देशाने लढाई करावी पासून विश्वचषक जिंकावा हा उन्मादच

१३ जुलै २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


आपण सेमी फायनलमधे हरलो आणि वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर पडलो. तसं सर्व भारतीय क्रिकेटप्रेमींनी दु:ख, राग, संताप सोशन मीडियापासून सगळीकडे व्यक्त केला. भारतानं पाकिस्तानला विश्वचषक स्पर्धेत नेहमी हरवलंय. पण न्यूझीलंडनेसुद्धा भारताला नेहमीच पराभूत केलंय हा इतिहास कुणी लक्षात घेतला नाही. आपण सोयीप्रमाणे काही गोष्टी विसरतो. भारताने लढाई करावी पासून विश्वचषक जिंकायलाच हवा ही उन्मादाची भाषा असते. सध्या हा उन्मादच नको तेवढा वाढतोय.

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतून टीम इंडिया बाहेर गेला आणि अनेकांना मानसिक धक्का बसला. कारण साखळीत फक्त एकच पराभव पत्करणाऱ्या ह्या संघाची वाटचाल विश्वचषक जिंकूनच संपणार असं ज्याला त्याला वाटत होतं. तशात उपांत्य फेरीत न्यूझीलंड बरोबर गाठ पडल्यानं भारत अंतिम फेरीत पोचणार असं गृहीत धरलं गेलं होतं. अंतिम सामना इंग्लंडशी होणार आणि त्यांना वेगवान पद्धतीने हरवलं जाणार असंही सर्वसामान्य क्रिकेट चाहत्यांना वाटत होतं.

टीम इंडियाला स्पर्धेत खुला वाव होता

क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे ही गोष्ट भारतीय नेहमीच दुर्लक्षित करतात. आपल्या खेळाडूंना ते ‘रजनीकांत’ समजतात. ते काहीही करू शकतात असा अनेकांचा समज आहे. मोठी स्वप्नं बघायची आणि त्यात रमायचं ही भारतीयांची सवय आहे. स्वप्न जरूर बघावीत, महत्वाकांक्षी असावं हे सगळं खरयं. पण शेवटी वास्तव बघायचं असतं.

भारतीय संघाला ह्या स्पर्धेत अक्षरशः खुला वाव दिला गेला होता. त्यांच्या सोयीनं सामने आयोजित केले होते. खेळपट्ट्यामधला डंख काढून घेण्यात आला होता. हे सामने बघायला भारतीय एकच गर्दी करतात. त्यांचा उत्साह अफलातून असतो. भारतीय मंडळ सर्वात श्रीमंत आहे. मेजर हक्क पुरस्कर्ते हे भारताकडून होते. याशिवाय टीवीवरच्या प्रेक्षकांची संख्या सुद्धा लक्षात घेतली गेली होती. म्हणून शनिवार रविवार असे सामने होते.

भारतीय संघ जेवढी चांगली कामगिरी करेल तेवढा गल्ला भरणार होता आणि सट्टेबाजार सुद्धा गरम होणार होता. ह्या सर्व गोष्टींमुळे भारतीय संघाची दौड दमदारपणे सुरु होती. पण न्यूझीलंड विरुद्ध भारताचे बिनीचे तीन फलंदाज प्रत्येकी एक धाव काढून बाद झाले तिथंच सामन्याची सूत्रं न्यूझीलंडकडे गेली. नंतर धोनी-जडेजा ह्यांची फटकेबाजीही तमाम भारतीय प्रेक्षकांना दिलासा देण्यासाठी होती.

