बर्नार्ड अरनॉल्ट : एका टॅक्सी ड्रायवरनं घडवलेला अब्जाधीश

१९ डिसेंबर २०२२

वाचन वेळ : ५ मिनिटं


फोर्ब्सने जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी नुकतीच जाहीर केलीय. यात टेस्ला आणि ट्विटरचे मालक एलन मस्क यांना धोबीपछाड देत फ्रान्सचे उद्योगपती बर्नार्ड अरनॉल्ट पहिल्या क्रमांकावर आलेत. वडलांच्या कन्स्ट्रक्शन कंपनीतून त्यांनी कामाला सुरवात केली होती. पुढे एका टॅक्सी ड्रायवरकडून मिळालेल्या प्रेरणेतून त्यांची फॅशन उद्योगात एण्ट्री झाली. अरनॉल्टना आधुनिक लक्झरी फॅशन उद्योगाचे गॉडफादर म्हटलं जातं.

वेगवेगळ्या लक्झरी वस्तूंचं आपल्याला भारी आकर्षण असतं. घड्याळ, हँडबॅगपासून ते अगदी चष्मा, परफ्यूमपर्यंत लक्झरी ब्रँडच्या वस्तू आपलं स्टेटस सिम्बॉल बनल्यात. 'लुई विटॉन मोएट हेनेसी' अर्थात एलवीएमएच ही जगातली लक्झरी ब्रँडमधली सगळ्यात मोठी कंपनी. याच कंपनीचे सीईओ आणि उद्योगपती असलेल्या बर्नार्ड अरनॉल्ट जगातल्या श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिला नंबर पटकावलाय. त्यांनी टेस्ला, स्पेसएक्स आणि ट्विटरचे बॉस असलेल्या एलन मस्क यांनाही मागे टाकलंय.

वडलांच्या कंपनीत नोकरी

मुळात गुंतवणूकदार आणि व्यावसायिक असलेल्या बर्नार्ड अरनॉल्ट यांचा जन्म १९४९ला फ्रान्सच्या रुबे शहरात झाला. त्यांचं सुरवातीचं शिक्षणही रुबे इथंच झालं. आईवडील दोघेही उद्योग-व्यवसायात होते. मास्टर्सपर्यंतचं शिक्षण घेतलेल्या अरनॉल्ट यांच्या वडलांची फेरेट सॅविनेल नावाची स्वतःची कन्स्ट्रक्शन कंपनी होती.

कुटुंब व्यवसायात असल्यामुळे पुढे काय करायचं याबद्दलची स्पष्टता होती. त्यामुळेच १९७१ला अरनॉल्टनी फ्रान्समधली इंजिनिअरिंगसाठी अग्रगण्य संस्था असलेल्या इकोले पॉलिटेक्निकमधून डिग्री घेतली. पुढं वडलांच्याच 'फेरेट सॅविनेल' या कन्स्ट्रक्शन कंपनीत इंजिनिअर म्हणून काम करायला सुरवात केली. हीच त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीची पहिली सुरवात होती.

दरम्यानच्या काळात त्यांनी आपल्या वडलांना रिअल इस्टेटचं महत्व पटवून दिलं. त्यात गुंतवणूक करण्यासाठी एक प्लॅनही तयार केला. त्यासाठी जॉर्ज वी ग्रुपची स्थापना केली. १९७८मधे फेरेट सॅविनेल कंपनीच्या चेअरमनपदाची जबाबदारी बर्नार्ड यांच्याकडे आली. त्याआधी त्यांनी कंपनीत वेगवेगळ्या हुद्यांवर काम केलं होतं. त्यामुळेच कंपनीची धुरा हाती आल्यावर त्यांनी उद्योग-व्यवसायाला एक वेगळा आकार दिला.

