लोकसभा निवडणुकीचा निकाल यायला अजून १३ दिवस उरलेत. पण कोण जिंकणार, कोण हरणार याची लोकांमधे खूप उत्सुकता आहे. सत्ताधारी भाजप आघाडीबद्दल नाराजीचा सूर आहे. पण याचा फायदा घेताना काँग्रेसला तितकं यश येताना दिसत नाही. महाराष्ट्रातल्या ४८ जागांवरच्या वस्तुस्थितीचा अंदाज घेऊन बांधलेला हा अंदाज. कोलाज याविषयी वेगवेगळ्या पत्रकार अभ्यासकांना लिहितं करतंय. त्याचा हा पहिला भाग.
मुंबईतून मराठी न्यूज चॅनेलमधे राजकीय बातमीदारी करत असताना निवडणुकीच्या निमित्तानं राज्यात फिरायला मिळालं. या दौऱ्यातून आणि ठिकठिकाणच्या लोकांशी, पत्रकारांशी बोलून तिथल्या राजकीय वातावरणाचा अंदाज आला. त्या अंदाजाच्या जोरावर राज्यभरातली मतदारासंघात कसं चित्र असेल याची मांडणी करण्याचा हा प्रयत्न.
मुंबईने गेल्यावेळी भाजप आघाडीला एकहाती पाठिंबा दिला. पण यावेळी नोटबंदी आणि जीसटी यामुळे भाजपचा पारंपरिक गुजराती भाषिक, मारवाडी त्यापेक्षा व्यापारी मतदार नाराज आहे. त्यामुळे तो गेल्यावेळसारखं यंदा भाजपबरोबर किती राहील ही शंका आहे. दलित, मुस्लिम समाजानेही मोदींकडे मोठ्या बघून मतदान केलं होतं. पण तेही यावेळी नाराज आहेत.
मुंबईत सहा लोकसभा मतदारसंघ आहेत. यात दक्षिण मुंबई मतदारसंघात काँग्रेसची बाजू वरचढ आहे. मुकेश अंबानींची साथ आणि जुन्या घरांचा रखडलेला प्रश्न, भाजपवर नाराज पारंपरिक मतदार यामुळे मिलिंद देवरा थोड्याफार फरकाने का होईना विजयी होतील. ईशान्य मुंबईमधे भाजपने भाकरी फिरवत सेनेची नाराजी बदली. तर राष्ट्रवादीने जुनाच चेहरा दिल्याने भाजपचा विजय सोपा झालाय.
दक्षिण मध्य मुंबईमधे शिवसेना आणि भाजपचं भक्कम संघटनात्मक जाळं आहेत. तसंच शेवटच्या क्षणी काँग्रेसच्या कालिदास कोळंबकर यांनी शिवसेनेच्या राहुल शेवाळेंना मदत केली. त्यामुळे इथे त्यांचं पारडं जड आहे.
हेही वाचाः अशोक चव्हाणांच्या जागी कोण होऊ शकतं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष?
उत्तर मध्य मुंबईची जागा राखणं भाजपसाठी अवघड आहे. मुस्लिम, दलित समाज पुन्हा ठामपणे काँग्रेसच्या बाजुने उभं राहताना दिसला. त्यातच भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांच्याबद्दलची नाराजीही दिसली. त्याचा प्रिया दत्त यांना फायदा होईल.
उत्तर पश्चिम मुंबई. दगडापेक्षा वीट मऊ या नात्यानं काँग्रेसचे संजय निरुपम नको तर नाइलाजाने का होईना शिवसेनेचे गजानन किर्तीकर चालतील अशी भावना. जोडीला शिवसेना भाजपची संघटनात्मक ताकद आहे.
उत्तर मुंबई. उर्मिला मातोंडकरमुळे प्रचारासाठी गोपाळ शेट्टी यांना भरपूर फिरावं लागलं. मात्र विकासकामं आणि दांडदा जनसंपर्क यामुळे शेट्टींचा विजय निश्चित आहे.
हेही वाचाः एक्झिट अंदाजः मुंबईसह चौथ्या टप्प्यावर राज्य कुणाचं?
ठाणे. शिक्षित विरुद्ध अशिक्षित असा प्रचार सुरु असला तरी गेल्या ५ वर्षात सेना, भाजपची ताकद वाढलीय. यामुळे सेनेचा विजय होईल.
कल्याण. चुरसच नसल्यानं बहुदा राज्यात सर्वांत कमी मतदान इथे झालं. शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंचा मुलगा सहज जिंकणार.
भिवंडी. भाजपच्या उमेदवाराबद्दल सेनेची तसंच ग्रामीण भागातही नाराजी आहे. भिवंडीमधे वाढलेल्या ताकदीच्या जोरावर काँग्रेसचा विजय शक्य.
पालघर. बहुजन विकास आघाडीला काँग्रेस आघाडीची साथ यामुळे त्यांचा थोड्याफार फरकाने विजय होईल. शिवसेनेने ही जागा प्रतिष्ठेची करून भाजपसोबतच्या वाटाघाटीत आपल्याकडे घेतली होती.
रायगड. २०१४ ला थोक्यात हुकलेली संधी यावेळी राष्ट्रवादीचे काँग्रेसचे सुनील तटकरे नक्की साधणार.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग. राणे विरुद्ध इतर अशी लढाई. यात शिवसेनेचा विद्यमान खासदार विनायक राऊत पक्ष संघटनेच्या जोरावर नक्की जिंकणार.
