बजेट आपण न चुकता ऐकतो. कारण यात आपल्यासाठी काय आहे हे बघायचं असतं. मग यंदा महिलांसाठी बजेटमधे काय आहे? देशाच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री निर्मला सीतारमण महिलांबद्दल भरपूर काही बोलल्या. महिलांना नारायणी असंही म्हटलं. महिला विकासाशिवाय देशाचा विकास होणार नाही. त्यामुळे असं वाटलं या बजेटमधे महिलांसाठी खूप काही असेल.
देशाच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री होण्याचा मान निर्मला सीतारमण यांना मिळाला. त्यांनी मोदी सरकार २.० चं पहिलं बजेट लोकसभेत सादर केलं. भाषणाच्या सुरवातीलाचं त्यांनी हे सरकार जनतेमुळे पुन्हा एकदा निवडून आलं. त्यात महिला मतदारांचं योगदान खूप राहिलंय. महिलांच्या बहुमूल्या मतांशिवाय हे सरकार उभंच राहिलं नसतं. महिलांना एवढं महत्त्व दिल्यामुळे हे बजेट महिला विशेष तर नसणार ना अशी चर्चा सुरू झाली. हे बजेट महिला, युवा आणि सशक्त भारताचं आहे, असं भाजपचे लोक सगळीकडे सांगताहेत.
सीतारमण यांनी बजेटच्या भाषणात सुमारे १९ वेळा महिला हा शब्द उच्चारला. त्या म्हणाल्या की, महिलांच्या विकासाशिवाय देशाचा विकास होणार नाही. तसंच यावेळी संसदेतही रेकॉर्ड झालाय. यंदा ७८ महिला खासदार निवडून आल्यात. हा उल्लेख करून जणूकाही त्यांनी सगळ्यांना महिला शक्तीची जाणीवच करून दिली.
सीतारमण यांनी महिलांसाठी बजेटमधे काय असणार हे सांगण्याआधी नारी तू नारायणी असं म्हणत आपल्या परंपरेची आठवण करून दिली. स्वामी विवेकानंदांनी त्यांचे गुरु रामकृष्ण यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं, महिलांच्या विकासाशिवाय जगाचं कल्याण होऊच शकत नाही. पक्षी एका पंखाने झेप घेऊ शकत नाही हे आपण समजलं पाहिजे. त्याला झेपावण्यासाठी दोन पंखांची गरज असते. आणि या सरकारचा विश्वास आहे की महिलांच्या अधिकाधिक सहभागानेच सामाजिक आणि आर्थिक बदल होतील.
हेही वाचा: आता बजेट नाही तर वहीखातं म्हणायचं, कारण
भारताच्या विकासाची गोष्ट ही ग्रामीण अर्थव्यवस्थेची आहे. आणि ग्रामीण भागात महिलांचा रोल महत्त्वाचा आहे. सरकार त्यांच्या भूमिकेचं कौतुक करतंय. तसंच सीतारमण यांनी लैंगिक भेदभाव दूर करण्यासाठी एक स्वतंत्र समिती तयार करण्याचा प्रस्ताव ठेवलाय. त्यांनी बजेटमधल्या महिला योजनेला स्वामी तू नारायणी हेच नाव दिलंय.
सेल्फ हेल्प ग्रुप अर्थात बचत गट प्रत्येक जिल्ह्यात वाढवण्याचा आणि त्यांच्या विस्ताराचा प्रस्ताव दिलाय. तसंच बचत गटाच्या सदस्यांचं बँकेत जनधन खातं असल्यास त्यांना बँकेत आहे त्या रक्कमेपेक्षा जास्त ५ हजार रुपये काढता येऊ शकतात.
जो गट मुद्रा लोनसाठी पात्र ठरतो त्यांना व्यवसायासाठी १ लाखांचं कर्ज देण्यात येईल. तसंच मुद्रा योजना येत्या काळातही चालूच राहणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. विविध प्रकारच्या उद्योगांसाठी वेगवेगळ्या लोनच्या स्किम्स आहेत. यात महिला उद्योजकांना अधिक प्राधान्य दिलं जाईल.
हेही वाचा: मोदी सरकार श्रीमंतांकडून वसूल करणार घसघशीत टॅक्स
एवढ्या योजना बजेटमधे महिलांसाठी सादर केल्या. एकूणच भाषणातून महिलांना प्रोत्साहन देण्याचं काम केलं गेलं. कारण सीतारमण यांना विश्वास आहे की महिलांना प्रोत्साहन दिलं तर त्या काहीही करू शकतात. पण हिंदू धर्मपरंपरेत स्त्री धन समजलं जाणारं सोनं मात्र महाग झालंय.
महिलांकडे पैसे नसले तरी दागिने असतात. सोन्याच्या दागिन्यांचं मिरवण्यासाठी आणि सुंदरतेच्या पलिकडे मोल असतं. अडीअडचणीच्या काळातलं हे महिलांचं अस्त्र असतं. भारत सोने की चिडीया होता. पण आता आपला देश वर्षाला साधारण ४० टन सोनं आयात करतो.
या बजेटमधे सोनं आणि प्रेशिअस स्टोनच्या आयातीवरची कस्टम ड्युटी ७.३ टक्क्यांवरुन १० ते १२.५ टक्के करण्यात आलीय. त्यामुळे स्टोन आणि सोनं या दोन्हीचे दागिने महागणार आहेत.
हेही वाचा:
असं आहे देशाचं आर्थिक आरोग्य, आर्थिक सर्वेक्षणातल्या १० ठळक गोष्टी
येणार तर मोदीच हे कळाल्यावर उंचावलेला सेन्सेक्स खाली का गेला?