काँग्रेस देशभरात अनपेक्षितपणे खूपच विचारपूर्वक पावलं टाकताना दिसतेय. मात्र महाराष्ट्रात काँग्रेसची अनेक आडाखे चुकताहेत. तिकीटवाटपात घोळ सुरू आहे. सगळं नेतृत्व प्रभावहीन वाटतंय. आता हायकमांड जागं झालंय. दिल्लीहून नेतेमंडळी परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. पण हे बैल गेला आणि झोपा केल्यासारखं आहे.
काँग्रेस पार्टीने देशभरात वेगवेगळ्या जातीधर्मात, वर्गात प्रभाव असलेल्या पक्षांशी निवडणूकपूर्व आघाडी करण्याचं धोरण ठरवलंय. त्यासाठी थेट पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनीच तामिळनाडू, केरळ, कर्नाटक यासारख्या राज्यांमधे प्रादेशिक पक्षांशी बोलणी केली. या बोलणीला तसं यशही आल्याचं दिसलं. महाराष्ट्रात मात्र पक्षाच्या राष्ट्रीय धोरणाच्या अक्षरशः उलट घडामोडी सुरू आहेत.
काँग्रेस पक्ष देशभरात वंचित बहुजनांना सोबत घेण्याच्या फॉर्म्युल्यावर काम करताना दिसतोय. उत्तर प्रदेशमधे तर सरचिटणीस प्रियंका गांधी आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आतापर्यंत सत्तेत वाटा न मिळालेल्या जातीधर्मांना सोबत घेण्याचा सपाटाच लावलाय. कर्नाटकमधे तर आपल्या बालेकिल्ल्यातल्या जागाही काँग्रेसने महाआघाडीतल्या धर्मनिरपेक्ष जनता दलाला सोडल्यात. बिहारमधेही हेच होतंय. कुठलीही आघाडी, बोलणी तुटणार नाही यासाठी खूद्द पक्षश्रेष्ठींनी पुढाकार घेतला. याउलट चित्र महाराष्ट्रातल्या काँग्रेसचं आहे.
महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस हा महत्त्वाचा पक्ष वगळता इथल्या स्थानिक काँग्रेस लीडरशीपला दुसऱ्या कुणाला आपल्यासोबत घेण्यात अपयश आलंय. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी महाआघाडीमधे ५६ पक्ष, संघटनांचा समावेश असल्याची घोषणा केली. ५६ आकड्यामुळे मीडियात ५६ इंची छातीशी तुलना झाली. मात्र, या ५६ संघटनांमागे आजच्या घडीला किती जनमत आहे, हे चव्हाण यांनाही धड सांगता यायचं नाही.
हेही वाचाः उर्मिला मातोंडकरसाठी उत्तर मुंबईचा गड अवघडच
दलित, मुस्लीम ही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची वोटबँक. या वोटबँकेलाच प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीकडून सुरूंग लावायचा प्रयत्न केलाय. विरोधी मतं विभागू नयेत म्हणून काँग्रेस आघाडीने वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा सुरू केली. मात्र त्यावर तोडगा काढण्यात इथल्या लीडरशीपला यश आलं नाही. वंचित बहुजन आघाडीला शेवटपर्यंत झुलवत ठेवण्याचं जुनाट, पारंपरिक काँग्रेसी राजकारण करण्यातच वेळ घालवला.
आघाडीच्या जागावाटपात स्वाभिमानी शेतकरी पक्षालाही शेवटच्या क्षणापर्यंत दुसरी जागा कोणती दिली मतदानाला काही दिवस शिल्लक असताना अजून स्पष्ट झालं नाही. त्यावरून सांगलीत वसंतदादा पाटील घराणं काँग्रेसपासून दूर जात असताना त्यांना कुणी रोखत असतल्याचंही दिसलं नाही. उमेदवारी भरायला काही दिवस उरलेले असताना अजूनही या जागेचा तिढा सोडवण्यात काँग्रेसला अपयश आलंय.
पुण्याच्या उमेदवारीचा तिढा तर आता पंतप्रधानाच्या निवडीइतका कठीण होऊन बसलाय. त्यावरून पक्षाची सोशल मीडियावर टर्र उडवली जातेय, ‘गिरीश बापटच सभा घेऊन पुण्यातला काँग्रेसचा उमेदवार जाहीर करणार.’ दुसरीकडे संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांनीही झुलवत ठेवण्याच्या राजकारणाला कंटाळून आता आपल्याला उमेदवारी नको असल्याचं स्वतःच सांगितलं. काँग्रेस नेते अरविंद शिंदे यांनी दिल्लीतून यादी येईल तेव्हा येईल, असं म्हणत पुण्यात प्रचार सुरू केलाय.
