भारतीय राज्यघटनेत मुस्लिमांना समान अधिकार दिले असले तरी शेवटी न्याय हा वेगळ्याच गोष्टींवरून ठरवला जातो. त्यामुळे आता मुस्लिमांनी सामाजिक परिवर्तन किंवा प्रबोधन घडवण्याची गरज आहे. देवच आपल्याला तारील या गैरसमजूतीतून बाहेर येऊन मुस्लिमांनी आत्मटीकेला तोंड दिलं पाहिजे. हिंदू मुस्लिम प्रकरणात औदार्य दाखवून मुस्लिमांनी राम मंदिर उभारणीत काहीतरी योगदान दिल्यानं एका नव्या सुरवातीची आशा दिसू लागेल.
लेखाचा यापूर्वीचा भागः बाबरी मशीद निकालानंतर मुस्लिमांनी काय करावं?
इस्लाममधे अल्ला विश्वाचा निर्माता असला तरी त्याचा कोणताही गुण अथवा अंश विश्वात समाविष्ट नाही. या सर्वांच्या पलिकडे त्याचं अस्तित्व आहे. कोणत्याही स्वरूपात अल्लाचा भौतिक किंवा जैविक घटकात समावेश करणं शिर्क म्हणजे मोठं पाप मानलं जातं. म्हणून जागा, दगड, मूर्ती अशी कोणत्याही निर्जीव वस्तूत किंवा वनस्पती, प्राणी, सजीवांमधे देवत्व नाही. ते पूजनीय नाहीत. अंगात येणं प्रकार इस्लाममधे नाही. अल्लाह एकमेवाद्वितीय पूजनीय आहे.
कुरआन अल्लाचा शब्द आहे. मक्का आणि मदिना मशिदींना पैगंबरांच्या प्रत्यक्ष सहवासामुळे विशेष पावित्र्य प्राप्त आहे. त्यांना धार्मिक, पारंपरिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. प्राचीन आणि ऐतिहासिक वारसा आहे. जागतिक मुस्लिमांची भावनिक आस्था याच्याशी जोडली गेलीय. त्यामुळे त्यात कोणताही बदल शक्य नाही. पण इस्लामिक विचारधारेत या वस्तू वा वास्तूत देवत्व नाही, पूजनीयता नाही, केवळ पावित्र्य आहे. इतर ठिकाणी सामान्य माणसांनी उभारलेल्या मशिदींना हा दर्जा नाही.
सार्वजनिक कामासाठी, उदाहरणार्थ धरण बांधताना अनेक गावासोबत गावातली मंदिरं, मशिदीसुद्धा बुडवणं शरियाला धरून नाही. जगभरात सार्वजनिक हिताच्या कामासाठी अनेकदा मशिदी पाडल्या गेल्यात. पण मशिदची जागा बदलता येते या सवलतीचा लोक स्वतःच्या स्वार्थासाठी वापर करतील अशा गैरकृत्यांना आळा घालण्यासाठी शरिया कठोर आहे. मुसलमानांनी शरियाचे कठोर पालन जरूर करावे.
व्यक्तिगत नफ्यासाठी मशिदीची जागा वापरू नये. पण शरियाचा मूळ हेतू समजावून न घेता, घटनेच्या चौकटीत बसवून माणसांनी विश्वनिर्मात्यात्या अल्लाला एका लहानशा जमिनीच्या तुकडयावर मालकी बहाल करणं हास्यास्पद वाटतं. त्याअर्थी मस्जिदची जागा अल्लाहची म्हणून अपरिवर्तनीय असण्याचा बोर्डाचा दावा तकलादू वाटतो.
हिंदू पक्षातर्फे राममंदिराची मागणी करणाऱ्यांचा दावासुद्धा रामाचा जन्म त्याच जागेवर झाला, या श्रद्धेवर आणि पूरक धर्मग्रंथावर आधारित होता. दोन्ही पक्षकारांचा मुख्य दावा घटनेपेक्षा धर्मश्रद्धा आणि धर्मशास्त्रावर आधारलेला होता. धार्मिक श्रद्धांचे विषय सुप्रीम कोर्टामार्फत आणि घटनेअंतर्गत मान्य करून घेण्याचा दोघांचा प्रयत्न होता. हिंदू आणि मुस्लिम कट्टरपंथी हे एकमेकांचे खरे मित्र आहेत, हे जनतेला कळलं पाहिजे.
