्हा जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर करावी, असा निर्देश या नियमावलीत देण्यात आलेत.

एखाद्या रोगाचा धोका वाढला की डब्लुएचओची एक मिटिंग घेण्यात येते. या मिटिंगला रोगाची लागण झालेल्या सगळ्या देशांतले प्रतिनिधी उपस्थित असतात. हे प्रतिनिधी आणि डब्लुएचओचे अधिकारी चर्चा करून आणीबाणी जाहीर करायची की नाही हे ठरवतात. कोरोनाच्या बाबतीत अशी चर्चा करूनच काल आणीबाणी जाहीर करण्यात आलीय.

आणीबाणीचा साधासोप्पा अर्थ असा की, हा आजार थांबवण्यासाठी आता काही कठोर पावलं उचलण्याची वेळ आलीय. आणीबाणी जाहीर झाली की ज्या ज्या देशांत आजाराचा प्रसार झालेला असतो त्या देशांसाठी काही नियम आखून दिले जातात. ज्या देशातून आजाराची निर्मिती झालीय त्या देशासाठी विशेष आणि कडक नियम असतात. यात सगळ्यांत पहिलं, या देशातून आंतरराष्ट्रीय प्रवासावर बंदी घातली जाते. तिथल्या आरोग्य सेवेत काही बदल करून आणखी सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करायला सांगितलं जातं. व्यापारावरही नियंत्रण येतं. पुन्हा संंबंधित देशांचे प्रतिनिधी आणि डब्लुएचओची मिटिंग झाल्यावरच ही आणीबाणी उठवली जाते.

चीनवर कठोर निर्बंध

आता कोरोनाच्या प्रकरणात चीनवर कठोर निर्बंध घालण्यात येणार आहेत. चीनसारख्या मोठ्या, समृद्ध आणि शक्तिशाली देशाला कोरोनाचा सामना करणं काही अवघड, अशक्य नाही. पण अर्थव्यवस्था कमकुवत असलेल्या अनेक देशांमधे अशा संकटाशी दोन हात करण्याची कुवत नसते. त्यामुळे डब्लुएचओकडून असे निर्बंध लादले जातात.

आधीच व्यापार बंद असल्यामुळे चीनचं भरपूर अर्थिक नुकसान झालंय. वायरसचा वेगाने प्रसार होत असल्याचं बघून चीनने दोन फेब्रुवारीपर्यंत बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे ३ फेब्रुवारीला म्हणजे सोमवारी चीनने जाहीर केलेल्या सुट्ट्या संपून लोक परत कामावर परतणार होते. पण आता आणीबाणी संपत नाही तोपर्यंत चीनला बाजारपेठा बंद ठेवाव्या लागतील. याचा मोठा परिणाम चीनच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे.

हेही वाचा : 

 सामान्य माणसांना स्वप्न दाखवणाऱ्या टिकटॉकची जागा टँगी घेणार?

 मोदी सरकारचा अजेंडा सांगणाऱ्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणातल्या ५ गोष्टी

निर्मला सीतारामन यांच्या अडीच तासाच्या भाषणातल्या १० कामाच्या गोष्टी

सारं काही चांगलं असूनही डिप्रेशन येतंय ना, मग दीपिकाची ही गोष्ट वाचा