अशोक चव्हाणांच्या जागी कोण होऊ शकतं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष?

०८ मे २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


काँग्रेसमधे प्रदेशाध्यक्ष बदलाचे वारे जोरात वाहताहेत. अशोक चव्हाणविरोधी गट दिल्लीत शड्डू ठोकून प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या तयारी आहे. बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, राजीव सातव यांचं प्रदेशाध्यक्षपदाचे दावेदार म्हणून नाव समोर येतंय.

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागायला १५ दिवस शिल्लक आहेत. जय-पराजयाचा निकाल लागण्याच्या आधीच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमधे अध्यक्ष बदलाच्या हालचाली सुरू झाल्यात. विद्यमान अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या विरोधातल्या गटांनी दिल्लीत मोर्चेबांधणी सुरू केलीय. त्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेसच्या नव्या कारभाऱ्याची चर्चा सुरू झालीय. विरोधी गटाचे मनसुबे धुळीला मिळवण्याचं कसब माहीत असलेल्या चव्हाणांनीही स्वतःसाठी चांगली फील्डिंग लावायला सुरवात केलीय. मीडियातूनही तशा बातम्या येऊ लागल्यात. तसंच सोशल मीडियावरही चव्हाणविरोधी गटाकडून जोरात कॅम्पेन सुरू आहे.

हेही वाचाः महाराष्ट्रातली काँग्रेस नेतृत्वहीन होतेय?

पण चव्हाणांना का बदलायचं?

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा मानहानीकारक पराभव झाला. तेव्हा प्रदेशाध्यक्ष बदलण्याची चर्चा सुरू झाली. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक नावांची चर्चा झाली. शेवटी यासाठी दोनेक वर्ष मुख्यमंत्री राहिलेल्या आणि मोदीलाटेतही लाखाच्या लीडने खासदार होणाऱ्या अशोक चव्हाणांकडे पक्षाची धुरा आली. राज्यातून काँग्रेसचे दोनच खासदार संसदेत गेले. त्यात नांदेडमधून चव्हाण तर शेजारच्या हिंगोलीतून राजीव सातव यांचा नंबर लागला. सातव यांना जिंकून आणण्यातही चव्हाणांनीच जोर लावला.

पण यंदाच्या लोकसभा निवडणुकीत चव्हाण यांच्या कारभाराबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झालं. राज्याची धुरा असलेले चव्हाण सुरवातीचे दोन टप्पे स्वतःच्या प्रचारापुरतं नांदेडमधेच फिरले. उमेदवारी वाटपावरून मीडियात, सोशल मीडियातही काँग्रेसची खूप छीथू झाली. चंद्रपूरच्या उमेदवारीवरून तर चव्हाणांची क्लीपच वायरल झाली. चव्हाणांच्या गोटातले म्हणून ओळखले जाणारे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी पक्षाच्या उमेदवारांविरोधात काम केलं. पक्षातलं हा गोंधळ निस्तरण्यासाठी दिल्लीहून टीम आली.

या सगळ्या प्रकरणांमुळे चव्हाणांचं काम डॅमेज झालंय. विधानसभा निवडणूक चव्हाणांच्या नेतृत्वात लढली आणि सत्ता आली तर तेच मुख्यमंत्री बनतील, अशी भीतीही काँग्रेसच्या गोटातून बोलून दाखवली जातेय. त्यामुळे चव्हाणांची ही सगळी प्रकरणं त्यांचे विरोधक दिल्लीच्या दरबारात लावून धरणार. त्यातून चव्हाणांची खेळी बिघडू शकते.

हेही वाचाः महाराष्ट्रात काँग्रेसचं घोडं कुठं अडतंय?

राहुल गांधी मुक्काम थोरातांच्या कामी येणार?

अखिल भारतीय काँग्रेसच्या राष्ट्रीय समितीवर असलेले बाळासाहेब थोरात यांचं सध्या दिल्ली दरबारी महत्त्व वाढलंय. संगमनेरला सभा झाल्यावर राहुल गांधी थोरातांच्या कॉलेजवर मुक्कामाला होते. स्वतः राहुल गांधींनीच थोरात यांच्या खांद्यावर हात टाकलेला फोटो सोशल मीडियावर टाकला. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदासाठी थोरात यांची दावेदारी प्रबळ मानली जातेय. गेल्यावेळी ते शिर्डीत राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे मुक्कामाला होते. त्यानंतर विखे हे विरोधी पक्षनेते झाले.

