काँग्रेसच्या विधानसभेसाठीच्या पहिल्या यादीचा अर्थ काय?

३० सप्टेंबर २०१९

वाचन वेळ : ३ मिनिटं


काँग्रेसने लोकसभेसारखंच विधानसभेलाही उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आघाडी घेतलीय. पहिल्या यादीत ५१ उमेदवारांचा समावेश आहे. यामधे प्रदेशाध्यक्ष, कार्याध्यक्ष, विधिमंडळ पक्षनेते, विरोधी पक्षनेते आणि विद्यमान आमदार यांचा समावेश आहे. पक्षात राहणाऱ्या विद्यमान आमदारांना उमेदवारी देतानाच तळ्यात-मळ्यात असणाऱ्यांच्या उमेदवारीबाबत पक्षाने सध्या कुठलाच निर्णय घेतला नाही.

विधानसभेची निवडणूक जाहीर होऊन आता दहा दिवस होताहेत. अजून काही निवडणुकाचा माहौल तयार होताना दिसत नाही. निवडणूक जाहीर झाल्यावर सत्ताधारी भाजपनेही आयाराम-गयारामांची मेगाभरती थांबवलीय. पण कालपासून राजकीय घडामोडींना अचानक वेग आलाय. काँग्रेसने रविवारी विधानसभा निवडणुकीसाठीची आपली पहिली यादी जाहीर केली.

सगळे वाट कशाची बघत होते?

काँग्रेसची पहिली यादी, त्या यादीतली नावं विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासूनच वायरल होत होती. ती यादी काही अधिकृत नव्हती. काँग्रेसकडून आपली यादी जाहीर करणं टाळलं जात होतं. निवडणूक जाहीर झाली तेव्हापासून पितृ पंधरवडा पंधरवाडा सुरू आहे. हा सगळा काळ चांगल्या कामासाठी चांगला नाही, असं काहीजण मानतात. त्यामुळे घटस्थापनेच्या मुहूर्तावर काँग्रेसने आपली पहिली यादी जाहीर केलीय.

काँग्रेससोबतच शिवसेनेनेही अधिकृत उमेदवारी जाहीर न करताच इच्छुकांना एबी फॉर्म द्यायला सुरवात केलीय. शिवसेना, भाजप युतीचा निर्णयही पितृपक्षामुळे रखडलाय. त्यावरही आज निर्णय होण्याची शक्यता आहे. आज भाजपनेही आपल्या शेवटच्या मेगाभरतीचा कार्यक्रम आयोजित केलाय. या मेगाभरतीमधे काँग्रेसचे काही आमदार भाजपमधे सामील होणार असल्याच्या बातम्या येताहेत.

काँग्रेसने जाहीर केलेल्या पहिल्या यादीतून काही अर्थ निघतात.

हेही वाचाः महाराष्ट्रात दिवाळीआधीच फुटणार विधानसभा निकालाचे फटाके

१. पहिल्या यादीत कुणाला संधी

काँग्रेसने पहिल्या यादीत ५१ जणांना उमेदवारी दिलीय. यामधे ठळकपणे सांगायचं झालं, तर प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह पाच कार्याध्यक्ष, विधिमंडळ पक्षनेते, विरोधी पक्षनेते यांच्यासोबतच विद्यमान आमदारांचा समावेश आहे.

या यादीत निष्ठावंताना पहिली संधी देण्यात आलीय. सत्ताधारी भाजप, शिवसेनेच्या मेगाभरतीपासून स्वतःला दूर ठेवणाऱ्या निष्ठावंतांचा यात समावेश आहे. तसंच लोकसभा निवडणूक लढवलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार के. सी. पाडवी यांना काँग्रेसने विधानसभेच्या रिंगणातही उतरवलंय.

२. पृथ्वीराज चव्हाणांचा निर्णय दोन दिवसांत

काँग्रेसने विद्यमान आमदारांना तिकीट देण्याचं धोरण अगोदरच जाहीर केलंय. पण कराड दक्षिणमधून आमदार असलेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उमेदवारीची घोषणा मात्र करण्यात आली नाही.

विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसोबतच सातारा लोकसभेची पोटनिवडणूकही होऊ घातलीय. राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा देत भाजपमधे गेल्यामुळे ही पोटनिवडणूक होतेय. राष्ट्रवादीच्या कोट्यातल्या या जागेवर काँग्रेसने चव्हाण यांना लोकसभेची उमेदवारी द्यावी, अशी मागणी होतेय. त्यामुळे ही घोषणा लांबलीय, असं खुद्द चव्हाण यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं.

