साधंसरळः राफेल ऑडियो टेपचं गोवा कनेक्शन काय?

०३ जानेवारी २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राफेल करारात घोटाळा केल्याची टीका केली. त्याच्या पुराव्यादाखल ऑडियो टेप दिली. त्याने देशाच्या राजकारणापेक्षाही गोव्याच्या छोट्याशा राजकारणात मोठं वादळ आलंय. आजारी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर पुन्हा एकदा चर्चेत आलेत.

केंद्र सरकारने थेट दुबईवरून ख्रिश्चन मिशेल नावाच्या ब्रिटीश दलालाला आयात केलं. त्याने ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणात सोनिया गांधींचं नाव घेतल्याचा दावा ईडीने कोर्टात केला. आता तरी काँग्रेस राफेल घोटाळ्याच्या आरोपांवर शांत बसेल असा होरा होता. पण तो खोटा ठरवत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज लोकसभेत पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकेचा मारा केला. ते करताना त्यांनी एका ऑडियो टेप पुराव्यादाखल दिली.

अर्थात लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी त्या टेपच्या अधिकृतपणाबद्दल शंका व्यक्त करत ती स्वीकारली नाही. नंतर काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून तो ऑडियो रिलीज झाला. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेऊनही तो ऑडियो पत्रकारांसमोर सादर केला.

या ऑडियोत भाजपचे गोव्यातले मंत्री विश्वजीत राणे हे कथितरित्या एका अज्ञात व्यक्तीशी संवाद साधत आहेत. मूळ संभाषण इंग्रजीतलं आहे. त्याचं शब्दशः मराठी भाषांतर असं आहे.

ऑडियो टेपमधलं संभाषण काय आहे?

अनाम व्यक्ती: गुड इवनिंग सर.

विश्वजीत राणे: बॉस गुड इवनिंग. मी आज तुला फोन केला. कारण आज तीन तासांची मीटिंग झाली. हे कुणालाही सांगू नकोस. खूप वादावादी झाली. नीलेश काब्राल यांनी आपल्या भागातल्या अनेक इंजिनियरची भरती केलीय. जयेश साळगावकरला ही लिस्ट मिळालीय आणि त्याने ती दाखवली. त्यावरून सगळेजण संतापले होते. कारण भरती करताना कुठलीच प्रक्रिया पार पाडली नाही. बाबू आजगावकर आणि सुदिन ढवळीकर हे दोघंही भांडले. कारण त्यांची कामं होत नाहीत. याशिवाय मुख्यमंत्र्यांनी एक खूप मजेशीर गोष्ट सांगितली. ते म्हणाले, राफेल प्रकरणाची सगळी माहिती आपल्या बेडरुममधे आहे.

अनाम व्यक्ती: खरंच. काय सांगताय?

विश्वजीत राणे: मी आपल्याला सांगतोय ना.

अनाम व्यक्ती: माय गॉड!

विश्वजीत राणे: तुम्ही याच्यावर स्टोरी करायला पाहिजे. मंत्रिमंडळातल्या तुमच्या ओळखीच्या माणसाकडून या सगळ्यांची तुम्ही खात्रीही करून घ्या.

अनाम व्यक्ती: ओके.

विश्वजीत राणे: त्यांनी सांगितलंय, त्यात काहीतरी दडलंय. याचा अर्थ सौदेबाजी करता येईल, असं काहीतरी त्यांनी आपल्याजवळ ठेवलंय.

अनाम व्यक्ती: खरंच का!

विश्वजीत राणे: त्यांनी सांगितलं, की माझ्या बेडरुममधे आहे. इथे फ्लॅटमधेच. राफेलची सगळी कागदपत्रं माझ्याजवळ आहेत. आता ते हे सगळं का सांगत होते, हे काही मला कळलं नाही. दिल्लीला जाऊन कुणीतरी याची माहिती द्यावी, असाही त्यांचा हेतू असेल.

अनाम व्यक्ती: माय गॉड!

विश्वजीत राणे: मी फक्त एवढंच सांगण्यासाठी कॉल केला.

अनाम व्यक्ती: आणि तीन तासांच्या कॅबिनेट मीटिंगमधे एवढंच झालं की आणखीही काही घडलं?

विश्वजीत राणे: काही नाही. एकदम दिशाहीन होतं सगळं. निव्वळ वेळ वाया गेला.

अनाम व्यक्ती: सर, मला एक गोष्ट सांगा. हा माणूस अचानकच विधानसभेचं अधिवेशन बोलवण्यामधे एवढा इंटरेस्ट कशामुळे दाखवतोय. आपले विधानसभा अध्यक्ष.

विश्वजीत राणे: कारण त्यांना वाटतंय की मुख्यमंत्री पदासाठी आरएसएस त्यांच्या नावाची शिफारस करेल.

अनाम व्यक्ती: ओके. ओके. म्हणजे, ते स्वतःचीच गाडी दामटत आहेत?

