मराठी गरबा का बंद झाला?

०७ ऑक्टोबर २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


नवरात्र म्हणजे मज्जा नु लाईफ. नाच, गाणी, खाणं-पिणं आणि धम्माल. गरबा आणि दांडीया खेळणं ही मुंबईकरांची जणूकाही परंपराच बनलीय. आपण मराठी लोक गुजराथी गरबा खेळण्यात कधीच मागे नसतो. पण मग आपण मराठी गरब्यात का मागे पडलो? काही वर्षांपूर्वी सुरू झालेला मराठी गरबा आता बंद पडलाय.

‘हालो, हालो ने रमवा नवरात्री’ हे शब्द गेल्या काही दिवसांपासून आपल्या कानावर पडतायत. पावसाळा संपल्यानंतर आणि थंडी सुरू होताना नवरात्र येते. आणि नवरात्रीत आपण गरबा, दांडिया खेळतो. आणि आपल्याला आवडतंही. मुंबईत तर वेगवेगळे आणि मोठमोठे इवेंट होतात.

मुंबईत गुजराथी आणि राजस्थानी मोठ्या प्रमाणात राहात असल्यामुळे नवरात्र अगदी जोशात साजरी होते. इथल्या सर्व गुजराथी नसलेल्या लोकांनाही गरबा, दांडिया खेळायला आवडतो. आणि गुजराथी नसलेलेही खेळण्यात पटाईत असतात. या अगुजराथ्यांमधे मराठी लोक जास्त असतात. म्हणून गरब्यात एक-दोन मराठी गाणी हमखास वाजतात. काही वर्षांपूर्वी पूर्णच्या पूर्ण गरबा मराठीत व्हायचा. पण आता मात्र असा गरबा होत नाही.

गरबा इवेंटमुळे रोजगार मिळतो

गरब्याच्या मोठमोठ्या इवेंटमधे डान्सच्या स्पर्धा, फूड फेस्टिवल, गेम, शॉपिंग फेस्टिवल, ऑर्केस्ट्रा किंवा डीजे अशा बऱ्याच गोष्टी असतात. आणि बक्षिसंही हजारो-लाखो रुपयांची असतात. त्यामुळे नवरात्रीच्या आधी खास गरब्याचा सरावही केला जातो. तसंच बऱ्याचशा जीममधे दोन ते एक महिन्यापूर्वीपासून गरब्याचे विशेष क्लासही होतात.

क्लासमधे गरबा डान्स शिकता येतो, वजन घटवता येतं, डान्स करता करता व्यायमही होतो. त्यामुळे अनेक लोक असे क्लास लावतात. यासाठी २ हजार ते ५ हजार रुपये फी आकारली जाते. याचा फायदा म्हणजे गरबा खेळताना स्टेप्स तर परफेक्ट जमतात आणि खेळण्याचा स्टॅमिनाही राहतो. तसंच युट्युब ट्युटोरीअलनासुद्धा लोकांची मोठी पसंती मिळाली, असं जिम इंन्स्ट्रक्टर अर्जुन रामटेके यांनी कोलाजला सांगितलं.

गरबा इवेंटमधे फूड, शॉपिंग, गेम, टॅटू, पेटिंग, मेंदीचे स्टॉल लावणाऱ्या वेंडरचासुद्धा फायदा होतो. तसंच गायक, वादक, डान्स शिक्षक यांनाही यानिमित्ताने पैसे कमावण्याची संधी मिळते. म्हणजे गरबा खऱ्या अर्थाने इवेंट झाला. ज्यामुळे इतर छोटे व्यवसायही सुरू झाले. आणि लोकांना रोजगार मिळाला. मराठी गरबा सुरू झाल्यावर टिपऱ्या, भोंडला शिकवणारे, मराठी गायकांनाही मोठी संधी मिळाली.

पारंपरिक गरबा कसा होता?

आज आपल्याला गरबा इवेंट म्हणून माहितीय. पण मुळात गरबा हा शब्द ‘गर्भ’ या संस्कृत शब्दावरून आलाय. ज्याचा अर्थ गर्भाशय किंवा पोटात वाढणारं बाळ असा होतो. म्हणजेच गरबा किंवा नवरात्रीतून आपण बाई, बाईपण आणि प्रजनन शक्ती साजरी करतो. आणि त्यांच्या सन्मानाखातर हा उत्सव होतो. नवरात्रीत आपण देवीची आणि देवीच्या रुपांची पूजा करतो. या देव्या पुराणातल्या कथेतून आल्यात, ही माहिती अल्का सुभेदार यांनी दिली. त्या दादरमधल्या तेजस्विनी महिला मंडळाच्या अध्यक्षा आहेत.

