भाजपच्या पहिल्या यादीचं वैशिष्ट्य काय?

२२ मार्च २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


भाजपने अखेर काल रात्री लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीचे सचिव जगत प्रकाश नड्डा यांच्या सहीने १८२ उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली. यामधे महाराष्ट्रातल्या १६ उमेदवारांचा समावेश आहे. वेगवेगळ्या सर्वेंच्या आधाराने भाजपमधे अनेक विद्यमान खासदारांचे तिकीट कापले जाणार असल्याची बातम्या आल्या. पण भाजपने १४ जणांना पुन्हा संधी दिलीय.

शिवसेनेसोबतच्या युतीत आपल्या वाट्याला आलेल्या १६ जागांवरचे उमेदवार भाजपने गुरुवारी रात्री जाहीर केले. यात १४ खासदारांना पुन्हा उमेदवारी दिलीय. तर दोन ठिकाणी खांदेपालट केलीय. त्यामुळे सर्वेच्या रिपोर्टवरून अनेक विद्यमान खासदारांचे तिकीट कापणार असल्याच्या जवळपास सगळ्या बातम्या खोट्या ठरल्यात.

तिन्ही मंत्र्यांना पुन्हा संधी

लोकसभेची निवडणूक वीसेक दिवसांवर आलेली असताना भाजपने गुरुवारी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात उत्तर प्रदेशातल्या उमेदवारांचा सर्वाधिक समावेश आहे. महाराष्ट्रातल्या १६ उमेदवारांचाही समावेश आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, हंसराज अहिर, सुभाष भामरे यांच्यासोबतच प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना अपेक्षेप्रमाणे उमेदवारी जाहीर झालीय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय असलेल्या नागपुरात आता गडकरी विरुद्ध काँग्रेसचे नाना पटोले असा सामना रंगणार आहे. धुळ्यात भामरेंविरोधात काँग्रेसने आधाचीच विद्यमान आमदार कुणाल रोहिदास पाटील यांना उमेदवारी दिलीय. चंद्रपुरात अहिर यांना उमेदवारी देत भाजपने काँग्रेसवर आघाडी केलीय.

दोन ठिकाणी भाकरी फिरवली

भाजपने अहमदनगर आणि लातूर इथल्या विद्यमान खासदारांना डावलून नवे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवलेत. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या जागावाटपावरूनच्या साठमारीत काँग्रेसमधून इच्छूक असेलेले डॉ. सुजय विखे पाटील तीन-चार दिवस आधीच भाजपवासी झालेत. तिथे भाजपने त्यांना लगेच उमेदवारी देत विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना घरी बसवलंय.

अहमदनगरसोबतच भाजपने लातूरचा उमेदवारही बदललाय. पालकमंत्र्यांसोबतची वादावादी तसंच एकला चलो रेच्या भुमिकेमुळे त्यांची उमेदवारी कापण्यात येणार असल्याचं अगोदरपासूनच बोललं जात होतं. तिथे भाजपने जिल्हा परिषद सदस्य असलेल्या सुधाकर शृंगारे यांना उमेदवारी दिलीय. मुंबईत बिल्डर असलेले शृंगारे हे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासोबतच अहमदपूरचे आमदार विनायकराव पाटील यांच्या ऐकण्यातले म्हणून ओळखले जातात.

नऊ मतदारसंघात अजून प्रतिक्षाच

भाजपची यादी यायला उशीर झाला. त्यामुळे आता भाजप राज्यातले सगळेच उमेदवार एकाच वेळेस जाहीर करेल, असं बोललं जात होतं. पण भाजपने १६ जागांवरचे उमेदवार जाहीर केलेत. अजून ९ जागांवरच्या उमेदवारांची प्रतिक्षा आहे. तसंच पालघरची जागा भाजप स्वतः लढवणार की शिवसेनेच्या पदरात टाकणार हे अजून स्पष्ट झालं नाही.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदेडमधून उमेदवार जाहीर केला नाही. तिथे काँग्रेसकडून कोण उमेदवार असणार हे पाहूनच उमेदवारी द्यायचा निर्णय घेतला जाणार आहे, असं पहिल्या यादीवरून स्पष्ट झालंय. चव्हाण हे आपल्या पत्नी आमदार अमिता चव्हाण यांच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत.

किरीट सोमैय्यांना शिवसेनेवरची टीका भोवणार?

ईशान्य मुंबईतून विद्यमान खासदार किरीट सोमैय्या यांच्या उमेदवारीबद्दलचा सस्पेन्स अजून जशासतसा आहे. स्वबळाची चर्चा सुरू असताना सोमैय्या यांनी शिवसेना पक्षनेतृत्वावर कठोर शब्दांत टीका केली होती. एवढंच नाही तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात थेट ईडीमधे तक्रार दिली होती. याबद्दलचा राग म्हणून शिवसेनेकडून त्यांच्या उमेदवारीला विरोध होताना दिसतोय. सोमैय्या यांचं मतदारसंघातलं काम चांगलं असूनही त्यांच्यावर उमेदवारीसाठी दुसऱ्या यादीची वाट बघण्याची वेळ आलीय.

ईशान्य मुंबईसोबतच पुणे, सोलापूर, जळगाव, दिंडोरी या जागांचा तिढा अजून सुटला नाही. जवळपास या सगळ्याच ठिकाणचे उमेदवार बदलण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्या चर्चेला भाजपच्या पहिल्या यादीने दुजोराच मिळालाय. या मतदारसंघात भाकरी फिरणार की जैसे थे राहणार हे दोनेक दिवसांतच कळेल. दिंडोरीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छूक असलेल्या डॉ. भारती पवार यांनी भाजपमधे प्रवेश केलाय. त्यामुळे विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची उमेदवारी कापली जाण्याची शक्यता आहे.

पहिल्या टप्प्यातली एका जागा अधांतरी

राष्ट्रवादी काँग्रेसचे माढ्यातून खासदार असलेल्या विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मुलगा रणजितसिंह यांनी नुकताच भाजपमधे प्रवेश केलाय. तिथे कुणाला उमेदवारी दिली जाणार हे अजून गुलदस्त्यातच आहे. तिथे नव्यानेच पक्षात आलेल्या मोहिते पाटलांच्या मुलाला उमेदवारी मिळणार की दुसऱ्या कुणाला हे अजून स्पष्ट व्हायचंय.

पहिल्या टप्प्यात मतदान होणाऱ्या भंडारा-गोंदियातही भाजपने अजून उमेदवार दिला नाही. माजी खासदार नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपला तिथे अजून जिंकून येणारा उमेदवार सापडला नाही.