कोरोना संकटाच्या काळात भेदाभेदाच्या पलीकडे जाऊन माणूस एकत्र येत असताना दुसरीकडे याला छेद देणाऱ्या घटना घडत आहेत. यूपीत जेवण बनवणारा व्यक्ती दलित आहेत म्हणून क्वारंटाईनमधे असलेले काहीजण जेवायला घरी जातात. जीवावर बेतलं असतानाही मनात खोलवर रुजलेल्या जातीच्या अस्मिता टोकदार कशा होतात, हे सांगण्यासाठी ही उदाहरणं पुरेशी बोलकी आहेत.
कोरोना वायरस दिवसेंदिवस माणसांना विळखा घालतोय. संसर्ग झालेल्यांची आणि मृत्यूच्या दाढेत जाणाऱ्यांची संख्या जगभरात वाढत आहे. भारतातही मृतांची संख्याही वाढतेय. जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी सरकारं कसोशीने प्रयत्न करत आहेत. आपला हातभार म्हणून अनेक समाजसेवी संस्था मदतीसाठी पुढे येताहेत. गरीब, कामगार, कष्टकऱ्यांसाठी ठिकठिकाणी जेवण दिलं जातं. पण दुसरीकडे माणुसकीला बट्टा लागणाऱ्या घटनासुद्धा घडतायत.
उत्तरप्रदेशातल्या एका गावात कोरोनामुळे काही लोकांना क्वारंटाईन करण्यात आलं. दोन वेळच्या जेवणासह सगळ्या सुविधा सरकारकडून मिळताहेत. पण त्यातले दोघेजण दुपार आणि संध्याकाळच्या जेवणासाठी पळून जातात. कारण काय तर दलितांच्या हातचं जेवण नकोय. अस्पृश्यता डोक्यात किती घट्ट रुतलीय हे सांगणारी पत्रकार पियुष श्रीवास्तव यांची एक बातमी कोलकात्यातून निघणाऱ्या 'द टेलिग्राफ इंडिया' या न्यूज पोर्टलवर आलीय. श्रीवास्तव हे स्वतः टेलिग्राफचे संपादक आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जग चिंतेत असताना समाजातलं जातीद्वेषाचं भेदक वास्तव त्यांनी मांडलय.
हेही वाचा : तू देवमाणूस आहेस, की खराखुरा देवच, एका कोरोना योद्ध्याला पत्र
उत्तर प्रदेशातल्या कुशीनगर जिल्ह्यात भुजौली नावाचं एक गाव आहे. तिथल्या प्राथमिक शाळेत ५ जणांना ३१ मार्चला क्वांरंटाईन करण्यात आलंय. आता क्वांरंटाईन केलं की साहजिकच सगळ्या सुविधा रुग्ण म्हणून दिल्या जातात. पण इथं परिस्थिती वेगळी आहे. या ५ जणांमधले दोघे चक्क जेवणासाठी म्हणून घरी जाताहेत. आपण लहानपणी शाळेच्या मधल्या सुट्ट्यांमधे घरी धूम ठोकायचो. हा प्रकार तसाच काहीसा आहे.
जेवण करणारी व्यक्ती केवळ दलित समाजातली आहे म्हणून तिच्या हातचं जेवण नाकारलं गेलं. ही घटना स्वतःच्या जातीबद्दलची अस्मिता आणि इतर जातींबद्दलच्या द्वेष अधिक घट्ट करणारी आहे. 'मागच्या दोन आठवड्यापासून इथल्या केंद्रात क्वारंटाईनमधे आहोत. आम्ही घरी बनवलेलं अन्नच खातो. अनुसूचित जातीच्या व्यक्तीने शिजवलेलं जेवण याआधी आम्ही खाल्लेलं नाही', असं क्वारंटाईनमधल्या या व्यक्ती अभिमानाने सांगतात. हा जातीविषयीचा अभिमान समाजातल्या एका वर्गाबद्दलचा तिरस्कार आणि भेदभाव करू पाहणारी मानसिकता दाखवणारा आहे.
ज्या गावच्या प्राथमिक शाळेत ५ जणांना क्वारंटाईन करण्यात आलंय. तिथंच बाजूला खड्डा नावाचं पोलिस स्टेशन येतं. लीलावती देवी या इथल्या ग्रामपंचायतीच्या प्रमुख आहेत आणि कुकही. कोरोनामुळे क्वारंटाईन करण्यात आलेल्या लोकांसाठी जेवण करायला त्यांनी होकार दिला. त्याचं कारणही तसंच आहे. कोरोना वायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गावात भीतीचं वातावरण आहे. या भीतीमुळे शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी दुपारचं जेवण करायला आधीच्या स्वयंपाकींनी नकार दिला होता. त्यांच्याही मनामधे कोरोना वायरसची भीती आहे.
'प्रत्येक व्यक्ती ही कोरोना साथीच्या भीतीने जगतेय. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विनंतीमुळे मी क्वारंटाईन केलेल्या लोकांसाठी जेवण बनवण्याचा निर्णय घेतला. मास्क आणि हँड ग्लोज वापरून मी आवश्यक ती काळजी घेऊन सकाळ आणि संध्याकाळी जेवणाच्या थाळ्या या लोकांना पुरवते आहे,' असं जेवण बनवणाऱ्या लीलावती देवी सांगतात.