पूर्वी गरबा वेगळ्या प्रकारचा होता. मध्यभागी दिवा ठेवून, फुलांची-रंगाची रांगोळी काढून किंवा देवीच्या मूर्तीभोवती फेर धरून डान्स केला जायचा. तसंच टिपऱ्या किंवा दांडिया या लाकडी असायच्या. आणि त्यावर हळद, कुंकू, तांदुळाच्या पीठाने चित्रकारी केलेली असायची. आता मात्र देवी, पूजा, आरती या गोष्टी वेगळ्या. आणि गरबा, दांडिया हा इवेंट वेगळा असं चित्र बघायला मिळतं, असंही सुभेदार म्हणाल्या.

हेही वाचा: घटस्थापना : भारतातल्या कृषीप्रधान संस्कृतीचं दर्शन घडवणारा सण

गरब्यात बॉलवूड गाणीच

गरबा डान्स करण्यासाठी ताल महत्त्वाचा असतो. म्हणून तशीच गाणी इवेंटमधे वाजवली जातात. यात आता डीजे, डिस्को, बॉलिवूड गरब्यामुळे पारंपरिक गाणी मागे पडलीयत. खरंतर गरब्याची गाणी म्हणजे पारंपरिक लोकगीतं. पुढे त्याची गाणी बनली. ज्यात ‘तारा विना श्याम’, ‘कुकडा तारी बोली’, ‘डोलीना ढोल ढीमो वगाड मा गरबा’, ‘आओ तो रमवाने’ इत्यादी. आता मात्र बॉलिवूड, रॅप, पंजाबी गाण्यांचा ट्रेंड आहे. यात एखाद दोन गुजराथी, राजस्थानी, मराठी गाणीसुद्धा वाजवली जातात.

दांडिया आणि गरब्याच्या गाण्यांसाठी खास डीजे, ऑकेस्ट्रा असतो. विशेष गाणारे गायक, गायिका गरब्यासाठी गाण्यांत बदल केले जातात. जेणेकरून नाचताना मज्जा येईल. गरब्यामुळे सगळ्यात फेमस झालेल्या गायिका म्हणजे फाल्गुनी पाठक. साधारण दहा वर्षांपूर्वी गरबा इवेंट होत असताना फाल्गुनी पाठक यांना फेम मिळालं. त्या पारंपरिक लोकगीतं गातात. पण लोकांच्या डिमांडमुळे आणि आयोजकांमुळे त्याही बॉलिवूड गाणीच गातात, असं गायक केशव मोने यांनी कोलाजला सांगितलं.

गुजराथी गरब्याचं मराठी वातावरण

साधारण २०१० पासून मराठी गरब्याचा ट्रेंड आणण्याचा प्रयत्न झाला. त्याची चर्चाही खूप जोरात झाली. लाईव गरब्याचं प्रक्षेपण, बातम्या, फीचर स्टोरीज अगदी फाल्गुनी पाठकसुद्धा मराठी गाणं गाऊ लागल्या. सॉलिड प्रमोशन झालं. पण हे सगळं हळूहळू बंद झालं. आता फक्त एखाद दोन मराठी गाणी वाजतात. पण हा मराठी गरबा का बंद झाला माहिती नाही. आणि कधी बंद पडत गेला हे आपल्याला समजलंसुद्धा नाही.

एकूण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात नवरात्र ही फक्त मुंबईत साजरी होते. इतर ठिकाणी वेगवेगळ्या परंपरांनुसार सण साजरा होतो. पण मुंबईत गरबा, दांडिया, दुर्गा पूजा असं सगळंच जोमात साजरं होतं. अगदी इथल्या जिम, पब, क्लब, ऑफीस, सोसायट्या, मंडप ज्याला पंडाल म्हणतात तिथेही मोठमोठे कार्यक्रम होतात. अगदी जत्रेसारखं वातावरण असतं.

या गरब्यात सगळ्यात जास्त सहभाग हा मराठी लोकांचा असतो. इथल्या गुजराथ्यांनाही मराठी खूप चांगलं येतं. आणि तेही मराठी सणात सहभागी होतात. तसंच या कार्यक्रमांत मराठी कलाकार मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात. त्यामुळे गुजराथी गरब्यात मराठी वातावरण असतं.

