इन्कम टॅक्स रिटर्न भरताना आपण कोणती काळजी घ्यावी?

०९ जुलै २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


बऱ्याच जण आयटीआर फॉर्म भरण्यात बिझी असाल. कारण आपल्याला जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न भरायचंय. सध्या याआयटीआर फॉर्ममधे आणि नियमांमधे काही बदल झालेत. त्यामुळे भरतानाकाही चुका होऊ शकतात. फॉर्म भरताना कोणती काळजी घ्यावी हे कर आणि गुंतवणूक अभ्यासक संदीप पाटील सांगताहेत.

२०१८-१९ हे आर्थिक वर्ष संपलं आणि इन्कम टॅक्स रिटर्न अर्थात प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची वेळ आलीय. जर आपण ऑडिटच्या कक्षेत येत नसाल तर ३१ जुलैपर्यंत आपल्या सर्वांना प्राप्तिकर विवरणपत्र म्हणजेच रिटर्न भरावे लागणार. आयटीआरच्या बऱ्याच नियमांत बदल झालेत आणि फॉर्ममधेसुद्धा. अशा स्थितीत रिटर्न भरताना नजरचुकीने गडबड होऊ शकते आणि कधी कधी काही जाणीवपूर्वक चुका केल्या जातात. मात्र अशी चूक आपल्याला महागात पडू शकते.

हा विभाग आटोमेटेड सॉफ्टवेअरने चालतो. आणि आर्टिफिशियल इंटिलिजिन्सचा प्रयोग करतो. म्हणून रिटर्न काळजीपूर्वक भरला पाहिजे. गरज पडल्यास कर सल्लागाराची मदत घ्यावी. प्रथमच आयटीआर भरणार्‍यांकडून चुका होण्याचे प्रमाण अधिक आहे. अशा स्थितीत आपल्या कंपनीतल्या अर्थ विभागात काम करणार्‍यांची मदत घेता येईल.

कोणत्या गोष्टी लिहिणं गरजेचं आहे?

प्राप्तिकर विवरण भरताना सेविंग अकाऊंटवर अर्थात बचत खात्यावर मिळणार्‍या व्याजाचा उल्लेख करावा. जर आपण हे उत्पन्न दाखविले नाही तर करचुकवेगिरीच्या नावाखाली आपल्यावर कारवाईचा बडगा उगारला जाऊ शकतो. या व्याजाचा उल्लेख आयटीआरमधे करत प्राप्तिकर कायदा ८० टीटीअंतर्गत या व्याजावर १० हजारांपर्यंत सवलत मिळवू शकतो.

आपल्याला आणखी काही गोष्टींची खबरदारी घ्यावी लागेल. जसं की, मागील आर्थिक वर्षादरम्यान नोकरी सोडून नवीन नोकरी पकडली असेल तर दोन्ही कंपनीकडून होणार्‍या इन्कम डिटेल्स म्हणजे मिळकतीचा तपशील आयटीआरमधे केला पाहिजे. नाहीतर रिटर्न भरताना अडचण येऊ शकते. अशा स्थितीत आपण दोन्ही कंपनीचा फॉर्म 16 घ्यायला हवा. फॉर्म 16 मुळे रिटर्न भरण्यास कमी वेळ जातो आणि चुकांचं प्रमाणही कमी राहतं.

हेही वाचा: मोदी सरकार श्रीमंतांकडून वसूल करणार घसघशीत टॅक्स

फॉर्म २६ एएस तपासायला हवा

फॉर्म 26 एएस किंवा टॅक्स क्रेडिट स्टेटमेंट हे आपल्या उत्पन्नावर कपात केलेल्या टीडीएसची माहिती देतं. टॅक्स रिफंडसाठी दावा करताना फॉर्म २६ ची तपासणी करावी. कराची आकारणी करताना हा फॉर्म संभाव्य चुकांपासून आपल्याला वाचवतो. या फॉर्मच्या मदतीने आपण योग्य रितीने प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करू शकतो.