क्वारंटाईनमधे असलेल्या दोघांनी दलितांचा स्पर्श झालेलं काही खायला नकार दिलाय. मला त्यांची कोणतीही अडचण नाही. मला पाठिंबा देणारी आणि विरोध करणारी दोन्ही प्रकारची लोकं ही माझ्याच गावातली आहेत. पण झालेल्या घटनेबद्दलची कल्पना मी अधिकाऱ्यांना फोनवरून दिली असल्याचं लीलावती देवी सांगतात.
हेही वाचा : बाहेरून आणलेलं सामान वायरस फ्री करण्याचं साधंसोप्पं प्रॅक्टिकल
लीलावती देवी यांनी झालेल्या घटनेची माहिती अधिकाऱ्यांना दिलीय. टेलिग्राफच्या बातमीत या घटनेच्या पार्श्वभूमीवर तिथल्या काही अधिकाऱ्यांच्याही प्रतिक्रिया नोंदवल्या गेल्यात. देश दीपक सिंग हे खड्डाचे सब डिविजनल मॅजिस्ट्रेट आहेत. त्यांनी ग्राम पंचायत प्रमुखांनी केलेल्या तक्रारीच्या चौकशीचे आदेश दिलेत. ब्लॉक अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीने क्वारंटाईन केंद्रांवर शिजवलेलं जेवण घेतलं जातंय की नाही यावर लक्ष ठेवायला सांगितलंय. तसंच क्वारंटाईन केंद्राच्या नियमांची मोडतोड करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, हेही त्यांनी स्पष्ट केलंय.
या पाचपैकी एकातही कोरोनाची लक्षण नाहीत. त्यांना घरी जाण्याआधी २७ एप्रिलपर्यंत क्वारंटाईनमधे ठेवलं जाईल. ३० मार्चला गावी आलेले हे सगळे दिल्लीतल्या एका कारखान्यात काम करायचे. या क्वारंटाईन केंद्रावर दोन कॉन्स्टेबल नेहमी तैनात असतात. मात्र कोणालाही इथं येण्याजाण्यापासून रोखलं जात नाही किंवा साधी चौकशीही केली जात नसल्याचं महत्वाचं निरीक्षण टेलिग्राफच्या बातमीत पत्रकार पियुष श्रीवास्तव नोंदवतात.
ब्लॉक डेवलपमेंट ऑफिसर असलेल्या रमाकांत यांनी क्वारंटाईन करण्यात आलेल्या राम जतन आणि जयप्रकाश यांची जेवणाबद्दल कोणतीही तक्रार नसल्याचं म्हटलंय. तर काहींना जेवणाबद्दल तक्रार असल्याचं म्हणत त्यांनी आपली दुसरी बाजूही सावरण्याचा प्रयत्न केला आहे. थोडक्यात इथंही कुठंतरी अधिकाऱ्यांचा सावळा गोंधळ दिसतोय.
राज्य सरकारने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, उत्तर प्रदेशात आतापर्यंत ४४८ जणांच्या कोरोना टेस्ट या पॉझिटिव आल्यात. ५,००० पेक्षा अधिक जणांना क्वारंटाईन केंद्रात ठेवण्यात आलं आहे. चार लोकांचा मृत्यू झाला असून जवळपास ८० जणांना उपचारानंतर सोडण्यात आलंय. अर्थात ही आकडेवारी १२ एप्रिल पर्यंतची आहे. कुशीनगरचे भाजपा खासदार विजय दुबे यांनी हे प्रकरण समोर आल्यावर शाळेला भेट दिली. आणि झालेल्या घटनेनंतर क्वारंटाईन करण्यात आलेल्या पाचही जणांना नियमांचं पालन करायला सांगितल्याचं पत्रकार श्रीवास्तव सांगतात.
कुशीनगरमधेच जगाला समतेचा संदेश देणाऱ्या गौतम बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं. दलित समाजातल्या एखाद्या व्यक्तीला भेदभावाचा सामना करायला लावणारी ही एकमेव घटना नाहीय. उत्तर प्रदेशातल्या बस्ती जिल्ह्यातही याआधी ८, ९ एप्रिलच्या दरम्यान अशीच एक घटना घडली होती. बस्ती जिल्ह्यातल्या सिसवा बरुआर या गावात क्वारंटाईन केलेल्यांनी दोन दलित स्वयंपाकींनी बनवलेलं जेवण खायला नकार दिला. त्यामुळे या १० जणांविरुद्ध साथरोग कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. याबद्दलची तक्रार ही स्थानिक रहिवासी असलेल्या राजेश कुमार यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.
जेवणाला चव नसल्याने ते खायला या १० जणांनी नकार दिल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. गावातले लोक आपली बाजू सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न करताहेत. पण या घटनांमधे दिसत असलेला स्वजातीच्या अस्मितेबद्दलचा आणि अस्पृश्यतेचा अँगल टाळून पुढे जाता येणार नाही.
हेही वाचा :
लस सापडल्यावर तरी कोरोना संपेल का?
नव्या पिढीनं गांधी-आंबेडकर मतभेदांकडे कसं बघावं?
एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?
अमेरिकेत ट्रम्प निवडून येणं हीच असेल जगासाठी मोठी दुःखद बातमी
अमेरिकेला हवं असणारं मलेरियाचं औषधं भारतात कसं आलं, त्याची गोष्ट