हेही वाचा: चला, बाईविषयीचे हे नवरंगी समज तोडत आपण सीमोल्लंघन करूया!

मराठी गरब्याला अमराठींचा प्रतिसाद

साधारण २००८ नंतर सगळीकडे मराठी भाषा वाचवा, दुकानांवर मराठी पाट्या, नोकरीत मराठी लोकांना प्राधान्य, मराठी लोकांचा बिझनेस वाढवा इत्यादी प्रकारचे उपक्रम वाढले. आणि सगळीकडे मुंबईत राहणाऱ्यांनीही मराठीत बोला, मराठी शिका, टॅक्सी-रीक्षा चालकांनावरही मराठीची सक्ती केली. मॉल, शॉपिंगसेंटरमधे ‘हॅलो, सर किंवा मॅम’ऐवजी ‘नमस्कार’ बोलून स्वागत होऊ लागलं.

त्या काळात मराठी सिनेमांनाही सोन्याचे दिवस येऊ लागले. मराठी गाणी, संगीत, सिनेमांची पुन्हा चर्चा होऊ लागली. मराठी कलाकार सेलिब्रेटी होऊ लागले. अगदी मराठी कलाकारांच्या पर्यावरणस्नेही होळी पार्ट्या, दहीहंडीतला मराठी कलाकारांचा सहभाग हे सगळं वाढत होतं. अशात मुंबईतला गरबा मराठी झाला नसता तर आश्चर्य. यासाठी बऱ्याचशा मराठी कलाकारांनी मराठी गरब्यासाठी पुढाकार घेतला.

मराठीसह अमराठी मुंबईकरांनीही मराठी गरब्याला पसंती दिली. आणि बहुभाषिक मुंबईकरांचाही प्रतिसाद मिळाला. मुंबईत दादर, परळ, गोरेगाव, अंधेरी, बोरीवली सगळीकडे मराठी गायक-गायिका दिसले. मराठी कलाकारही मंडळात जाऊन गरबा खेळले. सर्वच मंडळात, मंडपात, पंडालात मराठी गाणी वाजली. त्याचं खूप मोठं प्रमोशनही झालं. मराठी गरबाचा ट्रेंड आणण्यासाठी खूप प्रयत्न झाले.

गरब्यात पंजाबी गाणी

आताची परिस्थिती ही आहे की मराठीसह गुजराथी गाणीसुद्धा गरब्यात नसतात. मराठी आणि गुजराथी गाणी ज्या पंडाला वाजतात तिथेही ती नावाला वाजवली जातात. तीही अगदी सुरवातीला ६.३० किंवा ७ वाजता. त्यानंतर मात्र बॉलिवुड गरबा सुरू होतो. डीजेत ही पारंपरिक गाणी नव्या गाण्यांबरोबर मिक्स केली जातात. मराठी गाण्यात ‘झिंगाट’, ‘कोंबडी पळाली’, ‘माझी चिमणी उडाली’ इत्यादी काही गाणी आवर्जून ऐकायला मिळतात.

सध्या शहरात शेवटच्या तीन दिवशी गरबा मोठ्या प्रमाणात खेळला जातो. इतर दिवशी थंड प्रतिसाद मिळतो. शेवटच्या दिवासांचं तिकीटही महाग होतं. आणि राहिला प्रश्न मराठी गरबा बंद पडण्यामागे किंवा पारंपरिक गुजराथी गाणी न वाजवण्यामागे दोन कारणं आहेत.

एक म्हणजे मुळात लोकांकडून रिस्पॉन्स कमी येतो. दुसरं म्हणजे स्पॉन्सर ज्या कम्युनिटीचा असतो त्याची गाणी जास्त वाजवली जातात. कित्येकदा नगरसेवक, आमदाराने आयोजित केलं असेल तर मराठी, कोळी गाणीसुद्धा गरब्यात लावतात. सध्या पंजाबी गाण्यांचं प्रमाण वाढलंय. पंजाबी गायक कमी दरात गाणी गातात हेसुद्धा त्यामागचं कारण आहे, ही सर्व माहिती मुंबईतले गरबा आयोजक राहुल गुप्ता यांनी कोलाजला दिली.

हेही वाचा: 

शेवटी राज्य कुणाचं, भाजपचं की आयारामांचं?

हनी ट्रॅप: पहिल्या वर्ल्ड वॉरपासून ते सोशल मीडियापर्यंत

जगभरातल्या तरुणांना दोस्ती शिकवणारी फ्रेंड्स पंचविशीत