सर्वांत चुरशीच्या या पाच जागांवर कोण जिंकणार?

२४ ऑक्टोबर २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


एक्झिट पोलमुळे राज्यातल्या विधानसभा निकालाचं एक कच्चं चित्र समोर आलंय. त्यामुळे निकाल काय लागणार, कसा असणार याविषयीची उत्सुकता काही अंशी शमलीय. असं असलं तरी काही मतदारसंघातले निकाल काय असणार याविषयीची उत्सुकता कायम आहे. त्यापैकी कणकवली, वांद्रे पूर्व, कर्जत जामखेड, औसा आणि साकोली या मतदारसंघांतल्या चुरशीच्या जागांचा हा रिपोर्ट.

कितीही कडक बालेकिल्ला असला आणि कितीही प्रचार केलेला असला तरीही प्रत्येक उमेदवाराला मतमोजणीच्या दिवशी धाकधूक असतेच. यावेळच्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत तर तर अनेक टफफाईट होत आहेत. त्यातल्या या पाच हाय प्रोफाईल तरीही काट्याची टक्कर असणाऱ्या लढती. या पाचही ठिकाणचे निकाल पुढच्या राजकारणाचीही दिशा ठरवू शकतात. 

कणकवलीत भाजपवासी राणे की शिवसेनेचे सतीश सावंत?

कणकवली हा राणे कुटुंबाचा बालेकिल्ला. त्या जोडीला आमदार नितेश राणे यांनी गेल्या पाच वर्षांत केलेलं काम आणि संघटनबांधणी आहे. त्यामुळे भाजपमधे गेल्यावर राणेंसाठी इथली निवडणूक अगदी सोप्पी झाली. इथे भाजपचा परंपरागत मतदार म्हणून ओळखला जाणार ब्राम्हण आणि सारस्वत समाज २०-२५ हजारांच्या घरात आहे. ही मतं आणि राणेंची पारंपरिक मतं यांची गोळाबेरीज केल्यास राणे सहज जिंकू येऊ शकतात, असं सुरवातीला वाटत होतं. 

दुसरीकडे शिवसेनेचा विरोध असतानाही भाजपने राणेंना पक्षप्रवेश दिला. त्यामुळे नाराज झालेले शिवसैनिक राणेंविरोधात उमेदवार द्यायचा या इराद्याने तयारीला लागले. राणेंचा कट्टर समर्थक सतीश सावंत यांना शिवसेनेत घेऊन त्यांना उमेदवारी दिली. राणेंच्या दुसऱ्या-तिसऱ्या फळीतल्या या कार्यकर्त्याने चांगलंच आव्हान तयार केलंय. 

सावंत यांचं सहकार क्षेत्रात काम आहे. मुंबई गोवा हायवेमुळे या मतदारसंघाचे समुद्राकडचा आणि सह्याद्रीकडचा असे दोन भाग होतात. यात सह्याद्रीकडच्या भागात सावंत यांना चांगलं मतदान अपेक्षित आहे. इथे नोंदवण्यासारखी गोष्ट म्हणजे, यंदा या मतदारसंघात कुठलाही हिंसाचार झाला नाही. पण हिंसाचार झाला नाही त्यावेळी राणे पडलेत. 

मागे मराठा नेता बनण्याच्या मिषानं नितेश राणेंनी ब्राम्हणविरोधी वक्तव्य केली होती. त्यामुळे नितेश यांना उमेदवारी जाहीर झाल्यावर राज्यभरातून ब्राम्हण संघटनांच्या नेत्यांनी इथे येऊन राणेंविरोधात मतदान करण्याचं आवाहन केलं. त्यामुळे ब्राम्हण मतं भाजपला पडली नाहीत, तर नितेश राणेंच्या अडचणी वाढू शकतात.

