दिल्लीतल्या तबलिगी जमातमधून कोरोनाग्रस्त देशभर जात असल्यामुळे खळबळ माजलीय. लॉकडाऊनमुळे कोरोना कंट्रोलमधे येत असताना केवळ मुसलमानांमुळे त्याचा प्रादुर्भाव पुन्हा वाढतोय, असा आरोप अनेक न्यूज चॅनलवर केला जातोय. कोरोना या देशावरच्या सगळ्यात मोठ्या संकटालाही सध्या हिंदू मुस्लिम भेदाभेदाचं ग्रहण लागलंय. पण तबलिगचीही एक बाजू समोर येतेय. या सगळ्यात सत्य कुठेच सापडत नाही. ते शोधण्याचा हा प्रयत्न.
दिल्लीतल्या तबलिगी जमातच्या धर्ममेळ्यानं साऱ्या देशात खळबळ उडवून दिलीय. कोरोनाविरोधातला लढा एका निर्णायक वळणावर असतानाच हा प्रकार उघडकीला आलाय. मार्चमधे झालेल्या या कार्यक्रमानंतर दिल्ली पोलिसांनी आता गुन्हा दाखल केलाय. तबलिगी जमातच्या मौलानासह इतर सहा जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय. पोलिस आता मौलाना मोहम्मद साद कांधवी यांचा शोध घेताहेत.
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या एका ट्विटनुसार, ३६ तासांच्या ऑपरेशननंतर मरकजमधून २३६१ लोकांना बाहेर काढण्यात आलं. बुधवारी पहाटे चारपर्यंत हे ऑपरेशन चाललं. यापैकी ६१७ लोकांना हॉस्पिटलमधे दाखल करण्यात आलंय. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मरकजशी संबंधित लोकांचा दावा होता, की इथे हजारेक लोक आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानंही कोरोना वायरस संक्रमणाच्या केसेसमधे अचानक वाढ होण्यामागं तबलिगी जमातला जबाबदार ठरवलंय. एका पत्रकार परिषदेत आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितलं, की पॉझिटिव केसेसच्या संख्येत अचानक झालेली ही वाढ तबलिगी जमातच्या लोकांच्या फिरस्तीमुळे झालीय. पण हा ट्रेंड देशभर दिसत नाही.
हेही वाचाः संजय राऊत लिहितातः कोरोना हा निसर्गाने देवधर्माचा केलेला पराभव
निजामुद्दीन मरकजमधून बाहेर काढण्यात आलेल्यांपैकी तीनशेहून अधिक जणांमधे कोरोनाचं संक्रमण झाल्याचं आढळलंय. यामधे तामिळनाडूतल्या सर्वाधिक १९० लोकांचा समावेश आहे. याखालोखाल ७० जण आंध्र प्रदेशचे आहेत. दिल्लीचे २४, तेलंगणाचे १०, अंदमानचे १०, आसामचे ५, पुद्दुचेरीचे २ आणि काश्मीरमधली एक व्यक्ती सापडलीय. आता देशभरात एकोणीसशेहून अधिक लोकांमधे कोरोनाचं संक्रमण झालंय. तर पन्नासहून अधिक जणांचा जीव गेलाय.
आपल्या महाराष्ट्रातलेही दोनेकशे लोक या जमातमधे सामील झाल्याची बातमी टीवी ९ मराठीनं दिलीय. २० मार्चला तेलंगणामधे १० लोकांच्या टेस्ट कोरोना वायरस पॉझिटिव निघाल्या. हे सारे इंडोनेशियाचे नागरिक असून ते जमातमधे सामील झाले होते.
कोरोनाला रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असताना धर्माचं मिशनवर निघालेल्या तबलिगी जमातचं मुख्यालय 'मरकज मंजील' आता कोरोना वायरसचं हॉटस्पॉट बनलीय. जमातमधे सामील झालेले सात जण मृत्युमुखी पडलेत. यामधे तेलंगणातले सहा जण आहेत तर श्रीनगरच्या एका मौलानाचा समावेश आहे. घरी गेलेले लोक आणि हे मिशन पुढं नेण्यासाठी देशभर फिरत असलेल्या धर्मगुरूंमधेही कोरोनाची लक्षणं आढळलीत.
