काँग्रेसने काल रात्री लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यामधे मुंबईतले दोन, विदर्भातले दोन आणि सोलापूर मतदारसंघाचा समावेश आहे. उमेदवारांची यादी जाहीर करून काँग्रेसने सत्ताधाऱ्यांवर कुरघोडी केलीय. या पाचही मतदारसंघात भाजप हा काँग्रेसचा मुख्य विरोधी पक्ष आहे. पण या मतदारसंघात कोण कुणावर कुरघोडी करतंय, हे बघितलं पाहिजे.
फेसबूक, ट्विटरवर इतके दिवस शांत, निवांत असलेल्या प्रिया दत्त गेल्या दोन दिवसांपासून तिथे एक्टिव झाल्यात. वडील सुनील दत्त यांच्यासोबतचे फोटो टाकण्याचा सपाटाच लावलाय. मी जे काही आहे ते सगळं माझ्या वडलांमुळे, अशी भावना व्यक्त करतानाच माय डॅड, माय हिरो असंही त्या बोलून दाखवतात.
प्रिया दत्त यांचं अचानक फेसबूकवर सक्रिय होणं आणि सुनील दत्त यांचे फोटो टाकणं यात पॉलिटिक्स आहे. काँग्रेसने काल, बुधवारी रात्री लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातल्या पाच जागांवरचे उमेदवार जाहीर केलेत. यात एक नाव प्रिया दत्त यांचं आहे. मुंबईतल्या उत्तर मध्य मतदारसंघातून काँग्रेसने त्यांना पुन्हा उमेदवारी दिलीय.
गेल्यावेळी मोदी लाटेत त्यांचा भाजपच्या पूनम महाजन यांनी प्रचंड मताधिक्याने पराभव केला होता. हा मतदारसंघ तसा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलाय. इथल्या मतदारांवर सुनील दत्त यांचा प्रभाव आजही दिसून येतो. आणि या प्रभावाला आपलं करण्यासाठी प्रिया दत्त चांगल्याच एक्टिव झाल्यात. भाजपकडून इथून पुन्हा पूनम महाजन यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे इथे पुन्हा दोन महिलांमधेच फाईट होईल.
ज्येष्ठ पत्रकार विठोबा सावंत सांगतात, ‘काँग्रेस नेते सुनील दत्त यांचा प्रभाव असलेला हा मतदारसंघ. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी संजय दत्त याला बाळासाहेब ठाकरे यांनी जेलमधून बाहेर काढलं आणि दत्त यांनी १९९६ आणि ९८ या दोन निवडणुका लढवल्या नाहीत. या दोन्ही वेळेला शिवसेनेचे मधुकर सरपोतदार विजयी झाले. हा अपवाद वगळता १९८४ पासून २००९ पर्यंत आधी सुनील दत्त आणि त्यांच्या मृत्युनंतर त्यांची कन्या प्रिया दत्त यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं.’
मतदारसंघ फेररचनेनंतर युतीमधे भाजपच्या वाट्याला गेलेल्या या मतदारसंघात २०१४ मधे पूनम महाजन यांनी एकतर्फी विजय मिळवला. वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, कलिना, कुर्ला, विलेपार्ले आणि चांदिवली असे ६ विधानसभा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघात येतात. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत वांद्रे पूर्व, कलिना आणि कुर्ला या मतदारसंघात शिवसेनेनं स्वबळावर बाजी मारली, तर वांद्रे पश्चिम आणि विलेपार्ले मतदारसंघ भाजपनं जिंकला. नसीम खान यांनी काँग्रेसचा चांदिवली बालेकिल्ला कायम राखला.
असं असलं तरी महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला अपेक्षित यश मिळालं नाही. शिवसेना, भाजप आणि काँग्रेसला इथं संमिश्र यश मिळाल्यानं या मतदारसंघातील निवडणूक चुरशीची होईल, असं सावंत यांना वाटतं. महाराष्ट्रात तिसरा फॅक्टर म्हणून उभ्या राहिलेल्या वंचित बहूजन आघाडीने अजून मुंबईतले उमेदवार जाहीर केले नाहीत. त्यामुळे मुंबईत सध्या तरी दुहेरी लढती होताना दिसताहेत.