३. मेगाभरतीच्या लिस्टमधे असणारेही वेटिंगवर

विद्यमान आमदारांना पुन्हा तिकीट देण्याचं धोरण काँग्रेसने अवलंबलंय. असं असतानाही काँग्रेसने काही जागांचा निर्णय लांबणीवर टाकलाय. ज्या जागांवरचे उमेदवार जाहीर करण्यात आले नाहीत, अशांमधे सत्ताधारी भाजप, शिवसेनेत जाण्यास इच्छुक असलेल्यांचा समावेश आहे.

कालपासून काँग्रेसचे सहा आमदार भाजपच्या मेगाभरतीमधे सामील होणार असल्याच्या बातम्या येताहेत. या बातम्यांचं सहाही आमदारांनी खंडन केलं नाही. त्यामुळे आज ही मेगाभरती सोहळा पार पडेल, असा दावा या बातम्यांमधे करण्यात आलाय.

अक्कलकोटचे सिद्धराम म्हेत्रे, पंढरपूरचे भारत भालके, मालाडचे अस्लम शेख, बुलडाण्यातील चिखलीचे राहुल बोंद्रे आणि माजी मंत्री अमरीश पटेल यांचे समर्थक शिरपूरचे काशीराम पावरा, साक्रीचे डी. एस. अहिरे यांच्या जागांचा निर्णय काँग्रेसने लांबणीवर टाकल्याचं पहिल्या यादीवरून दिसतंय.

हेही वाचाः आजोबांच्या वयाच्या शरद पवारांची तरुणांमधे क्रेझ का वाढतेय?

४. विद्यमान आमदारांना बदलण्याची शक्यता

विद्यमान आमदारांना कायम ठेवतानाच काही ठिकाणी उमेदवारही बदललेत. भोकर मतदारसंघातून विद्यमान आमदार अमिता चव्हाण यांच्याऐवजी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना उमेदवारी दिलीय.

दुसरीकडे, लातूर ग्रामीण मतदारसंघात त्र्यंबक भिसे हे काँग्रेसचे आमदार आहेत. पण या जागेवर काँग्रेसने उमेदवार जाहीर केला नाही. या जागेवर जिल्हा परिषद सदस्य आणि विलासराव देशमुख यांचा मुलगा धीरज देशमुख हे इथून इच्छुक आहेत. शिवसेना, भाजप युती होणार की नाही हे स्पष्ट झाल्यावर काँग्रेसने आपल्या उमेदवार जाहीर करण्याचा निर्णय घेतल्याचं उमेदवार लांबणीवरून दिसतंय.

५. पक्ष सोडलेल्यांच्या जागांचा निर्णय लांबणीवर

२०१४ मधे झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने ४२ जागा जिंकल्या होत्या. पण आता काँग्रेसच्या आमदारांची संख्या ३६ वर आलीय. गेल्या वर्षभरात सहा आमदारांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजप, शिवसेनेमधे प्रवेश केलाय. या सहा जागांवरच्या उमेदवारांचा निर्णयही काँग्रेसने लांबणीवर टाकलाय. तर २३ आमदारांना पुन्हा उमेदवारी दिलीय.

गेल्या वर्षभरात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या १७ आमदारांनी भाजप, शिवसेनेत प्रवेश केला. यामधे काँग्रेसचे सात आमदार असून यात एका विधानपरिषद आमदाराचाही समावेश आहे.

विधानसभा सदस्य राधाकृष्ण विखे पाटील, कालिदास कोळंबकर, जयकुमार गोरे यांनी भाजपमधे तर निर्मला गावित, भाऊसाहेब कांबळे, अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना, भाजपचे उमेदवार, युतीचा निर्णय जाहीर झाल्यावरच इथल्या उमेदवाऱ्या जाहीर करण्याचं धोरण काँग्रेसने अवलंबल्याचं दिसतंय.

हेही वाचाः 

शिवसेना, भाजप युतीचं नेमकं ठरलंय तरी काय?

ईडीच्या कारवाईचा फायदा पवार उठवणार की फडणवीस?

माणिकराव जाधवांनी शरद पवारांना ईडीच्या फेऱ्यात कसं अडकवलं?

लग्नासाठी जातधर्माचा विचार न करणाऱ्या तरुणांच्या शोधात गणेश देवी

काँग्रेसने उमेदवार दिलेल्या पाच लोकसभा जागांवर कोण मारणार बाजी?