आपल्याला कोणता आणि कसा हिंदू धर्म हवाय?

२६ सप्टेंबर २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


सध्या हिंदू, हिंदूत्वाची चर्चा जोरात सुरू आहे. प्रत्येक गोष्टीकडे धर्माच्या चष्म्यातून बघितलं जातंय. अशातच ‘हिंदू धर्म नेमका कसा आहे?’ या विषयावर ‘ऑब्जर्वर रिसर्च फाउंडेशन’ या संस्थेनं एक चर्चासत्र घेतलं. मुंबई युनिवर्सिटीत झालेल्या या चर्चासत्रात हिंदू धर्माच्या विविधांगी पैलूंवर चर्चा झाली. या कार्यक्रमाचा हा लेखाजोखा.

हिंदू धर्माचं सर्वसमावेशक स्वरूप पुसून त्याऐवजी पाश्चिमात्यांप्रमाणे त्याला एकसाची धर्माचं स्वरूप देण्याचा प्रयत्न सातत्याने सुरूय. औद्योगिकरण आणि जागतिकीकरण स्वीकारायच्या प्रयत्नात शहरी आणि निमशहरी भागातील हिंदू लोकांची धर्माच्या मूलतत्त्वाविषयीची समजूत अधिकाधिक अस्पष्ट होतेय. यासोबतच हिंदू धर्माची मूळ संकल्पना आणि आणि त्यातल्या विचारांचा गाभा नजरेआड करून धर्माचा राष्ट्रवादी आणि वर्चस्ववादी आदर्श पुढे ठेवला जातोय.     

हिंदू धर्म काय आहे?

ही पार्श्वभूमी लक्षात घेता ‘हिंदू धर्म काय आहे?’ या विषयावर ‘ऑब्जर्वर रीसर्च फाउंडेशन’ या संस्थेनं एक चर्चासत्र गेल्या आठवड्यात मुंबई विद्यापीठात आयोजित केलं. पुणे विद्यापीठातल्या संस्कृत आणि प्रकृत भाषा विभागाचे माजी प्रमुख गणेश थिटे, बनारस हिंदू विद्यापीठातील प्राचीन इतिहास संस्कृती आणि पुरातत्त्व विभागातील प्राध्यापिका विभा त्रिपाठी, मुंबई विद्यापीठातील संस्कृत विभागाच्या माजी प्रमुख माधवी नरसाळे आणि भांडारकर इन्स्टिट्यूटमधल्या सहाय्यक प्राध्यापिका अमृता नातू यांच्यासोबतच ‘हिंदुइजम : रिच्युअल, रिझन अँड बियाँड’ या पुस्तकाचे लेखक अशोक मिश्रा या चर्चासत्राला उपस्थित होते.  

पुस्तक लिहिण्यामागचा हेतू सांगताना लेखक अशोक मिश्रा यांनी हिंदू धर्मातल्या प्रथा आणि परंपरांमागे असणारे मतितार्थ सोडून फक्त कर्मकांडालाच महत्व दिलं जातं, ही गोष्ट लक्षात आणून दिली. ग्लोबलायझेशनच्या जमान्यात धर्मातल्या प्रथा पार पाडताना अनेकदा शॉर्टकटचा वापर केला जातो. या शॉर्टकटमुळं प्रथांमागचा मूळ हेतू बाजुला राहतो आणि धर्मात एकप्रकारची उथळता येते. समाजात आणि स्वतःच्या कुटुंबातही या गोष्टी दिसू लागल्यावर पुस्तक लिहिण्याची गरज वाटू लागल्याचं लेखकाने सांगितलं.

हेही वाचाः वसईचे फादर फ्रान्सिस दिब्रिटो साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले, कारण

करवंटीची पूजा काय कामाची?

लेखक पु. ग. सहस्रबुद्धे यांनी त्यांच्या ‘माझे चिंतन’ या पुस्तकातही याविषयी टीका करून त्याला ‘करवंटीची उपासना’ असा शब्दप्रयोग वापरला आहे. त्याची आठवण यासंदर्भात येते. नारळातल्या आतल्या भागापेक्षा करवंटीलाच जास्त महत्व देऊन त्याची पूजा करत बसण्यासारखा हा प्रकार आहे.