उत्तर मध्यसोबतच काँग्रेसने दक्षिण मुंबई या मुंबईतल्या आणखी एका जागेसाठीही उमेदवार जाहीर केलाय. पक्षाध्यक्ष राहुल गांधींच्या यांच्या टीममधला माणूस अशी ओळख असलेल्या मिलिंद देवरांना काँग्रेसने इथून रिंगणात उतरवलंय. मराठी, गुजराती, जैन, मारवाडी, मुस्लिम अशा सर्वच समाजांचं प्राबल्य दक्षिण मुंबईत बघायला मिळतं. शिवसेना इथे विद्यमान खासदार अरविंद सावंत यांना पुन्हा उमेदवारी देईल, असं बोललं जातंय.
दर पाच वर्षांनी खासदार बदलणाऱ्या दक्षिण मुंबई मतदारसंघाविषयी विठोबा सावंत सांगतात, ‘काँग्रेसचे मुरली देवरा आणि भाजपच्या जयवंतीबेन मेहता यांना आलटून-पालटून संधी दिलीय. २००४ आणि मतदारसंघ फेररचनेत गिरणगावचा भाग जोडला गेल्यानंतर २००९ अशा सलग दोन वेळा काँग्रेसला संधी मिळाली. २००९ ला हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आला. पण मनसेमुळे शिवसेनेच्या मतांची विभागणी काँग्रेसच्या पथ्यावर पडली. नंतर २०१४ मधे सेनेच्या अरविंद सावंत यांनी मिलिंद देवरांचा पराभव केला.
हेही वाचाः मोदी खरंच ओबीसी आहेत?
लोकसभेनंतरच्या सहा महिन्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीत युती, आघाडीत काडीमोड झाला. सर्वच पक्ष स्वबळावर लढले. त्यात दक्षिण मुंबईतल्या ६ विधानसभा मतदारसंघांपैकी शिवसेना आणि भाजपने प्रत्येकी दोन, तर काँग्रेस आणि एमआयएम या पक्षांनी प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला. त्यानंतर अडीच वर्षांनी झालेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपने आपापल्या मतदारसंघांमधे वर्चस्व राखलं. मुस्लिमबहुल भागात काँग्रेसला यश मिळालं. या मतदारसंघातला मुस्लिम समाज एमआयएमपासून दूर गेल्याचं चित्र या निमित्तानं दिसलं. त्यामुळे यंदाही दक्षिण मुंबईकर आपला ट्रेंड फॉलो करणार की नवा ट्रेंड तयार करणार हे बघायला पाहिजे.
मुंबईतल्या दोन मतदारसंघांसोबतच काँग्रेसने विदर्भातल्या दोन जागांवरचेही उमेदवार जाहीर केलेत. आरएसएसचं मुख्यालय असलेल्या नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात काँग्रेसने नाना पटोले यांना मैदानात उतरवलंय. पटोलेंसारखा पक्षाचा राष्ट्रीय पातळीवरच शेतकरी चेहरा असलेल्या नेत्याला उमेदवारी देऊन काँग्रेसने इथे तगडी फाईट देण्याचा इरादा स्पष्ट केलाय. विदर्भातल्या या दोन्ही जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान होतंय.
हेही वाचाः ओपिनियन पोलचं वारं कोणत्या बाजूने वाहतंय?
नागपुरातल्या राजकीय मोर्चेबांधणीविषयी ज्येष्ठ पत्रकार विजय पवार यांनी सांगितलं, की नितीन गडकरी यांनी स्वतःची विकासपुरुष म्हणून ओळख निर्माण केलीय. नागपुरच्या गल्लोगल्लीत सिमेंट रस्त्यांची कामं सुरू केलीत. सुमारे नऊ हजार कोटी रुपयांची मेट्रो रेल्वेही नागपुरात आणलीय. या जोडीला नागपुरात वेगवेगळी कामं सुरू आहेत. आतापर्यंत काँग्रेसच्या उमेदवारांच्या पाठिशी असलेल्या नागपुरकरांनी गेल्यावेळेला भाजपला विजयी केलंय. वेळोवेळी जिंकून येणाऱ्या विलास मुत्तेमवार यांना बाजूला सारत काँग्रेसने यंदा भाजपमधून आलेल्या पटोलेंना उमेदवारी दिलीय. पटोलेसारख्या नव्या उमेदवाराच्या तुलनेत गडकरी यांनी आपल्या पाच वर्षांच्या कामाच्या जोरावर इथे प्रचारात आघाडी घेतलीय.