तबलिगी जमातचं प्रकरण समोर आलंय तसं राजकारण्यांसह सोशल मीडियावरच्या वॉरिअर्सचा धंदाही जोरात सुरू झालाय. पण हे सारं प्रकरण एका ओळीत समजण्यासारखं नाही. रोज नव्या गोष्टी समोर येत आहेत. सगळ्या गोष्टी समजून घ्यायला आपल्याकडे वेळ नसला तरी या प्रकरणावर काहीएक मत ठरवण्याआधी आपल्याला काही गोष्टी माहिती असल्या पाहिजेत. या सगळ्यात सरकारचीही एक क्रोनोलॉजी आहे. तसंच जमातचीही एक क्रोनोलॉजी आहे.
शिकवण देण्याला तबलिगी म्हणतात. जमात म्हणजे लोकांचा जत्था. म्हणजेच इस्लामच्या प्रचार, प्रसारासाठी निघालेले लोक म्हणजे तबलिगी जमात. थोडक्यात काय, तर इस्लामचा प्रचार, प्रसार करणाऱ्या मिशनरी लोकांची ही संघटना. राजस्थानाच्या मेवातमधे स्थापन झालीय. आता भारतासह बांगलादेश, इंडोनेशिया, पाकिस्तान यासारख्या १००-१५० देशांमधे जमातचं नेटवर्क आहे. सुन्नी मुस्लिमांमधे काम करणारी ही संघटना आहे.
तबलिगी जमातशी संबंधित मौलाना सय्यद अतहर देहलवी यांनी आपला एक वीडियो ट्विट केलाय. यात ते सांगतात, ‘तबलिगी जमात ही काही नव्यानं स्थापन झालेली संस्था नाही. या संस्थेला जवळपास ९० वर्षांचा इतिहास आहे. भारतात ५ ते ७ कोटी लोक आणि जगभरात ४० कोटी लोक या संस्थेचे अनुयायी आहेत. भारतात गुजरात आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांत दरवर्षी इज्तेमाचं आयोजन केलं जातं. तसंच आत्ताही करण्यात आलं होतं.’
दिल्लीच्या निजामुद्दीन भागात या संस्थेचं आंतरराष्ट्रीय मुख्यालय आहे. त्याला 'मरकज मंजिल' असं नाव आहे. सध्या मीडियामधे 'निजामुद्दीन मरकज' म्हणून हे मुख्यालय ओळखलं जातंय. ही मुसलमानांची जगातली सर्वात मोठी संस्था आहे. भारतातल्या सर्व मोठ्या शहरात या संस्थेची मरकज म्हणजेच केंद्रं आहेत. या केंद्रांमधे वर्षभर इज्तेमा सुरू असतो. म्हणजेच धार्मिक कार्यासाठी लोक इथं येत-जात राहतात. देशासह जगभर कोरोना संसर्ग झालेले रुग्ण सापडत असल्याच्या बातम्या येत असतानाही निजामुद्दीन इथल्या केंद्रात इज्तेमा सुरू होता. यादरम्यान इतर राज्यांमधूनही लोक इथं येत होते.
हेही वाचाः कोरोनाः जग सारे मार्ग अवलंबतंय, मग मोदी घरीच राहायला का सांगतात?
१३ ते १५ मार्च या काळात देशात तबलिगी जमातचा मेळावा झाला. देशपरदेशातून जवळपास तीन हजार लोक आले होते. परदेशातून दोनशेहून जास्त धर्मगुरू आले होते. याच काळात जगभर कोरोना वायरसनं थैमान घालायला सुरवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ मार्चपासूनच आपल्या ट्विटर अकाऊंटवरून कोरोनाबद्दल माहिती द्यायला सुरवात केली. कोरोनामुळं आपण यंदा होळी मिलन कार्यक्रमात भाग घेणार नाही, तसंच रंग खेळणार नसल्याचं त्यांनी जाहीर केलं. देशात ३० जानेवारीला कोरोना संसर्गाचा पहिला पेशंट सापडला होता.