अशा प्रकारच्या प्रवृत्तींवर टीका करताना अशोक मिश्रा म्हणाले, हिंदू धर्मात आणखीही इतर खटपटी सर्रास केल्या जातायत. या उलाढालींमधे सध्याच्या काळातला महत्वाचा मुद्दा म्हणजे हिंदू धर्मातली विविधता संपवून त्याला एका शाखेत बसवण्याचे प्रयत्न करणं. त्याला आळा घालायला हवा.

सिंधू नदीच्या खाली राहणारे हिंदू

हिंदू हा ख्रिश्चन किंवा इस्लामसारखा धर्म नाही. ती एक संस्कृती आहे. हिंदू संस्कृतीचा, इतिहासाचा आणि भारतीय तत्त्वज्ञानाचा अभ्यास करणाऱ्या लोकांच्या तोंडी सतत असं वाक्य असतं. याचा अर्थ अनेकदा सामान्य माणसाला लागत नाही. हा अर्थ पुणे विद्यापीठातले माजी संस्कृत विभाग प्रमुख गणेश थिटे यांनी या चर्चासत्रात उलगडला. 

हिंदू ही संस्कृती आहे, धर्म नाही हे सांगताना आपण हिंदू शब्दाचा इतिहास सांगतो. पर्शियन लोकांच्यात ‘स’ हे अक्षर नसतं. त्यामुळे सिंधू नदीच्या खोऱ्यात आणि आसपास राहणाऱ्या लोकांना सिंधू ऐवजी हिंदू असं म्हणलं जाऊ लागलं आणि नदीच्या खाली राहणारे सगळे लोक आणि सगळ्या संस्कृती हिंदू झाल्या असं त्यांनी सांगितलं. याशिवाय, कर्मसिद्धांत, पुनर्जन्म, वर्णव्यवस्था, अस्तेय ही हिंदू धर्माची अत्यावश्यक वैशिष्ट्य असल्याचं त्यांनी सांगितलं. 

भारतात आज सगळ्यांनाच आपली अस्मिता धर्मापेक्षा वेगळी आहे, असं सांगवंसं वाटतं असाही मुद्दा या चर्चासत्रात त्यांनी पुढे आणला. आम्ही हिंदू नाही. आम्ही तर जैन, आम्ही बौद्ध, आम्ही अमुक, आम्ही तमुक अशी ओळख सांगणारे खरंतर हिंदूच आहेत. इतकंच काय तर आदिवासीही हिंदूच आहेत असंही त्यांनी मांडलं.

हेही वाचाः भारतात आपण हिंदू, मुस्लिम एकत्र का राहतो?

धर्म स्वीकारणारा आणि सोडणारा हवा

थिटेंचं बोलणं वरवर योग्य वाटत असले तरी त्यातले छुपे अर्थ फारच आक्षेपार्ह आहेत. हिंदू मुळात संस्कृती असली तरी आज समोर येणारा हिंदू हा एक धर्म अर्थात रिलीजन म्हणूनच पुढे येतो. हे टाळण्यासाठी सिंधू नदीच्या खाली राहणारे हिंदूच त्यामुळे आज भारतात राहणारे सगळे धर्मीय आपलेच हिंदूच हा युक्तिवाद करून चालणार नाही. 

धर्म जसा अभिसरणात म्हणजेच सतत बदलता, नव्यानव्या गोष्टींचा स्वीकार करणारा पाहिजे. तसाच तो गोष्टी पटकन सोडून देणाराही पाहिजेच की! अस्तेय, अपरिग्रह हे हिंदू धर्माची वैशिष्ट्य असल्याचं थिटे म्हणतात. पण त्याचवेळी हा हिंदू धर्म लोकांना जबरदस्ती अडकवून ठेवणारा होतोय का याकडेही त्यांनी लक्ष द्यायला हवं.

आदिवासी वेगळे नाहीत हे म्हणणंही आक्षेपार्हच होईल. आदिवासी संस्कृती ही पूर्णतः वेगळी असल्याचं अनेक विद्वानांनी वारंवार मांडलं असताना त्याला धर्माच्या या एका कॅटेगरीखाली आणायचा प्रयत्न कशाला करायचा? त्यांना हिंदू म्हणुन मान्यता दिल्यानं सध्याचं हिंदुत्ववादी सरकारनं या आदिवासींच्या मूलभूत हक्कांची वाट लावणं चालवलं आहे, ते थांबणार आहे का?  

