पाकच्या टीमचं काय बिनसलंय, ते पुन्हा बाऊन्स बॅक करणार काय?

०१ जून २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


पाकिस्तानला गेल्या महिनाभरात झालेल्या सगळ्याच मॅचमधे पराभवाचं तोंड बघावं लागलंय. आता वर्ल्डकपमधे पहिल्याच मॅचमधेही वेस्ट इंडिजच्या टीमने पाकचा दणदणीत पराभव केला. त्याआधी सराव सामन्यातही कालपरवा क्रिकेट खेळायला शिकलेल्या अफगाणिस्तानने पाकला चारीमुंड्या चीत केलं. पाकिस्तानच्या टीमला अशा हाराकिरीला तोंड का द्यावं लागतंय? नेमकं बिनसलंय कुठं?

वर्ल्डकपमधे काल ३१ मेला आपला सख्खा शेजारी पाकिस्तानचा वेस्टइंडिजबरोबर पहिला मुकाबला होता. या मॅचकडे जसं पाकिस्तानी चाहत्यांच्या लक्ष होतं तसंच भारतीयांचीही नजर होती. कारण १६ जूनला रविवारी ज्यांना हरवायचंय त्यांचा अभ्यास नको का करायला?

कॅरेबियन वादळासमोर धुरळा

आता टीम इंडिया अभ्यास करणार, का चाहते अभ्यास करणार असं विचाराल. पण भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या मॅचचं असंच असतं. या मॅचबद्दल १०, १२ वर्षांची पोरही अधिकारवाणीने बोलतात. आणि ही गोष्ट दोन्ही देशांसाठी अगदी सर्वसामान्य आहे. तर आपला सख्खा शेजारी असलेल्या पाकिस्तानसाठी पहिली मॅच म्हणजे सुरवातच खूप वाईट झाली. तसं याची सुरवातचं सराव सामन्यापासूनच झाली. क्रिकेटमधे कालपरवा आलेल्या अफगाणिस्तानने त्यांचा पराभव केला.

नॉटिंगहॅमच्या मैदानावर पहिल्याच मॅचमधे कॅरेबियन वादळासमोर पाकच्या पार चिंधड्या उडाल्या. वेस्ट इंडिजच्या उंचपुऱ्या बॉलर्सनी पाकिस्तानच्या बॅट्समॅनला तुम्ही कसं खुजे आहात हेच दाखवून दिलं. होल्डर आणि थॉमस यांनी सुरवातीपासूनच पाकच्या बॅट्समॅनवर बाऊन्सरचा भडीमार केला. या भडीमारापासून वाचण्यासाठी पाकचे बॅट्समॅन कंबरेतून पार वाकून गेले. पण पाकच्या एकाही बॅट्समॅनला याच्यावर तोडगा काढता आला नाही.

फास्ट बॉलर्सचा इतिहास

पाकला हा विंडीजचा भेदक मारा फार सहन झाला नाही. कसेबसे २० ओवर खेळल्यानंतर सर्वांनी आपल्या बॅट्स खाली ठेवल्या. फकर जमान, बाबर आझम मोहम्मद हाफिस आणि इमाम-उल-हक यासारखे नावाजलेले बॅट्समॅन विंडीजच्या बॉलिंगचा पहिल्यांदाच सामना करत असल्यासारखं वाटत होतं. महत्त्वाचं पाकिस्तानचे माजी क्रिकेटर या बॅट्समॅनकडे पाकचं उज्वल भविष्य म्हणून बघत आहेत.

पण पाकच्या या टीमला अचानक असं काय झालं की वेस्ट इंडिजसारख्या तुलनेने कमी रेटिंग असलेल्या संघासमोर नांगी टाकावी लागली? तसं बघायला गेलं तर पाकिस्तानच्या टीमचा इतिहास बघितला तर त्यांच्या टीमची सर्व मदार ही नेहमीच बॉलिंगवरच राहिलीय. त्यांच्याकडे फास्ट बॉलर्सची खाण आहे. त्याच्या जोडीला एखादा फिरकी बॉलरही उजवी कामगिरी करुन गेला.