दुसरीकडे दिल्ली सरकारनं एकाच ठिकाणी दोनशेहून अधिक लोकांना एकत्र येण्यास प्रतिबंध घातला होता. हा आदेश १३ मार्चचा होता. पण असं असूनही निजामुद्दीन इथं जमातचे लोक कायदा धाब्यावर बसवून मिशन पूर्ण करण्यासाठी एकत्र आले. मग १६ मार्चला दिल्ली सरकारनं पन्नासहून अधिक लोकांच्या एकत्र जमण्यावर निर्बंध घातले. पण जमातमधे पहिले पाढे पंचावन्न सुरूच होते.
तेलंगणाच्या मुख्यमंत्री कार्यालयानं सोमवारी रात्री हैदराबाद शहरात कोरोनाच्या संसर्गानं सहा लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. शोध घेतल्यावर ध्यानात आलं, की हे सारे लोक दिल्लीत तबलिगी जमातच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. ही गोष्ट समजल्यावर देशात एकच खळबळ उडाली. सरकारी यंत्रणा कामाला लागल्या. परिसरात 'वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशन'च्या टीम्स दाखल झाल्या. कायद्याचा धर्म धाब्यावर ठेवून मरकजमधे सुरू असलेले सगळे कारनामे चव्हाट्यावर आले.
गृहखात्यानंही २९ मार्चला एक निवेदन जारी केलं. त्यानुसार ‘मरकजमधे अनेक लोक एकत्र राहत आहेत आणि त्यामधे काही परदेशी नागरिकांचाही समावेश आहे, अशी माहिती रविवारी २९ मार्चला रात्री उशिरा मिळाली. त्यानंतर दिल्ली पोलीस आणि सीआरपीएफचे अधिकारी वैद्यकीय पथक घेऊन इथं पोचले.’ आणि ३० मार्चला हे सर्व प्रकरण मीडियात आलं. साऱ्या सरकारी यंत्रणा हाय अलर्टवर असताना जवळपास पंधरा दिवस देशाच्या राजधानीत हे सारं सुरू होतं.
दिल्लीत तबलिगी जमातच्या कार्यक्रमानं आत्ता खळबळ उडालीय. पण फेब्रुवारीमधे मलेशियात जमातच्या एका कार्यक्रमात जवळपास १६ हजार लोक जमले होते. याबद्दल खूप उशिरा २० मार्चला 'न्यूयॉर्क टाईम्स'नं एक स्टोरी केली. त्यानुसार मलेशियातल्या जमातनं साऊथ ईस्ट आशियामधे कोरोना वायरसचा एक सगळ्यात मोठा वाहक बनण्याचं काम केलंय. यानंतर आठवडाभरातच या पट्ट्यातल्या सहाएक देशांमधे कोरोना वायरसच्या पॉझिटिव केसेस आढळल्या.
अल् जझिराच्या एका बातमीनुसार मलेशियात कोरोना संसर्गाचे जेवढे रुग्ण सापडले आहेत, त्यापैकी दोन तृतीयांश लोक हे तबलिगी जमातच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. ब्रुनेईमधे याच मशिदीच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या ४० पैकी ३८ लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं आढळून आलं. पाकिस्तानातही तबलिगी जमातच्या कार्यक्रमांनी सरकारला पुरतं बेजार केल्याचं ‘द डॉन’ वृत्तपत्रानं म्हटलंय.
हेही वाचाः लोकांचा विज्ञानावरचा विश्वास कमी व्हावा यासाठीच धडपडताहेत आपले राजकारणी
सगळा प्रकार अंगलट येत असल्याचं बघून तबलिगी जमातनं सोमवारी ३० मार्चला रात्री एका प्रसिद्धीपत्रक जारी केलंय. त्यानुसार ‘देशात जनता कर्फ्यूची घोषणा झाली तेव्हा मरकजमधे मोठ्या संख्येनं लोक होते. २२ मार्चला पंतप्रधानांनी जनता कर्फ्यूची घोषणा केली. त्याच दिवशी मरकजला बंद करण्यात आलं. नवीन लोकांना एंट्री बंद करण्यात आली. आतमधे असलेल्या लोकांना घरी पाठवण्याची सोय केली जाऊ लागली. पण २१ मार्चपासूनच रेल्वेसेवा बंद होऊ लागली होती. त्यामुळे लोकांना घरी पाठवणं अडचणीचं झालं. तरीही दिल्ली आणि आसपासच्या जवळपास दीडेक हजार लोकांना घरी पाठवण्यात आलं. आता जवळपास दीड हजार लोक राहिलेत.’