कर्मसिद्धांत, पुनर्जन्म इतकच काय तर वर्णव्यवस्था आणि जातव्यवस्थाही हिंदू धर्माचं अत्यावश्यक वैशिष्ट्य म्हणजेच इसेन्शिअल फिचर आहेत असं थिटे म्हणाले, `आपल्याला पटो अथवा न पटो पण जातव्यवस्थाही हिंदूधर्माचा अत्यावश्यक भाग` असं त्याचं वाक्य होतं. म्हणजे जातव्यवस्थेपासुन वेगळं करून हिंदू धर्म पाहिलाच जाऊ शकत नाही, असा याचा अर्थ होतो. कलम १५ च्या माध्यमातून समतेची वागणूक मिळणाऱ्या भारतीय समाजाला हिंदू धर्माचं हे वैशिष्ट्य रूचेल का? 

हेही वाचाः अयोध्येत भव्य मंदिर महात्मा गांधींना का नकोसं वाटलं असतं?

ज्याचा बाप हिंदू तोच हिंदू

हिंदू धर्माची फार मजेशीर व्याख्या थिटेंनी मांडली. ज्याचा बाप हिंदू आहे आणि ज्याने कोणताही इतर धर्म स्वीकारलेला नाही तो माणूस हिंदू. हिंदूच काय पण सगळ्याच धर्मात स्त्रियांच्या शोषणाचे मार्ग सांगितलेले गेलेत, हे अगदीच उघड आहे. पण आजच्या काळात पुन्हा हिंदू बाप असणारी व्यक्ती हिंदू अशी व्याख्या पितृसत्तेला दुजोरा देणारी आणि स्त्रियांच्या शोषणाला कारण ठरणारी होऊ शकते. याच्या उलट आत्ताच्या काळात पितृसत्ता न मानणारा हिंदू धर्म मांडणारी व्याख्या समोर आणणं गरजेचं आहे. 

स्त्रियांना आणि शूद्रांना वेदपठणाची परवानगी का नाही याचंही भन्नाट स्पष्टीकरण बनारस हिंदू विद्यापीठाच्या प्राध्यापिका विभा त्रिपाठी यांनी दिलं. वेदांच्या काळात बहुपत्नीत्वाची संकल्पना होती. एका घरात एका पुरुषाच्या अनेक पत्नी असायच्या. मग एक पत्नी वेद म्हणायला बसली तर दुसरीली राग येईल, म्हणून स्त्रियांनी वेद वाचायचे नाहीत.

तर शूद्र वेदांचा उच्चार चुकीच्या पद्धतीने करायचे म्हणून त्यांनी वेद वाचायचे नाहीत. या दोन्ही युक्तिवादात साधा तर्कही नाही, हेही त्यांच्या लक्षात आलं नाही. ही व्याख्या आणि हे युक्तिवाद ऐकून हिंदू धर्माविषयी आत्मीयता असणाऱ्या या प्राध्यापकांना हिंदू धर्मातली पुरूषसत्ताक मानसिकता काढून टाकायची नाही काय, असा प्रश्न पडतो. 

धर्माचं मॅक्डोनलायझेशन झालंय

वेळ कमी पडल्यानं माधवी नरसाळे आणि अमृता नातू यांना फक्त पुस्तकावर आपलं परीक्षण सांगून समाधान मानावं लागलं. मात्र, त्यातही एक विषेश मुद्दा माधवी नरसाळे यांनी सांगितला. मॅक्डोनल्डप्रमाणे एका साच्यात बसणारा धर्म सध्या समाजात दिसत असल्याचं त्या म्हणाल्या. मॅक्डोनल्डमधले सगळे बर्गर्स एका साच्यातून बनवलेले असतात. बर्गरमधे असणारी बटाट्याची पॅटी, त्याच्या पावांचा आकार, त्यातील कांदा, टोमॅटोच्या कापांची संख्या आणि सॉसचं प्रमाण हे सगळ्या बर्गरमधे सारखं असतं तसं धर्माचं झालं, असल्याचं नरसाळे म्हणाल्या.

नरसाळेंचं हे विश्लेषण अगदीच योग्य आहे. हिंदू धर्माचं पालन करताना प्रत्येकाला आपला स्वतंत्र मार्ग निवडण्याचं स्वातंत्र्य द्यायला हवं. पण धर्म म्हणून काहीतरी पक्की संस्था उभी करण्याच्या नादात धर्माशी जोडलेल्या लोकांचं भावविश्व तोडून त्याचं सार्वत्रीकरणं केलं जातंय हा मुद्दा नरसाळेंच्या या म्हणण्यातून स्पष्ट होतो.