प्रत्येक करदत्याने आपला फॉर्म १६ किंवा १६ ए ला फॉर्म २६ एएसशी जुळवून घ्यायला हवा. जर फॉर्म १६ किंवा १६ ए मधे दिसत असलेले उत्पन्न आणि फॉर्म २६ एएसमधे असणार्‍या उत्पन्नात अंतर असल्यास प्राप्तिकर विभागाकडून माहिती मिळवता येईल. याशिवाय कंपनी किंवा आपण टीडीएस कपात करणार्‍या व्यक्तीकडून माहिती मिळवू शकता. अशा प्रकारचं आकड्यांमधलं अंतर वेगवेगळ्या कारणाने होऊ शकतं.

जर कर कपात करणार्‍याने टीडीएस रिटर्न दाखल केला नसेल किंवा कपात केलेला टीडीएस प्राप्तिकर विभागाकडे जमा केलेला नसेल तर फॉर्म २६ एएसमधे अर्धवट आकडेवारी दिसेल. त्याचबरोबर अ‍ॅससेमेंट इअर चुकीने लिहल्याने, पॅन क्रमांक चुकल्यास किंवा चलानमधे चुकीची माहिती भरली गेल्यास फॉर्म २६ एएस हे मिसमॅच दिसेल. हीच चूक स्वाभाविकपणे झाली असली तरी कदाचित अशा प्रकारची चूक ही प्राप्तिकर विभाग हा उत्पन्न लपवण्याचा प्रयत्न म्हणूनही बघू शकतो. परिणामी प्राप्तिकर विभाग चौकशी करू शकतो आणि नोटीससुद्धा पाठवू शकतो.

हेही वाचा: असं आहे देशाचं आर्थिक आरोग्य, आर्थिक सर्वेक्षणातल्या १० ठळक गोष्टी

भांडवली नुकसानही दाखवता येईल

नावाचं स्पेलिंग, पूर्ण पत्ता, ई-मेल आयडी, मोबाईल नंबर, पॅन नंबर इत्यादी गोष्टी आयटीआर आणि आधार या गोष्टीत साम्य असायला हवं. एसएमएस येणाराच मोबाईल क्रमांक द्यावा. चुकीच्या माहितीमुळे रिफंड मिळण्यास अडचणी येऊ शकतात.

पहिल्यांदा रिटर्न भरणार्‍यांकडून चुका होण्याचे प्रमाण अधिक असतं. रिटर्न भरलं की काम झालं, असा त्यांचा समज असतो. मात्र रिटर्न फाईल करण्यापूर्वी त्याची पडताळणी करणे गरजेचं आहे, त्यामुळे प्राप्तिकर विभागाच्या ई फायलिंग पोर्टलने रिटर्नची पडताळणी करू शकता किंवा सीपीसी-बंगळूरला पाठवून त्याचे वेरिफिकेशन करता येईल.

प्राप्तिकर विवरण दाखल करण्याचा अर्थ केवळ उत्पन्न दाखवणे असा नसून नुकसानीची माहिती सादर करणे हादेखील आहे. बऱ्याचदा आपले भांडवली नुकसान होत असते आणि त्याचा उल्लेख केला जात नाही. अशा प्रकारची कृती चुकीची आहे. कारण एखाद्या वर्षात हानी झाली असल्यास हे नुकसान आपण रिटर्नमधे सामील करून कॅपिटेल गेनशी जुळवू शकतो आणि या नुकसानीला आगामी वर्षातही कॅरीफॉरवर्ड करू शकतो. यानुसार आगामी ८ वर्षात आपण या नुकसानीला कधीही कॅपिटल गेसशी अॅडजस्ट म्हणजे समायोजन करू शकतो.

हेही वाचा: आशियातल्या पहिल्या स्टॉक एक्सचेंजचं ट्रेंडींग चक्क झाडाखाली व्हायचं

कर वाचवण्याचा खोटा प्रयत्न नकोच

यापूर्वीच्या आयटीआर फॉर्ममधे सिंगल कॉलममधे करमुक्त उत्पन्नाचे तपशील द्यावे लागत होते. आता नवीन फॉर्ममधे अनेक कॉलम असून त्यात कृषी उत्पन्न, लाभांश, लाँग टर्म कॅपिटल गेन अर्थात दीर्घ कालावधी मिळणारा भांडवली नफा यावर मिळणारी सवलत याची माहिती वेगळ्या कॉलममधे द्यावी लागेल.

