चैत्यभूमीवर येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांना सोयीसुविधा कधी देणार?

०९ डिसेंबर २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी लाखो आंबेडकरी अनुयायी चैत्यभूमीला येतात. यंदाही तशी गर्दी झाली. पण मूलभूत सोयीसुविधांच्या बाबतीत इथे प्रचंड वाणवा आहे. टँकरच्या तोटीला तोंड लावून साधं पाणी पिण्यासाठीही लांब लांब रांगा लावाव्या लागतात. किमान एका ठिकाणी वर्षानुवर्षे येणाऱ्या लाखोंच्या समुदायासाठीच्या व्यवस्थापनासाठी आपण नव्याने काहीच करणार नाही का?

विठूमाऊलीसाठी पंढरपूराकडे धावणारे फाटके वारकरी आणि चैत्यभूमीला बाबांच्या आठवणीत येणारे त्यांचे गरीब अनुयायी यांच्यातला विश्वास, प्रेरणा किंवा 'असं जे' ज्यामुळे अनेक अडचणींवर मात करत देशाच्या कानाकोपऱ्यातून हे भाबडे लोक चैत्यभूमीवर येतात ते शोधण्यासाठी मी काही वर्षांपासून इथे ओढली जातेय. गरीब लोकांचा उल्लेख केला कारण बाकींच्याना पैशाने त्यांच्या माणूसपणाची थोडी तरी ओळख मिळवून दिलीय असं मला वाटतं.

लाखो अनुयायी चैत्यभूमीवर जमण्याचं गुपित

सर्वार्थाने आजही वंचित असलेला समाज अडचणीत मैदानावर दिवस रात्र काढतो तेव्हा त्याच्या रोजच्या जगण्याच्या भयाण अवस्थेची कल्पनाच न केलेली बरी. तरीही तो बाबांच्या आठवणीत येतो. बाबांनी जी माणूस म्हणून ओळख मिळवून दिलीय ती त्यांच्यापर्यंत पोचलेली नसताना तो बाबांचे आभार मानायला येतो, मला हेच महत्त्वाचं वाटतं.

मनात बॅकग्राउंडला सारखं वाजतंय 'आम्ही खातो त्या भाकरीवर भीमरायाची सही हाय रं. तुझी वाढली किंमत कोणाच्या पायी हाय रं?'

कडूबाईंचा आवाज पार काळाजात शिरुन भावनांना जागं करतोय. शिवाजी पार्कात त्या मोफतच्या जेवणात एक चपाती, त्याबरोबर थोडंस पातळ पिठलं किंवा तसलंच काही तरी, कुणी बिस्कीट तर कुणी पिवळा नाहीतर लाल भात वाटतंय. अंथरलेल्या त्या प्लास्टिकवर रिंगण करून बसून ती पोरं भात खाताहेत.

हेही वाचाः शिवाजी पार्कवर निळा समुद्र भरून आला होता तेव्हा

'बाबाने मानूस म्हणून ओळख दिली'

थोड्या वेळापूर्वी ज्या माईकवरुन मोफत अन्नवाटपाच्या उपक्रमाच्या उद्घाटनाची मधूर आवाजात अनाउन्समेंट झाली तो माईक बाजूला न काढल्याने 'एकाला एकच डिश बरीच लोक हाईत. चला बाजूला व्हा' अशी हाकलणी ऐकू आली. 

माणूस म्हणून मान्यता खरंच दिलीय का? व्यवस्थित जेवणाची सोय नसावी. मी कुठे एक - दोन दिवसाच्या जेवणाचा विचार करतेय. महारवाड्यात, बौद्धवाड्यात पाणी तरी पुरवायचं आहे का सरकारच्या डोक्यात. गेल्यावर्षी असाच एक किस्सा ऐकला इथेच या मैदानात.

'बाई त्या बाबाने मानूस म्हणून ओळख दिली.' हे ऐकताना बौद्धवाड्याची अवस्था आजही फार बरी नाही हे मला कळालं होतं. दुष्काळ होता. राज्यात कित्येक गावात पाणी नव्हतं. गावाबाहेर एके ठिकाणी पाणी होतं त्यात किडे होते. मराठ्यांच्या विहिरीतून मोजकंच पाणी मिळत किंवा मिळत नाही अशी स्थिती होती. पोरंबाळ आणि जेवणाला पाणी आणायचं कुठं हा प्रश्न बौद्धवाड्यातल्या घरांना होताच.

‘गावात टँकर आलेला कळत नाही. तेव्हा ते किडे असलेलं पाणी घ्यावं लागतंय गाळून गाळून.’ ती बाई सांगत होती आणि मला त्या मोकळ्या मैदानात गुदमरल्यासारखं झालं. जेव्हा भीमा कोरेगावात दंगल उसळली ती बाई हातातली पिशवी घेऊन दूर पळाली. 'दगड पडत होते तिथपासून दूर पळालो. थोड खरचटलं होतं. घरातल्यांना माहीत न्हाई मी जीती हाय का की गेली.' जे झालं ते वाईट झालं सांगत असताना ती मधेच म्हणाली ‘बाई पूर्वजांनी, बाबांनी जे केलं त्यामुळे आम्ही हाओ. त्या बाबाने मानूस म्हणून ओळक दिली त्याच्यासाठी यावं लागतंय.’