चंद्रपूरच्या उमेदवारीवरून प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी आपणच राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचं सांगून एकच खळबळ उडवून दिली. ऐन निवडणुकीत प्रदेशाध्यक्षांच्या या भूमिकेमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमधेही उलटसुलट चर्चा सुरू झाली. नंतर चंद्रपूरची उमेदवारी शिवसेनेतून आलेल्या आमदार बाळू धानोरकर यांना देण्यात आली. रत्नागिरी - सिंधुदूर्ग मतदारसंघातल्या उमेदवारीवरून तर पक्षावर खूप टीका झाली. नवीनचंद्र बांदिवडेकर यांचे सनातन संस्थेशी संबंध असल्याचं समोर आल्यावर त्यांची उमेदवारी बदलण्याची मागणी झाली. प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी बांदिवडेकर यांच्या उमेदवारीला क्लीनचीट दिली.
हेही वाचाः इलेक्शनची गेल्यावेळसारखी हवा यंदा कुठाय?
मराठवाड्यात लातूरचा उमेदवार जाहीर करतानाही काँग्रेसने घोळ घातला. काँग्रेसचा उमेदवार जाहीर झाला त्या दिवशी लातूरचे आमदार अमित देशमुख हे दिल्लीत पक्षश्रेष्ठींना भेटायला गेले होते. त्यामुळे लातुरात काँग्रेस उमेदवार बदलणार अशी चर्चा सुरू झाली. भाजपने आपला नवा उमेदवार देत दुसऱ्या टप्प्यातला प्रचार संपवला असताना स्थानिक काँग्रेस नेत्यांकडून उमेदवार बदलाच्या बातम्या पेरल्या जात होत्या. शेवटी मच्छिंद्र कामंत यांच्या उमेदवारी चर्चा झाली. पण उमेदवार बदलाबदलीच्या चर्चेत दोन-तीन दिवस वाया गेले.
जालन्यात तर शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना काँग्रेसच्या तिकीटावर लढवण्याची बोलणी फिक्स झाल्याच्या बातम्या आल्या. लोकसभेची तयारी करणाऱ्या खोतकरांना गळाला लावून भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरोधात तगडी फाईट देण्याची संधीही काँग्रेसने घालवली. याउलट खोतकरांना काँग्रेसमधे आणण्याची जबाबदारी घेतलेल्या आमदार अब्दुल सत्तार यांनी आता औरंगाबादेत पक्षाच्या उमेदवाराविरोधात बंडाचा झेंडा फडकवलाय. सत्तार यांनी औरंगाबाद जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदाचाही राजीनामा दिलाय.
महाराष्ट्रातल्या आघाडीच्या जागावाटपाचा तिढा शेवटच्या दिवसांपर्यंत सुरूच होता. अहमदनगरला काँग्रेसचा उमेदवार फिक्स असताना तिथली जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडून सोडवून घेण्यात तर पक्षाची खूप किरकिरी झाली. विरोधी पक्षनेत्याच्या पोरालाच जागा मिळत नसेल तर काँग्रेस आघाडीत किती सुरळीत सुरू आहे, हे दिसून आलं. जागावाटपाच्या वाटाघाटीचा पुरता फज्जा उडालेला असताना जळगाव जिल्ह्यातली रावेरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसने शेवटच्या क्षणी काँग्रेसला देऊ केलीय. हीच गोष्ट आधी झाली असती तर आतापर्यंत जो राडा झालाय तो रोखता आला असता.
महाराष्ट्रातला अध्यक्ष आपल्यावर राजीनामा देण्याची वेळ आली आहे, असं सांगतोय, दुसरीकडे ऐन निवडणुकीत मुंबईचा अध्यक्ष बदलावा लागतोय. यामुळे काँग्रेसविरोधात चित्र तयार होतंय. उमेदवारांना जिंकून येण्यासाठी स्वतःच्या अजेंड्यावरूनच मोर्चेबांधणी करावी लागणार आहे. आता हायकमांडला जाग आलीय. उद्या शनिवारी दिल्लीतून नेते येताहेत. पण ते पक्षाचं झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी काही करून शकत नाहीत.
हेही वाचाः
लोकसभेच्या रिंगणात कोण, किती पाण्यात हे सांगणारे कालचे निकाल