आपल्याकडून होणारी सर्वसामान्य चूक म्हणजे रिटर्न भरण्यास होणारा विलंब. जर आपण ३१ जुलैनंतर रिटर्न भरले तर ५ हजारांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. आपण ३१ डिसेंबरपर्यंतही रिटर्न भरू शकला नाही तर दहा हजार रुपयांचा देखील दंड होऊ शकतो. प्राप्तिकर विवरणपत्र उशिरा दाखल केल्यास आणि टॅक्स रिफंडवर दावा करत असल्यास व्याजदेखील मिळवू शकणार नाहीत.

बऱ्याचदा कर वाचवण्यासाठी बनावट सवलतीचा आधार घेतात. खोटे दान दाखवून कर वाचवण्याचा प्रयत्न केला जातो. याशिवाय मुलाच्या शाळेच्या फिच्या नावावर खोट्या पावत्या, बनावट भाडे पावती, बिल, कर्जाची कागदपत्रं, बनावट गुंतवणूक पावत्या आदींचा उपयोग करत करसवलतीचा दावा केला जातो. जर आपण कोणत्याही प्रकारच्या बनावट पावत्या सादर केल्या असतील तर यावर प्राप्तिकर खात्याचे लक्ष आहे, हे लक्षात घ्यायला हवं. कदाचित यावरून कारवाईदेखील होऊ शकते.

हेही वाचा: येणार तर मोदीच हे कळाल्यावर उंचावलेला सेन्सेक्स खाली का गेला?

सर्व बँक खात्यांची माहिती द्यावी

जर आपण रिफंडसाठी दावा करत नसाल तरीही बँक खात्याची माहिती अचूक द्यावी. ई-फायलिंग करताना बँकेचे नाव, खात्याचा क्रमांक, आयएफएससी आणि एमआयसीआर कोड पुन्हा तपासून पाहावा. ही माहिती चांगल्या पद्धतीने भरावी.

आपण कधी कधी आपल्या सर्व खात्यांची माहिती देत नाहीत. असं करणं आपल्याला महागात पडू शकतं. कारण प्राप्तिकर विभागाकडे आपल्याकडे सर्व बँक खात्यांची माहिती असते. त्यामुळे रिटर्न भरताना सर्व खात्यांची माहिती देणं आवश्यक आहे.

हेही वाचा: मोदी सरकार प्रोत्साहन देत असलेली इलेक्ट्रिक कार आपणही घेऊ शकतो?

आयटीआर का भरावं?

प्राप्तिकर विभागाकडून आयटीआर फॉर्म निश्‍चित केले आहेत. आपण उत्पन्नाच्या आधारावर आयटीआरच्या फॉर्मची निवड करायला हवी. अन्यथा आयटीआर विभागाकडून संबंधित अर्ज अमान्य केला जाऊ शकतो.

फॉर्म दुरुस्तीसाठी प्राप्तिकर कायदा कलम १३९ (५) नुसार विवरणात संशोधन करण्याची सूचना दिली जाते. आयटीआरमधे होणार्‍या चुका या कलमानुसार दुरुस्त करता येतात. परंतु चूक दुरुस्त नाही केली तर दंडही भरावा लागतो. अशा स्थितीत फॉर्मवर केलेला उल्लेख काळजीपूर्वक वाचा. आपल्यापैकी बरीच मंडळी पहिल्यांदाच रिटर्न भरत असतील तर जास्त सजग राहिलं पाहिजे. रिटर्न भरणार्‍या व्यक्तीचे मार्गदर्शन घेऊन आयटीआर दाखल करावं.

जर आपले उत्पन्न कराच्या स्लॅबमधे येत नसेल तर रिटर्न भरायचे कशाला? अशी साधारण मानसिकता असते. मात्र रिटर्न भरले नाही तर भविष्यात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कर्ज घेणं, व्हिसासाठी अर्ज भरणं, वाहन खरेदी यासाठी आयटीआरची गरज असते. त्यामुळे आयटीआर अवश्य भरा. यामुळे भविष्यात फायदाच होईल.

हेही वाचा: 

टीम इंडियाला यशाचा टीळा लावणारे रवी शास्त्री मैदानावर आल्यावर गो बॅकचे नारे लागायचे

वाफाळलेले दिवसः वयात येणाऱ्या पाल्यांसोबत पालकांनी बघावा असा अभिवाचनाचा प्रयोग

बॉटलबंद फ्रूट ज्यूस पिणं खरंच हेल्दी आहे की तब्येतीची वाट लागते?

(साभार दै. पुढारी)