इथे चक्क कुत्रे ब्लड डोनेट करतात

०९ मार्च २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


कुत्र्यांसाठी ब्लड बँक असं म्हटल्याक्षणी अनेकांच्या भुवया उंचावतील. कुणाच्या खिजगणतीतही नसलेली ही गोष्ट घडतेय थेट चेन्नईत. त्यातुन उभा राहिलाय एक असा अभ्यासक्रम जो प्राण्यांच्या ब्लड बँकेचं शास्त्रोक्त प्रशिक्षण देईल. याची नेमकी सुरवात कशी झाली याचा वेध घेणारी ही रोचक कहाणी.

चेन्नईत कुत्र्यांसाठीची भारतातली पहिली ब्लड बँक सुरू झालीय. ऐकून धक्का बसला ना. पण ही बातमी खरीय. ही ब्लड बँक आहे चक्क कुत्र्यांची. आता तामिळनाडूच्या युनिवर्सिटीनेही थेट वेटरनिटीच्या अभ्यासक्रमातच या विषयाचा समावेश केलाय. हे नेमकं आहे काय आणि ब्लड डोनेशन होतं कसं हे सांगणारा जी. सी. शेखर यांचा एक रिपोर्ट आऊटलुकच्या फेब्रुवारीच्या अंकात आलाय. प्राणीमित्रांनीच नाही तर सामान्यांनीही तो वाचायला हवा. खास कोलाजच्या वाचकांसाठी त्या रिपोर्टचा हा स्वैर अनुवाद.

सात वर्षांचा ब्रूनो हा कुत्रा मद्रास वेटरनरी कॉलेजमधे रेग्युलर येतोय. पिवळ्या रंगाचा हा लॅब्रेडॉर कोणत्याही प्रकारचे उपचार घेत नाहीय. तरीही तो उपचारांचा एक भाग बनलाय. त्याचं काम रक्तदात्याचं आहे. बऱ्याच मानवी मित्रांसारखंच. अनेक आजारी कुत्र्यांना वाचवण्यासाठी त्यानं मदत केलीय. देशातली पहिली कॅनाइन ब्लड बॅंक असलेल्या चेन्नईत ब्रुनोसारख्या कुत्र्यांची मागणी वाढतेय. खरंतर त्यामुळे कॅनाइन हेल्थकेअरमधे मोठ्या प्रमाणात भर पडतेय.

काहीवर्षांपूर्वी मुंबईमधे कुत्र्यांसाठी ब्लड डोनेशन कॅम्प घेण्यात आला होता. पण ब्लड बँक सुरू होण्याची ही पहिलीच घटना आहे.

वेगवेगळ्या रोगांमुळे कुत्र्यांना अशक्तपणा येतो. अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया कराव्या लागतात. त्यासाठी रक्ताची गरज असते. छोट्या-छोट्या अपघातांमुळे कुत्रे जखमी होतात. त्या त्यांचं रक्त कमी होतं. ‘अशा स्थितीत रक्तदान करुन कुत्र्याला वाचवणं हा एकमेव उपाय असतो. म्हणूनचं रक्तदात्यांची गरज असते. रक्ताची साठवणूक करण्यासाठी आणि ते मिळवण्यासाठी सुविधासुद्धा असते.’ असं तामिळनाडूच्या वेटरनरी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सी. बलचंद्रन सांगतात.

ब्लड डोनेशनची प्रक्रिया आहे तरी काय? 

२०१० ला युनिवर्सिटी फॉर वेटरनरी, एनिमल सायन्सेसची अर्थात तानुवासची स्थापना झाली. प्लाज्मा आणि प्लेटलेटचा वापर तसचं रक्त साठवण्याच्या सुविधा प्रत्यक्षात येण्याआधी तानुवासने ताज्या रक्ताचं संकलन करायला सुरवात केली. ‘सगळ्या रक्तापेक्षा प्लेटलेट किंवा लाल रक्तपेशींचा संग्रह पुरेसा ठरतो. कुत्री ही केवळ माणसाची मित्र नसतात तर रक्त द्यायची वेळ येते तेव्हा ती माणसाच्या अगदी जवळही असतात.’ इथल्या सगळ्या सुविधांवर नियंत्रण ठेवणारे डॉ. बरनीधरन म्हणतात.

