वर्धाः लोकसभेचा निकाल ग्रामपंचायतीच्या निकालात शोधता येईल?

१३ एप्रिल २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


सत्ताधारी भाजप आणि विरोधातल्या काँग्रेससाठी वर्ध्याची जागा खूप महत्त्वाची आहे. दोघांनीही गांधींच्या वास्तव्याने पावन झालेल्या या भूमीत आपला राजकीय वारसा असल्याचं दाखवून द्यायचंय. त्यासाठी दोन्ही पक्षांनी खूप जोर लावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सभा घेतली. या दोन्ही सभांची देशभरात चर्चा झाली. त्यामुळे स्थानिक पातळीवरही ही लढत तितकीच चुरशीची झाली.

चुरशीच्या लढतीत यंदा वर्ध्यात गेल्या वर्षीपेक्षा कमी मतदान झालं. गेल्यावेळी वर्ध्यात ६४.७९ टक्के मतदान झालं होतं. ते यंदा थेट ६१.१८ टक्क्यांवर येऊन घसरलं. मतदानात घट झाल्याने चुरशीच्या लढतीत कोण जिंकून येणार याची उत्सुकता लागलीय.

मतदानासाठी उशिरापर्यंत रांगा

वर्धा मतदारसंघातल्या आर्वीत ६४.५५, हिंगणघाटमधे ६३.३७ टक्के, देवळीत ६२.९१, मोर्शीत ६२.५२, धामणगावमधे ६१.२८ तर वर्ध्यात सगळ्यात कमी ५३.५२ टक्के मतदान झालं. यंदा कडक उन्हातही ग्रामीण भागात चांगलं मतदान झालं. मतदानासाठी रात्री उशिरापर्यंत रांगा लागल्या होत्या.

यंदा पुन्हा तेली, कुणबी फॅक्टर सक्रीय

कुणबी आणि तेली जातीचा फॅक्टर चालणाऱ्या वर्ध्यात १४ जण निवडणूक रिंगणात होते. यामधे भाजपने तेली समाजाच्या रामदास तडस यांनाच पुन्हा एकदा खासदार होण्याची संधी दिली. दुसरीकडे काँग्रेसने महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष, कुणबी समाजाच्या प्रतिनिधी मानल्या गेलेल्या चारुलता टोकस, तसंच वंचित बहुजन आघाडीने माजी पोलिस अधिकारी धनराज वंजारी, बसपाने काँग्रेसमधून आलेल्या शैलेश अग्रवाल यांना उमेदवारी दिली.

हेही वाचाः नागपूरचं वाढलेलं मतदान असंतोषामुळे की संघटनेमुळे?

तरीही मुख्य लढत रंगली ती भाजपचे तडस आणि टोकस यांच्यातच. या मतदारसंघात बसपाला मानणारा मतदार मोठ्या संख्येने आहे. गेल्यावेळी त्यांच्या उमेदवाराला ९० हजाराच्या घरात मतं मिळाली होती. बसपाचे अग्रवाल हे आर्थिकदृष्टीने तगडे उमेदवार म्हणून ओळखले जातात. ते किती मतं घेणार हे तडस आणि टोकस यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वंजारी हे तेली समाजाचे आहेत. तेली समाजाची काही मतं त्यांनाही मिळतील.

कमी मतदानाने धाबे दणाणले

पण मतदान कमी झाल्याने २३ मेला नेमकं काय होणार याकडे लक्ष लागलंय. २३ तारखेचा अंदाज आता व्यक्त होऊ लागलाय. यासाठी वेगवेगळी आकडेवारी सादर केली जातेय. वर्धा मतदारसंघातले प्रत्येकी तीन विधानसभा मतदारसंघ काँग्रेस आणि भाजपकडे आहेत. यामधे धामणगाव, आर्वी आणि देवळीत काँग्रेस, तर मोर्शी, हिंगणघाट आणि वर्ध्यात भाजपची सत्ता आहे.

हेही वाचाः महाराष्ट्रः पहिल्या टप्प्यातल्या सात जागांचा पॉलिटिकल एक्स-रे

स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्यावेळी मोदीलाटेत काँग्रेसला आपला आमदार असलेल्या मतदारसंघातही आघाडी मिळाली नव्हती. त्यामुळे भाजपचे रामदास तडस सव्वादोन लाखांनी निवडून आले. पण यंदा गेल्यावेळसारखी परिस्थिती नाही. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेलाही गेल्या वेळसारखा प्रतिसाद मिळाला नाही. याउलट मोदींच्या सभेनंतर झालेल्या राहुल गांधींच्या रॅलीला चांगली गर्दी जमली. त्यामुळे गेल्यावेळची गणितं आता लावून चालणार नाही. गेल्यावेळी निष्क्रीय झालेला तेली, कुणबी फॅक्टर यंदा चांगलाच सक्रीय झालेला बघायला मिळाला.

दोन्ही पक्षांचे तीन, तीन आमदार

वर्धा मतदारसंघातल्या आर्वीत ६४.५५, हिंगणघाटमधे ६३.३७ टक्के, देवळीत ६२.९१, मोर्शीत ६२.५२, धामणगावमधे ६१.२८ तर वर्ध्यात सगळ्यात कमी ५३.५२ टक्के मतदान झालं. यंदा उन असूनही ग्रामीण भागात चांगलं मतदान झालं. मतदानासाठी रात्री उशिरापर्यंत रांगा लागल्या होत्या. मतदानात तेली आणि कुणबी फॅक्टर चालल्याचीही चर्चा आहे. दोन्ही फॅक्टर तोडीसतोड आहेत.

