रत्नागिरी-सिंधुदुर्ग, रायगडमधे राणे, तटकरेंच्या लीडरशीपची परीक्षा

२२ एप्रिल २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात उद्या २३ एप्रिलला कोकणातल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि रायगड मतदारसंघात मतदान होतंय. दोन्ही ठिकाणी तगडी फाईट होतेय. सिंधुदुर्गात नारायण राणे यांचा मुलगा, तर रायगडमधे शिवसेनेतर्फे केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे सुनील तटकरे मैदानात उतरलेत. गेल्यावेळी पराभव चाखावा लागलेले राणे आणि तटकरे यावेळी विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताहेत.

कोकणात माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासाठी लोकसभेची निवडणूक खूप महत्त्वाची आहे. स्वतःचा पक्ष काढलेल्या राणे यांना तर कशाही परिस्थितीत मुलाला निवडून आणण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. तटकरे यांना गेल्यावेळच्या पराभवाचे डाग धुण्याची संधी मिळालीय. पण दोघांसाठीही यंदाची लढाई अवघड आहे.

रायगडचा किल्ला कोण राखणार?

महाराष्ट्रासाठी लोकसभेची निवडणूक ही विधानसभेची सेमीफायनल आहे. त्यामुळे सगळेच राजकारणी आपलं तिकीट पक्क करण्यासाठी आपल्या उमेदवाराला जिंकून आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करताहेत.

लोकसभा मतदारसंघ फेरचनेनंतर सलग दोनवेळा विजय मिळवलेल्या केंद्रीय मंत्री अनंत गितेंना यावेळी कडवं आव्हान मिळतंय. पाच वर्षांपूर्वी वेगवेगळे लढणारे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप यावेळी एकत्र आलेत. या मतदारसंघातली साधारण दीड लाख मतांची शेकापची ताकद मिळाली तर गतवेळी निसटता पराभव पत्करणाऱ्या सुनील तटकरेंना विजय मिळवणं शक्य होईल. पण ते वाटतं तितकं सोप्पं नाही.

हेही वाचाः जळगाव जिल्ह्याचा कंट्रोल कुणाकडे हे ठरवणारी निवडणूक

या मतदारसंघात भाजपची वाढलेली ताकद आणि सुमारे सव्वा लाखांहून अधिक तरुण नवमतदारांनी मोदींना साथ देण्यासाठी मतदान केलं, तर गितेंचा विजयरथ रोखणं तटकरेंना जड जाईल. हे ओळखूनच आपल्या प्रचारात कोणतीही कमतरता राहणार नाही याची काळजी घेताना तटकरे दिसतात. दुसरीकडे शिवसेनाही जोमानं प्रचारात उतरलीय. त्यामुळे यावेळीही रायगडचा सामना पुन्हा एकदा अटीतटीचा होण्याची चिन्हं आहेत.

शिवसेनेची भिस्त संघटनात्मक बांधणीवर

शिवरायांचं नाव घेऊन राजकारण करणाऱ्या शिवसेनेला फेररचनेआधीचा कुलाबा मतदारसंघ अर्थात रायगड कधीच सर करता आला नाही. रायगडकरांनी डाव्या विचारांच्या शेतकरी कामगार पक्षाला तर कधी काँग्रेसला विशेषतः ए. आर. अंतुलेंना साथ दिली. पण २००९ च्या फेररचनेनंतर रत्नागिरी जिल्ह्यातले गुहागर आणि दापोली हे दोन विधानसभा मतदारसंघ जोडले गेले. त्यानंतर सेनेच्या गितेंनी तब्बल ५४ टक्के मतं घेऊन १ लाख ४६ हजार मताधिक्यानं अंतुलेंचा पराभव केला.

पण त्याच गितेंना २०१४ च्या मोदी लाट असूनही केवळ दोन हजार मतांनी कसाबसा निसटता विजय मिळाला. यावेळीही गितेंच्या विजयाचं गणित गुहागर, दापोलीतील मताधिक्यावरच ठरेल. कुणबी, मराठा, मुस्लिम या जातींचा मतदारसंघात प्रभाव आहे. त्यात कुणबी मतांची साथ मिळाल्यानं १९९६ पासून आधीच्या रत्नागिरी मतदारसंघात सलग चारवेळा विजय मिळवणाऱ्या गितेंना रायगडातही सलग दुसऱ्यांदा विजय मिळवण्यात यश आलं. यावेळीही त्यांची लढत पुन्हा एकदा तटकरे यांच्याशीच आहे.