हेही वाचाः गांधीजींचा राम आज समजून घ्यावाच लागेल

ही तर प्रातिनिधिक मतं

खरंतर, या चर्चासत्रात चर्चा मांडलेली मतं फक्त त्यांचीच नाहीत. समाजातल्या सर्वसामान्यांच्या विचारांचं ते प्रतिनिधित्व करतात. चर्चासत्रात सहभागी झालेले सर्वच शैक्षणिक क्षेत्रात मोठ्या पदावर आहेत. त्यांनी केलेले युक्तिवाद खरंतर समाजात नेहमीच ऐकायला मिळतात. फक्त हिंदू धर्मातच नाही तर इतर धर्म पाळणारेही त्यांच्या धर्मातील चुकीच्या पद्धतींवर असे युक्तिवाद करतात.

याचं कारण असं की अमुक अमुक धर्म कसा बरोबर, त्यातील प्रथांचा अर्थ किती थोर याचे युक्तिवाद जितक्या मोठ्यांनी, स्पष्टपणे पण लॉजिकची वाट लावून मांडले जातात. तितक्या स्पष्टपणे त्यातील चुकीच्या गोष्टींचं खंडन करण्याचे प्रयत्न केले जात नाहीत.

फक्त धर्माचं पावित्र्य आणि महत्व वाढवण्यासाठी, तरुणांना पुन्हा जुन्याच धर्मात ढकलण्यासाठी धर्माची आहे तशी मांडणी करण्याचे प्रयत्न त्यांना रूचण्यासारखे नाहीत. कोणताही समाज, संस्कृती किंवा धर्म बदलत राहतो, तेव्हाच तो टिकतो हे लक्षात घ्यायला हवं.

तरुणांसाठी हवा रसरशीत दृष्टिकोन

५००० वर्षांपूर्वी लिहिलेला धर्माचं तंत्रज्ञानाच्या आणि ग्लोबलायझेशनच्या युगातही तरूणांनी आणि माणसांनी पालन करावं अशी अपेक्षा का केली जाते?  ग्लोबलायझेशनमुळे जगाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात असलेली संस्कृती भारतातल्या तरूणांना कळणार, त्याचा प्रभाव त्यांचा जीवनावर पडणार आणि तो प्रभाव जर जुना प्राचीन धर्माच्या कक्षेत बसला नाही तर?

या सगळ्याने तरूण वर्ग गोंधळून जाणार नाही का? आणि असं वारंवार होत असेल तर लोकं धर्माकडे परत येतील का धर्मापासून लांब होतील की मधल्यामधे घुसमटत राहतील याचा विचार प्रत्येकाला करता येईल. यासाठीच आजच्या युगात माणसाला आतून शांत करणारा हिंदू धर्म पाहिजे. त्याच धर्माची तीच मांडणी करून नेमकं काय साध्य होणार?

वेगवेगळे धर्म, भाषा, संस्कृती, अस्मिता एकमेकांचा सन्मान करत एकाच देशात टिकून रहावेत यासाठी आपण काय विचार करतो? सतत वर्चस्व, द्वेष, दुय्यमता, खेचाखेच अशापद्धतीनं हा विषय समोर आल्यामुळं सहअस्तित्वाविषयीचं एक छानसं मॉडेल लोकांच्या डोळ्यांसमोर येत नाही. त्यामुळे संस्कृती, धर्म आणि माणसांच्या सहजीवनाविषयी, एकत्र असण्याविषयी छान तरतरीत दृष्टिकोन मांडण्याची गरज आहे.

हेही वाचाः 

आदिम हिंदू महासंघाने कुंडल्या कचराकुंडीत का टाकल्या?

आपल्या मुलांना वाचायला आवडतील अशा गणपतीच्या पाच गोष्टी

हिंदूहृदयसम्राटांच्या भूमिकेत एक मुसलमान कसा स्वीकारला गेला?

गुरुपंरपरेला फाटा दिला म्हणूनच वारकरी संप्रदाय सगळीकडे पोचला

सनातन्यांनो, धर्माधिकाऱ्याला धर्म शिकवू नकाः न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी