अमेझॉनच्या जंगलातली आग विझवण्यासाठी ब्राझीलने चक्क मिलिट्री पाठवली

२५ ऑगस्ट २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


ब्राझीलमधलं अमेझॉनचं जंगल सध्या आगीत भस्म होतंय. जगभरातून या आगीबद्दल चिंता व्यक्त केली जातेय. कारण आपल्याला मिळणाऱ्या ऑक्सिजनचा २० टक्के वाटा या एका जंगलाचा आहे. ब्राझील अवकाश संशोधन केंद्राच्या मते, यंदा ७२,८८३ वेळा या जंगलात आग लागलीय. ही आग आटोक्यात आणण्यासाठी ब्राझीलच्या सरकारने मिलिट्री पाठवलीय.

जगातलं सगळ्यात मोठं जंगल कुठलं? या प्रश्नाचं उत्तर आपल्या भुगोलाच्या पुस्तकात आहे. या प्रश्नाचं उत्तर देऊन आपण परीक्षेत मार्कही मिळवलेत. आता तर आम्ही नोकरीधंद्याला लागलोय, मग हा प्रश्न पुन्हा कशाला असं तुम्हाला वाटलं असेल. पण आता प्रश्न निव्वळ भुगोलाचा नाही तर आपल्या आयुष्याचा आहे. कारण जगातलं हे सगळ्यात मोठं जंगल पेटलंय. आणि ही आग विझता विझत नाही.

अमेझॉनचं जंगल मोठ्या प्रमाणात धुमसतंय. जगातलं हे सगळ्यात मोठं जंगलं आहे. आपण रोज जो ऑक्सिजन घेतो त्यातलं २० टक्के ऑक्सिजन हे आपल्याला निव्वळ अमेझॉनमुळे मिळतं. आता कळालं असेल तुम्हाला हा प्रश्न भुगोलाचा नाही तर आपल्या जगण्यामरण्याचा आहे. याकडे गांभीर्यानं पाहिलं नाही तर अमेझॉनचं संपूर्ण जंगल जळून खाक होईल.

असं आहे अमेझॉनचं जंगल

रेन फॉरेस्ट म्हणजे पावसाचं जंगलं. दाट पाऊस असलेल्या भागात रेन फॉरेस्टचं प्रमाण अधिक असतं. ब्राझीलमधे याला पोषक वातावरण असल्याने तिथं जंगलाचं प्रमाण जास्त आहे. अमेझॉनच्या जंगलात झाडांपासून ते वेगवेगळ्या प्राण्यांपर्यंतच्या अनेक प्रजाती आढळतात. अगदी जगभरात ज्या प्रजाती दिसत नाहीत अशा असंख्य दुर्मिळ प्रजाती इथं आहेत.

ब्राझीलचं २७०० किलोमीटर क्षेत्र या काळ्या ढगांच्या सावटाखाली आहे. आगीमुळे पेरु या छोट्याशा देशात तर हाय अलर्ट जारी करण्याची वेळ आलीय. अमेझॉनच्या जंगलातली आग पसरत पसरत दक्षिण अमेरिकेतल्या पेराग्वे आणि बोलीविया या देशांतही शिरलीय. तिथे मोठं नुकसान झालंय. सध्या सोशल मीडियावर #PrayforAmazonas नावानेही ट्रेंड चालतोय.

या भागाला अमेझॉन बेसिन असंही म्हटलं जातं. पुरावे असं सांगतात की, जवळपास ११,२०० वर्षांपूर्वी इथं लोकांनी रहायला सुरवात केली. २५ लाखांपेक्षा जास्त कीटक, वनस्पतींच्या ४०,००० प्रजाती तसंच हजारो पक्षी इथं वास्तव्य करतात. ४३० प्रकारचे सस्तन प्राणी आहेत. ३००० प्रकारचे मासे आढळतात. त्यामुळे पर्यावरण आणि जैवविविधतेच्या दृष्टीनंही हे क्षेत्र महत्त्वाचं आहे.

हेही वाचाः हवामान बदल हे मानवजातीच्या अस्तित्वासमोरचं मोठं आव्हान

आगीमागे नेमकं कोण?

आदिवासी हे या जंगलातले मुळ रहिवासी आहेत. त्यांचं सगळं जगणं, त्यांची संस्कृती, त्यांची ओळख या जंगलाशी जोडली गेलीय. हे जंगल काही एका देशात नाही. चार, पाच देशांमधे हे विस्तारलंय. यातला ६० टक्के वाटा मात्र ब्राझीलचा आहे. पेरू, वेनेजुएला, इक्वेडोर यासारख्या देशांमधे आगीचा लोट पसरलाय. हे सगळे देश दक्षिण अमेरिकेतले आहेत. अमेझॉन, साओ पाउलो, आणि रोडांनिया या शहरांमधे धुरामुळे काळपट ढग तयार झालेत.