वास्तविक धर्मश्रद्धेचा विषय एकदा निकाली काढण्याची जबाबदारी लोकसभेची आहे. पण लोकसभेबाहेर लोकांना भडकवणारे लोकप्रतिनिधी लोकसभेत मात्र यावर स्वतः निर्णय घ्यायला तयार नाहीत. हिंदू मताकडे झुकणारी लोकसभा हा निर्णय सुप्रीम कोर्टावर सोपवून आपली कातडी वाचवतेय.
बहुसंख्यांक असण्याची ताकद वापरून हिंदूपक्षाने आपला दावा मान्य करून घेण्यात यश मिळवलं असं सकृतदर्शनी वाटतं. जगभरात न्यायालयीन असो किंवा राजकीय निर्णयावर बहुसंख्यांक आपला प्रभाव टाकतात. हा एक पॅटर्न आहे. भारतात हिंदू मुस्लिम होणं स्वाभाविक आहे. नेमकं असं का घडतं? न्यायालयीन प्रक्रियेत कोणकोणते घटक निर्णायक ठरतात? याची त्रोटक चर्चा करू.
राम मंदिर-बाबरी मशीद प्रकरणी म्हणा किंवा कोणताही निर्णय करताना न्यायालयाला स्वतःच्या अंगभूत मर्यादा आडव्या येतात. कायद्याची उपलब्ध चौकट, न्यायमूर्तींची मानसिकता आणि अर्थ लावण्याची बौद्धिक क्षमता, यांचा स्पष्ट, अटळ परिणाम असतो. दुसरा परिणाम पुराव्यांचा असतो. पुरावे अनेक प्रकारचे असतात.
प्रत्येक पुराव्याची सत्यता म्हणजे खरंतर अधिकृतता तपासली जाते. सरकारी दस्तऐवज अधिकृत मानले जातात. पण त्याची वास्तविक सत्यता किंवा खोटेपणा नेहमी अधिकृतपणाच्या शिक्क्याखाली लपून राहतो. सत्यापर्यंत पोचणं न्यायालयाला केवळ अशक्य असते. किंबहुना न्यायालये समोर येणाऱ्या ठिसूळ पुराव्यावर विसंबून ‘न्याय्य’ निर्णय करण्यास बांधील असतात.
न्यायालयाच्या तटस्थेचे कितीही गुणगाण केले तरी न्यायालयीन निर्णयावर वर उल्लेखलेल्या घटकांपेक्षा तत्कालीन समाजिक, सांस्कृतिक, धार्मिक मानसिकता आणि सर्वाधिक राजकीय परिस्थितीचा दबाव असतो. न्यायालयाला जमिनीच्या हकीकतकडे दुर्लक्ष करून ‘न्याय्य’ निर्णय घेता येत नाही. खासकरून आर्थिक, सांस्कृतिक आणि बौद्धिक क्षेत्रात पुढारलेल्या वर्गाचा प्रभाव न्यायालयं झुगारून देऊच शकत नाहीत. याची अपरिमित उदाहरणे देता येतील. कलम ३७७ रद्द करून एलजीबीटीला मान्यता देणारं प्रकरण बरंच बोलकं आहे.
थोडक्यात न्यायालयाचा निर्णय म्हणजे आकाशवाणी नाही. न्याय मागणारा समाजवर्ग कोण आहे? त्याची राजकीय आणि अन्य ताकद काय आहे? त्यानुसार ‘न्याय’ निश्चित होतो. हे सत्य समजावून घ्यावं लागेल.
हेही वाचा : रमजान ईद दिवशी अमर हबीब यांची वाचायला हवी अशी कथा
घटनात्मक लोकशाही पद्धत विभिन्न समुदायामधे सत्तासंतुलन टिकवते. संमिश्र समुदायांचे प्रतिनिधित्व करणारे राजकीय पक्ष तडजोड, आघाड्या करून हितसंबंधांना पुढे रेटतात किंवा सुरक्षित करण्याचा प्रयत्न करतात. अर्थात जागतिक आणि देशातल्या भांडवलदार वर्गाचे हितसंबंध त्यांना अपरिहार्यपणे सांभाळावे लागतात. याला आपण राजकारण म्हणतो.
