दिल्ली निवडणूक जाहीरः नरेंद्र मोदी नाही तर केजरीवालांभोवती फिरणार प्रचार

०७ जानेवारी २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


निवडणूक आयोगाने आज दिल्ली विधानसभेची निवडणूक जाहीर केलीय. येत्या ८ फेब्रुवारीला होणार मतदानात दिल्लीकर आपल्या नेत्याचं भविष्य ठरवणार आहेत. लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्लेल्या सत्ताधारी आम आदमी पार्टीपुढे आपली सत्ता कायम राखण्याचं आव्हान आहे. दुसरीकडे भाजपही २१ वर्षांनी पुन्हा सत्तेत येण्यासाठी तयार आहे.

२०१९ हे भारतासाठी निवडणूक वर्ष होतं. आता नव्या वर्षाचा सहावा दिवस सुरू असतानाच दिल्ली विधानसभेची निवडणूक जाहीर झालीय. ही यंदाची पहिली निवडणूक आहे. सर्व जागांसाठी एकाच टप्प्यात ८ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. ११ फेब्रुवारीला मतमोजणी होईल. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ जानेवारीला नोटिफिकेशन जारी होणार असून उमेदवारी भरण्यासाठी २१ जानेवारीपर्यंत मुदत आहे. २२ तारखेला अर्जांची छाननी, तर २४ तारखेला माघार घेता येईल.

एकूण ७० जागांमधे १२ जागा अनुसुचित प्रवर्गासाठी राखीव आहेत. एक कोटी ४६ लाख ९२ हजार १३६ मतदारांमधे ८० लाख ५५ हजार पुरुष तर ६६ लाख ३५ हजार महिला मतदार आहेत. सध्याच्या दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ २२ फेब्रुवारी २०२० पर्यंत आहे. म्हणजे २२ तारखेपर्यंत दिल्लीत सरकार बनवावं लागणार आहे.

हेही वाचाः पाकिस्तानी सत्तेला ‘हम देखेंगे’ म्हणणारं गाणं हिंदूविरोधी का ठरवलं जातंय?

तिहेरी लढत रंगणार

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वातल्या आम आदमी पार्टी अर्थात आपची सत्ता असलेल्या दिल्लीत यंदा तिहेरी लढतीची शक्यता आहे. आम आदमी पार्टी, भाजप आणि काँग्रेस यांच्यात हा मुकाबला होणार आहे. ७० जागा असलेल्या विधानसभेत ३६ हा बहुमताचा आकडा आहे. गेल्यावेळी २०१५ मधे नवख्या आपने ७० पैकी ६७ जागा जिंकून विक्रमच केला होता. आठेक महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीत ‘आप’ला धोबीपछाड देणाऱ्या भाजपला तीन जागांवरच समाधान मानावं लागलं. काँग्रेसला तर भोपळाही फोडता आला नव्हता.

असं असलं तरी गेल्या पाच वर्षांत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळवत विरोधी पक्षांच्या मुद्द्यांतली हवाच काढून घेतली. दिल्लीतल्या सातही जागांवर एकहाती विजय मिळवला. भाजपला दिल्लीत ५६.५८ टक्के मतं मिळाली. गेल्यावेळच्या तुलनेत भाजपच्या मतांमधे १०.१८ टक्के इतकी घसघशीत वाढ झाली.

माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या नेतृत्वात दिल्लीचा किल्ला लढवणाऱ्या काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही. तरी काँग्रेसच्या एकूण मतं ७.३६ टक्क्यांनी वाढून २२.४६ टक्क्यांवर पोचली. पाच जागांवर काँग्रेस उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिला. दीक्षित यांचं जुलैमधे निधन झालं. दिल्लीच्या राजकारणात मोठं फेस वॅल्यू असलेल्या दीक्षित यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच निवडणूक होतेय. दुसरीकडे आपचं मताधिक्य १४.९ टक्क्यांनी घटून १८ टक्क्यांवर आलं. आपच्या उमेदवारांना दोन जागांवर आघाडी मिळाली. राज्यात सत्तेवर असलेली आम आदमी पार्टी तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली.