हेही वाचाः क्रिकेट वर्ल्डकप, ‘या’ बॅट्समनवर असणार सगळ्यांची नजर

शॉर्ट बॉल क्रायसिस

पाकिस्तानकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जेदार कामगिरी केलीय असे बॅट्समॅन हाताच्या बोटावर मोजता येईल इतकेच आहेत. त्यातच सध्या पाकचे बॅट्समॅन आपल्या घरच्या मैदानावर खेळत नाहीत. ते सराव आणि आपल्या सगळ्या होम मॅचेसही परदेशी संयुक्त अरब अमिरातीच्या मैदानावर खेळतात. तिथल्या विकेट फिरकीला पोषक आहेत. त्या विकेटवर बॉल गुडघ्याच्या वर बाऊन्स होत नाही.

पाकचे नव्या दमाचे बॅट्समॅन अशाच स्लो आणि लो विकेटवर सराव आणि मॅच खेळताहेत. अशावेळी त्यांच्याकडून इंग्लंडसारख्या प्रचंड चेंडू उसळी घेणाऱ्या खेळपट्टीवर उत्तम कामगिरी करण्याची अपेक्षा करणंच चुकीचं आहे. ते त्या बाऊन्सचा सामनाच करु शकणार नाहीत कारण त्यांना असा बाऊन्स झेलण्याचा सरावच नाही.

पाकिस्तानला या संकटातून मार्ग काढण्यासाठी वर्ल्डकपपूर्वी इंग्लंडमधेच इंग्लंडबरोबर वनडे मालिका खेळण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी पाकच्या बॅट्समॅननी बऱ्यापैकी रनही काढले. याचा अर्थ पाकच्या बॅटिंग लाईनमधे बाऊन्सरचा सामना करण्याचा दमच नाही असं नाही. त्यांना फक्त आपल्या तंत्रात थोडासा बदल करुन खेळावं लागले. जितक्या लवकर हा बदल स्विकारला जाईल तितक्या लवकर पाकिस्तान या शॉर्ट बॉल क्रायसिसमधून बाहेर येईल.

हेही वाचाः वर्ल्डकपमधे तगड्या टीमला, लहान टीमने हरवण्याचा रेकॉर्ड भारताच्या नावावर

पराभव पाठ सोडेना, पण

हे झालं बॅटिंगचं. पाकिस्तानचे फास्ट बॉलरही वर्ल्डकपआधी चांगल्या फॉर्ममधे होते, असंही काही नाही. वर्ल्डकपपूर्वी वनडे सिरिजमधे इंग्लडने पाकचा चार शुन्यच्या फरकाने पराभव केला होता. त्यानंतर इंजमाम-उल-हक अध्यक्ष असलेल्या निवड समितीने आपल्या टीममधे बदल केले. अनुभवी फास्ट बॉलर मोहम्मद आमिर आणि वहाब रियाझ यांना पुन्हा पाचरण करावं लागलं.

पाकिस्तानसाठी वर्ल्डकमधील सर्वात दिलासादायक बाब म्हणजे हे दोघंही सध्या चांगल्या फार्मममधे आहेत. अफगानविरुद्धच्या सराव सामन्यात वहाब रियाझने रिवर्स स्विंग बॉलिंगचा उत्तम नमुना पेश केला. त्यानंतर पहिल्या मॅचमधे मोहम्मद आमिरने विंडीजचे ३ गडी आऊट करत आपला आत्मविश्वास परत मिळवला.

पाकला ३० एप्रिल ते ३० मे २०१९ या महिनाभराच्या काळात झालेल्या सर्व मॅचमधे पराभवाचं तोंड बघावं लागलं. पण बॅट्समॅन आणि बॉलर्सनी आपली जबाबदारी ओळखून सांघिक कामगिरी केली तर त्यांची गाडी पुन्हा विजयाच्या रुळावर येईल. 

सर्वात महत्वाचं, पाकिस्तानच्या टीमचा स्वभाव खुनशी आहे. त्यामुळे फक्त एक विजय त्यांना पुरेसा आहे. बाकी टीम म्हणून त्यांच्याकडे क्षमतेची कमतरता नाही. असंही राऊंड रॉबिन्स पद्धतीमुळे प्रत्येक टीमला ९ मॅच खेळण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे पहिल्याच मॅचमधे पाकिस्तान संपला असं म्हणणं धाडसाचं आहे.

हेही वाचाः 

नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाची पाच वैशिष्ट्यं

निर्मला सीतारामन देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री आहेत, खरंच?

वर्ल्डकपच्या तोंडावर आयपीएलचा टीम इंडियाला फायदा की नुकसान?