हेही वाचाः दक्षिण महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या अस्तित्वाची लढाई

कुणबी फॅक्टरचं महत्त्व

गेली साडेचार वर्ष मंत्री असलेल्या गितेंनी कोणतंच भरीव काम केल्याचं दिसलं नाही. तरीही कुणबी फॅक्टर त्यांना नेहमीप्रमाणे फायद्याचा ठरेल. दापोली, महाड, श्रीवर्धन, अलिबाग या चार मतदारसंघात शिवसेनेची चांगली ताकद आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत यापैकी केवळ महाडमधे विजय मिळवण्यात शिवसेनेला यश आलंय. 

तरीही दापोलीत याआधी पाचवेळा विजय मिळवणाऱ्या शिवसेनेच्या सूर्यकांत दळवी यांचा शिवसेनेतूनच राष्ट्रवादीत गेलेल्या संजय कदम यांनी सुमारे तीन हजार मतांच्या फरकानं पराभव केला. तर श्रीवर्धनमधे शिवसेना उमेदवाराचा अवघ्या ७७ मतांनी पराभव झाला. याशिवाय वर्षानुवर्षे भाजपच्या वाट्याला असलेल्या अलिबाग मतदारसंघात आयत्यावेळी उमेदवार उभा करूनही शिवसेनेने ६० हजारांवर मतं मिळवली.

हेही वाचाः भावा बहिणींनो, चौकीदार चोर नसूही शकतो!

रत्नागिरी जिल्हा परिषद शिवसेनेच्या ताब्यात आहे आणि रायगड जिल्हा परिषदेतही त्यांची चांगली ताकद आहे. शिवसेनेची ही जमेची बाजू आहे. दुसरीकडे या मतदारसंघात राष्ट्रवादीचे तीन आमदार आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या शेकापचे दोन आमदार निवडून आलेत. रायगड जिल्हा परिषद राष्ट्रवादी, शेकापच्या ताब्यात आहे. तटकरेंच्या घरात दोघांना आमदारकी आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी तटकरेंची कन्या अशी सत्ताकेंद्र आहेत.

कट्टर विरोधकांना सोबत घेण्यात तटकरेंना यश

तटकरेंचे दहापेक्षा अधिक जवळचे सहकारी त्यांच्यापासून दूर गेलेत. श्रीवर्धनचे आमदार असलेले त्यांचे पुतणे अवधूत तटकरेही सक्रिय नाहीत. काँग्रेसचे पेणमधील नेते माजी मंत्री रवीशेठ पाटील यांनी शेकाप, राष्ट्रवादी युतीनंतर आता भाजपमधे प्रवेश केलाय. या मतदारसंघात भाजपची वाढलेली ताकद गितेंसाठी फायद्याची ठरू शकेल. पेण मतदारसंघात शिवसेनेची चांगली ताकद असल्याचे गेल्या विधानसभा निवडणुकीत दिसून आलं.

माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांचा मुलगा नावेद अंतुले यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. त्यामुळे श्रीवर्धन पट्ट्यातली मुस्लिम मतं गितेंच्या पारड्यात पडू शकतात. अलिबागचे माजी आमदार मधुकर ठाकूर आणि काँग्रेसचे महाडचे माजी आमदार माणिकराव जगताप यांचं राजकारण तटकरेंमुळे मर्यादित राहिलं. पण कधीकाळी कट्टर राजकीय वैर बाळगणाऱ्या शेकापच्या जयंत पाटलांना जसं तटकरेंनी आपलंस केलं. तसंच ठाकूर आणि जगताप यांना या निवडणुकीत बरोबर आणण्याची जादू तटकरेंनी केलीय.

हेही वाचाः सर्वपक्षीय सेफेस्ट सीट कशामुळे फाईटमधे आल्यात?

