डॉ. प्रमोद सावंत आहेत कोण आणि ते कसे बनले गोव्याचे मुख्यमंत्री?

२० मार्च २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


दोन वर्षांपूर्वी प्रमोद सावंतांना साधं मंत्रिपदही दिलं गेलं नव्हतं. तुम्ही मुख्यमंत्री बनाल, असं प्रमोद सावंतांना वर्षभरापूर्वी कुणी सांगितलं असतं, तर त्यांनीही विश्वास ठेवला नसता. पण आता अचानक विधानसभेचे अध्यक्ष असणारे प्रमोद सावंत मनोहर पर्रीकरांचे वारसदार म्हणून गोव्याचे नवे मुख्यमंत्री बनलेत.

रात्री पावणेदोन वाजता ही काही शपथविधीही वेळ नसते. पण डॉ. प्रमोद सावंत आणि त्यांच्या अकरा सहकाऱ्यांनी दोना पावलाच्या राजभवनाता घोर मध्यरात्रीच मंत्रीपदाची शपथ घेतली. मनोहर पर्रीकरांची जागा घेण्यास गोव्यातले धुरंधर राजकारणी उत्सुक असतानाही केवळ दुसऱ्यांदा आमदार बनलेले प्रमोद सावंत मुख्यमंत्री बनले.

विश्वजीत राणे प्रमुख दावेदार, पण

पर्रीकरांचा आजार बळावल्यानंतर विश्वजीत राणे यांच्या नावाची चर्चा सर्वाधिक होती. विश्वजीत हे गोव्याचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री असणाऱ्या प्रतापसिंह राणे यांचे पुत्र आणि राजकीय वारसदार. सिनियर राणे हे पर्रीकरांचे राजकीय गुरू मानले जातात. दिल्लीहून गोव्यात परतल्यानंतर पर्रीकरांनीच विश्वजीतना काँग्रेसचा राजीनामा द्यायला लावून भाजपात आणलं. मंत्री बनवून हवी ती खातीही दिली.

विश्वजीत यांनी याआधीही मंत्रिपदाचा अनुभव आहे. सत्तरी आणि सभोवतालच्या परिसरावर त्यांचं राजकीय वर्चस्व आहे. ते सर्व पक्षातल्या असंतुष्टांशी संपर्कात असतात, अशी ख्याती आहे. शिवाय त्यांनी काँग्रेसमधले सुभाष शिरोडकर आणि दिलीप सोपटे हे दोन आमदार फोडून भाजपमधे आणलेत. त्यानंतर तर दिल्लीच्या सांगण्यावरून विश्वजीत मुख्यमंत्री बनणारच, असं वातावरण झालं होतं.

उपमुख्यमंत्रीपदावर मानलं समाधान

पण त्या आमदारांच्या भाजपप्रवेशामुळे नाराज झालेले भाजप आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे निष्ठावान नाराज झाले. पाठोपाठ राफेलवरून झालेलं वादग्रस्त फोन रेकॉर्डिंग गाजलं. त्याची चौकशी वगैरे झाली नाही. पण त्यात विश्वजीत यांचाच आवाज असल्याचं उघड होतं. त्यामुळे त्यांच्या भाजपमधल्या गोव्यातल्या आणि दिल्लीतल्या विश्वासार्हतेला कायमचा फटका बसला.

हेही वाचाः गोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं

मंत्रिमंडळातले सर्वाधिक अनुभवी असणारे मगोपचे सर्वेसर्वा सुदिन ढवळीकरही स्पर्धेत होतेच. त्यांची इच्छा खूप होती. पण त्यांचे दोन सहकारीच भाजपमधे जातील अशी परिस्थिती निर्माण झाली होती. सुदिपच आपला पूर्ण पक्ष घेऊन भाजपमधे गेले असते, तर ते मुख्यमंत्री बनण्याची शक्यता होती. गोवा फॉरवर्डचे प्रमुख विजय सरदेसाई इच्छुक असूनही शांत राहिले. आपला प्रभाव वाढावा, इतक्यापुरतंच त्यांनी आपलं दबावतंत्र वापरलं. त्यामुळे दोघांनीही उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानलं.

सावंत तर नेहरू युवा केंद्राचे प्रोडक्ट

गोव्यात संघाची पार्श्वभूमी असलेले भाजपचे एकमेव आमदार म्हणून प्रमोद सावंत यांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली, असं लोकसत्ताच्या बातमीत म्हटलंय. खरं तर त्यांच्यापेक्षा संघाशी अधिक जोडलेले आमदार डिचोलीचे राजेश पाटणेकर होते. पण याच पाटणेकरांनी पक्षांतर्गत गटबाजीला कंटाळून काही वर्षांपूर्वी भाजप सोडली होती आणि काँग्रेसमधे गेले होते. या दोघांव्यतिरिक्त सध्या भाजपचा एकही आमदार संघाचा सोडाच पण भाजपची पार्श्वभूमी असलेला नाही.