विश्वजीत राणे: हो, ते स्वतःचीच गाडी दामटत आहेत. सुदिनने आपण कुणालाही पाठिंबा देणार नसल्याचं स्पष्ट केल्याच्या मुद्द्याकडे एकाने लक्ष वेधलं. विजयने खूप स्पष्टपणे सांगितलंय, आपण पाठिंबा देणार नाही.

अनाम व्यक्ती: माय गॉड!

विश्वजीत राणे: पण आपण एकदा भेटलं पाहिजे. कारण तुम्हाला काही गोष्टी दिल्लीपर्यंत पोचवायच्या आहेत. या सगळ्यांचा काय परिणाम होईल.

अनाम व्यक्ती: सर, तुम्ही सांगाल, तिथे मी पोचवेन.

विश्वजीत राणे: मी तुम्हाला कळवेन. फक्त माहिती दिलं की झालं. मी खूप क्लिअर आहे.

अनाम व्यक्ती: ओके.

विश्वजीत राणे: मी कळवतो.

अनाम व्यक्ती: ठीकाय सर. तुम्ही मला सांगा फक्त. तुम्ही यायला सांगितलं, की मी येऊन जाईन.

विश्वजीत राणे: ओके. ओके.

अनाम व्यक्ती: बाय.

या ऑडियोवरून काँग्रेसने काय आरोप केला?

ही ऑडिओ रेकॉर्डिंग ऐकवल्यानंतर रणदीप सुरजेवाला यांनी थेट मनोहर पर्रीकरांवर आरोप केले. ते म्हणाले, १० एप्रिल २०१५ ला पॅरिसमधे राफेल कराराची घोषणा झाली तेव्हा तत्कालीन संरक्षणमंत्री पर्रीकर गोव्यात माशांची खरेदी करत होते. आणि मोदींसोबत अनिल अंबानी होते. मनोहर पर्रीकर यांच्याजवळच्या राफेल फाईलमधे कुठली गुपित दडलीयत? सरकार संयुक्त संसदीय समितीची मागणी मान्य का करत नाही?

विश्वजीत राणे कोण आहेत?

विश्वजीत राणे हे पर्रीकर सरकारमधे कॅबिनेट मंत्री आहेत. आरोग्य हे आवडीचं खातं त्यांच्याकडे आहेच. शिवाय महिला बालविकास आणि कौशल्यविकास हीदेखील खाती त्यांच्याकडे आहेत. ते दीर्घकाळ गोव्याचे मुख्यमंत्री राहिलेले प्रतापसिंह राणे यांचे पुत्र. ते काँग्रेसच्या सरकारात आरोग्यमंत्री होते. तेव्हा विरोधी पक्षनेते असणारे पर्रीकरच त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे जोरदार आरोप करत.

पण दोन वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीत भाजपला जोरदार धक्का बसला. सरकार बनवण्यासाठी केंद्रात संरक्षणमंत्री असणारे मनोहर पर्रीकर गोव्याचे मुख्यमंत्री बनले. तेव्हा त्यांनी विश्वजीत राणेंनाच भाजपमधे आणलं. नंतर काँग्रेसचा राजीनामा देत राणे भाजपच्या तिकिटावर निवडूनही आले. नुकतेच काँग्रेसचे आणखी दोन आमदार भाजपने फोडले. ते ऑपरेशन राणेंनीच केलं होतं. पण त्यांना अपेक्षित असलेलं मुख्यमंत्रीपद त्यांना मिळालं नाही.

विश्वजीत राणे टेपमधे कोणाशी बोलत आहेत?

समोरचा बोलणारा पत्रकार आहे हे नक्की. तो एका गोव्यातल्या एका जुन्या इंग्रजी पेपराचा संपादक असावा, अशी चर्चा सध्या सुरू आहे. हे संपादक महाशय गोव्याचे नाहीत. मूळ उत्तर भारतीय आहेत. दीर्घकाळापासून गोव्यात आहेत. दिल्लीशी, विशेषतः काँग्रेस नेतृत्वाची त्यांचे उत्तम संबंध असल्याचं म्हटलं जातं.

गोव्याच्या कॅबिनेटमधे कसली चर्चा सुरू होती?

सरकारी नोकऱ्या हा गोव्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. प्रत्येक २५ माणसांमागे एकजण इथे सरकारी नोकर आहे. त्यामुळे मंत्र्यांचं महत्त्वाचं काम इथे मतदारांना सरकारी नोकरीत चिटकवणं असतं. त्यासाठी सतत भांडणं सुरू असतात. एक मंत्री नीलेश काब्राल यांनी आपल्या काही लोकांना कुणाला न सांगता सरकारी नोकरीत घेतलंय. असा आरोप दुसऱ्या मंत्र्याने केलाय. त्यावरून वादावादी सुरू आहे. नीलेश काब्राल, जयेश साळगावकर, बाबू आजगावकर, सुदिन ढवळीकर, विजय (सरदेसाई) हे सारे मंत्री आहेत. त्यात विधानसभा अध्यक्ष म्हणून उल्लेख आहे तो प्रमोद सावंत यांचा. राणेंच्या मते ते मुख्यमंत्री पदासाठी प्रयत्न करत आहेत.

