नाही धर्मी, नाही अधर्मी असं म्हणणाऱ्या कबीर-रविदासांचं काय करायचं?

२९ जून २०२१

वाचन वेळ : ६ मिनिटं


संत कबीर आणि संत रविदास यांनी आपण धार्मिक नाही आणि अधार्मिकही नाही असं स्पष्ट म्हटलंय. त्यांनी कधीही कोणत्याही धर्मांचं सदस्यत्व स्वीकारलं नाही. अनेकदा धर्मातल्या गोष्टींवर टीका केली. असं असलं तरी ते अधार्मिक या पठडीत मोडतील असंही नाही. मग त्यांच्या कार्याचं मूल्यमापन कोणत्या परिभाषेत करता येईल?

बहुजन संतांचं कार्य धर्माच्या चौकटीत बंदिस्त करून बघण्याचा जुना प्रघात आहे. संत कबीर आणि संत रविदास यांनी आपण धार्मिक नाही आणि अधार्मिकही नाही असं स्पष्ट म्हटलंय. 'नाहीं धरमी, नाहीं अधरमी' असा कबीरांचा दोहा प्रसिद्ध आहे. रविदासही ‘धरम- अधरम, मोक्ष नहिं बंधन' असं कबीरांच्या भाषेत तीच भावना व्यक्त करतात. याचा सरळसरळ अर्थ त्यांना अशा कोणत्याही धर्माच्या एका विशिष्ट चाकोरीत बंद करणं म्हणजे त्यांच्या विचार आणि आचार विश्वाचं महत्त्व नष्ट करण्यासारखं आहे.

साखी, पदं या स्वरूपात उपलब्ध असलेल्या त्यांच्या साहित्यात ते विशिष्ट धर्माच्या चौकटीत बसतील असं त्यांचं चित्र अजिबात नाही. नाहीतर,

'अरे इन दोउन राह न पाई, 
हिंदुन की हिंदवाई देखी 
तुरकन की तुरकाई, 
कहै कबीर सुनो भाई साधो,
कौन राह हम जाई'

असं कबीर म्हणाले नसते. 'अरे या दोघांना मार्ग कळत नाही, हिंदूंचे हिंदुत्व पाहिले, तुर्कांची म्हणजे मुस्लिमांची तुर्काई, कबीर म्हणे ऐक आणि जाण, कुठली वाट घ्यावी?' असा या पदाचा अर्थ होतो. याचा अर्थ कुठल्याही धर्माची त्यांनी वाट धरली नाही.‌ त्या धर्मांचं सदस्यत्व स्वीकारलं नाही. असं असलं तरी ते अधार्मिक या पठडीत मोडतील असंही त्यांचं स्वरूप दिसत नाही.

हेही वाचा: संत चळवळ म्हणजे जगणं सुंदर करण्याचा मनोमन प्रयत्न 

धर्म सदृश्य संकल्पनांचा उद्घोष

'नाहीं धरमी, नाहीं अधरमी' या कबीरांच्या काव्याचा मराठी अनुवाद पुढे देत आहे. त्यात कबीर म्हणतात, ' ना मी यती, ना मी कामी हो. ना मी सांगत, ना मी ऐकत, ना मी सेवक - स्वामी हो. बंधनात ना, मुक्तही नाही,  विरक्त ना, ना रंगलो. नाही न्यारा कोणापासून, ना कुणाला बिलगलो. स्वर्ग लोकी ना जाऊ आम्ही, नरकही ना आम्हाला हो. सर्व कर्म ते आमचेच खरे, कर्म नि आम्ही न्यारे हो. मत हे कोणा विरळचि उमजे, बैठक त्याची निश्चल हो. कबीर ना स्थापी कसलेही मत, नष्ट करीना कुठले हो.' कबीरांची ही रचना पुरेशी बोलकी आहे. त्यातून अगदी स्पष्ट होतं की ना ते धार्मिक आहेत ना ते अधार्मिकही आहेत.

जे लोक धर्मांध किंवा स्वैराचारी आहेत त्यांना माझं मत वेगळं वाटेल, असं कबीर स्पष्टपणे मांडतात. ते कोणत्याच धर्माचे दुराग्रही नसल्यामुळे आणि ते अधार्मिकही नसल्यामुळे त्यांनी कोणतीच कट्टर किंवा विद्ध्वंसक मतं मांडली नाहीत. हे खरं आहे की, धर्म सदृश्य काही संकल्पनांचा उद्घोष त्यांच्या साहित्यात दिसून येतो. पण पारंपारिक हिंदू आणि मुस्लिम धर्मातील संकल्पना आहेत तशा त्या मुळीच नाहीत.

त्याचप्रमाणे कपाळाला टीळा किंवा गंध लावणं, दाढी, केस ठेवणं, माळ जपणं, कुंडात स्नान करणं, नदीत पापक्षालनासाठी डुंबणं अशा धार्मिक म्हणवणाऱ्या कोणत्याच गोष्टी त्यांनी केल्या नाहीत. आपल्या पदांत त्यांनी या सगळ्या गोष्टींचा धिक्कारच केलाय.

