विधानसभा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या रविवारीच खऱ्या अर्थाने राजकीय पक्षांनी आपले हुकमी पत्ते बाहेर काढले. प्रचाराला सुरवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात भाजप आणि काँग्रेससाठी प्रचार केला. पहिल्यांदाच प्रचाराच्या मैदानात उतरणार असल्याने दोघंही नेमकं काय बोलणार याकडे राजकारण्यांसोबतच मतदारांचंही लक्ष लागलं होतं.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला काल रविवारी खरी सुरवात झाली. आता जवळपास सगळ्याच पक्षांनी प्रचारासाठीचे आपले सारे पत्ते खुले केलेत. सारी ताकद पणाला लावली. महाराष्ट्राच्या निवडणूक प्रचारातला हा सगळ्यात पॉवरफूल दिवस होता. कारण दोन राष्ट्रीय पक्षांचे नेते प्रचारासाठी महाराष्ट्रात होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी जळगाव आणि भंडारा इथे जाहीर सभा घेतल्या. दुसरीकडे राहुल गांधी यांनी काँग्रेससाठी लातूर जिल्ह्यातल्या औशात एक आणि मुंबईत अशा दोन सभा घेतल्या. मोदींची विधानसभा निवडणूक जाहीर होण्याच्या दोन दिवस आधी नाशिकमधे महाजनादेश यात्रेच्या समारोपावेळी सभा झाली होती.
राहुल गांधींच्या भाषणाकडे तर साऱ्या देशाचं लक्ष लागलं होतं. कारण लोकसभा निवडणुकीतल्या दारूण पराभवानंतर ते कुठल्याही सार्वजनिक मंचावरून बोलले नाहीत. त्यामुळे लोकसभेच्या प्रचारात `चौकीदार चोर हैं` म्हणत पंतप्रधानांवर टीकास्त्र सोडणाऱ्या राहुल गांधींची भूमिका आता काय आहे, असा प्रश्न होता. एकमेकांचे वैचारिक विरोधक मोदी आणि गांधी एकाच दिवशी महाराष्ट्राच्या भूमीत येऊन काय बोलणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.
हेही वाचाः दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंच्या भाषणातल्या चार महत्त्वाच्या गोष्टी
आज प्रसिद्ध झालेल्या मराठी पेपरांच्या हेडलाईन बघितल्या तरी आपल्याला या दोन्ही नेत्यांच्या सभांचं महत्त्व लक्षात येईल. जवळपास सगळ्याच मराठी दैनिकांनी मोदी आणि राहुल गांधींच्या भाषणाला मुख्य बातमी म्हणून पहिल्या पानावर छापलंय. या सगळ्या बातम्यांची शीर्षकं खूप बोलकी आहेत.
महाराष्ट्र टाइम्स
हिंमत असल्यास ३७० पुन्हा आणण्याचे आश्वासन द्याः मोदी
बेरोजगारांना केंद्र सरकार चंद्राकडे पाहायला सांगतेः गांधी
पुढारी
३७० कलम पुन्हा लागू करून दाखवाः मोदी
अर्थव्यवस्था सुधाराः गांधी, मेड इन इंडियाची संस्थापकच धारावीः गांधी
लोकसत्ता
जागतिक मंदीतून भारताला सावरणारः मोदी
सरकारने अर्थव्यवस्था मोडीत काढलीः गांधी
लोकमत
विरोधकांमधे हिंमत असेल तर पुन्हा ३७० लावून दाखवाः मोदी
युवकांनी रोजगार मागितला, मोदींनी चंद्र दाखवलाः गांधी
सकाळ
हिंमत असेल तर ३७० आणाः मोदी
मोदींकडून अर्थव्यवस्थेचे वाटोळेः गांधी
सामना
थकलेले एकमेकांना आधारा देऊ शकतात, पण राज्याला नाहीः मोदी
तरुण नोकरी मागतात, मोदी चंद्र दाखवतातः गांधी
या हेडलाईन्स जवळपास सारख्याच आहेत. फक्त लोकसत्ताची हेडलाईन थोडीशी वेगळी आहे. लोकसत्ताने आपल्या हेडलाईनमधे मोदींनी देशात मंदीचं वातावरण असल्याची कबुली दिल्याच्या गोष्टीला प्राधान्य दिलंय. त्याचवेळी इतर साऱ्या दैनिकांनी मोदींच्या भाषणातला कलम ३७० चा मुद्दा उचलून धरलाय. यासाठी मोदी पन्नासेक मिनिटांचं वेळ घेतात. तर गांधी वीसेक मिनिटांतच आपलं भाषण संपवतात.
जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम ३७० काढून घेणं ही आपल्या सरकारची मोठी कामगिरी असल्याचं मोदी सरकारकडून सांगितलं जातं. हे सांगण्यासाठी भाजपकडून ३७० या आकड्याशी सांगड घालून देशभरात वेगवेगळे कार्यक्रमही घेण्यात येताहेत. हरयाणा आणि महाराष्ट्रातल्या निवडणुकीतही भाजपने कलम ३७० हा आपल्या प्रचाराच्या अजेंड्यावरचा मुख्य मुद्दा राहणार असल्याचं वेळोवेळी स्पष्ट केलंय. हाच धागा आपल्याला पंतप्रधानांच्या भाषणातही सापडतो.