हेही वाचाः किती भाषा मारल्या याचीही यूएन मानवाधिकार संस्थेने नोंद करावीः भालचंद्र नेमाडे

भाजपची प्रतिष्ठा पणाला

भाजपला लोकसभेत दणदणीत यश मिळालं असलं तरी विधानसभेच्या रिंगणात मानहानीकारक पराभवाचं तोंड बघावं लागलंय. गेल्या दीडेक वर्षांत मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड आणि महाराष्ट्र या पाच राज्यांतून भाजपची सत्ता गेलीय. त्यामुळे भाजपला काही करून दिल्लीत बाजी मारावी लागणार आहे. इथे पराभव झाला तर त्याचा भाजपच्या भविष्यातल्या कामगिरीवर खूप वाईट परिणाम होईल. कारण काही महिन्यांतच बिहार आणि पश्चिम बंगाल या महत्त्वांच्या राज्यांमधे निवडणूक आहे.

तसंच भाजप गेल्या २१ वर्षांपासून दिल्लीच्या सत्तेपासून दूर आहे. त्यामुळे यंदा दिल्ली जिंकण्यासाठी भाजपने सारी शक्ती पणाला लावलीय. गेल्या काही काळात केंद्र सरकारने दिल्लीसाठी अनेक घोषणा जाहीर केल्यात. झोपडपट्टी पुनर्वसन योजना जाहीर केलीय. पण मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घेऊन निवडणूक लढवणाऱ्या भाजपकडे दिल्ली जिंकून देईल असा एकही स्थानिक चेहरा नाही. त्यामुळे दिल्लीत भाजपने अनेक चेहरे घेऊन निवडणूक लढवण्याचं ठरवलंय. प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवण्याचा केंद्रीय मंत्री हरदीप सिंग सुरी यांचा निर्णयही काही तासांमधेच मागं घेण्यात आला.

आता दिल्लीचं नेतृत्व भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खांद्यावर टाकलंय. भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी आजच एक ट्विट टाकून मोदींच्या नेतृत्वाच आपण दिल्ली निवडणुकीला सामोरं जाणार असल्याचं जाहीर केलंय. ते म्हणाले, ‘मला विश्वास वाटतो की लोकशाहीच्या या महापर्वात दिल्लीची जनता त्यांची पाच वर्ष दिशाभूल करणारे आणि खोटी आश्वासनं देणाऱ्यांचा पराभव करेल. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात दिल्लीची जनतेच्या आकांक्षा पूर्ण करणारं सरकार बनवेल.’

हेही वाचाः तरुणांनो, आपण आईवडलांना वॉट्सअप युनिवर्सिटीतून बाहेर काढू शकतो?

काँग्रेसपुढे अस्तित्वाचा प्रश्न

सलग १५ वर्ष सत्तेवर राहणाऱ्या काँग्रेसला २०१३ मधे भ्रष्टाचारविरोधी आंदोलन आणि सरकारविरोधी वातावरणाचा मोठा फटका बसला. तत्कालीन मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचाही पराभव झाला. नवख्या आपने २९.५ टक्के मतं मिळवून सर्वाधिक २८ जागा जिंकल्या होत्या. भाजपला ३३ टक्के मतांसह २३, तर काँग्रेसला २४.६ टक्के मतांसह ८ जागांवर समाधान मानावं लागलं होतं.

२०१५ च्या निवडणुकीत तर काँग्रेसला भोपळाही फोडता आला नव्हता. २०१५ च्या विधानसभा निवडणुकीत आपला ५४.३ टक्के, भाजपला ३२.३ टक्के तर काँग्रेसला ९.७ टक्के मतं मिळाली होती. त्यामुळे यंदा काँग्रेसपुढे दिल्ली जिंकण्यापेक्षा आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्याचं संकट उभं आहे. यासोबतच पुन्हा आपला जनाधार मिळण्याचंही मोठं आव्हान आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला थोडा दिलासा मिळाला.