मराठा जातीतल्या थोरातांचं घराणं काँग्रेसी आहे. अनेक वर्ष ते राज्यात मंत्रीही राहिलेत. त्यातून त्यांचं महाराष्ट्रभरात चांगलं नेटवर्कही उभं राहिलंय. गेल्या पाच वर्षांत केंद्रीय नेतृत्वाने त्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्यात. त्यांचा भाचा सत्यजीत तांबे हे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. थोरातांना प्रदेशाध्यक्ष बनवायचं असेल तर एकाच घरात दोन पदांचा मुद्दा आडवा येईल. तसंच सोशल मीडियाच्या जमान्यात प्रभावी भाषणशैलीची गरज आहे, ती थोरातांकडे नाही. थोरात वयाच्या सत्तरीत पोचलेत.

हेही वाचाः काँग्रेसच्या हातातून संधी निसटून जातेय का?

पृथ्वीराज चव्हाणांचं दिल्लीदरबारी वजन

राजीव गांधींच्या टीममधला माणूस असलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांचं नावही चर्चेत आहे. अख्खी कारकीर्द दिल्लीत घालवलेल्या पृथ्वीराजबाबांची पक्षश्रेष्ठींकडे चांगली उठबैस आहे. मुख्यमंत्री असताना एक अभ्यासू लीडर म्हणून ते महाराष्ट्राच्या ओळखीचे झालेत. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण नांदेडमधे अडकून पडले असताना राज्यात पृथ्वीराजबाबांनी पक्षाच्या किल्ला लढवला.

पण पृथ्वीराज चव्हाण यांना प्रदेशाध्यक्ष बनवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा सर्वांत मोठा अडसर आहे. मुख्यमंत्री असताना राष्ट्रवादीचे नेतेच त्यांच्यावर उघड उघड टीका करायचे. त्यामुळे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादी सरकारचा पाठिंबाही काढून घेतला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने स्वबळावर निवडणूक लढवली. आता दोन्ही पक्ष आघाडी करून विधानसभा लढवण्याच्या तयारीत आहेत. अशावेळी मराठा जातीच्या चव्हाणांना प्रदेशाध्यक्ष करणं काँग्रेससाठी अडचणीचं ठरू शकतं. पृथ्वीराजबाबांचं वयही आता ७५ च्या घरात पोचलंय.

थोरात आणि चव्हाण यांना प्रदेशाध्यक्ष बनवताना आणखी एका गोष्टीची अडचण होईल. ती म्हणजे, दोघंही पश्चिम महाराष्ट्रातले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमुळे पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसच्या वाढीला, विस्ताराला मर्यादा आल्यात. तसंच पश्चिम महाराष्ट्राकडे पक्षाचं नेतृत्व दिल्यास राज्यात चुकीचा मेसेज जाऊ शकतो.

हेही वाचाः नागपुराच्या प्रचारात डीएमके, डीएमओ, टीएमकेचं राज्य

विदर्भातले कुणबी नेते नाना पटोले

नरेंद्र मोदींच्या शेतकरीविरोधी धोरणांमुळे नाना पटोले खासदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसमधे आले. काही दिवसांतच पटोलेंची राष्ट्रीय पातळीवरच्या किसान खेत मजदूर काँग्रेसच्या अध्यक्षपदी वर्णी लावण्यात आलीय. काँग्रेसने त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय असलेल्या नागपूरमधून रिंगणात उतरवलं. खुद्द राहुल गांधी हे पटोलेंच्या इलेक्शन मॅनेजमेंटवर लक्ष ठेऊन होते, असं बोललं जातंय.

एवढंच नाही तर कुणबी नेते असलेल्या पटोलेंना राहुल गांधींच्या वायनाड मतदारसंघात प्रभारी म्हणून नेमण्यात आलं होतं. तसंच त्यांची भाषणशैलीही चांगली आहे. ५५ वर्षांच्या नानांची राष्ट्रीय मीडियातही पोच आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला विदर्भातून चांगल्या जागा मिळण्याची आशा आहे. विदर्भातला माणूस प्रदेशाध्यक्ष केल्यास विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदा होऊ शकतो.

