दामदुप्पट परतावा देणारे सेक्टरल फंड कुणाच्या फायद्याचे?

०३ फेब्रुवारी २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर सेक्टरल फंड हे अत्युच्च जोखमीचे फंड म्हणून ओळखले जातात. त्यामुळेच सेक्टर फंडमधे गुंतवणुकीचा सल्‍ला देणारा गुंतवणूकतज्ज्ञ किंवा गुंतवणूक सल्‍लागार तुम्हाला क्‍वचितच भेटेल. कोणतंही सेक्टर दीर्घकाळ तेजीमधे राहील, याची खात्री देता येत नाही. पण इथल्या गुंतवणुकीतून अगदी काही वर्षांत पैसा दामदुप्पट होतो. पण ही गुंतवणूक काही येरागबाळ्याचा खेळ नाही.

भांडवल बाजाराची नियामक संस्था असलेल्या सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबीने इक्‍विटी फंडांचं वर्गीकरण केलंय. या वर्गीकरणाचा विचार करत असताना नवव्या क्रमांकावर दोन प्रकारच्या फंडांना एकाच वर्गवारीमधे समाविष्ट करण्यात आलंय. ते दोन फंड म्हणजे सेक्टर फंड्स आणि थिमेटिक फंड्स.

शेअर बाजारातले प्रमुख १० सेक्टर

खरं तर हे दोन्ही फंड एकाच प्रकारचे आहेत, असं वाटण्याचीच जास्त शक्यता आहे. पण या दोन्हींमधे एक मोठा फरक आहे. सेक्टरल फंड्स हे एकाच सेक्टरमधे गुंतवणूक करतात. दुसरीकडे थिमेटिक फंड्स हे एका थिमला अनुसरून विविध कंपन्यांमधे गुंतवणूक करतात. त्यामधे एकापेक्षा अनेक सेक्टरचा अंतर्भाव होऊ शकतो. कसं ते आपण आता पाहू!

सेबीच्या बंधनानुसार सेक्टरल फंडमधसी किमान ८० टक्के गुंतवणूक ही त्या सेक्टरशी संबंधित कंपन्यांच्या शेअर्समधेच झाली पाहिजे. शिवाय तो फंड कोणत्या सेक्टरवर आधारित आहे, याचाही स्पष्ट निर्देश संबंधित कंपनीला फंड बाजारात येण्याआधीच करावा लागतो. कारण हे बंधनकारक आहे. भारतीय स्टॉक मार्केटमधे जवळपास ४० सेक्टर्स आहेत. पण अगदी प्रमुख सेक्टर्सचाच विचार करायचा तर ती खालीलप्रमाणे आहेत.

१) बँकिंग अ‍ॅण्ड फायनान्स

२) मेटल्स

३) ऑटोमोबाईल्स

४) फार्मा, हेल्थकेअर

५) एफएमसीजी

६) आय.टी.

७) इन्फ्रा अ‍ॅण्ड रिअ‍ॅल्टी

८) सिमेंट

९) कन्झ्युमर ड्युरेबल्स

१०) अ‍ॅग्री

हेही वाचाः म्युच्युअल फंडातली गुंतवणूक काढून घेताना कोणती काळजी घ्यावी?

कोणतंही सेक्टर हमी देत नाही

सर्व अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपन्या वेळोवेळी वेगवेगळे सेक्टरल फंड सुरू करत असतात. कोणतंही सेक्टर हे ‘सदाबहार’ नसतं. सरकारच्या नियोजनातले फेरबदल, बाजाराची स्थिती, ग्राहकांचा कल, काही असंभाव्य गोष्टी या सर्वांमुळे सर्व सेक्टर्स खालीवर होत राहतात. अलीकडंचंच उदाहरण घ्यायचं, तर अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झाल्यापासून आयटी सेक्टरची अवस्था दोलायमान राहिलीय.

भारतातल्या बहुतेक आघाडीच्या आय.टी. कंपन्यांचा इन्कम सोर्स हा प्रामुख्याने अमेरिकाच आहे. आणि ट्रम्प यांचा आऊटसोर्सिंग आणि एच१बी विसा यांविषयीचा दृष्टिकोन भारतीयांसाठी काहीसा प्रतिकूल आहे. त्यामुळे भारतातलं आयटी सेक्टरही खालीवर होत आलंय.

