चंद्रपूर, गडचिरोलीत विरोधकांना साथ की सत्तेला साथसोबत?

१३ एप्रिल २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


उमेदवार बदलण्यावरून झालेल्या राड्याने चंद्रपुरात काँग्रेसचं हसं झालं. त्याचा काँग्रेसला सुरवातीच्या टप्प्यातल्या प्रचारातही बसला. भाजपला निवडणूक एकतर्फी जाईल, असं वाटतं असतानाच आता चंद्रपुरात चांगलीच टस्सल लागलीय. हमखास निवडून येतील असं वाटणारे केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांना त्यांनी चांगलंच अडचणीत आणलंय.

निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधे आलेले शिवसेना आमदार बाळू धानोरकर हे भाजपचे अनुभवी, मातब्बर नेते हंसराज अहिर यांना चांगलीच फाईट देताना दिसले. त्यामुळे विजयासाठी दोन्ही उमेदवारांनी पायाला भिंगरी लावल्यासारखा झंझावाती प्रचार केला. मतदारसंघातल्या अठराशे गावांपर्यंत पोचणं तसं सोपं नाही.

मतदानाचा टक्का घसरला

चंद्रपूर मतदारसंघात १३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. १९ लाख ४ हजार ३२ एवढी मतदारांची संख्या आहे. यामधे ९ लाख ८४ हजार ३८१ पुरुष, तर ९ लाख १९ हजार ६२८ महिला मतदारांची संख्या आहे. यंदा १९ लाख मतदारांपैकी जवळपास साडेबारा लाख मतदारांनी म्हणजेच ६४.६६ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावलाय. २०१४ मधे ६३.२९ टक्के मतदान झालं. १७ लाख ५३ हजारांपैकी ११ लाख मतदारांनी हक्क बजावला होता.

हेही वाचाः नागपूरचं वाढलेलं मतदान असंतोषामुळे की संघटनेमुळे?

यावेळी वणीत सगळ्यात जास्त ७१.८१ टक्के मतदान झालं. त्याखालोखाल राजुरा ६९.६१, आर्णी ६९.५२, वरोरा ६३.३५, बल्लारपूर ६१.१६ आणि सर्वात कमी चंद्रपूर ५३.१० टक्के मतदानाची नोंद झाली. सहा मतदारसंघातल्या मतदानाची टक्केवारी ६४.६६ एवढी झाली. वणी आणि आर्णी हे यवतमाळ जिल्ह्यातले विधानसभा मतदारसंघ आहेत.

वंचित बहुजन आघाडीचा उमेदवारही चर्चेत

चंद्रपूर हा तसा जातीपातीच्या पल्याड जाऊन मतदान करणारा मतदारसंघ. त्यामुळेच इथे उत्तर भारतातून आलेले गवळी समाजाचे अहिर हे सलग दोन वेळा खासदार झाले. पण यावेळी त्यांना जातीच्या स्थानिक समीकरणांना तोंड द्यावं लागलं. मतदारसंघात बहुसंख्येने असलेल्या कुणबी समाजातला फ्रेश चेहरा असलेल्या धानोरकर यांच्या उमेदवारीमुळे अहिर यांचं विजयाचं गणित धोक्यात आलंय. 

पण तीन वेळा खासदार राहिलेल्या अहिर यांचा जनसंपर्क दांडगा आहे. केंद्रात मंत्री असूनही ते मतदारसंघातच जास्त दिसायचे. गेल्या वेळी मोदीलाटेत भाजपच्या अहिर यांनी काँग्रेसच्या संजय देवताळे यांचा २ लाख ३६ हजार मतांनी पराभव केला होता. एक उत्तम लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचा लौकीक आहे. शिवाय अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह आमदारांची फळी त्यांच्याबरोबर आहे. 

हेही वाचाः महाराष्ट्रः पहिल्या टप्प्यातल्या सात जागांचा पॉलिटिकल एक्स-रे

काँग्रेसने यंदा धानोरकरांच्या रुपात नवा, तरुण, मराठी चेहरा दिलाय. त्यांची वरोरा, भद्रावती या भागात तरुणांमधे क्रेझ आहे. नवख्या धानोरकरांसाठी ही जमेची बाजू आहे. काँग्रेसने इथे पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांची प्रचारसभा घेऊन वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. तसंच प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अभिनेत्री आसावरी जोशींच्या उपस्थितीत रॅली काढली. भाजपनेही केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची सभा घेतली.

यंदा पहिल्यांदाच कुणबी फॅक्टर सक्रीय

बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार अॅड. राजेंद्र महाडोळे यांनी लोकवर्गणीचा आधार घेत प्रचार केला. शेवटच्या टप्प्यात महाडोळे यांच्या प्रचाराचीही खूप चर्चा झाली. गेल्यावेळी इथे आम आदमी पार्टीच्या वामनराव चटप यांनी लाखाहून जास्त मतं खाल्ली होती. त्याचा काँग्रेसला खूप मोठा फटका बसला होता. यावेळेस असा कुठला उमेदवार नसल्याने थेट लढत झाली.