पण काही दिवसांआधी पक्षात आलेल्या पटोलेंसाठी प्रदेशाध्यक्ष होणं काही सोप्पं नाही. काँग्रेसमधला निष्ठावंत गटच त्यांच्याविरोधात उभा होईल. नारायण राणेंना बाहेरचं म्हणूनच अनेक वर्ष पक्षात राहावं लागलं. मूळ काँग्रेसी असलेल्या नानांनी आतले आणि बाहेरचे हा वाद मिटवला तर मात्र ते प्रदेशाध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार होऊ शकतात.

हेही वाचाः चला आता आपण राज ठाकरेंना प्रश्न विचारुया

इलेक्शन मॅनेजर राजीव सातव

राहुल गांधींच्या टीममधला माणूस अशी ओळख असलेले हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांना काँग्रेसने गुजरातचा प्रभारी म्हणून नेमलंय. विधानसभा निवडणुकीत भाजपच्या जागांमधे चांगलीच घट झाली. ४४ वर्षांच्या सातव यांच्याकडे गुजरातमधलं मतदान झाल्यावर लगेचच राहुल गांधींच्या अमेठी मतदारसंघाचीही जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे सातव यांचं नाव इलेक्शन मॅनेजर म्हणून पुढं आलंय.

माळी समाजातल्या सातव यांनी गुजरातच्या निवडणुकीची जबाबदारी सांगून यंदा लोकसभेचीही निवडणूक लढवली नाही. त्यामुळे ते महाराष्ट्रात येण्याची शक्यता तयार झालीय. तसंच काँग्रेसने गेल्या पाच वर्षांत प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री निवडीत ओबीसी समाजाला प्राधान्य दिलंय. राजस्थानमधे माळी समाजाचे अशोक गेहलोत, एमपीत खत्री समाजाचे कमलनाथ, छत्तीसगडमधे कुर्मी जातीतले भुपेश बघेल यांना मुख्यमंत्री केलं.

काही महिन्यांआधी गुजरातमधेच अमित छावडा यांना प्रदेशाध्यक्ष करत ओबीसी समाजाला जवळ करण्याचा प्रयत्न केलाय. गुजरात इलेक्शनमधे अल्पेश ठाकोर, हार्दीक पटेल या ओबीसी तरुणांना सोबत घेत काँग्रेसने आपली हवा केली. ओबीसी राजस्थानमधेही गुर्जर समाजातल्या सचिन पायलट यांच्याकडे पक्षनेतृत्व आहे. या सगळ्यांचं वय बघितलं तर एक महत्त्वाची गोष्ट ध्यानात येते. मुख्यमंत्री निवडताना वयाचा मुद्दा मागं पडताना दिसतोय. पण प्रदेशाध्यक्ष निवडीवेळी तो कळीचा बनलेला दिसतो.

दिल्लीतले नेते असलेल्या सातव यांच्यासाठी गल्लीतलं राजकारण वाटतं तेवढं सहज सोप्पं नाही. इथे त्यांना स्वतःची पाळंमुळं घट्ट करावी लागतील. पण दिल्लीत उठबैस असलेल्या चव्हाणविरोधी गटांसाठी ते आपले उमेदवार असतील. या जोरावरच सातव प्रदेशाध्यक्ष बनू शकतात. गेल्या काही काळात काँग्रेसच्या राष्ट्रीय राजकारणाने घेतलेलं ओबीसी वळण बघितल्यास सातव यांची बाजू सर्वाधिक वरचढ आहे.

हेही वाचाः 

एक्झिट अंदाजः मुंबईसह चौथ्या टप्प्यावर राज्य कुणाचं?

एक्झिट अंदाजः १४ मतदारसंघात कोण जिंकतंय ते इथे वाचा

एक्झिट अंदाज: दुसऱ्या टप्प्यात कोण जिंकलंय, कोण हरलंय?

वाराणसीत काँग्रेसने प्रियंका गांधींना तिकीट का दिलं नाही?

विद्वत्तेविरुद्ध मोदी सरकारने पुकारलेलं युद्ध