राम, कृष्ण, अलख, खालिदला एक करताना

सर्वसाधारणपणे धर्म म्हणजे विशिष्ट ईश्वराचं, अल्लाहचं, देवाचं अस्तित्व मान्य करणं. त्याची पूजा करणं. इबादत करणं. कर्मकांड करणं‌. प्रार्थना म्हणणं. प्राण्यांचा बळी देणं. आत्म्याच्या स्वर्ग प्राप्तीसाठी आयुष्यभर विविध मार्गांनी प्रयत्न करत राहणं वगैरे गोष्टी. असा धर्म ते पाळताना दिसतात का? हे आपण समजून घेऊ.

कबीर- रविदासांनी पूजाअर्चा, कर्मकांड, बळी किंवा कुर्बानी देणं या धार्मिक गोष्टींना कडाडून विरोध केला होता. त्यांच्या काव्यात याची साक्ष पदोपदी मिळते. त्यांच्या काव्यात वर्णन केलेला तथाकथित ईश्वर किंवा खालिद हा हिंदू किंवा मुस्लिम वर्णन करतात तसा अजिबात नाही. कबीराचं एक पदच बघा. 'मला कुठे शोधतोस? ' असा प्रश्न विचारून कबीरांचा ईश्वर किंवा खालिद म्हणतो, 'बकरीत ना मी मेंढीत नाही, सुरीत ना मी विळ्यात नाही, कातडीत वा शेपटीत नाही, ना मांसांत हाडात नाही, देवळात ना मी, नाही मशिदीत, ना काबा आणि कैलासात, कर्मकांडी ना मी कसल्याही, ना योगी ना वैराग्यात.'

याचाच अर्थ हिंदू आणि मुस्लिम धर्मातल्या कुठल्याही ईश्वर संबंधित संकल्पना कबीर स्वीकारत नाहीत. म्हणजेच त्यांचा ईश्वर, खालिद हा पारंपरिक नाही. तो निर्गुण म्हणजे आकार, रंग नसलेला ईश्वर आहे. तसं बघायला गेलं तर त्यांचा खालिदही निर्गुणच आहे. ते अलख, राम, कृष्ण, खालिद, करतार हे एकच आहेत असं म्हणतात. त्यांचं हे म्हणणं विशिष्ट धर्माचं वेगळं अस्तित्व आणि त्याचं स्तोम नाकारणारंच आहे.

कबीर आणि रविदासांच्या लेखी वेद, कुराण हे धर्मग्रंथ एकच आहेत. ही एकत्वाची भावना ही निश्चितच धर्माची असू शकत नाही.  म्हणून ते म्हणतात की ते कोणत्याही धर्माचे पाईक नाहीत. तसं पहायला गेलं तर ते सेक्यूलर आहेत. ते निष्पक्षही आहेत.

हेही वाचा: ज्ञानोबा तुकारामः जातीच्या पलीकडे नेणारा क्ल्यू 

विवेकवादाची जोपासणी

त्यांचं 'आत्मा' या विषयावरचं मतही पारंपरिक नाहीय. रविदासांचं एक वचन आहे,

'आत्मा थिर भई जबै, 
तब सबही निधी पाई'

इथं ' आत्मा' या शब्दाचा अर्थ 'मन' या अर्थाने आलाय, हे स्पष्टच दिसतं. जे शास्त्रांचं अंधानुकरण करतील ते नरकात जातील असं संत रविदास एका पदात म्हणतात. इथं नरक यांचा अर्थ अधोगती असाच घेतला पाहिजे.

रविदासांनी पारंपरिक शास्त्रांना नकार देऊन विवेकवादाचीच जोपासणी केली नाही का? रविदासांची आणखी एक साखी बघा.

'जा देखे बिन उपजे,
नरक कुंड में वास,
प्रेम भगति सूँ उधरै,
प्रगटत जन रविदास.'

नरकातून सुटका होण्यासाठी विविध धर्म वेगवेगळे उपाय सांगतात. ते सगळं पाप- पुण्याच्या भाषेत मांडलं जातं. पुण्य केलं की स्वर्ग मिळतो आणि पाप केलं की थेट नरकात रवानगी होते, असं धर्म सांगतात. त्या त्या धर्माचे पुरोहित, मुल्ला मौलवी असंच सांगतात. पण रविदास मात्र 'प्रेम भक्ती'ने उद्धार होईल, पुण्य मिळेल असं सांगतात. हे विलक्षण आणि वेगळे नाही का?

आतापर्यंतच्या विवेचनावरून हे सिद्ध होईल की पारंपरिक धर्मातल्या धर्म संकल्पनांचा अर्थ आणि रविदास-कबीर यांनी त्या संकल्पनांचा वापर करून प्रचलित केलेला अर्थ हे पूर्णपणे वेगवेगळे आहेत. संतांच्या जीवितकार्याचे वर्णन 'धार्मिक' किंवा 'अधार्मिक' या पठडीत करता  येणार नाही. हे त्यांनीच नोंदवून ठेवलंय ते आपण पाहिलं. मग त्यांच्या कार्याचं मूल्यमापन कोणत्या परिभाषेत करता येईल?

