कोरोनाच्या एंडेमिक अवस्थेत बूस्टर डोसची गरज पडेल?

०८ सप्टेंबर २०२१

वाचन वेळ : ४ मिनिटं


स्वाईन फ्लू, प्लेग, इबोला, स्पॅनिश फ्लू अशा वेगवेगळ्या वायरसच्या साथी जगानं पाहिल्या. काही आल्या, काही गेल्या तर काहींनी पुन्हा डोकं वर काढलं. सध्या कोरोनाच्या वेगवेगळ्या लाटा जगभर येतायत. भारतातही कोरोनाची तिसरी लाट येतेय. वायरस कायम राहील अशी शक्यता व्यक्त केली जातेय. अशातच डब्ल्यूएचओच्या प्रमुख संशोधक सौम्या स्वामिनाथन यांनी कोरोना भारतात एंडेमिक अवस्थेला पोचल्याचं म्हटलंय.

कोरोना वायरसच्या पहिल्या लाटेत आपण अक्षरशः कंटाळलो. पहिली लाट गेली तोपर्यंत दुसरी लाट. लॉकडाऊनमुळे लोकांचे व्यवहार बंद होते. अर्थव्यवस्थेला फटका बसला. लोकांच्या रोजीरोटीवर त्याचा परिणाम झाला. घरी बसून कंटाळा येऊ लागला. लोक पुन्हा बाहेर पडू लागले. दुकानं, रेल्वे सुरू करायची मागणी होऊ लागली.

कोरोना वायरसची साथ कायम राहील असं जागतिक आरोग्य संघटनेनं गेल्यावर्षी म्हटलं होतं. याआधीही स्वाईन फ्लू, प्लेग, इबोला, स्पॅनिश फ्लूच्या साथी आल्या. काही कायम राहिल्या. तर काहींनी अधूनमधून डोकं वर काढलं.

कोरोनाच्या वायरसच्या लाटा जगभर पुन्हा पुन्हा येतायत. वायरसच्या केसेस आणि मृत्यूची संख्या कमी झाली किंवा लोकांना या वायरसची भीतीच वाटेनाशी झाली तर ही साथ संपते असं तज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळेच भारतात दुसरी कॅटेगरी दिसतेय. कोरोना कायम राहील असं म्हणत लोक रोजीरोटीसाठी बाहेर पडतायत.

भारतात सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटे इतकी ही लाट धोकायदायक नसेल असं सध्यातरी म्हटलं जातंय. जागतिक आरोग्य संघटनेनं मात्र गेल्याचवर्षी लाट कायम राहील असं म्हटलं होतं. त्यामुळेच वायरसच्या एंडेमिक अवस्थेची चर्चा होतेय.

हेही वाचा: कोरोनाः बिल गेट्सनी २०१५ मधेच दिलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष आपल्याला भोवतंय

एंडेमिकचा अर्थ काय?

'द वायर'ला दिलेल्या मुलाखतीत जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख संशोधक सौम्या स्वामिनाथन यांनी कोरोना भारतात एंडेमिक अवस्थेला पोचल्याचं म्हटलंय. यात चढ-उतार येत राहतील. पण भारतात दुसऱ्या लाटेमधे कोरोनानं जो उच्छाद मांडला तो पहायला मिळणार नाही असं त्याचं म्हणणं आहे.

अमेरिकेच्या 'सेंटर फॉर डिसीज कन्ट्रोल अँड प्रिवेंशन'नुसार एखाद्या भागात वायरस कायम राहणं आणि त्याचवेळी त्याचा प्रभाव नियंत्रित करता येणं या अवस्थेला एंडेमिक म्हणजेच स्थानिक स्वरूपाचा आजार असं म्हणतात. तर वायरसची एपिडेमिक अवस्था म्हणजे आजार संसर्गजन्य होणं.

जगभर वायरसचा संसर्ग होतो. वाढत जातो तेव्हा त्याला वायरसची पॅनडेमिक अवस्था म्हणतात. म्हणजेच वायसरची साथ येणं. सध्या मात्र आपण कोरोना वायरसच्या एंडेमिक अवस्थेत पोचू शकतो असं सौम्या स्वामिनाथन यांचं म्हणणं आहे.

ऑक्टोबरमधे तिसरी लाट

भारतात ऑक्टोबरमधे तिसरी लाट येईल असं केंद्रीय गृह खात्यानं स्थापन केलेल्या तज्ञांच्या समितीने म्हटलंय. तज्ञांच्या मदतीने 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिजास्टर मॅनेजमेंट'नं हा रिपोर्ट तयार केलाय. तो पंतप्रधान कार्यालयाकडे देण्यात आलाय.