हेही वाचाः एक्झिट अंदाजः १४ मतदारसंघात कोण जिंकतंय ते इथे वाचा
उत्तर महाराष्ट्रात काँग्रेस आघाडीची अवस्था डळमळीत होती. यामुळे उत्तर महाराष्ट्रातल्या सर्व आठ जागा सेना-भाजपच्या ताब्यात जातील असं चित्र आहे. नगर, दिंडोरी, नंदुरबार इथे मोदी यांच्या सभांचा भाजपला फायदा होईल. धुळ्यात सुभाष भामरेंविरोधात कुरबुरी असल्या तरी ते काठावर पास होतील. दिंडोरीमधे भाजपने ताकद पणाला लावलीय. नगरमधे मात्र काट्याची टक्कर आहे. राष्ट्रवादीने भाजपला घाम फोडला असला तरीही भाजपचा निसटता विजय मानला जातोय. जळगाव, रावेर, नाशिक, शिर्डी इथे महायुती जागा राखेल.
विदर्भामधेही महायुतीला २०१४ च्या तुलनेत यंदा संमिश्र यश मिळेल असं चित्र आहे. बुलढाणा, अमरावती, वर्धा, गडचिरोली, चंद्रपुर इथे महायुती काठावर पास होईल. तर नागपुर, भंडारा-गोंदिया, रामटेक इथे महायुतीचा विजय सहज होईल असं चित्र आहे. तर यवतमाळ-वाशिममधे काँग्रेस तर प्रकाश आंबेडकर अकोल्याच्या होमपिचवर जिंकतील, असं दिसतंय.
मराठवाड्यामधेही संमिश्र चित्र आहे. औरंगाबादच्या निकालाची राज्यात सर्वात जास्त उत्सुकता असेल. काँग्रेस, शिवसेना, एमआयएम यांच्यातल्या त्रिशंकू लढतीत लोकांनी नाईलाजाने का होईना खैरेंकडे नाही तर सेनेकडे बघून मतदारांनी कौल दिलाय, असे रिपोर्ट येताहेत. बीडमधे पंकजा मुंडे यांच्यावर असलेली नाराजी राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडणार आहे. जालन्यामधे काँग्रेसच्या कमकुवत उमेदवारामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष दानवे यांचा मार्ग सुरवातीलाच सुकर झाला. हिंगोलीत काँग्रेसचे विद्यमान खासदार सातव यांनी माघार घेतली. तर शिवसेनेने आक्रमक आमदार हेमंत पाटील या नव्या चेहऱ्याला उमेदवारी दिली. त्याचा शिवसेनेला फायदा होताना दिसतोय. परभणीची जागा राखण्यातही शिवसेनेला यश येईल.
नांदेडमधे भाजपने कितीही प्रचार केला, वंचित बहुजन आघाडीने कितीही ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला असला तरी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा विजय नक्की आहे. पाणीटंचाईने चर्चेत असलेल्या लातुरमधे पुन्हा भाजपलाच संधी मिळण्याचा अंदाज आहे. विकासात मागे पडलेल्या उस्मानाबादमधे यावेळी राष्ट्रवादीला आशादायक चित्र आहे.
हेही वाचाः एक्झिट अंदाज: दुसऱ्या टप्प्यात कोण जिंकलंय, कोण हरलंय?
पश्चिम महाराष्ट्रातही निकालामधे संमिश्र चित्र दिसेल असा अंदाज आहे. काँग्रेस आघाडीच्या मांडीला मांडी लावून बसल्यानं नाराजी ओढवलेली असली तरी राजू शेट्टीवर हातकणंगलेमधे पुन्हा एकदा बाजी मारतील. कोल्हापुरमधे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या एकमेकांत एवढ्या तंगड्या अडकल्या आहेत की यश शिवसेनेच्या पदरात पडेल. बारामतीमधे भाजपने कितीही आपटलं तरीही विजय राष्ट्रवादीचाच होणार आहे. पुणे हा भाजपसाठी राज्यातला सर्वात सोपा पेपर ठरणार आहे.
साताऱ्यात शिवसेनेच्या नरेंद्र पाटील यांनी चुरस निर्माण झाल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला. तरी सातारकर राजेंनाच मुजरा करणार हे स्पष्ट आहे. सोलापुरमधे वंचित बहुजन आघाडीमुळे मतविभाजन होत भाजप जागा कायम राखेल. सांगलीमधे संजयकाका पाटील यांच्याकडे नाही तर भाजपकडे बघुन मतदान झालं. त्याचा भाजप फायदा होईल. शिवाजीराव आढळराव पाटील यांना कंटाळलेले शिरुरकर हे यावेळी नव्या चेहऱ्याला राष्ट्रवादीच्या अमोल कोल्हेंना पसंती देतील असं चित्र आहे. मावळची लढाई राष्ट्रवादी काँग्रेससाठी प्रतिष्ठेची आहे. अजित पवारांनी लावलेली ताकद लक्षात घेता दरवेळी हुलकावणी देणाऱ्या मावळ लोकसभेवर यावेळी राष्ट्रवादी कब्जा मिळवेल असं दिसतंय.
थोडक्यात राज्याच्या निकालात २०१४ च्या तुलनेत महायुती ४२ जागांवरुन ९ जागा कमी होऊन त्या ३३ वर येतील. काँग्रेस आघाडी सहावरुन १२ वर झेप घेईल आणि साथीला घटकपक्षांच्या दोन जागा असतील. वंचित बहुजन आघाडीला एक जागा मिळेल.
ग्राऊंडवरच्या हवेचा अंदाज घेऊन हा रिपोर्ट तयार केलाय. पण २३ तारखेलाच मतदारराजा कुणाच्या पारड्यात किती जागा टाकणार हे नेमकं कळेल.
हेही वाचाः
चला आता आपण राज ठाकरेंना प्रश्न विचारुया
(लेखक हे झी २४ तास या मराठी न्यूज चॅनलमधे सिनिअर रिपोर्टर आहेत)