 हेही वाचा: सिंगल-डबलची स्ट्रॅटेजी फेल आणि भारत वर्ल्डकप बाहेर

भारत, क्रिकेट चाहते आणि उन्माद

पाकिस्तानी चाहत्यांना नावं ठेवणाऱ्या भारतीय चाहत्यांची मनोवृत्तीही वेगळी नाही. त्यांच्याकडून खेळाडूंना शिवीगाळ ठरलेलीच. आता झुंज देऊन पराभूत झाल्यानं कुणी खेळाडूंना अधिक दोष देणार नाही. अगदी पटकथा लिहीलेली असावी तसं सगळं घडत होतं असं कुणालाही वाटेल. भारताचे लाड करायचे तेव्हा केले गेले. अंतिम सामना कुणाचाही असला तरी गर्दी होतेच. साहजिकच भारतीय संघाला ढिला दोर दिला गेला होता.

भारतीय चाहते किती उतावीळ आणि गुडघ्याला बाशिंग बांधून असतात याची आता सर्वांनाच कल्पना आलीय. ढोलताशे घेऊन, तोंड रंगवून, झेंडे फडकवून, नाचून आरडाओरडा करून सहलीसारखे येणाऱ्या त्या उल्लू प्रेक्षकांची खरंच कीव वाटते. असा धांगडधिंगा भारतात बहुतेक ठिकाणी चालतो. पण इंग्लंडमधे सुशिक्षित, सुजान आणि सुसंस्कृत असा भारतीय तिथं असलेल्या समजाला खोटं ठरवणारी मस्ती होती. गेल्या काही वर्षांत उन्माद ही भारतीयांची ओळख झाली आहे.

भारत महासत्ता बनणार अशी स्वप्नं दिली गेल्यापासून हा उन्माद वाढताना दिसलाय. भारताने लढाई करावी पासून विश्वचषक जिंकावा अशी ही उन्मादाची जात आहे.

हेही वाचा: झोपाळू रोहीत शर्मा आळस झटकून जगातला टॉप बॅट्समन बनला

आपण हरलो त्याची कारणं

भारतीयांना भारतीयच उल्लू बनवत आलेत. कारण भारतीय भावनाशील आहे. प्रसिद्ध समीक्षकांनी सुद्धा हवा बघून भारतीय संघाचे गोडवे गायले. कुणी हे लक्षात घेत नाहीयं की ह्या संघाची मधली फळी कमकुवत होती. चौथ्या क्रमांकासाठी फलंदाज शेवटपर्यंत मिळालाच नाही. रिषभ पंतला बळे बळे चौथ्या क्रमांक दिला गेला. पण ही चाल चालली नाही. शंकर, कार्तिक ह्यांची निवड योग्य नव्हती. जाधव, धोनी हे सामने खेचणारे फलंदाज उरलेच नाहीत. कुलदीप, चहल आणि पंड्या हे अति चढवले गेले होते.

तर भुवनेश आणि शमी ह्यांच्यात डावा उजवा ठरवणं कठीण झालं होतं. एकूण हा संघाचा समतोल हा मजबूत नव्हताच. रोहीत शर्माला सुदैवाने डावाच्या सुरुवातीलाच चार वेळा जीवदान मिळालं. ही साथ उपांत्य सामन्यात काही लाभली नाही. आपण पाकिस्तानला हरवल्यानंतर खूपच जोशात होतो. पण त्या पराभवानं आता सर्वांना जमिनीवर आणलंय. आपण पाकिस्तानला विश्वचषक स्पर्धेत नेहमी हरवलंय. पण न्यूझीलंडनेसुद्धा भारताला नेहमीच पराभूत केलंय हा इतिहास कुणी लक्षात घेतला नाही. हीच मोठी चूक होती.

हेही वाचा: 

टीम इंडियाला यशाचा टीळा लावणारे रवी शास्त्री मैदानावर आल्यावर गो बॅकचे नारे लागायचे 

वारकरी संप्रदायाने गुरुपंरपरेला फाटा दिला म्हणूनच हा संप्रदाय तळागाळापर्यंत पोचला 

लिटल मास्टर गावस्करच्या सत्तरीनिमित्त हे तर वाचावंच लागेल 

संत चळवळ म्हणजे जगणं सुंदर करण्याचा मनोमन प्रयत्न

संत कबीरांची पालखी वाराणशीतून पंढरपूरात येत होती