कसा होतो धर्माचा अधर्म?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तथागत गौतम बुद्धाच्या धम्माचं वेगळेपण मांडताना भरपूर तपशील पुरवलाय. तथागत बुद्धांच्या मते एखादा धर्म हा अधर्म कसा बनतो याविषयी विवेचन करताना आंबेडकरांनी काही निकष सांगितलेत.

१) दैवी चमत्कारावर विश्वास ठेवणं म्हणजे अधर्म.
२) ईश्वरावर विश्वास ठेवणं म्हणजे अधर्म.
३) ब्रम्हाशी मिलन या समजुतीवर आधारित धर्म म्हणजे अधर्म आहे.
४) आत्म्यावरचा विश्वास हा अधर्म आहे.
५) यज्ञयागावर विश्वास हा अधर्म आहे.
६) काल्पनिक अनुमानावर आधारित धर्म हा अधर्म बनतो.
७) धर्म ग्रंथाचं केवळ पठण म्हणजे धर्म नाही.
८) धर्माचे ग्रंथ हे अप्रमादीत, दोषरहित आहेत असं मानणं म्हणजे अधर्म आहे.

संतांवर रचण्यात आलेल्या अनेक दंतकथांत देव चमत्कार करतो आणि स्वतः संतही चमत्कार करतात असं दाखवलंय. त्यामुळे संतांचा दैवी चमत्कारावर विश्वास होता आणि त्यांनीही चमत्कार करून दाखवलेत असं समाजमन मानतं. पण वस्तुस्थिती तशी आहे का?

बहुजन संतांनी अशा दैवी चमत्कांरांचं खंडण केलंय. संत रविदास यांच्या एका पदाचा हवाला देऊन ही गोष्ट सिद्ध करता येईल. रविदास म्हणतात,

'पाती तोड़ई पूज अरचावई, 
तारन तरन कहै रे,
जऊ मूरत महिं बस परमेसर,
जल में काहे न तरे रे.'

पाने तोडून पूजाअर्चा करून हा भवसागर तरून जाता येईल या इराद्याने भक्ती केली जाते. पण अशी मूर्ती पाण्यात तरंगत का नाही? मूर्तीत असलेला ईश्वर चमत्कार करून मूर्तीला पाण्यात बुडण्यापासून का वाचवत नाही?

हेही वाचा: जैतुनबींच्या निमित्ताने महाराष्ट्राचं व्यापक तत्त्वज्ञान भारतभर पोचलं असतं पण?

दैवी चमत्कारावर टीका

याचाच अर्थ ईश्वर चमत्कार करेल या विश्वासावर विसंबून राहता कामा नये, असं रविदास अप्रत्यक्षपणे बजावतात. 'जपमाळेचे मणी लाकडाचे आहेत, देव दगडाचे आहेत, गंगा यमुना म्हणजे पाणी आहे. राम आणि कृष्ण मृत्यू पावले आहेत. चारी वेद म्हणजे केवळ काल्पनिक कहाण्या आहेत'  या आशयाचा कबीरांचा दोहा आहे. त्यातून मूर्तीभंजन, वेदावर टीका आहेच. त्याचबरोबर मानवांप्रमाणे देवांनासुद्धा मर्त्य म्हटलंय.

अलौकिक देव चमत्कार करतात या मांडणीलाच कबीर इथं छेद देतात. देवाच्या अलौकिकत्वाची चिरफाड करताना कबीर एका पदात जे मांडतात त्याचा आशय सांगता येईल. कबीर विचारतात, ' दगड हातोड्याने फोडून आणि त्याला आकार देऊन पाय, छाती असलेली मूर्ती तयार केली जाते. ही मूर्ती खरी असेल तर तिने हातोड्याचे घाव घालणाऱ्या मूर्तीकारालाच खाऊन टाकायला हवं.'

स्वयंभू म्हणवल्या जाणाऱ्या देवाला मूर्तीकार घडवतो. देव स्वतः प्रकट होत नाही. मग तो स्वयंभू कसा? तो स्वयंभू असेल तर त्याने दैवी सामर्थ्य किंवा चमत्कार करून त्याला घडवणाऱ्या मूर्तीकाराला खाऊन टाकायला हवं, असं उपरोधिकपणे कबीर म्हणतात.‌ याचाच अर्थ बहुजन संत दैवी चमत्कारावर आधारित अधर्मावर टिका करत होते.

हेही वाचा: 

ज्ञानाचा एकाः महाराष्ट्राचा जीवनधर्म घडवणारा वारसा 

संत कबीरांची पालखी वाराणशीतून पंढरपूरला वारीत सामील व्हायची

गुरुपंरपरेला फाटा दिला म्हणूनच वारकरी संप्रदाय सगळीकडे पोचला

ब्राह्मणी अरेरावी आणि मुसलमानी धर्मवेड यांना आव्हान देणारे संत नामदेव

(शोध संत रोहिदासांचा या आगामी पुस्तकातल्या एका लेखाचा संपादित भाग)