हेही वाचाः महिलांना उमेदवारी देतानाही घराणेशाहीचंच कार्ड

आर्वी, देवळी आणि धामणगाव मतदारसंघात काँग्रेसचा आमदार आहे. देवळीत तर टोकस यांचा मावस भाऊच आमदार आहे. उरलेल्या तीन ठिकाणी भाजपचा आमदार आहे. वाढलेला मतदानाचा हा टक्का कुणी वाढवला याकडे सगळ्यांच लक्ष लागलंय. पण हा टक्का कुठून, कसा वाढला असेल याचा अंदाज लावणार निकाल एप्रिलच्या सुरवातीलाच मतदारांनी देऊन ठेवलाय.

ग्रामपंचायतीत कोण जिंकलं?

गेल्या महिन्याच्या शेवटी वर्धा जिल्ह्यातल्या जवळपास ३०० ग्रामपंचायतींसाठी मतदान झालं होतं. यामधे वर्धा मतदारसंघात येणाऱ्या जिल्ह्यातल्या वर्धा, आर्वी, देवळी आणि हिंगणघाट या चार तालुक्यातल्या ग्रामपंचायतींचा समावेश होता. वर्धा मतदारसंघात अमरावती जिल्ह्यातले मोर्शी आणि धामणगाव रेल्वे हे दोन विधानसभा मतदारसंघही येतात.

ग्रामपंचायतीच्या निकालात हिंगणघाटमधे नेतृत्वहीन काँग्रेसने अनपेक्षितपणे मुसंडी मारली होती. अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच काँग्रेस राष्ट्रवादीने सरपंचपदाचे उमेदवार तोडीस तोड निवडून आणले. तालुक्यात ५६ ग्रामपंचायतीसाठी मतदान झालं. यात काँग्रेसने १५ सरपंच निवडून आणले. इथे राष्ट्रवादी काँग्रेसने २८ आणि भाजपने १८ तर शिवसेनेने ६ सरपंच निवडून आल्याचा दावा केलाय. लोकसभेत हिंगणघाटमधे दुसऱ्या क्रमांकाचं मतदान झालंय.

आर्वी तालुक्यात २२ पैकी ११ काँग्रेसला, तर ९ ग्रामपंचायती भाजपला मिळाल्या. तालुक्यात भाजपच्या ताब्यात असलेल्या अनेक ग्रामपंचायतींवर काँग्रेस आणि अपक्षांनी आपला झेंडा फडकवला. देवळी तालुक्यातला ४६ ग्रामपंचायतींमधे काँग्रेसने २२ जागांवर यश मिळवलंय. भाजपला १३, तर राष्ट्रवादीला ४ आणि शिवसेनेला एक ग्रामपंचायतीवर समाधान मानावं लागलं. लोकसभेच्या मतदानात आर्वी आणि देवळीत पहिल्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

हेही वाचाः वर्ध्याच्या सभेत नरेंद्र मोदी शरद पवारांवर का घसरले?

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ग्रामीण भागात मतदानाची मुदत संपल्यावर मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. रात्री साडेआठपर्यंत मतदान चाललं. मतदानाचा वाढलेला हा टक्का काही दिवसांआधी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाशी जोडून बघितला तर विद्यमान खासदाराची धोक्याची घंटा वाजवणारा आहे.

रामटेकमधे पुन्हा नवबौद्ध आणि हिंदू दलित सत्तासंघर्ष

नागपूरला लागून असलेला रामटेक मतदारसंघ आता शिवसेनेचा गड आहे. कधी काळी नरसिंह रावांसारखा बाहेरचा उमेदवार देऊनही काँग्रेस जिंकलेला हा मतदारसंघ सातत्याने शिवसेनेला कौल देतोय. आताही सेनेचेच कृपाल तुमाने खासदार आहेत. हा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव आहे. तिथे नवबौद्ध आणि हिंदू दलित असा सत्तासंघर्ष दरवेळेस होतो. तो शिवसेनेसाठी आता हातखंडा प्रयोग झालाय.

हेही वाचाः नागपुराच्या प्रचारात डीएमके, डीएमओ, टीएमकेचं राज्य

मात्र यंदा माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांनी तुमानेंना जोरदार टक्कर दिलीय. त्यामुळे तुमानेंचा विजय मागच्या वेळेसारखा सोपा नाही. मागच्या वेळेस इथे ६२.६४ टक्के मतदान झालं होतं. यंदा त्यात फारसा फरक पडलेला नाही. यंदाची सरासरी ६२.१२ इतकी आहे.

मागच्या वेळेस तुमानेंना सर्वाधिक लीड देणाऱ्या उमरेडमधे ६७.१५ असं दणदणीत मतदान झालंय. तर रामटेकमधे ६४.५८, काटोलमधे ६४.२९ टक्के, सावनेरला ६२.५६, कामटीत ५८.६०, तरहिंगणामधे ५८.४२ टक्के मतदान झालंय. शिवाय गजभियेंना वंचित बहुजन आघाडी आणि बसपाने मारलेली मुसंडीही डोकेदुखी ठरतेय. दोघे मिळून लाखभर मतं खातील, असा अंदाज व्यक्त होतेय. तसंच सुनील केदार आणि नितीन राऊत यांची नाराजीही तुमानेंना अडचणीची ठरू शकते.

हेही वाचाः 

नागपुरात नितीन गडकरींना धक्का बसण्याची शक्यता कशामुळे?

जळगावात भाजपचे नेते पक्षाच्या व्यासपीठावर WWF का खेळले?