हेही वाचा: २६ व्या वर्षी सर्वांत तरुण अब्जाधीश बनणाऱ्या रितेशची भन्नाट कहाणी

टॅक्सी ड्रायवरनं दिली प्रेरणा

याच काळात वेगवेगळ्या कंपन्यांमधे बर्नार्ड यांनी गुंतवणूक चालू ठेवली. त्यावेळी 'बुसॅक सेंट फ्ररेस' हा कापड उद्योगातला मोठा ब्रँड होता. १९८४च्या दरम्यान हा ब्रँड दिवाळखोरीत आला. फ्रान्सचे प्रसिद्ध लक्झरी डिझायनर ख्रिश्चन डायर यांचा हा ब्रँड होता. बर्नार्ड यांनी संधी हेरत ही कापड उद्योग कंपनी विकत घेतली. त्यातल्या ९ हजार कर्मचाऱ्यांना बाहेर काढलं. पुढे याच ब्रँडच्या मदतीने त्यांनी लक्झरी वस्तूंच्या क्षेत्रात एण्ट्री केली.

एकदा बर्नार्ड न्यूयॉर्कमधे होते. शहर फिरत असताना त्यांची गाठ एका टॅक्सी ड्रायवरशी पडली. त्यांच्यात हलकंफुलकं बोलणं सुरू झालं. त्यावेळी बर्नार्ड यांनी त्या ड्रायवरला सहजच एक प्रश्न विचारला. 'तुला फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष माहिती आहेत का?' त्यानं उत्तर दिलं, 'नाही. पण मी ख्रिश्चन डायर यांना ओळखतो.' या  छोट्या  प्रसंगातून डायर आणि त्यांचा ब्रँड जगात किती प्रसिद्ध होता याची कल्पना येते. फोर्ब्स मॅगझीनच्या एका लेखात या प्रसंगाचा उल्लेख केलाय.

या एका प्रसंगानं अरनॉल्ट यांना एका जागतिक ब्रँडचं महत्व सांगितलं. एखादा ब्रँड सर्वसामान्य लोकांवर कशी छाप पाडू शकतो याची प्रचिती त्या टॅक्सी ड्रायवरसोबतच्या बोलण्यातून अरनॉल्ट यांना झाली होती. त्यातून त्यांना प्रेरणा मिळाली. आणि पुढं एक खूप मोठा ब्रँड उभा राहिला.

लक्झरी ब्रँडचे सर्वेसर्वा

'डायर' हा ब्रँड विकत घेतल्यावर त्यांचं लक्ष डायरच्याच परफ्यूमकडे गेलं. त्यावेळी लक्झरी वस्तूंच्या क्षेत्रातल्या कंपन्या 'लुई विटॉन' आणि 'मोएट हेनेसी' यांची चलती होती. त्यांनी डायरचा परफ्यूम ब्रँड विकत घेतला होता. यातल्या 'विटॉन' कंपनीत अरनॉल्ट यांची भागीदारी होती. पुढं या दोन्ही कंपन्या नावाने एकत्र आल्या. अरनॉल्ट यांनी १९८९ला एलवीएमएच म्हणून ओळखल्या जाणा-या या कंपनीचे सर्वाधिक शेअर विकत घेतले.

एलवीएमएचची रूपांतर एका मोठ्या ग्रुपमधे झालं. अरनॉल्ट यांची या कंपनीत ५० टक्के इतकी भागीदारी आहे. त्यांनी यात मोठ्या कंपन्यांनाही सामावून घेतलंय. एलवीएमएच हा उद्योग समूह आज ब्रँडेड परफ्यूम, शॅम्पेन, वाइन, चामड्याच्या वस्तू, घड्याळं, दागिने विकतो. आजची जगातली सगळ्यात मोठी लक्झरी वस्तूंची कंपनी म्हणूनही एलवीएमएचकडे पाहिलं जातंय. या कंपनीची जगभरातल्या ६८ देशांमधे ५,५०० स्टोअर्स असल्याचं त्यांच्या वेबसाईटवर वाचायला मिळतं.

एलवीएमएचसोबत आज जगातल्या ६० पेक्षा अधिक सहायक कंपन्या म्हणून काम करतायत. या कंपन्यांचे जवळपास ७५ लक्झरी ब्रँड आहेत. यात दागिन्यांमधला 'सिफोरा', 'टिफनी अँड कंपनी', 'बलगरी', सौंदर्य प्रसाधनांमधली 'डायर', घड्याळ बनवणारी 'टॅग हेयर', हँडबॅगमधली 'फेंडी', चष्म्यासाठी असलेला 'मार्क जेकब' अशा जगप्रसिद्ध ब्रँडचा समावेश आहे.