गुंतवणूक सल्लागाराची भूमिका महत्त्वाची

सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बघायचं झालं तर सेक्टरल फंड हे अत्युच्च जोखमीचे फंड मानले जातात. सेक्टर फंडात गुंतवणुकीचा सल्‍ला देणारा गुंतवणूकतज्ज्ञ किंवा गुंतवणूक सल्‍लागार तुम्हाला क्‍वचितच भेटेल. याचं कारण शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंड यांच्यातल्या गुंतवणुकीच्या यशाचं मर्म म्हणून दोन गोष्टी सांगितल्या जातात. एक म्हणजे स्टे लाँगटर्म अर्थात दीर्घकाळासाठी गुंतवणूक करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे फॉलो अ सिस्टमेटिक इन्वेस्टमेंट वे अर्थात दरमहा नियमित गुंतवणूक करा.

या दोन्ही गोष्टी आदर्श असल्या तरी सेक्टर फंडामधे गुंतवणूक करताना त्या अजिबात कामी येत नाहीत. कारण कोणतंही सेक्टर दीर्घकाळ तेजीमधे राहील, याची खात्री देता येत नाही. २००९ ते २०१५ ही सात वर्ष औषध कंपन्यांच्या भरभराटीचा काळ होता. २००९ मधे ज्या गुंतवणूकदारांनी फार्मा फंडामधे गुंतवणूक केली होती त्यांना २०१५ अखेर ३५ टक्के परतावा मिळाला. म्हणजे सात वर्षात त्यांची गुंतवणूक सातपट झाली. परंतु त्यानंतर आजअखेर हे सेक्टर अंडर परफॉर्म करतंय.

हेही वाचाः अडचणीच्या काळात म्युच्युअल फंड प्लॅन थांबवायचा की कर्ज काढायचं?

सामान्य गुंतवणूकदारांनी दूर राहिलेलंच बरं!

या सगळ्यांमधून आपल्या लक्षात आलं असेल, की सामान्य गुंतवणूकदारांनी या फंडामधे गुंतवणूक करू नये. डायवर्सिफिकेशन म्हणजेच वैविध्य हे म्युच्युअल फंडाचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. आणि सेक्टरल फंड्समधे त्याला दिला जातो. त्यामुळे इथली गुंतवणूक अतिजोखमीची बनते. आर्थिक सुबत्ता असणार्‍या आणि थोडी जास्तच जोखीम घेऊ शकणार्‍या गुंतवणूकदारांनी आपल्या गुंतवणुकीचा अल्पसा हिस्सा म्हणजे कमाल १० टक्के सेक्टर फंडामधे गुंतवावा. त्यापूर्वी खालील गोष्टी ध्यानात ठेवाव्यात.

१) तुम्हाला माहिती असलेल्या सेक्टरची निवड करा.

२) यात भरपूर जोखीम आहे, याची नोंद घ्या.

३) एसआयपीचा अवलंब न करता एकरकमी गुंतवणूक करा.

४) बाजाराची आणि गुंतवणूक केलेल्या सेक्टरची अद्ययावत माहिती घेत रहा.

५) अपेक्षित परतावा मिळाला की रक्‍कम काढून घ्या.

सेक्टर फंड हा विषय थोडा क्लिष्ट असल्यामुळे गुंतवणूकदारांनी आपल्या सल्‍लागाराचा सल्‍ला घेऊनच यामधे गुंतवणूक करावी. सध्या भारतात खालीलप्रमाणे प्रमुख सेक्टर फंड आहेत.

अ. क्र. फंडाचे नाव सेक्टर
आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल बँकिंग अ‍ॅण्ड फायनान्शिअल सर्व्हिसेस फंड बँकिंग अ‍ॅण्ड फाई. सर्व्हिसेस
एल अ‍ॅण्ड टी इन्फास्ट्रक्‍चर फंड इन्फास्ट्रक्‍चर 
निप्पान इंडिया फार्मा फंड फार्मा
आयडीएफसी इन्फ्रास्ट्रक्‍चर फंड इन्फ्रास्ट्रक्‍चर
युटीआय ट्रान्स्पोर्टेशन अ‍ॅण्ड लॉजिस्टीक फंड ट्रान्सस्पोर्टेशन

 

हेही वाचाः 

कोरोनाः जागतिक आरोग्य आणीबाणी लागू केल्याने काय होणार?

फोकस्ड म्युच्युअल फंडमधली हाय रिस्क गुंतवणूक कुणाच्या फायद्याची?

बजेट २०२०: मोदी सरकार असा विकणार एलआयसीमधला आपला वाटा

निर्मला सीतारामन यांच्या अडीच तासाच्या भाषणातल्या १० कामाच्या गोष्टी

भारतामुळेच जगात मंदी, असं आयएमएफच्या गीता गोपीनाथ का म्हणाल्या?

(दैनिक पुढारीतून साभार.)