अमेझॉनच्या जंगलातली आग सातत्यानं पेटत जातेय. गेल्या तीन आठवड्यांपासून ही आग पेटतेय. जंगलामधे आग लागते त्यामागे नैसर्गिक कारणं असतात. तसंच माणसांच्या बेजबाबदारीतूनही हे घडतं. कधी मुद्दाम अशा आगी लावल्या जातात. ब्राझील अवकाश संशोधन केंद्रानं यंदा ७२,८८३ वेळा या जंगलात आग लागल्याचा अहवाल दिलाय. त्यामुळे अमेझॉनच्या जंगलातली ही आग जाणून बुजून लावण्यात आल्याची शक्यता बळावलीय.

ब्राझीलमधल्या शेतकऱ्यांना शेतीसाठी जमीन हवीय. बिजनेस करणाऱ्यांची नजर अमेझॉनमधल्या नैसर्गिक संसाधनांवर आहे. त्यामुळे हा परिसर ब्राझील नाही तर आसपासच्या सगळ्याच देशांसाठी महत्त्वाचा आहे. महत्त्वाचं म्हणजे जुलै महिन्यात इथं मोठ्या प्रमाणात झाडांच्या कत्तली झाल्या आणि ऑगस्टमधे आग लागली.

विकासाच्या नावाखाली जंगलाशी खेळ

लल्लनटॉप या वेबपोर्टलवर आलेल्या माहितीनुसार, १९६५ च्या ब्राझील फॉरेस्ट कोड कायद्यानुसार शेतकरी हे अमेझॉनच्या जंगलात जमीन खरेदी करु शकत होते. पण त्यातला फक्त २० टक्के हिस्सा शेतीच्या वापरासाठी होता. ३० वर्षांआधी १९८८ मधे नवं संविधान आलं. या संविधानानं तिथल्या मूलनिवासींना जमिनीचा अधिकार दिला. त्यात असं सांगण्यात आलं की, त्यांच्या जमिनीवर होणाऱ्या डेवलेपमेंटसाठी त्यांचा विरोध नसेल.

२०१२ मधे पुन्हा या कायद्यात बदल करण्यात आला. बेकायदेशीर झाडं तोडली जायची. त्यावरचे निर्बंध आणि शिक्षा काढून टाकण्यात आली. त्यामुळे जंगलाच्या संरक्षणाचे अधिकार कमकुवत झाले. हे सगळं प्रकरण तिथल्या सुप्रीम कोर्टात पोचलं. कोर्टानेही कायद्यातला बदल कायम ठेवला.

ब्राझीलमधल्या पर्यावरण अभ्यासकांच्या मते, अमेझॉनमधून दर मिनिटाला एका फुटबॉल मैदानाएवढं जंगल कापून टाकलं जातंय. महत्त्वाचं म्हणजे जंगल संपवण्याचा हा ट्रेंड जानेवारीत झेयर बोलसोनारो यांनी राष्ट्राध्यक्षपदाची सुत्रं स्वीकारली तेव्हापासून मोठ्या वेगात सुरू आहे. ब्राझीलच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस रिसर्चच्या आकडेवारीनुसार, आगीच्या घटनांमधे २०१८ च्या तुलनेत ८५ टक्क्यांनी वाढ झालीय.

हेही वाचाः नोबेल विजेती मलाला यूसुफजई काश्मीरवर काय म्हणाली?

जंगल पाच देशांचं, पण वर्चस्व ब्राझीलचं

२०१९ मधे ब्राझीलमधे नवं सरकार आलं. तिथले सध्याचे अध्यक्ष जैल सोल्सोनोरो हे उजव्या विचारधारेचे आहेत. तसेच ते पर्यावरणविरोधी म्हणूनही ओळखले जातात. जंगलतोडीला त्यांचं प्रोत्साहन आहे. त्यांनी पुन्हा सत्तेत आलो तर अमेझॉनचं जंगल आणि त्याच्या आसपासचा प्रदेश हा बिजनेससाठी खुला केला जाईल, अशी घोषणाच केली होती. मूळ रहिवाशांसाठी जंगल खुलं करु असं आश्वासनही त्यांनी दिलं होतं.