माणसासारखंच कुत्र्यांचेही रक्तगट असतात. तेही सात. त्यातला डिईए १.१ हा निगेटिव युनिवर्सल डोनर असतो. कोणत्याही जातीचा कुत्रा हा दुसऱ्या जातीच्या कुत्र्याला रक्तदान करू शकतो. एखादा निरोगी कुत्रा तीन महिन्यांतून एकदा ३०० ते ४०० मिली रक्तदान करु शकतो. तीन आठवड्यांमधेच हे रक्त भरून निघतं. ब्लड बँक रक्ताची गरज आहे त्यांच्याकडून प्रती पिशवी हजार रुपये घेते. अगदीच माफक दरात ही सेवा दिली जाते.

परदेशात तर याच्या पाचपट पैसे घेतले जातात. प्राणीमित्र श्रवण कृष्णन रस्ते अपघातात जखमी झालेल्या कुत्र्यांना थेट इथे आणून भरती करतात. त्यांच्या या कामासाठी तर ही ब्लड बॅंक वरदानच ठरलीय. व्यवस्थितपण जनजागृती मोहिम राबवल्यामुळे कुत्र्यांच्या रुपाने अनेक दाते मिळताहेत. हे काम कसोशीने चालूय.

प्रयोग यशस्वी ठरतोय 

‘आम्हाला फक्त अँम्ब्यूलन्स मिळाल्यात. त्यामुळे आम्हाला थेट रक्तदात्याच्या घरापर्यंत जावून रक्त गोळा करणं सोपं झालंय. शहराच्या बाहेरही अनेकजण रक्तदान करण्यासाठी तयार आहेत. पण वीसेक किलोमीटर अंतर पार करून रक्तदानासाठी हॉस्पिटलमधे येण्याची त्यांची तयारी नाही,’ असं डॉ. बरनीधरन सांगतात.

कॅनाईनच्या रक्तदान आणि रक्तपेढीच्या यशाने तानुवासला गायी आणि शेळ्यांसाठीही असा प्रयोग करण्यासाठी प्रोत्साहित केलंय. हा सगळा प्रयोग अधिक यशस्वी करण्यासाठी युनिवर्सिटीने आता शेवटच्या वर्षातल्या पोस्ट ग्रॅज्यूएट मुलांसाठी हा अभ्यासाचा भाग बनवलंय. सोबत बिस्ट ब्लड बँकिंग आणि ब्लड ट्रांसफ्यूजन यांनाही अभ्यासक्रमाचा भाग करण्यात आलंय. त्यातून प्राण्यांविषयी आणि त्यांच्या आरोग्याविषयी जागृती निर्माण होईल.

आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपणही आपल्या कुत्र्याला ब्लड डोनेशनसाठी घेऊन जाऊ शकतो. कुत्र्याला ब्लड डोनेशनसाठी नेण्यापूर्वी काही गोष्टींची खात्री केली पाहिजे.

१)    कुत्रा १ ते ८ वर्षाचा असावा.
२)    कमीतकमी २० किलो वजन हवं.
३)    वैद्यकीयदृष्ट्या स्वस्थ असावं.
४)    नियमितपणे लसीकरण करायला हवं. साधारण २ आठवड्यांच्या अंतरात.
५)    वेळोवेळी स्वच्छता ठेवायला हवी.
६)    संसर्गजन्य रोगांपासून दूर ठेवायला हवं.
७)    फिमेल असेल तर प्रेगनंट असताना रक्तदान करता येत नाही.