२०१४ च्या तुलनेत २०१९ मधे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या मताधिक्यात लक्षणीय वाढ झाली. पण आता काँग्रेसपुढे शीला दीक्षित यांच्यासारखा सर्वांना घेऊन चालणारा नेता नाही. सध्या दिल्ली काँग्रेस अक्षरशः लीडरलेस, फेसलेस आहे. दीक्षित यांच्यानंतर अनेक महिने काँग्रेसला आपला प्रदेशाध्यक्षही निवडता आला नव्हता. चर्चेत नसलेल्या सुभाष चोपडा यांना प्रदेशाध्यक्ष बनवण्यात आलंय.

निवडणूक जाहीर होऊन दोनेक तास उलटून गेल्यावरही काँग्रेसच्या एकाही मोठ्या नेत्याने किंवा काँग्रेस, दिल्ली काँग्रेस यांच्या ट्विटर हँडलवरून कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. यावरून काँग्रेस दिल्लीतल्या निवडणुकीविषयीच गांभीर्य लक्षात येतं.

हेही वाचाः घरी येणाऱ्या भाजपवाल्यांना नागरिकत्व कायद्याबद्दल हे २० प्रश्न विचारुया

आपचा लाखमोलाचा सवाल

भाजप स्थानिक चेहऱ्याच्या शोधात, तर काँग्रेस स्वतःच्या अस्तित्वाच्या शोधात आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस हे माझ्यापुढे पैलवानचं नसल्याचं सांगत होते. असंच काहीसं दिल्लीत अरविंद केजरीवाल हे दोन्ही विरोधी पक्षांना तुमचा नेता कोण विचारण्याच्या मूडमधे आहेत. त्यामुळे दिल्लीचा किल्ला कोण जिंकणार, हरणार यापेक्षा केजरीवालांविरोधात कोण हा यंदाच्या निवडणुकीतला लाखमोलाचा सवाल झालाय.

भाजपने मोदींच्या नेतृत्वातच निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केलाय. पण केजरीवाल यांनी निवडणूक जाहीर झाल्यावर मोदींशी पंगा न घेता ‘ये चुनाव काम पर होगा’ असं ट्विट टाकून आपला इरादा स्पष्ट केलाय. प्रचारात टीका करण्यापेक्षा आपला भर विकासाचे मुद्दे लावून धरण्यावरच असणार असल्याचं स्पष्ट केलंय. ‘अच्छे बीते पांच साल, लगे रहो केजरीवाल’ असा नारा दिलाय.

लोकसभेत तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेलेल्या आपची आता विधानसभा निवडणुकीत चांगली परिस्थिती आहे. मोफत पाणी, वीजबिलातल्या सवलताचा सर्वसामान्य मतदारांवर प्रभाव आहे. तसंच आरोग्य, शालेय शिक्षण क्षेत्रातलं आपचं मॉडेलही खूप गाजलं. आणि केजरीवालांच्या नेतृत्वात आपने आपली ही कामंही लोकांपर्यंत खूप चांगल्या पद्धतीने पोचवलीत.

आज संध्याकाळी आलेल्या एबीपी न्यूज आणि सी वोटरच्या ओपिनियन पोलमधेही आपचा बोलबाला दिसला. या पोलनुसार, आपला ५३ टक्के मतांसह आपला ५९ जागा, २६ टक्के मतांसह भाजपला ८ तर पाच टक्के मतं घेत काँग्रेसला ३ जागा मिळू शकतात.

हेही वाचाः 

रात्रीस खेळ चालेः शेवंता हॉट म्हणून बदलला प्लॉट?

अपघाताने जन्माला आलेल्या वनडे क्रिकेटची आज पन्नाशी 

भाजपला हरवणारे हेमंत सोरेन हे झारखंडचे उद्धव ठाकरे!

लोकसभा सदस्यांची संख्या वाढवून प्रतिनिधित्व मिळणार की वाद होणार?