अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यावर तालिबाननं सावध पावलं टाकायचं कारण काय?

१६ ऑगस्ट २०२१

वाचन वेळ : ४ मिनिटं


तालिबाननं अफगाणिस्तानवर ताबा मिळवलाय. अध्यक्ष अश्रफ घनी आणि उपाध्यक्ष अब्दुल्ला यांनी लढण्याऐवजी मैदानातून पळ काढला. पण काबुल शहर ताब्यात घेताना हिंसा झाली नाही. ही अनेक अर्थांनी महत्त्वाची घटना आहे. अफगाणी वॉरलॉर्डस सध्या शांत असले तरी ते कायमचे शांत राहतील असं नाही. अफगाणिस्तानच्या वाटचालीबद्दल सांगणारी राजकीय विश्लेषक दिवाकर देशपांडे यांची फेसबुक पोस्ट.

अफगाणिस्तान आज ना उद्या तालिबानींच्या ताब्यात जाणार हे कळत होतं, पण इतक्या तडकाफडकी तालिबान्यांना अफगाणिस्तानचा ताबा मिळेल असं वाटत नव्हतं, कारण अध्यक्ष अब्दुल घनी आणि उपाध्यक्ष अब्दुल्ला हे सरकारी फौजांना एकवटून तालिबानशी दीर्घकाळ लढा देतील आणि काही काळ तरी अफगाणिस्तान यादवीत सापडेल असं बहुतेक निरीक्षकांना वाटत होतं. पण गेल्या काही दिवसांपासून अफगाण सैन्याला पगार तर मिळत नव्हताच पण लढण्यासाठी आवश्यक असलेली साधनंही मिळत नव्हती.

अफगाण नेत्यांचा मैदानातून पळ

तालिबानींना हवाई हल्ल्यापासून संरक्षण नसल्यामुळे अफगाण हवाई दल हल्ले करून आपला प्रतिकार वाढवेल असं वाटत होतं. पण ते झालं नाही. हवाई दलाला अमेरिकेकडून आवश्यक साधनसामुग्री मिळणं बंद झालं होतं. अफगाण सैन्यासमोर आभाळच फाटलं होतं. कुठंकुठं ठिगळ लावणार अशी परिस्थिती होती.

घनी आणि अब्दुल्ला यांच्या शाब्दिक प्रोत्साहनाने काहीच होणार नव्हतं. त्यामुळे अफगाण फौजांनी या दोन्ही नेत्यांकडे आपली असमर्थता व्यक्त केली. त्यामुळे घनी आणि अब्दुल्ला यांना मैदान सोडून पळण्याशिवाय पर्यायच नव्हता. घनी मध्य आशियातल्या कुठल्या तरी देशात गेले आहेत तर अब्दुल्ला दोहा इथं आहेत.

अब्दुल्ला आता घनी यांच्यावर पळपुटेपणाचा आरोप करून तालिबानींची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत आहेत. अब्दुल्ला हे उत्तर अफगाणिस्तानातले बिगर पुश्तु नेते आहेत आणि त्यांचा तिथं चांगला जम आहे, त्याचा फायदा घेऊन ते तालीबानींशी तडजोड करू शकतात.

हेही वाचा: कंदील बलुच : पाकिस्तानी महिलांची प्रेरणा

तालिबानला जगाशी वैर नकोय?

तालिबानींनी काबुल घेताना हिंसाचार किंवा गोळीबार केला नाही, ही महत्त्वाची घटना आहे. तसं केलं असतं तर काबुल शहर उध्वस्त झालं असतंच पण दुतावासाना संरक्षण देण्यासाठी आलेल्या अमेरिकन, ब्रिटिश आणि इतर देशांच्या सैनिकांशी चकमक उडाली असती. ते सध्या तालिबानला नकोय कारण त्यांना पाश्चात्य देशांकडून मान्यता मिळवायची आहे.

आताच्या तालिबानी नेतृत्वात आणि २० वर्षापूर्वीच्या तालिबानी नेतृत्वात बराच फरक आहे. सध्याच्या तालिबानी नेतृत्वाला आंतरराष्ट्रीय विचारप्रवाहाची कल्पना आहे. जगाशी वैर घेऊन आपण राज्य करू शकत नाही याची त्यांना जाणीव आहे. त्यामुळेच तालिबानी नेते बारादर यांनी चीनचा दौरा करून आधी चीनला आपल्या बाजूने वळवलं.

अफगाणिस्तानला आर्थिक मदतीची गरज आहे. ती चीनकडून लगेच मिळण्याची शक्यता आहे. चीनला अफगाणिस्तानात खनिज उत्खननाचे हक्क हवे आहेत. त्याच्या रोड अँड बेल्ट प्रकल्पात अफगाणिस्तानला स्थान आहे. शिवाय अफगाणिस्तानकडून बंडखोरांना पाठिंबा मिळू नये असंही चीनला वाटतंय. त्यामुळे अफगाण चीन सहकार्य लगेच सुरू होण्याची शक्यता आहे.

रशियाही तालिबानींशी जुळवून घेण्याच्या मन:स्थितीत आहे. पाकिस्तानकडून अफगाणिस्तानला फारसं काही मिळणार नाही. त्यातच अफगाण जनतेत पाकिस्तानविषयी कमालीचा द्वेष आहे. त्यामुळे अफगाण पाक संबंध पूर्वीसारखे राहतील असं मानायचं कारण नाही. अगदी भिकारी झालेल्या पाकचं अफगाणी ऐकतीलच असं नाही.

अशी असेल भारताबद्दलची भूमिका

भारत आणि अफगाणिस्तान संबंध सध्यातरी ताणलेलेच राहतील. चीन आणि पाकला अफगाणी भारतविरोधी कारवायांसाठी मदत करणार असतील तर हे संबंध सुधारणारही नाहीत. पण अफगाणी जनतेत भारताविषयी खूप जिव्हाळा आहे. शिवाय भारताने अफगाणिस्तानच्या विकासात सक्रीय सहभाग घेतला आहे, त्याचे पुरावे अफगाणिस्तानी जनतेसमोर आहेत.

तालिबान सध्यातरी भारताच्या विरोधात केवळ इस्लामिक अजेंडा राबवण्यासाठी जाईल का हे पहावं लागेल. तालिबान ही अनेक इस्लामी विचार प्रवाह असलेल्यांची संघटना आहे. त्यात पाकवादी आहेत तसे पाकविरोधकही आहेत. कट्टर इस्लामी आहेत तसे सौम्य इस्लामीही आहेत. त्यामुळे त्यांना परस्पर सहमतीने राज्य करावं लागेल.

अफगाणी वॉरलॉर्डस सध्या शांत आहेत. मात्र ते कायमचे शांत राहतील असं नाही. हळूहळू तेही डोकं वर काढतील. त्यामुळे अफगाणिस्तानच्या यापुढच्या वाटचालीकडे सगळ्यांनाच काळजीपूर्वक पहावं लागणार आहे.

हेही वाचा: 

ट्रम्प हरलेत, ट्रम्पवाद अमेरिकेत बोकाळलेला आहेच

चीन कधीच जगावर सत्ता गाजवू शकत नाही, कारण

भारतानं आधी आर्थिक युद्धाच्या सीमेवर लढायला हवं!

चीनने धोका दिल्यानंतर नेहरूंनी आपली युद्धनीति कशी बदलली?

(लेखक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक असून ही त्यांची फेसबुक पोस्ट आहे)