लोकशाहीचा तात्त्विक किंवा आदर्श विचार काही असला तरी व्यवहारात, या पद्धतीत निर्णय करणारी सत्ता निवडणुकीच्या मार्गाने जो समुदाय हस्तगत करेल, प्राधान्याने त्याचे हितसंबंध हाच सर्वांचा न्याय ठरतो. सत्ता बहुमाताने निश्चित होत असल्याने बहुमत घडवणं हा राजकारणाचा खेळ बनतो.
मुस्लिमांना राजकारणाचं हे कसब मिळवता आलेले नाही. भारतात जात आणि राम मंदिर - बाबरी मशीद प्रकरण हे बहुमत आपल्या बाजूने वळवण्याच्या राजकीय खेळातलं एक पान आहे. राम मंदिर - बाबरी मशीद प्रकरणाला स्पष्ट राजकीय किनार आहे. मुस्लिमांना याप्रकारचं राजकारण परवडणारं नाही. त्यात मुस्लिमांची हार निश्चित आहे.
भारतीय मुस्लिमांनी कोणावर तरी खापर फोडून विलाप करणं बंद केलं पाहिजे. आपल्या दुबळेपणावर मुळातून मंथन केलं पाहिजे. आपण या देशाचे समान नागरिक आहोत या भ्रमात जगणं पुरेसं नाही. शासनसंस्था आणि भारतीय राजकारणाचे वास्तव जाणून मुस्लिमांना व्यवहार करावा लागेल.
मुस्लिमांना लोकशाहीमधे कायद्यासमोर समानता आणि न्यायासंदर्भात असलेली भावूक आणि भोळसट समजूत काढून टाकावी लागेल. भारतात स्वतंत्र नागरिकांचा समूह अस्तित्वात आलेला नाही. धर्म, जात वगैरे बंधनांनी हा नागरिक समाजामधे बंदिस्त आहे. अशा समाजाची लोकशाहीत राजकीय आणि आर्थिक पत किती यावरून कायद्यासमोर समान किती, हे ठरतं.
समाज शक्तींनुसार न्याय पदरात पडतो. समूह सामर्थ्यावर समानतेची आणि न्याय मिळवण्याची तडजोड निश्चित होते. असं असलं तरी धार्मिक विभागणी आणि असमानतेवर आधारित रचना नष्ट करतच सक्षम आणि सशक्त होण्याला पर्याय नाही. ही वाट अत्यंत निसरडी आहे. मुस्लिम समुदाय पुराणमतवादी, सनातन किंवा प्रतिगामी विचारांना बळी पडण्याची यात खूप शक्यता आहे. बहुजनांसोबत बहुमताचा भाग होऊन सत्तेत वाटा मिळवण्याचं राजकारण त्यांना यश देणार आहे. मुस्लिमांना हे शक्य आहे.
हेही वाचा : अमेरिकेच्या हल्ल्यात कासिम सुलेमानींच्या मृत्यूने तिसरं महायुद्ध होणार?
वर उल्लेखल्याप्रमाणे मुस्लिमांना सत्ता आणि विकासात समान वाटा मिळवायचा असेल तर, त्यांना एका व्यापक समाज परिवर्तनाची गरज आहे. याला ‘रेनेसान्स’ या संकल्पनेत बांधण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. रेनेसान्स म्हणजे प्रबोधन. मुस्लिमांना सर्वप्रथम समाजांतर्गत चिकित्सक आत्मटीकेतून जावं लागेल.
मुस्लिमांनी ऐहिक जीवनातल्या पराभवाची कारणमिमांसा आध्यात्मिक तत्त्वज्ञानात शोधणं चुकीचंय. कारण त्याचं उत्तर नैतिक धार्मिक आचरण आणि कर्मकांडांचे पालन यापलिकडे जाणार नाही. अशा विचारसरणीच्या आधारे आणि कार्यक्रमावर कितीही बळकट संघटना उभी राहिली. कोट्यावधी अनुयायी मिळवले तरी भौतिक जीवनाच्या गरजा पूर्ण करण्याची क्षमता यामधे नाही. यातून राजकीय शक्ती कदापी प्राप्त होणार नाही. समाज सतत नव्या संकटात ढकलला जाईल. भौतिक जीवन आणि आध्यात्मिक विश्लेषण या विरोधाभासात संपूर्ण समाजमन आणि व्यक्तिमत्व दुभंगलं जाईल किंबहुना गेलं आहे.