नंतरच्या काळात अमेझॉनचं १५ टक्के जंगलं हे वृक्षतोड आणि आगीमुळे नष्ट झालं. महत्त्वाचं म्हणजे, अमेझॉनचं  जंगल  एकट्या ब्राझीलच्या मालकीचं नाही. पण या जंगलाचा सर्वाधिक भाग ब्राझीलमधे येतो. त्यामुळे हे जंगल ब्राझीलचं म्हणून ओळखलं जातं. कोलंबिया, वेनेजुएला, इक्वेडोर, बोलविया, गुयाना, सुरिनाम आणि फ्रेंच गुयाना या भागांमधे हे जंगलं आहे. पेरू या देशात या जंगलाचा १३ टक्के भाग आहे.

ब्राझीलच्या अध्यक्षांवर जगभरातून दबाव

सुरवातीपासूनच अमेझॉनच्या जंगलाचे सर्वाधिक ब्राझीलला मिळताहेत. पण गेल्या काही वर्षांत ब्राझीलचं सरकार विकासाच्या नावाखाली अमेझॉनचं जंगल ओरबडून खाण्याच्या मागे लागलंय. पण आताच्या आगीने साऱ्या जगाचं लक्ष अमेझॉनच्या जंगलाकडे वेधलं गेलंय. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष सोल्सोनोरो यांच्यावर जगभरातून दबाव वाढलाय.

फ्रान्स आणि आयर्लंड या युरोपियन देशांनी तर ब्राझीलची आर्थिक कोंडी करण्याचा  प्रयत्न केला. या देशांनी ब्राझीलमधली आपली व्यापारी गुंतवणूक रोखून धरलीय. फ्रान्सचे पंतप्रधान इम्यॅन्युएल मॅक्रॉन यांनी तर हवामान बदलावर सोल्सोनोरो आपल्याशी खोटं बोलल्याचं सांगितलंय. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी अमेझॉनमधल्या जंगलातली आग ही आंतरराष्ट्रीय समस्या असल्याचं म्हटलंय. 

फिनलँडच्या अर्थमंत्र्यांनी यूरोपियनं युनियनने ब्राझीलच्या बीफ आयातीवर निर्बंध लावायला हवेत असं विधान केलं होतं. पण सोल्सोनोरो स्वतःवरचे आरोप फेटाळून लावताहेत. तरीही या सगळ्या दबावानंतर त्यांना तातडीने एक आदेश काढवा लागलाय. सोल्सोनोरो यांनी सीमावर्ती, आदिवासी आणि संवेदनशील भागांमधे मिलिटरी तैनात करण्याचे आदेश प्रशासनाला दिलेत.

हेही वाचाः आपल्या ताटातल्या प्रत्येक घासामागे दडलंय पैशांचं गणित

जंगल वाचवायला हवं, कारण

आपल्या आजूबाजूला ऑक्सिजन आहे त्यातला २० टक्के वाटा हा एकट्या अमेझॉनच्या जंगलाचा आहे. कार्बन डायऑक्साइड हा वायू शोषण्याचं काम ही जंगलं करतात. ते बंद झालं तर ग्लोबल वॉर्मिंगची समस्या आणखी गंभीर होईल. कार्बन डायऑक्साइड मानवी शरीरासाठी घातक आहे. जंगलांमुळे त्याला कंट्रोल केलं जातं. पावसाचं चक्र नियमित राहण्यात त्याची भूमिका महत्त्वाची असते. त्यातला ओलावा हा ढगांना आणि वातावरणाला कंट्रोल करतो. त्यामुळे पाऊस चांगला पडतो.

जर ही जंगली साफ करण्यात आली तर त्याचा परिणाम हा वातावरणावर होईल. ब्राझील किंवा त्यांच्या आसपासच्या प्रदेशासोबत जगावर हे परिणाम होतील. ग्रीनलँडमधे करोडो टन बर्फ वितळतोय. १९६० पासूनच अमेझॉनच्या जंगल आणि आसपासच्या भागात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होतेय. खाणी, शेती, पावर प्रोजेक्टसाठी हे प्रामुख्यानं केलं जातंय.

जगभरातले शास्त्रज्ञ सातत्याने या धोक्याकडे इशारा करताहेत. या अशा सगळ्या वागण्यामुळे आपण पुढची १०० वर्ष तरी जगू का हा प्रश्नही त्यांना सतावतोय.

हेही वाचाः 

अरुण जेटलींना पत्रकार ब्यूरो चीफ म्हणायचे!

मंदीतही पॅथॉलॉजीच्या धंद्यात खुणावतेय संधी

नरेंद्र मोदींना खलनायक करुन हाती काहीच लागणार नाही

नागराज मंजुळेंनी आरएसएसच्या शाखेत जाणं का थांबवलं?

उत्तर भारतातले रोहिदास भक्त मोदी सरकारवर एवढे नाराज का?