कोविड-१९ झालेल्या ४२ रुग्णांना डिस्चार्ज मिळालाय. सध्या ही बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी वायरल झालीय. खरंतर, कोरोना वायरसमुळे होणाऱ्या कोविड-१९ आजारावर सध्या कोणतीही एक ट्रिटमेंट किंवा औषधांचा डोस उपलब्ध नाही. असं असताना या रुग्णांवर नेमके कोणते उपचार करून त्यांना बरं केलंय जातंय?
भारतात ३० जानेवारी २०२० ला कोविड-१९ आजार झालेला पहिला पेशंट आढळला. परदेश प्रवास करुन आलेल्या या रुग्णाचं तातडीनं निदान करण्यात आलं. त्यामुळे भारतात त्याचा प्रसार होण्यापासून रोखता आलं. पण मार्चपासून कोरोना वायरसनं हळूहळू देशभर आपले पाय पसरायला सुरवात केलीय. देशात कोविड-१९ चे महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण सापडलेत.
सध्या संपूर्ण देशात कोरोना वायरसच्या संसर्गानं कोविड-१९ आजार झालेले ७२५ रुग्ण आढळलेत. १७ जणांचा मृत्यू झालाय. या सगळ्यात आनंदाची गोष्ट अशी की या रुग्णांपैकी ४२ जणांवर डॉक्टरांचे उपचार यशस्वी झाले असून त्यांना डिस्चार्जही देण्यात आलाय.
खरंतर, कोविड-१९ आजारवर सध्या कोणतीही एक ट्रिटमेंट किंवा औषधांचा डोस देताच येत नाही. आपण ज्याला कोरोना वायरस म्हणून ओळखतो त्याचं शास्त्रीय नाव SARS-CoV-2 असं आहे. तर या वायरससाठीच नाही तर कोरोना कुटुंबातल्या सार्स आणि मार्स या जुन्या मेंबरसाठीही कोणतीही उपचारपद्धती उपलब्ध नाही.
नेमकं कुठलं औषध किंवा इंजेक्शन किंवा गोळी दिली की कोविड-१९ आजार वायरस बरा होईल याबद्दल अजून कुठलंच संशोधन पूर्णत्वास गेलेलं नाही. मग कोणतंही औषध नसताना हॉस्पिटलमधले कोविड-१९ आजार झालेले रुग्ण बरं कसं होतात? त्यांना नेमकं कोणतं औषध दिलं जातं?
हेही वाचा : लॉकडाऊन न करता कोरोनाशी लढणाऱ्या दक्षिण कोरियाचं होतंय जगभर कौतूक
डिसेंबर महिन्यात चीनच्या वुहान शहरामधे पहिल्यांदा हा वायरस आढळला. त्याआधी याबद्दल कुणाला काहीच माहीत नव्हतं. पहिल्यांदाच हा वायरस आढल्यानं त्यावर कुठलंही संशोधन झालेलं नव्हतं. सुरवातीला चीनमधे कोविड-१९ पेशंट अडमिट होऊ लागले तेव्हा त्याच्यावर साध्या पद्धतीने उपचार केले जात होते. तापामुळे त्याच्या शरीरातली पाण्याची पातळी खाली जाऊ नये यासाठी त्याला सतत सलाईन देणं, ताप उतरवण्यासाठी औषध देणं आणि रुग्णाला स्वतःला श्वास घेता येत नसेल तर वेंटिलेटरच्या मदतीनं श्वास घ्यायला मदत करणं असे उपचार चालू होते.
हळूहळू या वायरस संदर्भात संशोधन सुरु झालं. मग काही औषधांचं कॉम्बिनेशन करुन तयार ते रुग्णाला दिलं जाऊ लागलं. यात प्रामुख्याने एचआयवी आणि मलेरियासाठी जी औषधं दिली जातात त्यांचा समावेश होता. याशिवाय काही हर्बल म्हणजे वनस्पतींपासून बनलेल्या औषधांचा प्रयोगही रुग्णावर केला जात होता.