प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटलंय,
२४ मार्चला स्थानिक पोलिसांनी मरकज बंद करण्याची नोटीस दिली.
२४ मार्चलाच पंतप्रधानांनी लॉकडाऊनची घोषणा केली. तयारीसाठी केवळ चार तासांचा वेळ मिळाला.
२६ मार्चला एसडीएमसोबत एक मिटिंग झाली. मरकजकडून प्रशासनाला पुन्हा मदतीची याचना करण्यात आली.
२५ मार्चला ६ लोकांना टेस्टसाठी हॉस्पिटलमधे नेण्यात आलं.
२८ मार्चला ३३ लोकांना टेस्टसाठी नेण्यात आलं.
२८ मार्चलाच लाजपतनगरच्या एसीपीकडून मरकजला कायदेशीर कारवाईची आणखी एक नोटीस देण्यात आली.
२९ मार्चला तबलिगी जमातनं नोटीसचं उत्तर दिलं.
तबलिगी जमातचा बेजबाबदारपणा, हेकेखोरपणावर चौफेर टीका होत असताना जमातकडून आम्ही काहीच केलं नसल्याचं सांगितलं जातंय. लंगडं समर्थन केलं जातंय. जगभरातले देश कोरोनाविरोधात लढताहेत. कोरोनाचं संक्रमण हे परदेशातून भारतात येतंय. त्यासाठी सरकार अनेक पातळ्यांवर काम करतंय. सोशल डिस्टन्सिंगचं आवाहनही केलंय जातंय. असं असताना जमातनं परदेशातले धर्मगुरू कशाला बोलावले? या धर्मगुरूंना भारतभर फिरस्तीसाठी मोकळं कशाला सोडलं?
तबलिगनं सारा प्रकार समोर आल्यावरही इथल्या कार्यक्रमात सामील होण्यासाठी किती लोक आले होते याविषयी मोघम माहिती दिली. जिथं ठोस माहिती गरजेची आहे तिथं ती देण्यास टाळाटाळ केली जातेय. सामील झालेल्यांची नावंही सरकारशी शेअर केली जात नाहीत. त्यांचे पत्तेही दिले जात नाहीत.
एवढा मोठा जमाव जमणार आहे, तर मग तेव्हा काळजी घेण्याची जबाबदारी जमातची नव्हती का? धर्माचं काम माणसाला वाचवण्याचं आहे. संकटात नेऊन सोडण्याचं नाही, हे तबलिगी जमात विसरली.
मौलानानं एक नागरिक म्हणून कर्तव्य का निभावलं नाही? हा आजार परदेशातून येतो हे माहीत असूनही मौलानानं जमातचं आयोजन रद्द का केलं नाही? जमातकडून आता अगोदरच परवानगी घेतल्याचं सांगितलं जातंय. पण परिस्थितीचं गांभीर्य बघून स्वतःसह दुसऱ्याचा जीव धोक्यात न घालण्याचा मानवता धर्म मौलानाला पाळता आला असता.
जमातच्या बेजबाबदारपणाला तर कोणतीही माफी नाही. पण जमातनं सर्रास कायदा तोडण्याचाही अधर्म केलाय. जमातमधे सामील झालेले परदेशी धर्मगुरू हे पर्यटन विसा घेऊन धर्माच्या प्रचार, प्रचाराचं मिशन पार पाडत होते. अशा कामासाठी वेगळा मिशनरी विसा घ्यावा लागतो.
हे कोरोना स्पेशलही वाचाः
एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?
कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?
कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?
कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?
कोरोनानंतर आपण वेगळ्याच जगात असणार आहोतः युवाल नोवा हरारी
किराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो?
तबलिगी जमातनं लोकांच्या जिवाशी खेळण्याचा प्रयत्न केलाय. तसंच आता सरकारच्या कार्यक्षमेतवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. सरकार 'आम्ही तयार आहोत, तयार आहोत', असं सांगतंय. सरकार लोकांच्या जीवाची काळजी घ्यायला किती तयार आहे, हे यानिमित्तानं कळालं.
गृह मंत्रालयानंही एक निवेदन काढून आपली बाजू मांडलीय. त्यानुसार, २१ मार्चला मरकजमधे १,७४६ लोक हजर होते. यंदाच्या वर्षी तबलिगमधे सामील होण्यासाठी जवळपास २१०० परदेशी नागरिक भारतात आले होते. तसंच २१ मार्चपर्यंत वेगवेगळ्या तबलिगमधे ८२४ परदेशी नागरिक सामील झाले होते. यामधे इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड, नेपाळ, म्यानमार, बांगलादेश, श्रीलंका आणि किर्गिस्तान या देशांतल्या नागरिकांचा समावेश आहे. आत्तापर्यंत मरकजमधे सामील झालेल्या २,१३७ लोकांची ओळख पटलीय. वैद्यकीय तपासणी करून त्यांना क्वारंटाईन करण्यात आलंय.
'द वायर' वेबपोर्टलच्या एका स्टोरीनुसार, १३ तारखेला हा इवेंट सुरू झाला आणि त्याच दिवशी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं एक महत्त्वाचं विधान केलं. ‘भारतात कोविड-१९ मुळं अजून आरोग्य आणीबाणीसारखी परिस्थिती नाही आणि भ्यायची काही गरज नाही.’ १६ मार्चला दिल्ली सरकारनं पन्नासहून अधिक लोक जमतील अशा सर्व धार्मिक तसंच सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घातली. त्याच दिवशी तिकडे हैदराबादमधे १० इंडोनेशियन नागरिकांमधे कोरोनाची लक्षणं आढळली होती. हे सर्वजण दिल्लीतल्या तबलिगी जमातमधे सामील होऊन इकडे आले होते. २१ मार्चला तामिळनाडूतही दोन थाई नागरिक कोरोना पॉझिटिव आढळले. तेही जमातमधे आले होते.
म्हणजेच १३ तारखेला तबलिगी जमातचा हा इवेंट होत असताना आपल्याल आरोग्य खात्यालाही कोरोनाची नीट कल्पना आली नव्हती. या बेजबाबदारपणाची जबाबदारी कुणाची हेही निश्चित करून त्याविरुद्ध कठोर कारवाई करावी लागेल. आरोग्य मंत्रालय दररोज पत्रकार परिषदा घेतंय. मग एकाच ठिकाणी एवढे लोक जमलेत याची माहिती त्यांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून मिळाली नाही का?
दिल्लीत पहिल्यांदा २२ मार्चला लॉकडाऊन लागू झाला. मग एवढे दिवस इथं जमलेल्या या लोकांवर प्रशासनाची नजर कशी गेली नाही? कोरोना वायरसमुळे आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार दिल्लीचा कारभार केंद्र सरकारच्या हातात एकवटलाय. दिल्लीच्या कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्रालयाकडे आहे. मग परदेशी नागरिक एवढ्या मोठ्या संख्येने आलेत याची गृहमंत्रालयाकडे माहिती नव्हती का?
दिल्ली पोलिसांनी मंगळवारी रात्री ३१ मार्चला एक विडिओ जारी केलाय. २३ तारखेला रेकॉर्ड करण्यात आलेया तीन मिनिटांच्या या विडिओमधे पोलिस अधिकारी ठाण्यामधे जमातच्या आयोजकांशी चर्चा करताना दिसतात. आपल्याला चार दिवस आधीच मरकजमधल्या गर्दीची कल्पना मिळाल्याचं पोलिस सांगतात. मग वायरस संक्रमणासाठीच हॉटस्पॉट होईपर्यंत पोलिस दहा दिवस काय करत होते?
