भाजपच्या उमेदवार याद्यांमधे कुणाचा बोलबाला?

०३ ऑक्टोबर २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या दोन याद्या जाहीर केल्यात. आतापर्यंत १३९ जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आलेत. यामधे काही मातब्बरांना वेटिंगवर टाकण्याचं धोरण अवलंबण्यात आलंय. तर आयारामांचं तिकीत देऊन स्वागत करण्यात आलंय. त्यामुळे या याद्या कुणी फायनल केल्या, त्यावर कुणाचा प्रभाव आहे, याची चर्चा रंगलीय.

भाजपने परवादिवशी एक ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीसाठीची आपली १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यानंतर काल रात्री उशिरा १४ उमेदवारांचा समावेश असलेली दुसरी यादी आलीय. शिवसेना, भाजपचा जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर झाला नाही. पण यानिमित्ताने जागावाटप होण्याआधीच उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्याचा नवा फॉर्म्युला समोर आलाय.

कुणाचं तिकीट कापलं, जुन्यांना नव्यानं संधी

पहिल्या यादीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यासह ९२ विद्यमान आमदारांना पुन्हा संधी मिळालीय. १२ जणांचं तिकीट कापण्यात आलंय. बारा महिलांना संधी देण्यात आलीय. २०१४ मधे अपक्ष म्हणून निवडून आलेल्या तिघांनाही उमेदवारी मिळालीय.

दुसऱ्या यादीत उदगीरचे सुधाकर भालेराव आणि केजच्या संगीता ठोंबरे यांचं तिकीट कापण्यात आलंय. केजमधून नमिता मुंदडा यांच्या रुपाने एका महिलेला तिकीट मिळालंय. भाजप, शिवसेना युतीच्या अघोषित फॉर्म्युल्यानुसार आता भाजपच्या वाट्याच्या केवळ सात जागांवरचे उमेदवार जाहीर करणं बाकी आहेत.

हेही वाचाः काँग्रेसच्या विधानसभेसाठीच्या पहिल्या यादीचा अर्थ काय?

मातब्बरांना वेटिंग लिस्ट

या दोन्ही याद्यांमधे भाजपचे मातब्बर नेते एकनाथ खडसे यांचं नाव नाही. तसंच कॅबिनेट मंत्री विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे आणि माजी मंत्री प्रकाश मेहता यांनाही वेटिंगवर ठेवण्यात आलंय. तावडे हे गेल्यावेळी बोरिवली मतदारसंघातून निवडून आलेत. नागपूरच्या कामठीतून निवडून आलेले बावनकुळे हे नागपूरचे पालकमंत्री आहेत.

स्वतःहूनच मातब्बरांनी माघार घ्यावी, ही स्ट्रॅटेजी भाजपने लोकसभा निवडणुकीवेळी अवलंबलीय. या स्ट्रॅटेजीला यशही आलं. तत्कालीन लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यासारख्या दिग्गजांनी आपल्याला उमेदवारी जाहीर होत नसल्याचं बघून स्वतःहूनच माघार घेतली.

आयारामांना संधी

पक्षातल्या ज्येष्ठांना, निष्ठावंतांना वेटिंगला ठेवतानाच आयारामांना तिकीट देण्याचं धोरण अवलंबल्याचं दिसतंय. १४ उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत तर दोन दिवसांआधीच भाजपमधे आलेले गोंदियाचे काँग्रेस आमदार गोपालदास अग्रवाल, वंचित बहुजन आघाडीचे नेते गोपीनाथ पडळकर आणि राष्ट्रवादीतून आलेल्या केजच्या नमिता मुंदडा यांनी उमेदवारी देण्यात आलीय.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने आयारामांना पक्षात घेण्यासाठी मेगाभरती राबवली. यामधे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या अनेक पारंपरिक घराण्यांनी भाजपमधे प्रवेश केला. जवळपास या सगळ्या उमेदवारांना भाजपने तिकीट दिलंय. पहिल्या यादीत १२ आयारामांना तिकीट मिळालंय.

शिर्डीतून राधाकृष्ण विखे पाटील, इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील, साताऱ्यातून शिवेंद्रराजे भोसले, अकोलेमधून वैभव पिचड, भोकरमधे बापूसाहेब गोरठेकर, वडाळ्यातून कालिदास कोळंबकर, तूळजापूरमधून राणा जगजितसिंह पाटील, नवापूरमधे भरत माणिकराव गावित, वाईतून मदन भोसले, ऐरोलीत संदीप नाईक, माणधे जयकुमार गोरे आणि पेणमधे रवीशेठ पाटील या १२ आयारामांना स्थान मिळालं.

