इरफान खान: त्याला जातानाही चमेलीचा सुगंध हवा होता!

२९ एप्रिल २०२०

वाचन वेळ : ३ मिनिटं


हॉलिवूडचे अभिनेते टॉम हँक्स 'इरफानचे डोळेही अभिनय करतात,’ असं म्हणाले होते. आज हे डोळे शांतपणे बंद झालेत. आपली मेल्यानंतरची एक इच्छा इरफाननं ज्येष्ठ पत्रकार प्रभा कुडके यांना एका मुलाखतीदरम्यान बोलून दाखवली होती. आज लॉकडाऊनच्या काळात त्याची ही इच्छा पूर्ण झाली असेल का?

जयपूरमधल्या एका पठाणाच्या घरात ७ जानेवारी १९६७ ला इरफानचा जन्म झाला. साहबजादे इरफान अली खान असं त्याचं पूर्ण नाव. वडलांच्या टायरच्या व्यवसायावर इमराननं नॅशनल स्कूल ऑफ ड्रामापर्यंत मजल मारली. त्यानंतर वडील गेल्यावर स्कॉलरशिपच्या मदतीनं कोर्स पूर्ण केला आणि २००५ मधे रोग या सिनेमातून बॉलिवूडमधे पदार्पण केलं. 'लंचबॉक्स', 'गुंडे', 'हैदर', 'पीकू' आणि 'हिंदी मीडियम' अशा मोजक्याच सिनेमात इरफान वावरला. पण त्याचा अभिनय या सगळ्या सिनेमांची दखल घ्यायला भाग पाडतो. 

हासिल या सिनेमासाठी त्याला सर्वोत्कृष्ट खलनायकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. यानंतर 'पान सिंह तोमर'साठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. २०११मधे भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कारानं त्याला सन्मानित करण्यात आलं.

२०१८ पासून इरफान कॅन्सरने आजारी होता. उपचारासाठी तो लंडनलाही जाऊन आला. तिथं एक वर्ष उपचार घेऊन इरफान भारतात परतला. त्यानंतर त्यांचा इंग्लिश मीडियम हा सिनेमाही आला.

हेही वाचा : बॉलिवूडच्या सिनेमात कधी आनंदी दलित पाहिलाय का?

बॉलिवूडप्रमाणेच हॉलिवूडमधेही इरफानने काम केलं. हॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते टॉम हँक्स एका मुलाखतीत त्याच्याविषयी बोलत होते. इरफानसोबत त्यांनी इन्फेर्नो या सिनेमात काम केलंय. या मुलाखतीत कौतुक करताना ते एकदम म्हणाले, 'इरफानचे डोळेही अभिनय करतात.’ आज हे डोळे शांतपणे बंद झालेत.

मरणानंतरची एक इच्छा इरफानने ज्येष्ठ पत्रकार प्रभा कुडके यांना एका मुलाखतीदरम्यान बोलून दाखवली होती. आज इरफान गेल्याची बातमी कळल्यानंतर त्यांच्या भेटीचा हा किस्सा प्रभा कुडके यांनी फेसबूकवर लिहिलाय. त्यांची ही फेसबुक पोस्ट अगदीच वाचनीय आहे. प्रभा कुडके आपल्या पोस्टमधे लिहितात,

 

इरफान खान आज गेला. गेल्या कित्येक दिवसांपासून तो जाणार अशा बातम्या कानावर आदळत होत्या. साधारण १५ वर्षांपूर्वी सकाळ वर्तमानपत्रात असताना इरफान खानची मुलाखत घेण्याची संधी मिळाली होती. एका प्रसिद्ध पबमधे त्याची भेट झाली आणि खूप वेळ गप्पा झाल्या. शेजारी वाजत असलेल्या मोठ्या संगीताच्या आवाजातही इरफानचा खणखणीत आवाज कानावर येत होता. इरफानच्या आयुष्यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट कुठली होती हे जाणून घेण्यासाठी मी त्याला भेटले होते.

मुलाखतीच्या दरम्यान इरफानने त्याच्या लहानपणीची एक गोष्ट सांगितली. इरफानच्या आजीच्या अंगणात एक चमेलीची वेल होती. चमेलीच्या फुलांचा सुगंध हा त्यांच्या अंगणात दरवळत असायचा. इरफान त्यावेळी बोलताना म्हणाला, ‘त्या चमेलीच्या फुलांनी मला वेड लागायचं. ती फुलं सकाळी कधी उमलतात हे पाहण्यासाठी मी लवकर उठायचो. तो सुगंध मनात साठवुन ठेवायचो आणि माझ्या दिवसाची सुरवात व्हायची. त्या चमेलीच्या वेलीसोबत माझं एक नातं तयार झालं होतं.’ इरफानचं वेगळेपण हे तेव्हाच दिसून आलं होतं.

काही माणसं ही खरोखर वेगळी असतात. स्टारडमपेक्षा या माणसांकडे मन असतं, हे त्यावेळी इरफानशी बोलताना पदोपदी जाणवलं. त्यानंतर इरफान वरचेवर भेटला. ‘कैसे हो प्रभाजी?’ असं म्हणायचा. त्यानंतर त्याचं पुढचं वाक्य ठरलेलं असायचं ‘आपको याद हैं ना चमेली के फुल?’ मी म्हणायचे, ‘यस सर!’

हेही वाचा : पटकथाकार जावेद अख्तरांचा स्ट्रगलही पटकथेएवढाच फिल्मी आहे 

इरफान खानने त्या मुलाखतीत एक इच्छा व्यक्त केली होती, ‘आमच्या धर्मात माणसाच्या अंतिम संस्कारावेळी त्या शवावर फुलांची चादर चढवली जाते. मी या जगातून जाईन तेव्हा हा चमेलीचा सुगंध माझ्यासोबत असावा. माझ्या अंगावर मी गेल्यानंतर चादर चढवली गेली तर ती चमेलीची असावी, असं मला वाटतं.’

आज इरफानचं जाण्यानं फार धक्का बसला नाही. कारण शेवटचं त्याच्याशी बोलणं झालं साधारण दीड वर्षांपूर्वी, तेव्हाच तो म्हणाला होता, ‘प्रभाजी चमेली की चादर चढाने का वक्त नजदीक आ रहा हैं|’

आज लॉकडाऊनच्या काळात मिळाली असेल का त्याला ती चमेली? या विचारानं जीव कासावीस झालाय. तो गेलाय त्याचं फार वाईट वाटत नाहीय. तो सुटलाय. पण चमेलीचं काय? मिळाली असेल का त्याला ती चमेली आणि तो चमेलीचा सुगंध?

हेही वाचा : 

माझ्या न्यूड मॉडेलिंगची खरीखुरी गोष्ट

अजय देवगण बड्डे स्पेशलः नैंटीजची लवइष्टोरी

सैरंध्री : पहिल्या मेड इन इंडिया सिनेमाची शंभरी

रामायण, महाभारताचं स्वागत करायला काय हरकत?

लॉकडाऊनमधे पॉर्न पहातच आहात; तर त्याआधी हे वाचा

मराठ्यांना रोखण्याचा प्रस्ताव मांडणाऱ्या गोळवलकरांना बाबासाहेबांनी काय उत्तर दिलं?

कोर्टाचं आदेशपत्र जसंच्या तसं: राहुल कुलकर्णींना कोर्टाने जामीन दिला पण `सपोर्ट` का केलं नाही?