राणे कुटुंब विरुद्ध शिवसेना असं इथल्या लढतीचं चित्र आहे. असं असलं तरी राणे आता भाजपमधे आहेत. त्यामुळे शिवसेना-भाजप युतीतल्या या मैत्रीपूर्ण लढतीत राणे हरले तर कोकणच्या राजकारणासाठी अनेक मेसेज जातात.

हेही वाचाः शरद पवार पावसात भिजल्यानं भाजपचे डोळे ओले होणार?

वांद्रे पूर्वः मातोश्रीच्या अंगणात शिवसेना अडचणीत?

वांद्रे पूर्व हा शिवसेनेसाठी प्रतिष्ठेचा मतदारसंघ आहे. इथेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मातोश्री बंगला आहे. पण हाच मतदारसंघ शिवसेनेसाठी उमेदवारी वाटपावरून मोठ्या डोकेदुखीचा विषय झालाय. इथे शिवसेनेने मुंबईचे महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांना तिकीट दिलंय. विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांनी बंडखोरी केल्याने शेवटपर्यंत इथे शिवसेनेला आपली सारी ताकद पणाला लावावी लागली.

इथे काँग्रेसने माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी दिलीय. सिद्दीकी यांचा वांद्रे पश्चिम मतदारसंघात प्रभाव आहे. पण काँग्रेसने त्यांना वांद्रे पूर्वमधून उमेदवारी दिली. इथली लढत शिवसेना विरुद्ध काँग्रेस विरुद्ध तृप्ती सावंत अशी तिरंगी झाली. सावंत यांना शेवटच्या टप्प्यापर्यंत चांगला प्रतिसाद मिळाला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, प्रचार संपल्यावर मतदानाच्या आदल्या रात्री खुद्द उद्धव ठाकरे आपलं केडर सक्रिय करण्यासाठी शिवसेनेच्या शाखांना भेटी देत फिरत होते.

बंडखोरांवर कारवाईचं धोरण अवलंबलेल्या शिवसेनेला आपल्या अंगणातल्या बंडखोराविरोधात कारवाई करायलाही खूप उशीर झाला. मतदानाच्या तीन दिवस आधी कारवाई करण्यात आली. तृप्ती या शिवसेनेचे माजी आमदार बाळा सावंत यांच्या पत्नी आहेत. मुस्लिमबहुल मतदारसंघात सावंत यांनी मोठ्या कौशल्याने शिवसेनेचं संघटन वाढवलं. बाळा सावंत यांच्या अकाली निधनानंतर इथे पोटनिवडणूक झाली. त्या पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना शिवसेनेच्या तृप्ती सावंत यांनी धूळ चारली.

मनसेनेही इथे आपला उमेदवार दिलाय. अखिल चित्रे यांच्यासाठी राज यांनी सभा घेतली. शिवसेना, बंडखोर, मनसे यांच्यातल्या मतांच्या फाटाफुटीत सिद्दीकी यांची बाजू वरचढ होतेय. शिवाय तिथे फक्त ५१.३४ टक्के मतदान झालंय. त्याचाही फटका शिवसेनेला बसू शकतो.

हेही वाचाः मोदी-राहुल यांची महाराष्ट्रातल्या प्रचाराची बोहनी काय सांगते?

कर्जत जामखेडमधे रोहित पवार की राम शिंदे?

अहमनगर जिल्ह्यातला कर्जत जामखेड मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे. गेल्या २५ वर्षांपासून १९९५ पासून इथे भाजपचा आमदार निवडून आलाय. गेल्या दोन टर्मपासून राम शिंदे आमदार आहेत. जिल्ह्यात काँग्रेस, राष्ट्रवादीचं वर्चस्व असलं तरी त्यांना भाजपच्या या बालेकिल्ल्याला धक्का देता आला नाही. पण यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोहित पवार यांनी शिंदेंपुढे आव्हान निर्माण केलंय.