आदिवासींसाठी राखीव असलेल्या गडचिरोली चिमूर मतदारसंघातही काँग्रेसने उमेदवार जाहीर केलाय. जिल्हाध्यक्ष, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांना उमेदवारी दिलीय. इथे भाजपने अजून उमेदवार जाहीर केला नाही. पण दोनदा आमदार राहिलेले आणि विद्यमान खासदार असलेले अशोक नेते यांना पुन्हा उमेदवारी मिळेल, असं बोललं जातंय.
गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया या तीन जिल्ह्यांत हा मतदारसंघ विभागलेला आहे. मतदारसंघातील सहापैकी चार विधानसभा जागा अनुसुचित जमातीसाठी राखीव आहेत. त्यामधे गडचिरोलीतल्या तीनही मतदारसंघांचा समावेश होतो. त्यामुळे अन्य प्रवर्गातल्या लोकांमधे निवडणुकीचा उत्साह नसतो आणि त्याचा विपरित परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर पडतो, असं पवार यांनी सांगितलं.
गेल्या निवडणुकीत बसपाला ६६९०८ मतं, आम आदमी पार्टीला ४५४५८ मतं आणि भाकपला २२५१२ मतं मिळाली होती. यावरुन आगामी निवडणुकीत या तीनही पक्षांची भूमिका महत्त्वपूर्ण राहील.
राज्यातला सगळ्यात हॉट मतदारसंघ असलेल्या सोलापुरात काँग्रेसने सुशीलकुमार शिंदे यांच्या रुपाने गेल्यावेळचाच उमेदवार कायम ठेवलाय. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सोलापुरातूनच निवडणूक लढवण्याचे संकेत दिल्याने इथे खूप चूरस बघायला मिळेल. एससीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात गेल्यावेळी भाजपचे शरद बनसोडे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. २००९ मधेही शिंदे-बनसोडे ही लढत झाली होती. त्यावेळी शिंदे विजयी झाले होते.
ज्येष्ठ पत्रकार गिरीश अवघडे यांच्या मते, केंद्रीय गृहमंत्र्याला हरवल्याची नोंद त्यांच्या नावावर झाली. पण यंदा बनसोडे यांच्याविरोधात मतदारांमधे नाराजीचा सूर आहे. तसंच पक्षांतर्गत विरोधामुळेही त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमीच आहे. या मतदारसंघातले अक्कलकोट, पंढरपूर आणि सोलापूर मध्य इथे काँग्रेसचे आमदार आहेत. पंढरपूर विधानसभेची गणितं शेतकरी स्वाभिमानी पक्षावर अवलंबून आहेत. तसंच भाजपचे दोन तर राष्ट्रवादीचा एक आमदार आहे.
भाजपने अक्कलकोट इथले वीरशैव मठाधीश शिवाचार्य महाराज यांचा विचार करायला सुरवात केलीय. याशिवाय राज्यसभेचे खासदार अमर साबळे हेही इथून इच्छूक आहेत. खुद्द सोलापूर शहरात भाजपचे दोन आमदार आहेत. विशेष म्हणजे हे दोघेही राज्य मंत्रीमंडळात मंत्री असले तरी त्यांच्यातील विसंवाद गेल्या काही दिवसांत सातत्याने चव्हाट्यावर आलाय. सुभाष देशमुख आणि विजय देशमुख यांच्यातला वाद मिटवण्यात किती मिळतंय त्यावर भाजपच्या विजयाची गणितं अवलंबून आहेत, असं अवघडे सांगतात.
दुसरीकडे सुशीलकुमार शिंदे यांनी पराभवानंतर आपला जनसंपर्क नेटाने वाढवत नेलाय. अगदी छोट्यात छोट्या कार्यक्रमाला शिंदे आवर्जून हजेरी लावतात. त्यामुळे प्रत्यक्ष सोलापूर शहरात त्यांच्याबद्दल सहानुभूतीचं वातावरण निर्माण होतंय. ही बाब सत्ताधाऱ्यांच्या गोटात काळजी निर्माण करणारी आहे.
काँग्रेसने आतापर्यंत उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्यात. राष्ट्रवादी काँग्रेसनेही आज, गुरुवारी महाराष्ट्रातल्या १० जागांवर उमेदवार जाहीर केलेत. याउलट सत्ताधारी भाजप, शिवसेनेने अजून आपले पत्ते गुलदस्त्यातच ठेवलेत. येत्या दोनेक दिवसांत महाराष्ट्रातल्या उमेदवारांचं चित्र स्पष्ट होईल. आणि त्यानंतरच निवडणूक प्रचारात रंगत येईल.