केंद्रीय गृहमंत्रालयानं टूरिस्ट विसा वापरून धार्मिक काम करणाऱ्या परदेशी धर्मगुरूंचा हा विसा रद्द करणार असल्याचं म्हटलंय. पण विसा नियमांचं सर्रास उल्लंघन करणाऱ्या या धर्मगुरूंबद्दल सरकारला इतके दिवस साधा थांगपत्ताही लागला नाही का? आणि हे माहीत असेल तर मग तेव्हाच कारवाई का केली नाही? की गृहमंत्रालयही हा हॉटस्पॉट तयार होण्याची वाट बघत होतं?
हेही वाचाः कोरोनानं नाही, तर आपले मजूर लॉकडाऊनमुळे मरतील?
दिल्लीचे मख्यमंत्री केजरीवाल गेले दहाएक दिवस झालं रोज मीडियासमोर येऊन कोरोनाला रोखण्यासाठी आपलं सरकार कसं काम करतंय याची माहिती देत होते. सरकार काय करतंय याची माहिती देण्याच्या त्यांच्या निर्णयाचं देशभर कौतूकही होतंय. पण गेले पंधरा दिवस तीनेक हजार लोक एकत्र जमलेत याचा थांगपत्ताही त्यांना लागला नाही. दिल्ली सरकारच्या तयारीवरच प्रश्नचिन्हं लागलीत.
केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू, तेलंगणासारखी राज्यं आपापल्या पातळीवर कोरोनाशी लढत आहेत. दिल्लीत तर कोरोनाशी लढण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार अशा दोनदोन ताकदवर यंत्रणा आहेत. मग अशा शक्तिशाली यंत्रणा पंधरा दिवस काय करत होत्या?
भारतात ३० जानेवारीला पहिली कोरोना पॉझिटिव केस सापडली. तेव्हापासूनच केंद्र सरकार कोरोनाला रोखण्यासाठी सरकारी यंत्रणा सज्ज असल्याचं सांगतंय. मग दिल्लीच्या कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी असलेलं केंद्रीय गृहमंत्रालय पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार जमातचा कार्यक्रम पार पडेपर्यंत काय करत होतं? जमावबंदीच्या आदेशाचं धिंडवडे उडेपर्यंत सरकारची सज्जता काय करत होती?
तेलंगणात १८ तारखेलाच जमातमधे सामील झालेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला. मग त्या व्यक्तीची ट्रॅवल हिस्ट्री सरकारनं तेव्हा शोधली नव्हती का? दक्षिण कोरियात अशाच एका पेशंटची वेळीच ट्रॅवल हिस्ट्री शोधून तिथल्या सरकारनं कोरोनाला रोखून धरलं. याचं आता जगभरात कौतूक होतंय.
लॉकडाऊनच्या निर्णयासोबतच सरकारनं जगभराचा संपर्कही तोडण्याचा निर्णय घेतला. मग शेकडोच्या संख्येनं आलेले परदेशी लोक कुठं आहेत, याचा सरकारला दिल्लीतच शोध का घेता आला नाही? घटना घडून गेल्यावरच गुप्तचर यंत्रणांना कळणार का?
यातलं सत्य सखोल चौकशीतूनच बाहेर येईलच पण सध्या तरी या बेजबाबदारपणाची मोठी किंमत आपल्याला चुकवावी लागू शकते. जगभरात अनेक देशांनी ती चुकवलीय. यातूनही आपण धडा घेऊन काही केलं तर आपल्याएवढं भारी कोण नसेल. पण हा धडा आपण घेणार का हा खरा प्रश्न आहे.
हेही वाचाः
सोशल कसलं, हे तर दिल्ली डिस्टन्सिंग!
अजय देवगण बड्डे स्पेशलः नैंटीजची लवइष्टोरी
छत्तीसगडमधे पुन्हा नक्षलवादी हल्ला होऊ शकतो
आपल्याला एप्रिल फूल बनवणाऱ्या टॉप टेन फेक न्यूज