थोडक्यात, कोविड-१९ आजार झालेल्या रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवण्यासाठी उपयुक्त अशी औषधं त्याला दिली जातात. त्यामुळे रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे माणसाच्या शरीरातल्या पेशी स्वतः लढून या वायरसचा नाश करतात.
गल्फ न्यूज या वेबसाईटवरच्या एका बातमीत तर कोरोनावर औषध म्हणून चीनने पारंपरिक औषध पद्धतीचाही वापर केल्याचं म्हटलंय. ‘डिसेंबर २०१९ मधे वुहान शहरात कोरोनाचा उद्रेक सुरु झाल्यावर चीनमधे रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली. आणि हजारो रुग्णांवर पारंपरिक चायनीज वैद्यकशास्त्रानुसार यशस्वीपणे उपचार केले गेले. अमेरिकनं न्यूज एजन्सी सीएनएननंही चायनीज मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलजीचा एक अहवाल दाखवून चीनमधल्या ८५ टक्क्यांपेक्षा जास्त रुग्णांना अँण्टीवायरल ड्रगसोबत वनऔषधींचा डोस देऊन बरं करण्यात आल्याचं सांगितलं होतं,’ असं या बातमीत म्हटलंय.
आपल्या पारंपरिक वनऔषधींमुळे माणसाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, असा विश्वास चिनी लोकांना वाटतो. याआधीही अशा प्रकारच्या वायरसशी लढताना वनऔषधींचा उपयोग करण्यात आल्याचं चायनीज अधिकाऱ्यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं होतं.
२०१८ मधे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने चायनीज पारंपरिक औषधोपचाराला मान्यता दिलीय. असं असलं तरी पाश्चिमात्य देशांतल्या डॉक्टर आणि शास्त्रज्ञांना त्याविषयी शंका वाटते. अशा प्रकारची औषधं कितपत सुरक्षित असतील आणि किती काळ काम करतील याविषयी त्यांना खात्री वाटत नाही. शिवाय, त्यातली काही औषधं मानवी शरीरासाठी अपायकारक असू शकतात, असंही त्यांना वाटतं. काहीही असलं तरी चीन फक्त पारंपरिक औषधांवर विसंबून न राहता आधुनिक वैद्यकशास्त्रातल्या औषधांचाही वापर करत होतं, हे विसरुन चालणार नाही.
हे कोरोना स्पेशलही वाचा :
कोरोनानंतर आपण वेगळ्याच जगात असणार आहोत
एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?
कोरोना वायरसः मोदींनी कुणाकडून घेतली जनता कर्फ्यूची आयडिया
विलगीकरण कक्षात डॉक्टर काय करतात, मुंबईची पत्रकार सांगतेय स्वानुभव
जय शेंडुरे: कोरोना आणि ट्रम्प प्रशासनाला पुरुन उरणारा रांगडा कोल्हापूरकर
चीनने आपल्या पारंपरिक औषधांवर विश्वास ठेवला तर ऑस्ट्रेलियाच्या क्विन्सलॅण्ड शहरातल्या संशोधकांनी आपण कोरोनावर औषध शोधल्याचा दावा केलाय. न्यूज डॉट कॉम एयू या वेबसाईटवरच्या एका बातमीत कोविड – १९ म्हणजेच कोरोना वायरस मारण्याची ताकद एचआयवी आणि अँटी मलेरिया ड्रगमधे असल्याचं त्यांनी म्हटलंय. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या अमेरिकेतंही हीच औषधं वापरली जातात असल्याचं एक ट्विट करून सांगितलं.