हिंदूसंस्काराने भारतात इस्लाम प्रदुषित झाला आहे. प्रदुषित संस्कार आणि अशुद्ध आचारांपासून मुस्लिमांना मुक्त करून शुद्ध इस्लाम आचरणात आणण्यासाठी निरंतर शुद्धीकरणाची चळवळ बांधली गेली. पेहराव, दाढी, साफा किंवा अन्य बाहयचिन्हानी वेगळी ओळख ठसवणं, त्याचा अभिमान रूजवणं सोपं होतं. पण अर्धवट ज्ञानातून हिंदू मुस्लिम दुरावा निर्माण झाला तर दुरुस्त करायला शतकं जातील.
सामान्य मुस्लिमांना याची फार मोठी किंमत मोजावी लागेल. टोपी परिधान करण्याने थोडीच क्रांती होते! हा व्यक्तीचा लोकशाही हक्क कोणी नाकारायचं कारण नाही. पण टोपीखालचा मेंदू आधुनिक विचार, उच्चज्ञान, तंत्रज्ञान इत्यादींनी विकसित करणं खूप अवघड आहे. मेंदू विकसित न करू शकल्याने, ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मुस्लिम मागास बनेल.
जागतिकीकरणाच्या झंझावातात मुस्लिम समाजाची आर्थिक वाताहत झालीय. जागतिक राजकारणात सपाटून मार खावा लागलाय. देश उद्ध्वस्त झालेत. कोट्यवधी मुसलमान मारले गेलेत. मुस्लिम समाजाचं हे संकीर्ण संकट आणि सर्वांगीण पराभव पचवण्यासाठी आणि सर्व समस्यांवर मात करणारे हुकमी दैववादी उत्तर मुस्लिमांना पढवलं गेलंय - ‘परमेश्वराची इच्छा!’ याला कोणी आव्हान देत नाही. लोक श्रद्धेपोटी अनायसे विश्वास ठेवतात.
भोळसट श्रद्धेमुळे जनतेची चिंता आणि जिज्ञासा दोन्ही एकसाथ नष्ट झाल्या. एक प्रकारची गुंगी, स्तब्धता, अचलता आणि कर्मकांडातली व्यग्रता समाजात भरून राहिलीय. शोध आणि अभ्यास अनावश्यक बनलाय. परमेश्वराला राजी करण्यापलीकडे या जगात कशाची गरज नाही यावर प्रत्येकाचा जणू दृढ विश्वास झालाय. संकटाचा मुकाबला करण्याऐवजी सोयीस्करपणे लोक मशिदीत शरण गेलेत. आधुनिकतेचा धिक्कार आणि परंपरेचा उदोउदो सुरू आहे. भ्रमाने पोसलेल्या अभिमान आणि अहंकारामुळे नवीन शिकण्याची किंवा दुरुस्त करण्याची भाषा त्यांच्या पचनी पडत नाही. कारण परमेश्वर अंतिम विजय मुस्लिमांना देणार आहे यावर ते खुष आहेत.
परमेश्वराने सांगितलेल्या सन्मार्गापासून भटकल्याने मुस्लिमांना या संकटांचा मुकाबला करावा लागतो. जालीम सत्तेवर येणे त्याचीच साक्ष आहे अशा निरर्थक सोप्या मांडणीवर त्यांचा पक्का विश्वास आहे. परमेश्वराची भक्ती आणि श्रद्धेनेच जालिमांचा नाश होणार आहे. केवळ हीच भाषा त्यांना पटते. वर्तमानाकडे साफ दुर्लक्ष करून ते आता फक्त अंतिम मुक्ती दिवसाची वाट पाहण्यात मग्न झालेत.
हा इथॉस, भाषा, कथा, घटना, वक्तव्ये आणि पवित्र श्लोक माझ्या लिखाणात नाहीत. उलट टीका आहे. काहीजण याविरूद्ध लोकांना भडकवतील. कदाचित माझे लिखाण लोकांना भावणार किंवा पचणार नाही. मला मुस्लिमांना भ्रमात ठेऊन त्यांची फसवणूक करणं शक्य नाही. पण कटुसत्य मला सांगावं लागेल.