नेते एकत्र आल्यानं तटकरेंचा मार्ग सोप्पा वाटत असला तरी एकमेकांना पाण्यात बघणारे कार्यकर्ते एकत्र आले तर तटकरेंची गाडी शर्यत जिंकू शकेल. तटकरे दिल्लीला जाणार असल्यानं राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधवांनी वाद विसरून तटकरेंसाठी जोर लावलाय. तटकरेंसाठी ही आणखी एक जमेची बाजू. आणि याच मतदारसंघात ताकद असलेले भाजपचे आमदार डॉक्टर विनय नातू प्रचारापासून दूर आहेत ही गितेंसाठी अडचणीची बाजू आहे.

अटीतटीची रंगतदार लढत

गेल्या निवडणुकीत गितेंच्या प्रचारासाठी न फिरकणाऱ्या रामदास कदम यांनी दापोली मतदारसंघात गितेंना मताधिक्य मिळवून देण्यासाठी कंबर कसलीय. अर्थात मुलाला विधानसभेत उमेदवारी मिळवून देण्यासाठी त्यांनी ही ताकद लावलीय. या मतदारसंघात गेल्या विधानसभा निवडणुकीत निसटत्या मतांनी पराभव झालेले सूर्यकांत दळवी नाराज असले तरी कदम जोमानं कामाला लागल्यानं गितेंना फायदा होईल. तर राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम आपलं वर्चस्व कायम राखण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करतील.

वंचित आघाडीकडून सुमन कोळी रिंगणात आहेत. त्यांच्याकडे कोळी, दलित आणि मुस्लिम मतं जेवढी वळतील तेवढा सुनील तटकरेंचा संघर्ष आणखी वाढेल. त्यामुळे वरकरणी सुनील तटकरे यांच्या बाजूनं वाटणारं चित्र प्रत्यक्षात अटीतटीचं आहे आणि ते गेल्यावेळेसारखंच रंगतदारही असेल.

हेही वाचाः ऐसी कैसी जाहली साध्वी!

रत्नागिरी-सिंधुदुर्गमधे राणे विरुद्ध शिवसेना

काँग्रेस विरुद्ध समाजवादी, शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशी परंपरा असलेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्गात आता शिवसेना विरुद्ध महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष म्हणजे शिवसेना विरुद्ध राणे असा सामना रंगलाय. महायुतीचे विनायक राऊत आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे डॉ. निलेश राणे यांच्यात प्रमुख लढत होऊन काँग्रेस यावेळी तिसऱ्या स्थानावर जाईल अशी चिन्हं आहेत. तळकोकण म्हणजे नारायण राणे या समीकरणाला २०१४ च्या निवडणुकीत सुरूंग लागला.

आधी शिवसेना आणि नंतर काँग्रेसकडून लढताना राणेंनी या मतदारसंघावर वर्चस्व मिळवलं खरं. पण प्रस्थापित राजकीय पक्षाच्या मदतीशिवाय प्रथमच लढणाऱ्या राणेंची ताकद आता खऱ्या अर्थानं समोर येणार आहे. या निवडणुकीत सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघात स्वबळावर पाच आमदार निवडून आणणाऱ्या शिवसेनेचं पारडं जड आहे.

हेही वाचाः साध्वी प्रज्ञा ठाकूर खरंच साधू की फक्त दिखावा?

भाजपबरोबरच्या युतीचा फायदा शिवसेनेला होईलच. पण शिवसेनेचं या भागातलं संघटन आणि शिवसेनेबरोबरच अन्य पक्षाच्या नेत्यांचा राणेंना असलेला टोकाचा विरोध हेच त्यांची सर्वात मोठी जमेची बाजू आहे. अर्थात सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेसह या जिल्ह्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर असलेलं वर्चस्व आणि संघटन या बळावर शिवसेनेला टक्कर देण्याचा राणेंचा प्रयत्न आहे.

गेल्यावेळी मोदीलाटेचा तडाखा

स्वातंत्र्यानंतर लाटा आणि राजकीय वादळांतही समाजवाद्यांचा बालेकिल्ला असलेला तेव्हाचा राजापूर मतदारसंघ पुढे १९९६ पासून शिवसेनेचा गड राहिला. २००९च्या फेररचनेनंतर पुढे चिपळूणपर्यंत विस्तारून हा मतदारसंघ रत्नागिरी-सिंधुदुर्ग झाला आणि फेररचनेनंतर २००९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे निलेश राणे विजयी झाले. पण २०१४ च्या मोदी लाटेत शिवसेनेनं पुन्हा या मतदारसंघावर ताबा मिळवला. या मतदारसंघात शिवसेनेची ताकद आहे.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत सहापैकी पाच मतदारसंघात शिवसेनेनं भाजपच्या मदतीशिवाय विजय मिळवला. तर एकमेव जागा नारायण राणे यांचा मुलगा नितेश राणेंना काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळाला. राणेंनी आता काँग्रेस सोडून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केलीय आणि राज्यसभेत ते भाजपचे खासदार आहेत. नितेश अजूनही तांत्रिकदृष्ट्या काँग्रेसचेच आमदार आहेत.