कडूबाईचा आवाज आतून येतोच आहे ‘होतो जगत कुत्र्यावानी’

लहान मुलांचं करायचं काय?

थोडं पुढे कुणाशी तरी बोलत असताना काही मंडळी विहार बनवायला पावती बूक घेऊन वर्गणी जमवत होते. कोयना धरणाच्या शेजारच्या गावचे. गावात पाण्यासाठी लाईन टाकली त्याला पाणी नव्हतं. पण हे बौद्ध विहार बांधण्यासाठी धडपडत होते. मला वाईट वाटलं जेव्हा ते म्हणाले, १०-२० किती पण द्या आम्ही पावती देतो. विहार बांधण्यासाठी आमचा प्रयत्न आहे.

'माझ्याकडे पैसे नाहीत,' असं मी सांगितलं. बरोबरच्या मित्राने मात्र स्पष्ट सांगितलं ‘मी अशा गोष्टींसाठी पैसे देत नाही अगदी ते देऊळ बांधायलाही आले तरी मी देणार नाही.’ माझ्याही मनात तेच होतं पण इतकं स्पष्ट उत्तर देण्याचं धाडस केलं नाही.

बकणा भरलेलं ते मुल आणि तशीच तिथे फिरणारी मुलं. का तिथे या मुलांना खेळण्यासाठी चांगला कोपरा आणि व्यवस्था नाही. अगदी चार, दोन पैसे गाठीला लागतील म्हणून थाटलेल्या रस्त्यावरच्या दुकानातली चिल्लीपिल्ली पण त्या मांडलेल्या दुकानाच्या पथारीवर हारीने मांडलेल्या वस्तूच्या शेवटी कळकट टॉवेल नाही तर गमछा तोंडावर ठेवून झोपवलेली दिसतात.

हेही वाचाः डॉ. बाबासाहेब आंबेडकरः भारतातल्या मानवी स्वातंत्र्याचे शिल्पकार

व्यवस्थापनातल्या उत्क्रांतीची प्रतिक्षा

जिथे यंदा नव्यानेच ड्रोनने सुरक्षेची खात्री करण्याचा प्रयत्न झाला तिथे तान्हुल्यांसाठी अशी सुविधा नसावी. का तिथे एका कोपऱ्याला एका पाईपला थोड्या अंतरावर लावलेल्या काही नळातून झुंडीने पाणी प्यायची वेळ येते. मुंबई महापालिकेचं पाणी जगात स्वच्छ असेल पण तरीही ते उकळून नाही पण किमान फिल्टरचं तरी असावं ना. की 'यांना गावात पाणी पण नाही मिळत इथे ते तरी मिळतंय' या विचारातून ते रांगेत नळ लावले जातात. त्या नळातून बाहेर आलेलं पाणी वाहून जायलाही सोय नाही अगदी मैदानाच्या गेटवरच स्वागताला चिखल होता. 

काही वेगळी सोय मागत नाही. पण किमान एका ठिकाणी वर्षानुवर्षे येणाऱ्या लाखोंच्या समुदायासाठीच्या व्यवस्थापनेसाठी आपण नव्याने काहीच करणार नाही का? काही नवीन बदल अपेक्षित आहेत. डिजिटल स्क्रिन आणि मोबाईल चार्जरपेक्षा अधिक चांगली व्यवस्था होऊ शकते. मुंबई महापालिकेच्या वर्षानुवर्षाच्या या कार्यक्रमाच्या आयोजनाच्या अनुभवातून हा बदल घडू शकतो. मी वाट पाहतेय त्या माणूस म्हणूनच्या व्यवस्थापनातल्या उत्क्रांतीची.

दरवर्षीप्रमाणे यंदाही चैत्यभूमीला गेले. दरवर्षीचं उत्तर आजही नाही सापडलं. का येतात हे लोक इथे? बाबासाहेब यांच्यातच तर आहेत. ते संविधानात आहेत. ते वस्त्यांमधे आहेत. पण असं काहीतरी जे सतत शोधावं लागतं पिढ्यान पिढ्या आणि जन्मोजन्मी. जसं वारकरी दररोज नव्याने भेटतो विट्ठालाला. यांच्यासाठी बाबासाहेब हे असंच एक गुपित आहे जे त्यांना कळलंय आणि तरीही त्यांना शोधावं लागतंय. चैत्यभूमीवर. जसं मी शोध घेतेय त्यांच्या या शोधाचा.

हेही वाचाः 

मुक्काम चैत्यभूमीः ‘जय भीम’ जागवणारी रात्र

 

नयनतारा सहगलः फुले, आंबेडकरांच्या रांगड्या वारशाचा अपमान

बाबासाहेबांनी पहिला मोर्चा दलितांसाठी नाही तर शेतकर्‍यांसाठी काढला

डावे, आंबेडकरवाद्यांच्या टोकाच्या गांधीविरोधामुळे आरएसएसचं फावलं!