पाऊस, पूर आणि दरडींना जबाबदार कोण?

२३ जुलै २०२१

वाचन वेळ : ४ मिनिटं


गेल्या तीन ते चार दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाची मालिका सुरू आहे. सततच्या पावसाने नद्यांना पूर आलेत, कुठे घरं कोसळतायत, कुठे दरड पडतेय तर कुठे जमीन खचतेय. निसर्गानं अचानक असा तांडव का सुरू केलाय? त्यामागचं नेमकं कारण काय? याबद्दलचा एक वीडियो पर्यावरणतज्ञ  आणि पत्रकार अभिजित घोरपडे यांनी त्यांच्या 'भवताल' या युट्यूब चॅनेलवर टाकलाय. या वीडियोचं हे शब्दांकन.

सगळीकडे पाऊस पडतोय. ठिकठिकाणी दरड कोसळतेय. पूर आलेत. याचा नेमका अर्थ काय? हे सगळं कशामुळे घडतंय? पावसामुळे का माणसामुळे?  याच्याबद्दल अनेकांशी बोलतोय. लोकं त्यांच्या त्यांच्या परीनं कारणं सांगतायत. अर्थातच, त्यांच्या अनुभवानुसार. पण पुण्यात एक शहाणा भेटला. 

म्हणाला, पावसानं जाम वैताग आणलाय. तिकडं शेतावर, धरणावर पडावं ना इथं आमच्या शहरामधे रस्त्यावर तुझं काय काम आहे? आता काय बोलणार?  पुण्यात भेटला म्हणून आता त्याला ‘पुणेरी शहाणा’ म्हणतो. पण असे नग जागोजागी भेटतात. पण या निमित्तानं आपण पावसाबद्दल आणि पुराच्या परिस्थितीबद्दल बोलुयात.

हेही वाचा: वेळेत उपाय केले नाही तर पुण्याची मुंबई होईल

दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस

खरंतर महाराष्ट्रात विशेषतः कोकण घाटात आणि दक्षिण महाराष्ट्रात प्रचंड पाऊस कोसळतोय. २४ तासांत धरणाच्या क्षेत्रात इतका पाऊस पडलाय की कोल्हापूरमधलं राधानगरी धरण, सांगलीतलं वारणा, साताऱ्यातलं कोयना या तिनही धरणांच्या क्षेत्रात २४ तासांत ६२४ मिलीमीटरच्या आसपास पाऊस झालाय. इकडं पुणे जिल्हा आणि रायगड जिल्हा यांच्या सीमेवरचा तामिणी घाट. तिथंही जवळजवळ ५०० ते ५२५ मिलीमीटर पाऊस पडलाय.

कोल्हापूर जिल्ह्यातच राधानगरी जवळ तुळशी धरणांच्या क्षेत्रात तर तब्बल ८९५ मिलीमीटर पाऊस पडला, असं जलसंपदा विभागानं जाहीर केलंय. ८९५ मिलीमीटर म्हणजे ३५ इंच पाऊस फक्त २४ तासात! हे खरं असेल तर महाराष्ट्रातला हा दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस असेल. मुंबईत २६ जुलै २००५ ला ९४१ मिलीमीटरच्या पावसानंतर हाच. इतका पाऊस पडत असेल तर का पूर येणारच आणि दरडी कोसळणारच की!

पण यामागे फक्त पाऊस पडणं इतका मोठा पाऊस पडणं हे एकमेव कारण आहे का?  मला वाटतं आपण याच्या पलीकडे बघायला पाहिजे. खरं सांगा, नदीच्या पात्रांमधे आपण जर अतिक्रमणं केलीयत, हो की नाही? ओढे-नाले बुजवलेत, डोंगरांवर रस्त्याच्या निमित्ताने डोंगर फोडलेत, कसेही सुरुंग लावलेत. तर या घटना घडणार नाहीत का?  त्यामुळे पावसाकडे बोट दाखवण्यापूर्वी आपण काय करतोय याच्याकडे पाहायला हवं.

हव्यासापोटी जिओलॉजी धोक्यात 

सुरवातीला आपण नद्यांबद्दल बोलुयात. नदी फक्त वाहणारा पाण्याचा प्रवाह नसतो. तिला अनेक ओढे, नाले येऊन मिळतात. त्यातून निर्माण होणारी व्यवस्था असते. आपण काय केलंय? आपण ही व्यवस्थाच कोलमडून टाकली. म्हणजे आपण ओढे, नाले बुझवले. आपण नदीच्या पात्रात शिरलो.