हेही वाचाः एक्झिट अंदाज: दुसऱ्या टप्प्यात कोण जिंकलंय, कोण हरलंय?

दरम्यानच्या काळात सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत राणेंनी विजय मिळवला आणि त्यानंतर काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी जिल्हा परिषद आपल्याच ताब्यात ठेवलीय. गेल्या निवडणुकीत नितेश राणेंचा आणि विधानसभा निवडणुकीत खुद्द नारायण राणेंचा पराभव झाला. त्यामुळे राणेंच्या वर्चस्वाला सुरुंग लागलाय. तरीही सिंधुदुर्गातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राणेंनी आपली ताकद दाखवून दिलीय.

राणेंची रत्नागिरीत मर्यादित ताकद

रत्नागिरीत शिवसेनेनं आपला गड कायम राखलाय. देशात भाजपचा वारू उधळत असताना देवगड आणि रत्नागिरी या भाजपच्या पारंपरिक बालेकिल्ल्यात भाजपची पीछेहाट झाली. भाजपचे नेते शिवसेनेबरोबर फिरत असले तरी नाराज असल्याची चर्चा आहे. पण शिवसेनेची संघटनात्मक ताकद लक्षात घेता त्यांच्या नाराजीचा फटका शिवसेनेला बसेल असं दिसत नाही. कारण भाजपचा पारंपरिक मतदार पंतप्रधान मोदींसाठी शिवसेनेलाच मतदान करेल अशी शक्यता अधिक आहे.

सिंधुदुर्गात राणेंची ताकद असली तरी रत्नागिरीत मात्र मर्यादा आहेत. त्यांच्याबरोबर आलेले माजी आमदार गणपत कदम, सुभाष बने पुन्हा शिवसेनेत परतलेत. त्यामुळे रत्नागिरीमधल्या तीन विधानसभा मतदारसंघात राणेंना मोठी मेहनत करावी लागतेय. कोकणपट्ट्यातील मुस्लिम मतं काही प्रमाणात राणेंकडे वळू शकतात. सिंधुदुर्गात मोठं मताधिक्य मिळालं तरच निलेश राणेंचा विजय शक्य आहे.

विधानसभेच्या तिकीटासाठी जोरदार तयारी

सध्या कणकवलीमधे मोठं मताधिक्य राणेंना मिळेल. पण केसरकरांच्या सावंतवाडीत आणि वैभव नाईक यांच्या कुडाळ मतदारसंघात राणे मताधिक्य मिळवतात का यावरच त्यांच्या विजयाचं गणित अवलंबून आहे.

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी मतदारसंघात जनसंपर्क ठेवलाय. शिवसेनेच्या सर्व आमदारांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. शिवसेनेच्या आमदारांना सहा महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी हवी असेल तर लोकसभा निवडणुकीत मताधिक्य मिळवून देण्याची अट पक्ष नेतृत्वानं घातलीय. त्यामुळे रत्नागिरीच्या उदय सामंतांपासून राजापूरच्या राजन साळवींपर्यंत सगळे आमदार जोमानं कामाला लागलेत.

शिवसेनेचं मतदारसंघातलं विशेषतः रत्नागिरीतलं संघटनात्मक प्राबल्य ही त्यांची जमेची बाजू आहे. त्यामुळेच शिवसेनेसाठी या मतदारसंघाचा पेपर सध्यातरी सोपा वाटतोय.

हेही वाचाः 

नांदेडः अशोक चव्हाणांच्या अस्तित्वाची लढाई

एका नाटकाचा प्रवासः सिंधुदुर्गातलं सरमळे ते न्यूयॉर्कचं ब्रॉडवे

हापूस झगडतोय अस्तित्वासाठी