येत्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातले जवळपास एक कोटी तरुण लोक मतदान करणार आहेत. नवा महाराष्ट्र कसा असणार हे ठरवण्याची ताकद मताधिकारानं या तरुणांच्या हाती आलीय. उमेदवार निवडताना कोणते निकष लावायचे याबद्दल आता विचार करायला हवा.
सोशल मीडियावर अनेकदा बिली मीम्स फिरत असतात. बिली असा आहे, बिली असं करतो, बिली तसं वागतो आणि तुम्ही बिलीसारखे असू नका किंवा असा असं या मीम्सचं स्वरूप असतं.
आता निवडणुकीच्या वातावरणात आपण या बिलीला मागच्या पिढीतला एक तरुण मुलगा मानूया. तर, बिली हा एक तरुण मुलगा होता. बिली प्रत्येक निवडणुकीला मतदान करत असे. मतदान करताना काय विचार केला पाहिजे हे बिलीला कधी कळलच नाही. कोणालातरी मत द्यायचं म्हणून बिली आपल्या गावाकडच्या माणसाला मत द्यायचा.
एका निवडणुकीत तर बिलीला त्याच्या भागातील उमेदवारांनी मत देण्यासाठी पैसे दिले होते. तेव्हा ज्या उमेदवारानं सगळ्यात जास्त पैसे दिले त्याला बिलीनं मत दिलं होतं. आणि नंतर तो उमेदवार बिलीच्या घरातला पाण्याचा प्रश्न सोडवत नाही म्हणून बिली जामच वैतागला होता. बिली वेडा आहे आणि आपण आत्ताच्या पिढीतल्या तरुण मुलामुलींनी बिलीसारखं असायचं नाहीये!
विधानसभा निवडणुकीसाठी आजपासून दोन दिवसांनी मतदान केंद्रावर मतदान करायला १ कोटी बिली जाणार आहेत. म्हणजे असं की, निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार महाराष्ट्रात मतदान करणाऱ्यांची संख्या जवळपास ८ कोटी ९९ लाख इतकी आहे. यापैकी १ कोटी ६ लाख ७६ हजार १३ लोक 'तरुण मतदार' या कॅटेगरीत येतात. तरुण लोकांची कॅटेगरी म्हणजे १८ ते २५ या वयाचे मुलं-मुली.
यामधे पुन्हा ६० लाख ९३ हजार ५१८ तरुण मुलं आणि ४५ लाख ८१ हजार ८८४ तरुण मुली येतात. एकूण मतदारांच्या संख्येत ११ टक्के जागा या तरुणांनी व्यापली आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत ही तरुण कोणाला मत देतात यावर अनेक गोष्टी अवलंबून असतील.
निवडणूक जवळ येतेय, तसं प्रचाराला आणखी आणखी जोर येतोय. 'आमचं ठरलंय, वारं फिरलंय' म्हणत काही तरुण मंडळी भर पावसात सभेला हजेरी लावतायत. तर काही जण पुन्हा 'आपल्या' सरकारचा झेंडा घेतलाय. कुणी भगवा झेंडा हातात घेतलाय; तर कुणी सतरंगी झेंडा फडकवणाऱ्या पक्षाचं समर्थन करतंय. पण या सगळ्या पक्षांना सपोर्ट करताना स्थानिक पातळीवरच्या उमेदवाराला मतदान करताना कोणते निकष लावायचे याविषयी विचार करायला आपल्याला वेळ आहे कुठं?
हेही वाचा : डॉ. मनमोहन सिंग यांच्या प्रश्नांची नरेंद्र मोदींकडे उत्तरं आहेत का?
बिली वॉज मॅड! आणि या मॅड बिलीसारखे आपणही आंधळेपणानं मतदान करत नाहीयोत हे एकदा तपासून घ्यायला हवं की नको? त्यामुळं आपला मॅड बिली होऊ नये यासाठी मतदान करताना बिलीसारख्या तरुणांनी कशाचा विचार करायचा आहे यावर बोलायला हवं.
राजकारण आणि आंतरराष्ट्रीय संबंध यावर अभ्यास करणारे परिमल माया सुधाकर म्हणातात की, मतदान करताना स्वतःसाठी योग्य काय आहे याचा पहिले विचार केला पाहिजे. आपल्या भागातले उमेदवार तरुणांच्या शिक्षणासाठी काय धोरणं आखतात. आपल्या रोजगाराचा किंवा नोकरीचा प्रश्न सोडवण्यासाठी ते काय करणार आहेत आणि भविष्यातलं आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या सामाजिक सुरक्षेसाठी ते काय प्रयत्न करणार आहेत याचा विचार याचा फार निट विचार व्हायला हवा, असं त्यांनी कोलाजशी बोलताना सांगितलं होतं.
‘देश आणि त्यातली माणसं ही काही वेगळी नसतात. त्यामुळे आपल्याला खरोखर ज्यामधून लाभ होतोय त्याचा विचार करून तो लाभ पूर्ण करणाऱ्या व्यक्तीला मतदान करावं’, असं ते म्हणाले.