यावेळी प्रचारामधे केंद्रात गृहराज्यमंत्री असलेल्या अहिर त्यांच्या विकासकामांच्या जोरावर लढत आहेत. त्यांचा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला आहे. तिथे त्यांची संघटना आणि यंत्रणाही मजबूत आहे. भाजपच्या मतदारांना वर्षानुवर्षं कमळावर मतदान करायची सवय आहे. सुधीर मुनगंटीवार मनापासून राबले असतील तर त्यांची मतं कमी होण्याची शक्यता नाही.

हेही वाचाः यवतमाळ-वाशिमः जिंकण्यासाठी हवा राळेगावमधला वाढलेला टक्का

पण या मतदारसंघात जातीच्या फॅक्टरनेही आपलं काम केलंय. अहिर यांच्याविरोधात मतदारसंघात एण्टी इन्कम्बन्सी असणं स्वाभाविक आहे. कुणबी, दलित, मुस्लीम हे समीकरण इवीएममधे जुळल्यास धानोरकर यांचा बाजूने पारडं फिरू शकतं. कारण त्याला उत्तर देऊ शकेल असं कोणतंही समीकरण अहिरांकडे नव्हतं. मोदींच्या नावावर भाजपला भरभरून मतं पडली असतील, तरच अहिरांचं तारू पैलतीराला जाऊ शकतं.

गडचिरोलीत मतदानाचा घटलेला टक्का कुणाच्या कामाचा?

गडचिरोली चिमूर मतदारसंघात पाच उमेदवार रिंगणात होते. भाजपकडून विद्यमान खासदार अशोक नेते, काँग्रेसचे डॉ. नामदेव उसेंडी, वंचित बहुजन आघाडीचे डॉ. रमेशकुमार गजबे, बसपाचे हरिचंद्र मंगाम आणि आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडियाचे देवराव नन्नावारे यांच्यात लढत झाली. मात्र खरी लढत रंगली ती नेते आणि डॉ. उसेंडी यांच्यातच. गेल्यावेळी एकतर्फी विजय मिळवणाऱ्या नेते यांचा यावेळी मात्र चांगलाच कस लागला.

हेही वाचाः सर्वपक्षीय सेफेस्ट सीट कशामुळे फाईटमधे आल्यात?

सहाशे किलोमीटर परिसरात पसरलेल्या या मतदारसंघात प्रचारासाठी फिरणं ही एक टास्कचं आहे. एरवी सहजसोप्या ठिकाणीही कुणी निवडून आल्यावर फिरत नाही. अशावेळी प्रचंड विस्तारलेल्या गडचिरोलीत तर आपला खासदार मतदान झाल्यानंतर पुन्हा एकदा मत घेण्यासाठीच आल्याची नाराजी नागरिकांतून व्यक्त होते. २०१४ मधे काँग्रेसचे तत्कालीन खासदार मारोतराव कोवासे यांच्याविरोधात अशीच नाराजी होती. ही नाराजी ओळखून काँग्रेसने डॉ. नामदेव उसेंडी यांना उमेदवारी दिली. पण ते निवडून आले नाहीत. 

नाराजी बूथपर्यंत पोचणार?

गेल्यावेळी ७०.०४ टक्के मतदान झालं होतं. यात नेते यांनी उसेंडी यांचा तब्बल दोन लाख ३५ हजार मतांनी दणदणीत पराभव केला होता. नेते यांनी ५२ टक्के मतं घेत एकतर्फी विजय मिळवला. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीतही भाजपने मतदारसंघातल्या सहापैकी पाच जागा मिळवल्या. गेल्या पाच वर्षांत भाजपने मतदारसंघात आपली पाळंमुळं पक्की केलीत. यंदा मतदानाची टक्केवारी घसरून ६० च्या घरात पोचलीय.

यंदा नेते यांच्याविरोधातही मतदारसंघात जनसंपर्क न ठेवल्याबद्दल लोकांमधे नाराजी आहे. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आणि माना समाजाची नाराजी यासारखे मुद्दे भाजपसाठी त्रासदायक ठरले. मतदारांची ही नाराजी संघटनात्मक पातळीवर कमजोर काँग्रेस बूथपर्यंत नेण्यात किती यशस्वी ठरलीय त्यावर इथे विजयी कोण होणार हे ठरेल.

हेही वाचाः

वर्ध्याच्या सभेत नरेंद्र मोदी शरद पवारांवर का घसरले?

वर्धाः लोकसभेचा निकाल ग्रामपंचायतीच्या निकालात शोधता येईल?

नागपुरात नितीन गडकरींना धक्का बसण्याची शक्यता कशामुळे?

नागपुराच्या प्रचारात डीएमके, डीएमओ, टीएमकेचं राज्य

जळगावात भाजपचे नेते पक्षाच्या व्यासपीठावर WWF का खेळले?