हेही वाचा : बाबरानं मंदिर पाडून मशीद बांधली नाही, तरीही निकाल रामलल्लाच्या बाजुने का लागला?
मी एक आवाहन करतोय. राम मंदिरासंदर्भात मुस्लिमांनी धार्मिक औदार्य आणि सहिष्णुतेचा आदर्श नमुना पेश करावा. भारताला शैव विरूद्ध वैष्णव, वैदिक विरूद्ध बौद्ध असा रक्तरंजित संघर्षाचा इतिहास हजारो वर्षांचा आहे. तुलनेत हिंदू मुस्लिम संघर्षाचा इतिहास उण्यापुऱ्या दोनशे वर्षांचा सुद्धा नाही. उलट हिंदूमुस्लिमांमधे परस्पर सहकार्य आणि आदर व्यक्त करणाऱ्या व्यवहारांनी समाजात संतुलन आणि सौहार्द टिकवून ठेवलंय. जगभरातला अनुभवसुद्धा असाच आहे.
अमेरिकेत शुक्रवारच्या प्रार्थनेला मुस्लिमांना जागा उपलब्ध नव्हती तर ख्रिश्चन समुदायाने आपल्या चर्चमधे मुस्लिम श्रद्धेला बाधा येणार नाही याची काळजी घेऊन म्हणजे अगदी फोटो वगैरे हटवून नमाजची सोय करून दिली. शेकडो मुसलमान आता चर्चमधे नमाज पठण करतात. ज्या अयोध्येत इतकं रामायण घडले. अगदी त्याच गावात सीतागढी या मंदिराच्या मालकीच्या जागेत महंतानी स्वतः पुढकार घेऊन मशिदीचं पुनरुज्जीवन करून अलिशान मशीद बांधून दिली. मंदिराच्या मालकीच्या जागेत नमाज, उर्स आणि हिंदूची पुजाअर्चा चालते. दोन्ही धर्माचे लोक एकाच जागेत धार्मिक क्रिया करतात.
फाळणीनंतर पंजाबमधील एका गावात आता कुणी मुस्लिम नाही. पण तेथे फार जुनी मशीद आहे. बाबरी पाडली गेल्यानंतर कांही कंटक ही मशीद पाडायला आले. तर शिखांनी त्यांचं संरक्षण केलं. आजही अतिशय श्रद्धेने ते त्याची देखरेख करतात. सुफीसंत परंपरेमुळे हिंदू - मुस्लिम धार्मिक एकोपा आणि ऐक्याची शेकडो उदाहरणे भारतात पहायला मिळतील. राम मंदिर - बाबरी मशीद प्रकरणाने मुस्लिमांना औदार्य दाखविण्याची एक संधी चालून आलेली आहे.
पैगंबरांनी मक्का जिंकल्यानंतर धर्मस्थळाच्या चाव्या उस्मान इब्न तल्हा या कट्टर विरोधकाच्या हाती सोपविल्या. औदार्याच्या या कृतीने तो गृहस्थ सहाबी म्हणजेच पैगंबरांचा जिवलग सहकारी बनला. मुस्लिमांनी या घटनेचं स्मरण करून अन्याय विसरून, सामान्य हिंदूंच्या श्रद्धेचा प्रश्न म्हणून राम मंदिर उभारणीत मोठया मनाने आपलं योगदान द्यावं. मंदिर उभारणीत प्रवेशद्वार अथवा घुमट अशा एकाची जबाबदारी घ्यावी.
शिखांच्या स्वर्णमंदिराची पायाभरणी मियाँ मीर सुफींच्या हस्ते करण्यात आली. या उदात्त घटनेला स्मरून, हिंदूंनी राम मंदिराची पायाभारणी सुफीच्या हस्ते करण्याचा निर्णय घ्यावा. भारतीय इतिहासात सौहार्दाचे नवे युग निर्माण करण्याची सुरवात होईल.
हेही वाचा :
एका उद्ध्वस्त मशिदीची गोष्ट : भाग १
एका उद्ध्वस्त मशिदीची गोष्ट : भाग २
(लेखक ज्येष्ठ सामाजिक विचारवंत आहेत.)