नदीचं एक गाळाचं मैदान असतं. पूर येतो तेव्हा नदी दोन्ही बाजूनी पसरते. लांबपर्यंत पसरते. आपण तिच्या गाळाच्या मैदानात जाऊन तिथंच तिथंच घर बांधली, बांधकाम केलं आणि नंतर ओरडायला लागलो की आमच्या घरात नदी शिरली. तर हे कसं चालेल?

डोंगराबद्दल, प्लॉट पाडण्याच्या आणि रस्ते पाडण्याच्या नावाखाली आपण कसेही डोंगर फोडले, टेकड्या फोडल्या. सगळं सपाट करण्याच्या नादात कसेही सुरुंग लावले. त्याच्यामागची जिओलॉजी लक्षात घेतली नाही. तिथली भूरचना कसली हे बघितलं नाही आणि वाटेल तसे डोंगर फोडत सुटलो. तर नंतर दरडी कोसळल्या, माती खाली आली आणि आमचं नुकसान झालं यासाठी आपण त्या डोंगराला आणि पावसाला जबाबदार धरणार का?

हेही वाचा: पुरामुळे वाहन खराब झाल्यास बेसिक विमा काही कामाचा नाही

थांबेल का हवामान बदल?

आता पावसाबद्दल पण बोलुयात. नेहमीपेक्षा जास्त पाऊस पडलाय का? तर हो. पण असा जास्त पाऊस या आधी झाला नाही का?  समजा नसेल झाला तर आपण काय करणार? आपण पाऊस थांबवू शकतो का? ते आपल्या हातात आहे का? अजिबात नाही.

त्यामुळे जे काही होतंय त्याला सामोरं जायला हवं. बदलत्या परिस्थितीत हे सगळं वातावरण बदलेल तेव्हाही तापमानात वाढ होईल, हवामान बदलेल. अतिवृष्टी, ढगफुटी, कमी वेळात जास्त पाऊस पडण्याच्या घटना असतीलच. त्या वारंवार घडतील. त्यांची तीव्रताही वाढणार आहे. हे सगळं आपण थोपवू शकत नाही.

हवामान बदल आपण थांबवायचं ठरवलं तरी फारसा उपयोग नाही. जगाने एकत्रित प्रयत्न केले तरीही ही गोष्ट पुढच्या वीस पंचवीस वर्षात थांबणारी नाही. संपूर्ण जगाने आज ठरवलं की, आम्ही जास्त कार्बन उत्सर्जन करणार नाही. तरीही हे सगळं थांबवण्यासाठी आपल्याला ६० ते १०० वर्ष लागतील.

आपल्या हातात काय आहे?

या होणाऱ्या बदलांना सामोरं जाणं आणि आपल्याकडून होणाऱ्या चुका कमी करणं एवढंच आपल्या हातात आहे. हे केलं तर याची तीव्रता आपण कमी करू. आपलं नुकसानही त्यामुळे कमी होऊ शकेल. यासाठी आपल्याला खरं शहाणपण घ्यावं लागेल.

नुसतंच पावसानं कुठं पडावं, किती पडावं, कसं पडावं याच्याबद्दल त्याला सल्ले देण्यापेक्षा किंवा अतिशहानपणाने बोलण्यापेक्षा पावसाशी जुळवून घेतलं, बदलत्या परिस्थितीत योग्य वागलो तर आपलं होणारं नुकसान आपण नक्कीच कमी करू शकू.  सध्या आपण याकडे लक्ष दिलं पाहिजे.

तिसरीकडे लक्ष नेऊन आता जे घडतंय ते हवामान बदलांमुळे होतंय तसंच पाऊस जास्त पडलाय इकडे जास्त लक्ष न देता आपण याला कसे सामोरे जाऊ शकू याकडे भर दिला तर आपण निश्चितपणे नुकसान कमी करू. आताच्या घडीला हेच गरजेचं आहे.

हेही वाचा: 

गेल्या दहा दिवसात पुराने कोल्हापूरला कसं वेढलं?

पीएमसी बँकेपुढे अडीच हजार कोटी रुपये उभे करण्याचं टार्गेट

हायडेगरला नाझीवादी म्हणून बाजूला सारणं आपल्याला परवडणारं नाही!

पावसाळ्यात पुण्या-मुंबईतल्या इमारती पत्त्याच्या डावासारख्या का कोसळतात?