पंतप्रधान जळगावच्या सभेत विरोधी पक्षांवर तुटून पडले. विरोधकांना खुलं आव्हान दिलं. ते म्हणाले, ‘हिंमत असेल तर विरोधकांनी आपल्या जाहीरनाम्यात सरकारने हटवलेलं कलम ३७० पुन्हा लागू करून दाखवण्याचं आश्वासन द्यावं. विरोधकांनी खोटे अश्रू गाळू नये. लोकांना ते मूर्ख बनवत आहेत. त्यांच्यात दम असेल तर त्यांनी कलम ३७० पुन्हा लागू करावं आणि तसं करण्याचा प्रयत्न केला तर ते वाचतील का? त्यांचं राजकीय अस्तित्व राहील कय? तुमच्यात हिंमत असेल तर तिहेरी तलाक पुन्हा लागू करून दाखवा.’
हेही वाचाः महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार या पाच मुद्द्यांभोवती फिरणार
कलम ३७०, तिहेरी तलाकच्या मुद्द्यावरून विरोधकांना खुलं आव्हान देणाऱ्या मोदींनी आर्थिक मंदीच्या मुद्द्यावर बोलताना हात आखडता घेतला. ते म्हणाले, ‘सहा महिन्यांपूर्वी आपण पुन्हा निवडून दिलेलं सरकार नव्या ऊर्जेने भारत निर्माणाचं काम करतंय. ही वेळ जागतिक जागतिक मंदीची असून वेळोवेळी असे प्रसंग जगावर ओढवत असतात. या जागतिक मंदीतून भारताला सावरण्याचं लक्ष्य सरकारने ठेवलंय. मंदीतून देश बाहेर निघेल.’
केंद्रात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात मे महिन्यात पुन्हा एकदा भाजपचं सरकार आल्यापासून भारतातल्या आर्थिक मंदीची जगभरात चर्चा सुरू आहे. पण सरकारकडून देशात अशी कुठलीच परिस्थिती नसल्याचं सांगितलं जातं. पंतप्रधानांनी मात्र जगभरात मंदी असल्याचं सांगत भारताला आपण यातून सावरून नेणार असल्याचं सांगत देशाच्या खालावलेल्या आर्थिक परिस्थितीची अप्रत्यक्षरित्या कबुलीच दिलीय. पंतप्रधानांनी सार्वजनिक मंचावरून पहिल्यांदाच आर्थिक मंदीचा उल्लेख केला.
नरेंद्र मोदींनी कलम ३७० आणि तिहेरी तलाक पुन्हा लागू करण्याचं आव्हान विरोधी पक्षांना खुलं आव्हान दिलं. पण विरोधी पक्षांनी मोदींच्या या आव्हानाला कुठलंच उत्तर न देता आपल्याच अजेंड्यावर चालायचं ठरवल्याचं राहुल गांधींच्या भाषणावरून दिसून आलं. लोकसभा निवडणुकीत राफेलच्या मुद्द्यावरून ‘चौकीदार चोर हैं’ म्हणत थेट पंतप्रधानांना कोंडीत पकडणाऱ्या गांधींनी विधानसभेच्या मैदानातही आपल्या विरोधाची धार कायम ठेवलीय.
हेही वाचाः भाजपचा अश्वमेध रोखण्यासाठी विरोधकांना कांशीरामांकडे जावंच लागेल!
राहुल गांधींनी आपल्या वीसेक मिनिटांच्या कॅप्सूलछाप भाषणात बेरोजगारी, आर्थिक मंदी यासारख्या पैशांभोवती फिरणाऱ्या मुद्द्यांवर भर दिला. ते म्हणाले, ‘काँग्रेसने ७० वर्षांत काय केलं, असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपकडून सातत्याने विचारला जातोय. त्यांना एकच उत्तर आहे, ७० वर्षांत काँग्रेसने अर्थव्यवस्था मजबूत करण्याचा प्रयत्न केला. ती बरबाद केली नाही. पण पाच वर्षांतच मोदी सरकारने देशाची अर्थव्यवस्था मोडीत काढलीय.’
पंतप्रधानांनी विरोधकांना खुलं आव्हान दिलं. तसंच राहुल गांधींनी पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिलं. शेतकरी आत्महत्या करताहेत. बेरोजगारी वाढतेय. यावर मात्र मोदी आणि फडणवीस का बोलत नाहीत, असा सवाल केला. राहुल गांधींनी ऐतं चालून आलेल्या पीएमसी बँक घोटाळ्यावरूनही सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, ‘पीएमसी बँकेचे संचालक कोण होते, हे संचालक कुणाचे नातेवाईक आहेत, यावर मोदी किंवा फडणवीस का बोलत नाहीत.’
राहुल गांधी पुढे म्हणाले, ‘मेड इन इंडियाचे स्वप्न तुम्ही पाहता. पण या मेड इन इंडियाची संस्थापकच धारावी आहे. ही धारावीच मेड इन चायनाशी मुकाबला करू शकते. धारावीतले लघु उद्योग बंद आहेत. त्यामुळे बेरोजगारी वाढलीय. मुंबईसह गुजरात, चेन्नई तसंच इतर राज्यांतलं उत्पादन बंद आहे. पंतप्रधानांनी अदानी, अंबानींचं कर्ज माफ केलं. धारावीतल्या लघु उद्योजकांचं कर्ज माफ केलं नाही.’
हेही वाचाः
पंतप्रधानांच्या नाशिकमधल्या भाषणाचे ५ बिटविन द लाईन्स अर्थ
मोदी तामिळनाडूला गेल्यावर ट्विटरवर गोबॅकमोदी ट्रेंड का होतो?
रिझर्व बँकेने सरकारला पावणे दोन लाख कोटी दिल्यावर मंदी संपेल?
काँग्रेस गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष निवडण्याची रिस्क का घेत नाही?
भाजपसाठी ब्राम्हणबहुल कोथरूड हे काँग्रेसच्या वायनाडसारखं आहे का?