हेही वाचाः मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या एका दिवसाने काय सांगितलं?

कोण कुठल्या गटाचा?

स्थानिक पातळीवरच्या नेत्यांशी सल्लामसलत करून भाजपने आपल्या उमेदवाऱ्या फायनल केल्याचं दिसतंय. पण फायनल निर्णय स्थानिक पुढाऱ्यांशी बोलून झाला नाही, हे पक्षांतर्गत बंडाळीने स्पष्ट झालंय. लातूर जिल्ह्यातल्या औसा मतदारसंघात मुख्यमंत्र्यांचे पीए अभिमन्यू पवार यांना तिकीट देण्यात आलंय. पण तिथे पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांमधूनच त्यांना प्रचंड विरोध होतोय. थेट स्थानिक भाजप विरुद्ध टीम मुख्यमंत्री असं पाडापाडीचं राजकारण घडतंय.

गेल्यावेळी सामुहिक नेतृत्वात निवडणूक लढणाऱ्या भाजपने यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांचा चेहरा समोर केलाय. फडणवीसांनीही आगामी निवडणूक आपल्याच नेतृत्वात लढवली जाणार असल्याचा अंदाज घेत तयारी सुरू केलीय. राज्यभर महाजनादेश यात्रा काढली. या यात्रेच्या काळातच मुख्यमंत्री कुणाला उमेदवारी मिळणार याचे संकेत देत होते. तिथल्या स्थानिक उमेदवारांसाठी जनादेश मागत होते.

‘अहमदनगर जिल्ह्यातल्या उमेदवारांवर नजर टाकली तर सबकुछ फडणवीस हेच या याचं विश्लेषण करता येईल. नगरला हा अमूक गटाचा तो तमूक गटाचा अशी राजकीय संस्कृती आहे. काँग्रेसने उमेदवार दिला तर तो थोरातांचा की विखेंचा? अशी चर्चा लगेच सुरू व्हायची. भाजपच्या यादीबाबत असा दावा कुणालाही करता येणार नाही. अमुक आमदाराचं तिकीट मी आणलं, असा दावा भाजपचा एकही नेता करू शकत नाही. भाजपच्या यादीवर थेट मुख्यमंत्री, पालकमंत्री आणि त्यांच्या पक्षाचाच प्रभाव दिसतो,’ असं मत पत्रकार सुधीर लंके यांनी दैनिक लोकमतमधे आपल्या लेखात नोंदवलंय.

काँग्रेसमधल्या घराणेशाहीला नवी चाल

घराणेशाहीला चाल हे भाजपच्या याद्यांचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीमधून भाजपमधे आलेल्या घराण्यांना तिकीट देण्यात आलंय. भाजपमधल्या जुन्या घराण्यांनाही तिकीट मिळालंय.

अहमदनगरमधे खासदार सुजय विखे पाटील यांचे वडील राधाकृष्ण विखे पाटील, साताऱ्यात उदयनराजे भोसले यांचे चुलत भाऊ शिवेंद्रराजे भोसले, नंदूरबारमधे खासदार हीना गावित यांचे वडील विजयकुमार गावित या काँग्रेसी नेतेमंडळीचं आपापल्या घराण्यांचं राजकारण विधानसभेतही कायम राहणार आहे.

भाजप खासदार नारायण राणे यांचा मुलगा नितेश राणे यांनाही कणकवली मतदारसंघातून भाजपचं तिकीट दिलं जाणार आहे. भोकरदनमधे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा मुलगा संतोष दानवे, बीडमधे खासदार प्रीतम मुंडे यांची बहीण मंत्री पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आलीय. 

हेही वाचाः 

बाप एकच असतो, तो कसा बदलणार?

ईडीच्या कारवाईचा फायदा पवार उठवणार की फडणवीस?

महाराष्ट्रात दिवाळीआधीच फुटणार विधानसभा निकालाचे फटाके

पंतप्रधानांच्या नाशिकमधल्या भाषणाचे ५ बिटविन द लाईन्स अर्थ

आजोबांच्या वयाच्या शरद पवारांची तरुणांमधे क्रेझ का वाढतेय?