भाजपने गेल्या पाच वर्षांत राम शिंदे यांची ओबीसी नेते म्हणून प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. त्यासाठी त्यांना बळ दिलं. पण त्यांच्याच धनगर समाजातून शिंदे यांच्याबद्दल नाराजीचा सूर आहे. धनगर आरक्षणाबद्दल मौन बाळगल्याने ही नाराजी आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा नातू रोहित पवार हेच उमेदवार असल्यामुळे या लढतीकडे साऱ्यांचं लक्ष वेधलं गेलंय. रोहित यांनी बारामती एग्रो या साखर कारखान्याच्या माध्यमातून मतदारसंघात आपलं नेटवर्क उभं केलंय. शरद पवारांनी इथे तीन सभा घेतल्यात. प्रचाराच्या शेवटच्या दिवशीची त्यांची सभा खूप गाजली. मुख्यमंत्रीही दोन वेळा येऊन गेलेत. शेवटच्या दिवशी अमित शाह यांची सभा पावसामुळे रद्द करावी लागली.

धनगर, माळी, वंजारी यासारख्या ओबीसी जातींचं या मतदारसंघात प्राबल्य आहे. जातीची समीकरणं निकालावर परिणाम करत असतात. हे समीकरण जुळवण्यात यश आल्यामुळेच भाजपने हा मतदारसंघ आपल्या बालेकिल्ला केलाय. यावेळी रोहित पवारांना भाजपचं हे समीकरण बिघडवून आपल्यासोबत घेण्यात यश आलं तरच यशाचा मार्ग मोकळा होणार आहे. आणि यात रोहित यांना यश आल्याचं प्रचाराचा एकूण मूड बघितला तर लक्षात येतं.

हेही वाचाः आश्चर्यच, मुंबईत काँग्रेसच्या आमदारांची संख्या वाढू शकेल

औशात मुख्यमंत्र्यांचे पीए हरणार की जिंकणार?

औसा मतदारसंघामधे काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष विद्यमान आमदार बस्वराज पाटील आणि भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पीए अभिमन्यू पवार यांच्यात तुल्यबळ लढत होतेय. मुख्यमंत्र्यांनी आपली सारी प्रतिष्ठा पणाला लावून आपल्या पीएसाठी शिवसेनेकडून ही जागा सोडवून घेतलीय. भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या सभेमुळे ही जागा भाजपसाठी खूप महत्त्वाची आहे यावर शिक्कामोर्तब झालंय. 

पालकमंत्री संभाजीराव पाटील यांच्या गटाने बंडखोरीने केल्याने ही लढत आणखी रंगतदार झालीय. पाटील यांचे समर्थक, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती बजरंग जाधव यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केलीय. मुख्यमंत्री फडणवीस हे भाजपमधे सर्वशक्तिमान नेते आहेत. औशात मात्र थेट मुख्यमंत्र्यांनाच त्यांच्या मंत्रीमंडळातल्या एका सहकाऱ्याने उघडउघड आव्हान दिलंय. राज्यभरात प्रचारसभा घेणारे मुख्यमंत्री गेल्या पाच वर्षांत नव्याने भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लातूर जिल्ह्यात मात्र कुठेही प्रचारसभा घेताना दिसले नाहीत.

भाजपमधल्या अंतर्गत बंडाळीमुळे ही लढत आणखी चर्चेत आलीय. काँग्रेसचे दोनवेळचे आमदार बस्वराज पाटील यांनीही अभिमन्य पवार यांच्यासाठी भाजप आपली सारी ताकद पणाला लावणार असल्याचा अंदाज घेत मोर्चेबांधणी केली. पाटील यांच्यामागे कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे. अमित शाह यांच्या सभेनंतर काँग्रेसने औशातच राहुल गांधींची सभा घेत ही जागा आपल्यासाठीही महत्त्वाची असल्याचं सांगितलं.