क्लोरोक्वीन आणि मलेरियावरचं औषध अमेरिकेसह भारतातही वापरलं जातंय. शिवाय, एचआयवीचा संसर्ग रोखणाऱ्या लोपिनावीर आणि रिटोनावीर या औषधांच्या कॉम्बिनेशननंही कोविड-१९ रूग्णांना मोठा दिलासा दिलाय. कॉम्बिनेशनचा हा कामचलाऊ प्रयोग सध्यातरी जगभरातल्या डॉक्टरांच्या मदतीला धावून आल्याचं दिसतंय.
भारतातल्या डॉक्चरांनीही या औषधांचीच मदत घेतलीय. मलेरिया, एचआवी यांच्या जोडीला स्वाईन फ्लूची औषधं देऊन रुग्णांना बरं करण्याचा प्रयत्न भारतात चालू असल्याचं वर्ल्ड वेबसाईटवर सांगण्यात आलंय.
भारतात पर्यटनासाठी आलेल्या एका इटालियन माणसाला कोरोना वायरसचा संसर्ग झाला. हे कळाल्यावर त्याला लगेचच जयपूरमधल्या सवाई मानसिंग हॉस्पिटलमधे भरती करण्यात आलं. तिथं डॉक्टरांनी एचआयवी, मलेरियासाठी वापरली जाणारी ड्रग आणि ओसेल्टामीवीर या ड्रगचं मिश्रण करुन संबंधित पेशंटला दिली. दोन आठवड्यांनी हा रुग्ण बरा झाला.
ही सगळी औषधं आणि त्याची माहिती गुगलवर किंवा अनेक ठिकाणी उपलब्ध असली तरी कोरोनासदृश्य लक्षणं दिसल्यावर ही औषधं परस्पर घेऊ नयेत, असं सरकारकडून नागरिकांना आवाहन करण्यात येतंय. सध्यातरी कोविड-१९ हा एक गंभीर आजार आहे. त्याला हलक्यात घेऊन चालणार नाही. त्यामुळे कोरोनाची लक्षणं आढळली तर हॉस्पिटलमधे जाऊन, तपासणी करुन मग डॉक्टरांकडूनच उपचार घ्यावेत.
आणि महत्त्वाचं म्हणजे, चीननं आपली पारंपरिक उपचारपद्धती वापरली तसं आपण आयुर्वेदाचा घरबसल्याच उपचार करुन बघू, असं कुणी म्हणत असेल तर ते सध्या साफ चुकीचं आहे. आयुर्वेदात सांगितलेल्या पद्धतीने कोविड-१९ आजार बरा झाल्याचे सध्या तरी कोणतेही पुरावे किंवा संशोधन उपलब्ध नाही.
आयुर्वेदाचं समर्थन करणारे अनेकजण आयुर्वेदीक जीवनशैलीचा अवलंबल्यास माणसाची प्रतिकारशक्ती वाढते असा युक्तिवाद करतात. त्यात कडुलिंब, कुटकी, गुडुची अशा वनौषधींचा समावेश असतो. हे खाणं आरोग्यासाठी उपयुक्तच असतं. पण त्याने कोविड-१९ बरा होतो की नाही हे सिद्ध झालेलं नाही.
सध्या जगभर जुगाड टेक्नॉलॉजी वापरून कोविड-१९ वर औषधोपचार सुरू आहेत. त्या जोडीला जगभर नवं आणि ठोस औषध मिळतंय का हे शोधण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. अनेक देशांमधे औषध शोधण्यावरुन स्पर्धाही लागलीय. त्यामुळे लवकरच कोविड-१९, सार्स आणि मार्ससारख्या जीवघेण्या आजारांवर आपल्याला जालीम इलाज मिळेल अशी आशा करण्यास हरकत नाही.
हेही वाचा :
सोशल मीडियात ज्ञानदा कोरोनापेक्षा जास्त वायरल का होतेय?
कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?
कोरोनाः बिल गेट्सनी २०१५ मधेच दिलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष आपल्याला भोवतंय
कोरोनाला हरवण्यासाठी जग वेगवेगळे मार्ग अवलंबतंय, मग मोदी घरीच राहायला का सांगतात?