प्रमोद सावंतांचा संघाशी संबंध आला तो भाजपमधे प्रवेश केल्यानंतर. त्याआधी मात्र त्यांना इतर आमदारांसारखी काँग्रेस किंवा मगोची पार्श्वभूमी नव्हती. त्यांनी नेहरू युवा केंद्रातून सामाजिक कामांना सुरवात केल्याचं गोवन वार्ता या वर्तमानपत्राने दिलेल्या बातमीत म्हटलंय.

हेही वाचाः मनोहर पर्रीकरः शून्यातून विश्व उभं करणारा नेता

`सावंतांनी १९९४-९५ च्या दरम्यान त्यांच्या कोठंबी या गावातल्या सामाजिक कामांत झोकून दिलं. १९९६ साली ते साई स्पोर्ट्स क्लब या गावातल्या संस्थेचे अध्यक्ष झाले. त्याच वर्षी नेहरू युवा केंद्राने नार्वे येथे आयोजित केलेल्या युवा नेतृत्व प्रशिक्षण शिबिरात त्यांनी भाग घेतला. तसंच शिबिर त्यांनी गावातही भरवलं. त्यामुळे १९९८ मधे त्यांना नेहरू युवा केंद्राचा जिल्हा युवा पुरस्कार मिळाला.`

भाजपमधे येताच संघाशी जवळीक

मात्र प्रमोद सावंत यांचे वडील पांडुरंग सावंत मात्र भाजपशी संबंधित होते. ते एकेकाळी पाळी मतदारसंघातून जिल्हा पंचायत सदस्य होते. ते मनोहर पर्रीकरांचे फॅन. त्यामुळे पर्रीकरांचं तरुण प्रमोद सावंतांकडे लक्ष गेलं. त्यांनी मग काँग्रेस आणि भाजपच्याही प्रस्थापित स्थानिक नेतृत्वाला शह देण्यासाठी या धडपड्या तरुणाच्या डोक्यावर हात ठेवला.

सावंत हुशार होतेच. त्यांनी भाजपच्या संस्कृतीशी जुळवून घेतलं. संघाचा गणवेश घालून ते भाजपमधे रुळले. भाजपच्या संघटनेत जुंपून घेतलं. राज्याच्या भारतीय जनता युवा मोर्चाचे ते अनेक वर्षं अध्यक्ष होते. त्यांना राष्ट्रीय पातळीवरही युवा मोर्चाचा उपाध्यक्ष बनवलं. २०१२ला त्यांना आमदारकीची तिकीट मिळाली. काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात त्यांनी यश मिळवलं. २०१७ला बाकीचे बडे बडे आमदार पडत असताना त्यांनी पुन्हा यश मिळवलं. तो त्यांच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरला.

१५ ऑगस्टच्या भाषणातून संकेत

२०१७ला प्रमोद सावंतांकडे गोवा विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी आली. कारण भाजपकडे दुसरा विश्वासार्ह नेता नव्हता. त्यांचं मंत्रिपद हुकलं, पण ते राज्यातल्या नेत्यांच्या पहिल्या फळीत जाऊन पोचले. मुख्यमंत्री पर्रीकर फेब्रुवारी २०१८ला आजारी पडले. पुढच्या काही महिन्यांतच त्यांचा आजार गंभीर असल्याचं स्पष्ट झालं.

मुख्यमंत्री असलेल्या पर्रीकरांना १५ ऑगस्टचं मुख्यमंत्रीपदाचं भाषण करणं शक्य नव्हतं. तेव्हा त्यांनी तो मान दुसऱ्या पक्षातल्या किंवा दुसऱ्या पक्षातून आलेल्या नेत्यांना न देता प्रमोद सावंतांकडे दिला. त्यानंतर सावंतांकडे मुख्यमंत्रीपदाचा दावेदार म्हणून पाहिलं जाऊ लागलं.

हेही वाचाः जालन्यात रावसाहेब दानवे पुन्हा ‘चकवा’ देणार की खाणार?

प्रमोद सावंत उच्चविद्याविभूषित आहेत. कोल्हापुरात शिकलेले आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. त्यांचं वय अवघं ४५ इतकं आहे. ते स्वभावाने नम्र आहेत. पण त्याचवेळेस ते प्रशासक म्हणूनही चांगले आहेत. पक्षाशी ते एकनिष्ठ आहेत. त्यांचं संपूर्ण कुटुंबच पक्षाशी जोडलेलं आहे. त्यांच्यावर कोणतेही आरोप आजवर झालेले नाहीत. सर्वसमावेशक आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारं नेतृत्व म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातंय.

या सगळ्या गुणांमुळे मुख्यमंत्रिपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडलीय. त्यात त्यांचं जातीने मराठा असणंही राजकीय गणितांत फायद्याचं ठरलंय. ज्या पर्रीकरांनी त्यांना राजकारणात आणलं, त्याच पर्रीकरांचे ते वारसदार बनलेत. त्यांच्या पावलांवर पावलं टाकत ते चालू शकले, तरच ते यशस्वी होऊ शकतील.