तो आवाज खरंच विश्वजीत राणे यांचा आहे?

गोव्यात विश्वजीत राणे यांना ऐकलेल्या अनेकांनी निर्वाळा दिलाय की हा आवाज राणे यांचाच आहे. लोकसभा अध्यक्षांनी टेप अधिकृत असल्याची ग्वाही राहुल गांधींकडून मागितली होती. पण त्यांनी ती दिली नाही. तरीही त्यांच्यासारखा एका राष्ट्रीय पक्षाचा नेता संसदेत खोटी टेप सादर करून स्वतःची विश्वासार्हता पणाला लावणार नाही, असाही एक तर्क आहे. पण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन ही टेप खोटी असल्याचा खुलासा केला आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांना सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केलीय. पण ती मागणी रात्री उशिरापर्यंत तरी मान्य झालेली नाही.

Goa Minister Vishwajit P Rane writes to Goa CM Manohar Parrikar in regard with the audio tape released by Congress on Rafale, states, "This is a doctored audio & I have never had any discussion on this subject with anyone. there should be a thorough inquiry in this matter" pic.twitter.com/OVHkYOHtfz

— ANI (@ANI) January 2, 2019

मनोहर पर्रीकर असं बोलू शकतील का?

मनोहर पर्रीकर एक जानेवारीपासूनच मंत्रालयात येऊ लागलेत. दुसऱ्याच दिवशी हा बॉम्ब पडलाय. त्यात कॅबिनेट बैठकीत पर्रीकर असं बोलू शकतील का, असा प्रश्न विचारला जातोय. पर्रीकरांना अनेक वर्षं जवळून ओळखणाऱ्या एका ज्येष्ठ पत्रकाराने कोलाजला सांगितलं, `ऑडियो टेपमधे वर्णन केलंय, असं घडू शकतं. यात ज्यांची नावं आलीत, त्यांचे स्वभाव माहीत असणारं कुणीही सांगेल की असं घडू शकतं. स्वतःचं महत्त्व सांगण्यासाठी पर्रीकर असं सहजपणे बोलून जावू शकतात.`

आता पर्रीकर तसं बोलले की नाही माहीत नाही. पर्रीकरांनी ट्विट करून त्याचा स्पष्टपणे इन्कार केलाय. पण काँग्रेसने केलेला एक आरोप मात्र खरा आहे. पॅरिसमधे नरेंद्र मोदी राफेल करार करत असताना तेव्हा संरक्षणमंत्री असणारे पर्रीकर पणजीत मांडवी नदीच्या तीरावर स्वस्त मासे विकणाऱ्या सरकारी गाड्यांचं उद्घाटन करत होते.

Goa CM Manohar Parrikar tweets, "The audio clip released by the Congress party is a desperate attempt to fabricate facts after their lies were exposed by the recent Supreme Court verdict on Rafale. No such discussion ever came up during Cabinet or any other meeting." (File pic) pic.twitter.com/FoccXSmfP7

— ANI (@ANI) January 2, 2019

या ऑडियो टेप प्रकरणातून काय अर्थ काढायचा?

या सगळ्या प्रकरणातून काही शक्यता समोर येतात. त्या फक्त जर तरच्या पातळीवर आहेत. पण त्या अशा आहेत.

  • विश्वजीत राणे भाजपला कंटाळले असू शकतात. ते कधीही भाजप सोडून काँग्रेसमधे जाऊ शकतील. सोबत काही आमदार घेऊन जाऊ शकतात. त्यामुळे गोव्यात पुन्हा राजकीय भूकंप होऊ शकतो.
  • आजारपणामुळे पर्रीकरांना सगळ्यांनीच राजकीयदृष्ट्या वजा करून टाकलं होतं. पण अॅक्टिव झाल्यानंतर दोन दिवसांतच पुन्हा सगळं राजकारण त्यांच्या भोवती फिरायला लागलंय. पर्रीकरांनी हे घडवून आणलं असेल, तर ती चाणाक्ष राजकीय खेळी मानायला हवी.
  • पर्रीकर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका महत्त्वाच्या गटाच्या अगदी जवळचे आहेत. या प्रकरणात संघाचा हात असेल, तर संघ मोदींच्या विरोधात चाली खेळू लागला आहे, असाही याचा अर्थ काढता येऊ शकतो.
  • ही ऑडियो टेप विश्वजीत राणेंशी बोलणाऱ्या पत्रकाराने राहुल गांधींपर्यंत पोचवली असेल तर ते पत्रकारितेच्या नैतिकतेला धरून झालेलं नाही. एखाद्या नेत्याने आपल्यावर विश्वास ठेवून केलेली चर्चा अशी दुसऱ्या पक्षाच्या हातात देणं योग्य नाही. वरिष्ठ पदांवर काम करणारे काही पत्रकार राजकारण्यांसाठी राजकीय दलालीची कामं करतात, हे कटू सत्य नीरा राडिया टेपनंतर पुन्हा एकदा या टेपमधून समोर आलंय.