पण यासोबतच समाजाचाही विचार करायला परिमल सरांनी सांगितलंय. आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजाचा, त्या समाजातील सगळ्या घटकांचाही विचार केला पाहिजे. परिघावरचे घटक असं ज्यांना म्हणलं जातं अशा सगळ्यांसाठी म्हणजे स्त्रीयांसाठी, दलितांसाठी, अपंगांसाठी आपल्याला कसा समाज निर्माण करायचा आहे याचा विचार तरुणानं मतदान करताना केला पाहिजे असं सर म्हणतात.
‘स्वतःचं हित आणि समाजाचं हित या दोन्हीचा ताळमेळ बसेल अशी धोरणं जो उमेदवार तयार करतोय त्याला मतदान करणं योग्य होईल.’ हे किती काहीतरी महत्वाचं सर सांगतायत!
हेही वाचा : यंदाच्या विधानसभा निवडणुकीचं वेगळेपण काय?
मतदान करताना काय विचार करावा यापेक्षा काय विचार करू नये हे सुद्धा आपण तरुणांनी सारखं सारखं स्वतःला सांगत राहिलं पाहिजे. म्हणूनच ‘जातीचा विचार करून, जवळच्या पुढाऱ्याचा विचार करून, कोण किती पैसे देतं किंवा याचा विचार करून मतदान करू नये. एखादा छान दिसतो, छान बोलतो म्हणून त्याला मत देणं हे तर मुर्खपणाचं आहे.’ असं सामाजिक कार्यकर्ते अमर हबीब म्हणतात. एवढंच नाही, तर उमेदवार कोणत्या पक्षाचा आहे याचा विचार करून त्या पक्षासाठी त्याला मतदान करणं हेही आता कालबाह्य झालंय, असं त्यांना वाटतं. तो पक्ष सत्तेवर आला तरी स्थानिक उमेदवार चांगलं काम करेल असं काही सांगता येत नाही.
'मागच्या निवडणूकीत मतदारांनी सत्तेवरचा पक्ष बदलून पाहिला. पण नव्या पक्षानंही तिच धोरणं आणि उपाययोजना केल्या. त्यामुळे ज्या उमेदवाराकडून आपला देश, समाज बदलण्याची धोरणं राबवली जाऊ शकतात एवढीच कसोटी मतदान करताना पहायची आहे आणि अशीच लोकं आता आपल्याला सभागृहात पाठवायची आहेत हे डोक्यात ठेवणं गरजेचं आहे.’ असं अमर हबीब सुचवतात.
हेही वाचा : या तीन लेखिका जग गाजवत आहेत
निवडणूक प्रक्रियेत प्रत्येक मत अनमोल असतं. त्यातही तरुणांच्या मताला सध्या फारच किंमत आलीय. आणि त्यामुळे सहाजिकच राजकारण, मतदान आणि उमेदवार याविषयीची जाणही या पिढीतल्या तरुणांना आहे असं दिसतं.
आपल्या जनरेशनमधले अनेक तरुण मतदानाविषयी फार वेगळा दृष्टिकोन ठेवतात. संविधानाचा अभ्यास करणारा मित्र राजवैभव शोभा रामचंद्र म्हणतो की, ‘भारतीय संविधानानं १८ वर्षावरील सर्व जाती धर्माच्या पुरुष, स्त्रिया आणि इतर लिंगाच्या माणसांना मत देण्याचा अधिकार दिलाय. आपण याला मतदान म्हणतो, पण मला वाटतं हे दान नसतं तर हा इथल्या प्रत्येक वयानं सुज्ञ असणाऱ्या माणसांचा अधिकार आहे.’
संविधानाची मूल्य मानणारी, त्या मूल्यांवर चालणारी व्यक्ती सक्षम आणि त्याचा संविधानिक विचार मानणारा त्याचा पक्ष असेल तरच अश्या उमेदवाराला मत द्यावं असं त्याला वाटतं. पुढं बेरोजगार, शिक्षण, स्थानिक सोयीसुविधा हे मुद्दे सोडून धर्मांध राजकारण, खोटा राष्ट्रवाद, खोटी आश्वासनं या मुद्यांना मतंच काय पण साधं महत्वही देणार नाही असा ठाम निश्चय त्यानं केलाय.
भारतीय संविधानानं सर्वात महत्वाच काम कोणत केलं असेल तर ते म्हणजे या देशाचा मालक आपल्याला बनवलं. या देशाचे मालक आपण आहोत ही भावना जागृत ठेवून, आपण मालक असलेल्या देशाची सेवा करण्यासाठी प्रतिनिधी मला निवडायचा आहे हे समजून घेऊन आजची पिढी मतदान करते आहे.
त्यामुळे आता बिली बदलला आहे. तेव्हा त्याचा मीमही बदलून टाकता येईल. बिली हा सुजाण तरुण मुलगा आहे. बिली मतदानाला मताधिकार म्हणतो आणि मतदान करतानाला उमेदवारासोबतच इतर सामाजिक, राजकीय आणि अर्थिक घटकांचा विचार करतो. बिली स्मार्ट आहे. बिली इज स्मार्ट. बी लाईक बिली!
हेही वाचा :
#NoBra या हॅशटॅगविषयी ब्र का नाही काढायचा?