हेही वाचा: ELSS फंड्सला करबचतीचा सर्वोत्तम पर्याय असं का म्हणतात?

कलेच्या श्रीमंतीचं दर्शन

फॅशन उद्योगाचे गॉडफादर समजले जाणारे अरनॉल्ट कलेचे चाहते म्हणूनही जगभरात ओळखले जातात. त्यांच्या कलासंग्रहात प्रसिद्ध चित्रकार पिकासो, अमेरिकन चित्रकार अँडी वॉरहोल, फ्रेंच चित्रकार यवेस क्लेन, तत्वज्ञ हेन्री मूर यांच्या कलाकृती आणि आधुनिक, समकालीन चित्रांचा समावेश आहे. इतक्यावरच ते थांबलेले नाहीत. तर या कलेला पुढं घेऊन जाण्यासाठी त्यांनी पावलंही उचलली.

फ्रान्समधल्या कलेला, कलाकारांना प्रोत्साहन देण्यात अरनॉल्ट यांचा मोठा वाटा आहे. एलवीएमएचच्या माध्यमातून फ्रान्समधल्या वेगवेगळ्या कला शाळांमधे त्यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धा भरवल्या. फॅशन डिझायनरना कला जोपासण्यासाठी अनुदान दिलं. कला निर्मिती आणि समकालीन कलेला समर्पित एका प्रकल्पासाठी म्हणून त्यांनी पॅरिसमधे एक इमारत उभी केलीय. त्यातून त्यांच्या मनात कलेबद्दल असलेल्या आपुलकीचं दर्शन घडतं.

एलन मस्कला मागे टाकलंय

१९९९मधे अरनॉल्ट पहिल्यांदा फॅशन क्षेत्रातली सगळ्यात श्रीमंत व्यक्ती बनले होते. त्यानंतर २०१९ला त्यांची संपत्ती १०० बिलियन डॉलरवर पोचली. त्यावेळी अमेझॉनचे संस्थापक आणि सीईओ जेफ बेझोस आणि मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स हे दोघंच या स्पर्धेत होते. जुलै २०१९ला अरनॉल्ट जगातली दुसरी सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले. डिसेंबर २०१९ला त्यांनी श्रीमंतीमधे जेफ बेझोस यांनाही मागे टाकलं होतं.

जानेवारी २०२१ला अमेरिकेतली दागिने बनवणारी 'टिफनी अँड कंपनी' विकत घेतली. महत्वाचं म्हणजे १५.८ बिलियन डॉलरला खरेदी केलेली ही कंपनी एलवीएमएचचा आजपर्यंतचा सगळ्यात मोठा करार समजला जातोय. अरनॉल्ट यांची चार मुलं एलवीएमएचचा कारभार पाहतायत. त्यांच्या कुटुंबाकडेही एलवीएमएचचं मोठं भागभांडवल आहे. असं सगळं असलं तरी ७३ वर्षांचे अरनॉल्ट कंपनीकडे जातीने लक्ष देतात. कर्मचाऱ्यांशी स्वतः संवादही साधतात.

कोरोना साथीचा फटका अरनॉल्ट यांनाही बसला होता. त्यामुळे मधल्या काळात त्यांची काही प्रमाणात पीछेहाट झाली होती. पण मे २०२१ला ते पुन्हा श्रीमंत व्यक्तींच्या यादीत झळकले. आता पुन्हा टेस्ला आणि ट्विटरचे सर्वेसर्वा एलन मस्कना मागे टाकत १८८.६ बिलियन डॉलर इतक्या संपत्तीनं अरनॉल्ट जगातले सगळ्यात श्रीमंत व्यक्ती बनलेत.

हेही वाचा: 

'बर्ड फ्लू'से डरने का नय!

ब्रेन ड्रेनपेक्षा विघातक आहे वेल्थ ड्रेन!

पाकिस्तानातल्या अस्थिरतेचं कारण काय?

शपथ घेतल्यानंतरही सोपा नसेल जो बायडन यांचा प्रवास

इंटरनेटच्या समुद्रात गळ टाकून बसलेल्या हॅकर्सचं काय करायचं?