गांधी घराण्याशिवाय काँग्रेसचं चांगभलं होईल?

२९ मे २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


लोकसभेत सलग दुसऱ्यांदा मानहानीकारक पराभव झाल्यानंतर काँग्रेसमधे नेतृत्वाचं संकट निर्माण झालंय. पक्षाला एका धाग्यात बांधून ठेवण्यासाठी गांधी घराण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असं आतापर्यंत सांगितलं जायचं. पण राहुल गांधींनी स्वतःच्या राजीनाम्यावर ठाम राहत पक्षातल्या लोकांना पर्याय शोधायला सांगितलंय. त्यामुळे कधी नव्हे ते आता गांधी घराण्याशिवायच्या पर्यायावर गांभीर्याने चर्चा सुरू झालीय.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने गेल्यावेळपेक्षा चांगली कामगिरी करत एकट्याच्या जीवावर ३०३ जागा जिंकल्या. तसंच एनडीएच्या जागाही तब्बल ३५३ वर गेल्यात. दुसरीकडे गेल्यावेळी ४४ जागा जिंकलेल्या काँग्रेसला यंदा केवळ ५२ जागांवर समाधान मानावं लागलं. काँग्रेस आणि घटक पक्षांचा हा आकडा ९० च्या घरात जातो.

हेही वाचाः नरेंद्र मोदींना एवढं घवघवीत यश कशामुळे मिळालं?

‘काँग्रेसची सकारात्मक भूमिका संपली’

महत्त्वाचं म्हणजे एक्झिट पोल आल्यापासूनच काँग्रेसच्या लीडरशीपविषयी, अस्तित्वाविषयी उलटसुलट चर्चा होतेय. स्वराज्य इंडियाचे प्रमुख आणि ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी तर आता काँग्रेस मेलीच पाहिजे, अशी भूमिका मांडली. त्यावर सोशल मीडियात उलटसुलट प्रतिक्रिया आल्या.

योगेंद्र यादव यांच्या मते, ‘काँग्रेस मेली पाहिजे. भाजपपासून आयडिया ऑफ इंडियाला वाचवता येत नसेल तर काँग्रेससाठी इतिहासात कुठलीच सकारात्मक भूमिका उरणार नाही. पर्यायी राजकारण उभं करण्यामधे काँग्रेस एक मोठा अडथळा बनून उभी आहे.’ यादव हे देशात पर्यायी राजकारण उभं करण्यासाठी प्रयत्नशील असून ते आम आदमी पार्टीचे संस्थापक आहेत. पण नंतरच्या काळात मतभेद झाल्याने त्यांनी आपपासून फारकत घेतली.

आपल्या ट्विटवर उलटसुलट चर्चा होऊ लागल्याने त्यावर स्पष्टीकरण देताना यादव यांनी आणखी एक ट्विट केलं. ते लिहितात, ‘भारताच्या इतिहासात काँग्रेसची सकारात्मक भूमिका उरली नाही, या माझ्या भूमिकेवरून गोंधळ होऊ शकतो. पण स्वातंत्र्याआधी आणि नंतरही काँग्रेसची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली असून ती मी नाकारलेली नाही. मला फक्त एवढंच म्हणायचंय की काँग्रेसला भविष्यात कुठलीच सकारात्मक भूमिका उरलेली नाही.’

The Congress must die.
If it could not stop the BJP in this election to save the idea of India, this party has no positive role in Indian history. Today it represents the single biggest obstacle to creation of an alternative.

My reaction to @sardesairajdeep https://t.co/IwlmBmf75d

— Yogendra Yadav (@_YogendraYadav) May 19, 2019

‘काँग्रेसला गांधीमुक्त करा’

यादव यांच्या उलट भूमिका प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांची आहे. लोकसभेचा निकाल आल्यावर त्यांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. एका ट्विटमधे गुहा म्हणतात, 'राहुल गांधींनी अजून राजीनामा दिला नाही याचं मला आश्चर्य वाटतं. त्यांच्या पक्षाने या निवडणुकीत खूप वाईट कामगिरी केलीय. एवढंच नाही तर ते स्वतःची जागाही वाचवू शकले नाहीत.'

आणखी एक ट्विटमधे गुहा लिहितात, 'राहुल गांधी आपला आत्मसन्मान, राजकीय प्रतिमा गमावून बसलेत. काँग्रेसला एका नव्या नेतृत्वाची गरज आहे, असं मला वाटतं. मात्र काँग्रेसकडे आता असं कुठलं नेतृत्वही उरलेलं नाही.' महत्त्वाचं म्हणजे गेल्या पाचेक वर्षांपासून गुहा हे काँग्रेसला गांधीमुक्त करण्याचा विचार मांडत आलेत.

देशातली सर्वांत जुनी १३४ वर्षांची काँग्रेस पार्टी सध्या गांधी हवे की नको या पेचात सापडलीय. अध्यक्षपदाची सुत्रं हाती घेऊन दोनेक वर्ष झालेल्या राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसला मानहानीकारक पराभवाचं तोंड बघावं लागलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेचा प्रचारही गांधी घराण्याभोवतीच केंद्रित ठेवला.

It is astonishing that Rahul Gandhi has not yet resigned as Congress President. His party performed very poorly; he lost his own pocket borough. Both self-respect, as well as political pragmatism, demand that the Congress elect a new leader. But perhaps the Congress has neither.