काँग्रेसने आपले विद्यमान आमदार असलेल्या किंवा बालेकिल्ल्यांमधेच राहुल गांधी यांच्या सभा ठेवल्यात. त्यावरून आपला खुंटा बळकट करण्याचं काँग्रेसचं धोरण असल्याचं दिसतंय. औशात बस्वराज पाटील यांना ताकद देत काँग्रेसने यावर एका रीतीने शिक्कामोर्तबही केलं. तसंच पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसलाही सोबत घेत एकदिलाने काम करण्याच्या प्रयत्न केला.

भाजपमधल्या अंतर्गत बंडाळीमुळे अभिमन्यू पवार यांच्या प्रचारात स्थानिक कार्यकर्त्यांची खूप वानवा दिसली. त्यामुळे पवार यांनी आपल्या मित्रमंडळींना कामाला लावलं. माजी सैनिक, महिला बचत गट यांना सोबत घेऊन प्रचाराचा किल्ला लढवला. शिवसेनेच्या स्थानिक नेतेमंडळींना विश्वासात घेऊन मतदारसंघ पिंजून काढला. तरीही गावागावातल्या, गल्लीतच्या राजकारणाचं गणित माहीत नसणारे भाजप कार्यकर्ते सोबत नसणं हे पवार यांच्यासाठी धोक्याचं ठरू शकतं. आणि हीच गोष्ट बस्वराज पाटील यांच्या पथ्यावर पडू शकते.

हेही वाचाः मुंडे भावंडांचं भवितव्य ठरवणार १९ सेकंदांची क्लिप ठरणार?

साकोली विदर्भातली टफफाईट सीट

भंडारा जिल्ह्यातल्या साकोलीत भाजपकडून राज्यमंत्री परिणय फुके आणि काँग्रेसच्या नाना पटोले यांच्यात लढत रंगली. काँग्रेसचे माजी आमदार सेवक वाघाये यांनी बंडखोरी करत वंचित बहुजन आघाडीकडून तिकीट मिळवलं. त्यामुळे इथली लढत तिहेरी राहिली. पण शेवटच्या टप्प्यात फुके विरुद्ध पटोले असाच सामना झाला.

पटोले यांनी मोदींच्या शेतकरीविरोधी धोरणामुळेच आपण भाजप सोडत असल्याची टीका केली होती. त्यामुळे भाजपसाठी ही जागा प्रतिष्ठेची आहे. इथे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली. मुख्यमंत्र्यांनीही कधीकाळचे आपले पीए फुके यांच्यासाठी सभा घेतली. पटोले यांच्या प्रचारासाठी शत्रुघ्न सिन्हा, हार्दिक पटेल यांनी सभा घेतल्या. 

कधीकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पीए असलेले फुके नागपूरहून येऊन भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून आमदार झाले. दुसरीकडे पटोले हे स्थानिक उमेदवार आहेत. साकोलीत अगोदरच काट्याची लढत रंगली असतानाच मतदानाची टक्केवारी वाढलीय. त्यामुळे लढत आणखी रंगतदार झालीय. साकोलीमधे जिल्ह्यात सर्वाधिक ७१.१६ टक्के मतदान झालं.

इथे एक फॅक्टर काम करताना दिसतोय. भाजपने तुमसरचे विद्यमान आमदार चरण वाघमारे यांचं तिकीट कापलंय. त्यामुळे त्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केली. तेली समाजातल्या वाघमारेंचं तिकीट कापण्यात पालकमंत्री फुकेंचाच हात असल्याची इथे दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. साकोलीत तेली समाजाची संख्या मोठी आहे. ही नाराजी दूर करण्यात यश आल्यास फुके यांचा विजयाचा मार्ग सोपा होऊ शकतो.

हेही वाचाः 

नरेंद्र मोदींची शेवटची प्रचारसभा रंगली नाहीच

प्लास्टिकमुक्त देशाचं स्वप्न जंतू साकार करणार?

यंदाच्या विधानसभा निवडणुकीचं वेगळेपण काय?

येत्या निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्र कुणाला देणार कौल?

सगळं संपलंय, असं वाटेल तेव्हा शाहबाज नदीमची ही गोष्ट वाचा