तिसऱ्या लाटेचा लहान मुलांना मोठ्या प्रमाणात फटका बसू शकतो. त्यामुळेच लहान मुलांच्या आरोग्य सुविधांसंबंधी समितीने केलेल्या शिफारशींकडे गांभीर्याने पहायला हवं. या धोक्याच्या पार्श्वभूमीवर समितीने काही इशारेही दिलेत. विशेष करून आरोग्य सुविधांच्या कमतरतेवर बोट ठेवलंय.

तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन डॉक्टर, कर्मचारी वर्ग, वेंटिलेटर अशा पुरेशा व्यवस्था आपल्याला आतापासून करायला हव्यात असंही समितीने म्हटलंय. सध्या आपल्याकडे १२ पेक्षा अधिक वयाच्या मुलांना झायडस कॅडीला आणि झायकोव-डी या लसीला मंजुरी मिळालीय. त्यामुळे लसीकरण ही प्राथमिकता असायला हवी असं समितीने सरकारला सुचवलंय.

हेही वाचा: कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

एंडेमिक अवस्थेचं कारण

जागतिक आरोग्य संघटनेनं याआधीच कोरोना वायरस आपल्यात कायम राहील असं म्हटलंय. 'नेचर' या विज्ञानविषयक मॅगझीनमधे मार्च २०२१ ला एक सर्वे आला होता. ज्यात १०० आरोग्य क्षेत्रातल्या तज्ञांपैकी ९० टक्के लोकांनी कोरोना वायरस जगभरात पुढची अनेक वर्ष एंडेमिक अवस्थेत असेल या म्हणण्याला दुजोरा दिला होता.

वायरसच्या लाटा या लोकसंख्येचं जास्तीचं प्रमाण आणि लसीकरण कमी आहे अशा भागांमधे कायम येत राहतील असं प्रसिद्ध साथरोगतज्ञ डॉ. गगनदीप कांग यांनी 'द क्विंट'ला सांगितलंय. वायरसचे नवनवे प्रकार म्हणजेच वॅरियंटही त्याचं कारण ठरतायत. त्याचाच भाग म्हणून सध्याचा डेल्टा वॅरियंटकडे पहावं लागेल. हा वॅरियंट सध्या जगभर धुमाकूळ घालतोय.

वॅरियंटचा लहान मुलांवरचा धोका लक्षात घेऊन आपल्याला 'होम केयर मॉडेल' उभं करावं लागेल असं आरोग्य क्षेत्रातले अनेक तज्ञ आधीपासूनच सांगतायत. त्या बरोबर मास्कचा वापर, लसीकरण वाढवणं, राजकीय नेत्यांच्या सार्वजनिक सभा, कार्यक्रमांवर निर्बंध या सगळ्याचं काटेकोर पालन करावं लागेल.

बूस्टर डोसची गरज?

कोरोना वायरसपासून वाचण्यासाठी म्हणून जास्तीत जास्त लसीकरणावर भर दिला जातोय. ज्यांनी दोन डोस घेतलेत त्यांना काही ना काही दिलासा मिळतोय. त्यानंतरही लसीचे डोस द्यावे लागले तर त्याला बूस्टर डोस असं म्हटलं जातं. सध्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे बूस्टर डोसची चर्चाही सुरू झालीय.

२७ मेला केंद्राच्या कोविड टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. वीके पॉल यांनी बूस्टर डोसची गरज असेल तर त्यासंबंधी गाईडलाइन तयार करण्यात येतील असं म्हटलं होतं. भारतातल्या बायोटेकच्या कोवॅक्सीन लसीच्या बूस्टर डोसची ट्रायल दिल्लीच्या 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स' मधे घेतली जातेय. फायजर, मॉडर्ना या कंपन्याही त्यावर विचार करतायत.

जगभरही या डोसची चर्चा आहे. इस्रायलनं बूस्टर डोस द्यायला सुरवातही केलीय. थायलंड आणि इंडोनेशियाचं सरकार फ्रंटलाईन वर्करला बूस्टर डोस द्यायचा विचार करतंय. तर अमेरिकेनं मॉडर्ना आणि फायजरची लस घेतलीय त्यांना २० सप्टेंबरपासून बूस्टर डोस दिला जाईल. जागतिक आरोग्य संघटनेनं मात्र बूस्टर डोसला मान्यता दिलेली नाहीय.

हेही वाचा: 

कोरोनाचा प्रादुर्भाव ही माणसाचीच चूक आहे!

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

कोरोना रोखण्यासाठी डिग्लोबलाइज होणं ही तर आपली घोडचूक ठरेल

पॅथॉलॉजीविषयी ४ : ब्लड बँकमुळे जीवन आणि पोस्टमॉर्टममुळे मृत्यू समजतो