— Ramachandra Guha (@Ram_Guha) May 24, 2019

हेही वाचाः कॉंग्रेसने भाजपकडून शिकाव्यात अशा गोष्टी

सारा प्रचार गांधीभोवती फिरला

भाजप समर्थकांनीही सोशल मीडियाच्या मदतीने गांधी घराण्यावर जोरदार हल्ला चढवला. त्यामुळे आपोआपच काँग्रेसविरोधापेक्षा गांधी घराण्याविरोधात वातावरण तयार झालं. देशाचं आतापर्यंत जे काही वाईट झालंय त्याला केवळ गांधी घराणं जबाबदार असल्याची लोकभावना तयार केली गेली. सर्वसामान्य माणसाच्या हाती काँग्रेस आपलं नेतृत्व देऊ शकत नाही, असाही प्रचार झाला. दुसरीकडे गांधी घराण्याविरोधातल्या या प्रचाराला काँग्रेसने कुठलाच जोरदार युक्तीवाद केला नाही.

इंदिरा गांधी १९७८ मधे दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्या. तेव्हापासून २०१९ पर्यंत गेल्या ४१ वर्षांत गांधी घराण्याबाहेरच्या केवळ दोघांनाच काँग्रेसचा अध्यक्ष होता आलंय. १९९२ ते ९६ मधे पी. वी. नरसिंह राव आणि १९९६ ते ९८ मधे सीताराम केसरी. केसरी यांच्या काळात काँग्रेसमधे खूप मोठी फूट पडली. आता पश्चिम बंगालल्या मुख्यमंत्री असलेल्या ममता बॅनर्जीही काँग्रेसमधून बाहेर पडत स्वतःचा पक्ष काढला.

हेही वाचाः खरंच वंचित आघाडीमुळे काँग्रेस, राष्ट्रवादीचा पराभव झाला?

गांधी घराण्याची अपरिहार्यता निकालात

पक्षाची पडझड सुरू असतानाच काँग्रेसमधल्या ज्येष्ठांचा आग्रहावरून सोनिया गांधींनी १९९८ मधे अध्यक्ष पदाची सुत्रं हाती घेतली. त्यांच्या काळातच सत्तेबाहेर असलेल्या काँग्रेसला २००४ मधे युपीएच्या नेतृत्वात सत्ता मिळाली. तब्बल २० वर्षांनी २०१७ मधे त्यांनी अध्यक्षपदाची धुरा मुलगा राहुल गांधी यांच्याकडे दिली. अध्यक्षपदावर सर्वाधिक काळ राहण्याचा विक्रमही सोनिया गांधींच्याच नावावर आहे. सोनियांच्या २० वर्षांच्या कारकीर्दीत पक्ष २० वर्षे सत्तेत होता.

१९२८ मधे मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षपदी नियुक्तीने काँग्रेसचे गांधी-नेहरू घराण्याशी सूत जुळले. महत्त्वाचं म्हणजे स्वातंत्र्यानंतरच्या ७२ वर्षात काँग्रेसला २९ अध्यक्ष लाभले. यामधे ७२ पैकी ३७ वर्ष अध्यक्षपद नेहरू-गांधी कुटुंबाकडे तर ३५ वर्ष इतरांकडे राहिलं. काँग्रेसची अपरिहार्यता म्हणून पक्षाचं नेतृत्व गांधी घराण्याकडे आहे. पण सलग दोन निवडणुकीतल्या पराभवाने ही अपरिहार्यताच निकालात निघालीय.

आरोपांपलीकडचं राजकारण उभं करण्याची संधी

याविषयी पॉलिटिकल पर्सेपशन स्ट्रॅटेजिस्ट गिरीश ढोके म्हणतात, ‘घराणेशाही हे काँग्रेसविरोधी पक्षांच्या हातातलं हुकमी अस्त्र आहे. जवळपास सगळ्याच पक्षांमधे घराणेशाही आहे. पण घराणेशाहीच्या आरोपात केवळ काँग्रेस अडकते. घराणेशाहीचा आरोप फेटाळून लावण्यातच त्यांची खूप सारी शक्ती खर्ची जाते. त्यामुळे आरोपापलीकडचं पर्यायी राजकारण उभं करण्यासाठी काँग्रेसने नेतृत्व बदलाचा विचार करायला पाहिजे.’

काँग्रेसने एकाच निवडणुकीत राहुल गांधी, प्रियंका गांधी हे दोन पर्याय वापरले. तरीही काँग्रेसला यश मिळालं नाही. त्यामुळे आता नवे पर्याय शोधायला हवेत, असं ढोके यांना वाटतं. त्यांच्या मते, ‘गांधी घराण्याचा करिश्मा सोबत ठेऊन काँग्रेसने पर्यायांचा विचार करायला हवा. तळागाळातून आलेल्या माणसाला अध्यक्ष करावं. तसंच रिमोट कंट्रोलचं दरबारी राजकारणही बाजूला केलं पाहिजे.’

निवडणुकीच्या काळात काँग्रेसचा सारा भर गांधी घराण्यावर असतो. गांधी घराण्यातली व्यक्ती आपल्या प्रचाराला यावी यासाठी सारे प्रयत्नशील असतात. काँग्रेस पक्षाध्यक्षालाही असं वलय मिळाल्यास काँग्रेससाठी ती मोठी उपलब्ध ठरू शकते, असं ढोके यांना वाटतं.

हेही वाचाः 

चला, आज तरी मासिक पाळीवर चर्चा करूया

शस्त्र घेऊन गुंडागिरीचा सामना करायला सांगणारे गांधीजी माहीत आहेत?

वर्ल्डकपमधे तगड्या टीमला, लहान टीमने हरवण्याचा रेकॉर्ड भारताच्या नावावर